नागवर्मन्‌, पहिला : (दहावे शतक). कन्नड छंदःशास्त्रकार आणि कवी. दहाव्या शतकाच्या अखेरीस (सु.९९०) तो होऊन गेला. छंदोबुधिकर्नाटक कादंबरि हे दोन ग्रंथ त्याने रचले. छंदोंबुधीतील पाठदोष व प्रक्षिप्त पाठ यांमुळे ह्या कवीचा संप्रदाय, ग्रंथ-कर्तृत्व, आश्रयदाता राजा इत्यादींबाबत अभ्यासकांत बरेच मतभेद आहेत. महाकवी पंप याच्याप्रमाणेच पहिला नागवर्मन्‌ हाही जैन ब्राह्मण असावा, असे अनुमान आहे. तो छंदःशास्त्रवेत्ता, कवी व कुशल योद्धाही होता, असे दिसते. छंदोंबुधि हा छंदःशास्त्रावरील आद्य कन्नड ग्रंथ होय. संस्कृत छंदाबरोबरच ‘कर्नाटक विषय जाती’ म्हणजे कन्नड भाषेतील विशिष्ट छंद व वृत्ते यांचे स्वरूप आणि प्रकार यांचे विवेचन त्यात आढळते. कर्नाटक कादंबरि हा ग्रंथ बाणभट्टाच्या मूळ संस्कृत कादंबरीचे कन्नड रूपांतर होय. हे रूपांतर त्याने गद्यपद्यमिश्रित अशा चंपूप्रकारात संक्षेपाने केले आहे. कन्नड भाषेच्या ललितमधुर शैलीचा आविष्कार त्यात दिसतो. स्वतंत्र कृतीला साजेशी सहजता असलेले हे चंपूप्रकारातील रूपांतर कन्नडमध्ये पहिले आणि श्रेष्ठ प्रतीचे मानले जाते. दोन्ही भाषांवरील कवीच्या प्रभुत्वाचा व सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय त्याच्या ह्या रूपांतरातून येतो.

मळगी, से. रा. (क.) कायकिणी, गौरीश (म.)