नारायणगुरु : (२० सप्टेंबर १८५४ – ? १९२८). केरळमधील एक थोर धर्मसुधारक व समाजसुधारक. त्यांचा जन्म चंपाळती नावाच्या खेड्यात (ता. नेय्यांतिकर, जि. त्रिवेंद्रम) ईळव नावाच्या एका अस्पृश्य जातीच्या कुटुंबात झाला. वडिलांचा शेती हा व्यवसाय होता. नारायणगुरूंचे वडील माटन आशान व चुलते कृष्णन् वैद्यर या दोघांचाही संस्कृतचा अभ्यास होता आणि ज्योतिषशास्त्र व आयुर्वेदाचेही त्यांना ज्ञान होते. नारायणगुरूंच्या आईचे नाव कुट्टी. त्यांचे संस्कृत, तमिळ व मलयाळम्चे आरंभीचे शिक्षण चुलत्यापाशीच झाले व प्राथमिक शिक्षण चंपाळती मुथा पिळ्ळा यांच्या स्थानिक शाळेत पार पडले. पुढे कुम्मम्पळ्ळी रामन् पिळ्ळा आशान (काही चरित्रकांच्या मते पुतुप्पळ्ळी रामन् पिळ्ळा) यांच्याकडे त्यांनी संस्कृत, काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र व अलंकारशास्त्र यांचे अध्ययन पूर्ण केले. तरुण वयातच त्यांनी संस्कृत, तमिळ व मलयाळम् या तिनही भाषांवर उत्तम प्रभुत्व संपादन केले. त्यानंतर वेदान्ताचा आणि योगविद्येचा अभ्यास त्यांनी चट्टाबी स्वमीकळ (कुंचन पिळ्ळा चट्टाबी) आणि थैक्कर अय्यवू या दोन गुरूंपाशी राहून पूर्ण केला. नारायणगुरूंचा लहानपणापासूनच वैराग्याकडे ओढा असल्याने पारंपरिक उच्च धार्मिक शिक्षण पूर्ण झाल्यावर सत्याच्या शोधासाठी विमुक्त जीवन जगण्याचे त्यांनी ठरविले. तथापि वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना स्वजातीयांची विपन्नावस्था, हलाखी, त्यांच्यातील गाढ अज्ञान व त्यांच्यावर होणाऱ्या सामाजिक अन्यायाचे विदारक दर्शन त्यांना झाले आणि त्यामुळे त्यांच्या जीवनाला वेगळीच दिशा मिळाली. यापुढील उर्वरित संपूर्ण जीवन त्यांनी ईळव जातीच्या त्याचप्रमाणे केरळमधील इतर अस्पृश्य जातींच्या उद्धारासाठी वाहून घेतले.
अस्पृशांच्या उद्धारार्थ नेमका विधायक कार्यक्रम हाती घेणे, अस्पृश्यांना संघटित करणे, त्यांच्यासाठी शैक्षणिक संस्था निर्माण करणे, धर्मसुधारणा करणे, लोकशिक्षण व लोकजागृतीसाठी सतत प्रयत्नशील राहणे, अशा विविध अंगांनी त्यांनी आपली चळवळ जाणीवपूर्वक विकसित केलेली दिसते. अस्पृश्यांतील पिढ्यान्पिढ्यांच्या धार्मिक संस्कारांचा अभाव त्यांच्यातील अनिष्ट प्रवृत्तींचे मूळ कारण आहे, असे त्यांना वाटे. त्यामुळे अस्पृश्यांसाठी असे संस्कार करणाऱ्या मंदिराच्या स्थापनेचा अभिनव कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. त्रिवेंद्रमजवळील अरुविप्पुरम, अंजेंगो, पेरिंगोत्तुकर, त्रिचूर, कननोर, तेल्लीचेरी, कालिलत, मंगलोर, वरकळ इ. महत्त्वाच्या ठिकाणी सु. १० वर्षांत त्यांनी शंभरांहून अधिक मंदिरे स्थापन केली. ‘सर्वांसाठी एकच जात, एकच धर्म व एकच परमेश्वर ’, हे त्यांच्या चळवळीचे ब्रीदवाक्य बनले. त्यांच्या मंदिरातून देवतापूजेपेक्षाही नैतिक शिक्षण, सर्वधर्मसमभाव, बंधुता व स्वच्छता या गोष्टींना अधिक प्राधान्य देण्यात येई. माणसाचे ऐहिक जीवन अधिक सुखी, प्रेममय व सहिष्णुतेचे बनविणे हे श्रेष्ठ ध्येय असून त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी देवालयांची जागा विद्यालये घेतील, अशी त्यांचा श्रद्धा होती. माणसांमधील परस्परबंधुभाव वाढीस लागण्याच्या दृष्टीने सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने त्यांनी श्रीलंकेचा दोनदा दौराही केला. त्यांच्या प्रेरणेनेच अलवाये येथे ‘विश्वबंधुत्व परिषद’(कॉन्फरन्स ऑफ ब्रदरहूड, १९२१) तसेच ‘सर्व धर्म परिषद’ (१९२४) अशा दोन परिषदा घेण्यात आल्या व अध्यात्मविद्येच्या अभ्यासासाठी ‘ब्रह्म विद्या मंदिरम्’ही संस्थाही स्थापन करण्यात आली.
