नानचांग : चीनच्या जिआंगसी प्रांताची राजधानी. लोकसंख्या ९०,००० (१९७० अंदाज). हे वूहानच्या आग्नेयीस २६० किमी. वरगान नदीकाठी, पोयांग सरोवराजवळ वसले आहे. नानचांग हे लोहमार्गांचे प्रस्थानक असून लोहमार्गाने जीओजीआंग, जजिआंग प्रांतातील हांगजो व हूनान प्रांतातील जूजोशी जोडले आहे. १९२७ मध्ये चँगकै-शेकनेक्कोमिंतांगमधून कम्युनिस्टांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चुतेह (जू-द) च्या नेतृत्वाखाली शिपायांनी बंड पुकारून कम्युनिस्ट सैन्याच्या उभारणीस येथेच सुरुवात केली व त्यामुळे चीनच्या इतिहासात हे विख्यात आहे. १९३९–४५ मध्ये हे जपानच्या ताब्यात होते. याच्या आसमंतात तांदूळ हे मुख्यपीक होत असून कापूस, तंबाखू, चहा, तांदूळ, चिनीमातीची भांडी यांची येथून निर्यात होते. १९४९ पासून नानचांगचे मोठ्या प्रमाणात औद्योगिकी करण होत असून सुतीकापड गिरण्या, कीटकनाशके, औषधनिर्मिती, साबण इ. उद्योग चालतात. अवजड उद्योगांबाबत हे नावारूपास येत असून येथे ट्रक, ट्रॅक्टर, डीझेल एंजिने, टायर इत्यादींचे कारखाने आहेत.
ओक, द. ह.
“