नायक्रोम : निकेल आणि क्रोमियम धातूंचे प्राधान्य असलेल्या मिश्रधातू. या मिश्रधातूंच्या तारांचा उपयोग प्रामुख्याने विद्युत् रोधन व विद्युत् रोधापासून उष्णतानिर्मितीसाठी होतो. उच्च तापमान दीर्घकाल सहन करता येणे हा ह्या मिश्रधातूंचा मुख्य गुण आहे. त्यांचा विद्युत् रोधनाचा गुणांक जास्त असल्यामुळे रोधन-उष्णतानिर्मिती सहज होते. यांत उच्च तापमान सहनशीलता पुढील कारणांमुळे येते. (१) उच्च वितळबिंदू निकेल व क्रोमियम यांचे वितळबिंदू अनुक्रमे १,४५५° व १,८००° से. असून त्यांच्या मिश्रधातूंचा किमान वितळबिंदू १,३४३° से. आहे. (२) आरक्षक कवच पटल : ह्या मिश्रधातूंच्या पृष्ठभागावर क्रोमियम ऑक्साइडाचे दुर्भेद्य व अप्रवेश्य असे कवच तयार होते व बाहेरील ऑक्सिजनाशी संपर्क तुटून त्यामुळे होणारा ऱ्हास थांबतो. हे कवच केवळ अप्रवेश्यच नव्हे, तर चिवट असल्यामुळे ते गरम व थंड होत असताना होणाऱ्या प्रसरण- आकुंचनामुळेही त्याला भेगा पडत नाहीत व ते धातूला चिकटून राहणारे असते. (३) उच्च तापमानावर धातूंतील स्फटिक वृद्धिंगत होतात. त्यामुळे ठिसूळपणा निर्माण होतो, तो विद्युत् रोधकाच्या आयुष्याला बाधक ठरतो. निकेलामुळे स्फटिकांची वृद्धी लवकर होत नाही. म्हणून निकेलच्या मिश्रधातू उच्च तापमान सहन करू शकतात.

प्रकार : नायक्रोमाचे तीन मुख्य प्रकार आहेत. (१) ८०% निकेल, २०% क्रोमियम : ह्या मिश्रणाच्या तारा सर्वांत उच्च प्रतीच्या असून त्या १,२००° से. तापमानापर्यंत वापरता येतात. दीर्घायुष्यासाठी १,०००° से. पर्यंत त्यांचा सतत उपयोग करता येतो. गंधकीय रसायने व तज्जन्य वातावरणापासून ह्या तारांना दूर ठेवावे लागते. (२) ६०% निकेल, २४% लोह व १६% क्रोमियम : या मिश्रणाच्या तारा किंचित कमी प्रतीच्या आणि स्वस्त असून मध्यम तापमानाच्या उष्णतानिर्मितीसाठी व घरगुती विद्युत् उपकरणांसाठी (उदा., टोस्टर-पावाचे तुकडे भाजण्याची शेगडी, इस्त्री, मोठ्या शेगड्या, पाणी तापविण्याचे बंब इत्यांदींसाठी) वापरतात. हे मिश्रण कित्येक रसायनांच्या संपर्कात गंजत नाही म्हणून याचा उपयोग रासायनिक उपकरणे तयार करण्यासाठीही करतात. (३) ३५% निकेल, ५०% लोह व १५% क्रोमियम : हे मिश्रण ८००° से.च्या वर वापरत नाहीत. विद्युत् रोधक आणि हलक्या प्रतीची व स्वस्त घरगुती उपकरणे तयार करण्यासाठी याचा वापर करतात.

इंकोनेल व निमॉनिक ह्या व्यापारी नावांनी ओळखण्यात येणाऱ्या मिश्रधातू नायक्रोमामध्ये आणखी काही धातू मिसळून बनविलेल्या असतात. इंकोनेलावर अमोनिया वायूचा परिणाम होत नाही. तसाच हायड्रोजन व नायट्रोजन या वायूंचाही परिणाम होत नाही. त्यामुळे रासायनिक धंद्यांत व नायट्राइडिंगकरिता (वायुरूप अमोनियामध्ये तापवून विशेष प्रकारच्या पोलादाचा पृष्ठभाग अतिशय कठीण करण्याच्या प्रक्रियेकरिता) इंकोनेलाचा उपयोग करतात. निमॉनिक मिश्रधातू उच्च तापमानावर टिकणाऱ्या असल्यामुळे त्यांचा उपयोग वायू टरबाइन, रॉकेट एंजिन वगैरेसाठी वाढत्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

आळतेकर, वि. अ.