नारायणगुरूंचे सर्वांत श्रेष्ठ कार्य म्हणजे ईळव जातीच्या उद्धारार्थ त्यांनी स्थापन केलेली (१५ मे १९०३) ‘श्री नारायण धर्म परिपालन योगम्’ (एस्. एन्. डी. पी. योगम्) ही संस्था होय. अस्पृश्यांच्या सामाजिक, आर्थिक गरजांकडे लक्ष पुरविणे त्याचप्रमाणे त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश होता. संस्थेतर्फे अनेक माध्यमिक व उच्च विद्यालये स्थापन करण्यात आली आणि गरजू व हुशार अस्पृश्य विद्यार्थांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यात आली. महाकवी कुमारन आशान, के. अय्यप्पन् (सहोदरन् अय्यप्पन् म्हणूनही प्रसिद्ध) व डॉ. पी. नटराजन् अशा काही नामवंत व्यक्तींचा त्या दृष्टीने उल्लेख करता येईल. संस्कृत आणि वेदान्त यांच्या अभ्यासासाठीही पाठशाला स्थापन करण्यात आल्या.
नारायणगुरू हे ⇨कुमारन आशानांचे आध्यात्मिक गुरू होत. बंगलोरला त्यांचे शिक्षण नारायणगुरूंच्या देखरेखीखाली झाले. त्याचप्रमाणे के. अय्यप्पन् यांना उच्च विद्यापिठीय शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक मदत केली तसेच डॉ. पी. नटराजन् हे पॅरिसला जाऊन उच्च विद्याविभूषित होऊन परतले. नारायणगुरूंच्या कार्याचा खोल ठसा या तिघांच्याही जीवनावर उमटला व उत्तरायुष्यात त्यांनीही त्याच कार्यासाठी आपले जीवन वाहिले. एस्. एन्. डी. पी. योगम् या संस्थेतर्फे विवेकोदयम् हे नियतकालिक प्रसिद्ध होई. केरळमध्ये, द. भारतात इतरत्र तसेच श्रीलंकेत नारायणगुरूंना लक्षावधी निष्ठावंत अनुयायी लाभले. सर्वांभूती समभाव, मानवता, प्रेम व बंधुता यांना त्यांनी आपल्या शिकवणुकीत सतत प्रधान्य दिले.
त्रिवेंद्रमपासून सु. ३२ किमी. वरील शिवगिरी, वरकळ येथे १९०३ च्या सुमारास ते स्थायिक झाले होते व तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांची समाधीही तेथेच बांधण्यात आली आहे. १९५४ मध्ये केरळमध्ये त्यांची जन्मशताब्दी भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली.
संस्कृतमध्ये आठ, तमिळमध्ये दोन आणि मलयाळम्मध्ये सु. ३० अशी ४० पेक्षाही अधिक त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यांची काव्यरचना विपुल असून ती प्रासादिक व सुमधुर आहे. त्यांची बहुतेक पद्यरचना धार्मिक स्तोत्रे व तत्त्वचिंतनात्मक स्वरूपाचीच आहे. त्यांच्या संस्कृत रचनेवर शंकराचार्यांचा प्रभाव दिसतो. आपल्या सुरुवातीच्या कवितांतून (१८८४) त्यांनी शिवपुराणांतील कथा व अद्वैत वेदान्त यांचा मनोरम मिलाफ साधला आहे. आत्मोपदेशतकम् (१८९७) हे त्यांचे वेदान्तावरील काव्य आहे, तर दर्शनमाला (१९१६) हे संस्कृत काव्य गूढवादी आहे. कालीनाटकम्, शिवशतकम्, चिज्जटचिंतनम्, कुंडलिनिपाट्टु, जातिनिर्णयम्, जातिलक्षणम् इ. त्यांच्या मलयाळम्मधील रचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितेची संकलनेही प्रसिद्ध झालेली असून त्यांतील ‘श्री नारायणगुरू धर्म संघम्’, वरकळर्फे प्रसिद्ध झालेले श्री नारायण गुरुदेव कृर्तिकळ (१९५३) हे अधिक प्रसिद्ध आहे.
नामवंत मल्याळम् साहित्यिकांनी त्यांची चरित्रे लिहीलेली आहेत. त्यांपैकी मूर्कोत्तू कुमारन् यांचे दोन खंडांतील नारायण गुरुस्वामियुटे जीवचरित्रम् (१९३०), के. बलराम पणिक्कर यांचे नारायण गुरुदेवन् (१९४८) व पी. नटराजन् यांचे द वर्ल्ड ऑफ द गुरु (१९५२) ही विशेष प्रसिद्ध आहेत.
पोरे, प्रतिभा
“