नागपूर विद्यापीठ : महाराष्ट्र राज्यातील एक जुने विद्यापीठ. नागपूर येथे ४ ऑगस्ट १९२३ रोजी त्याची स्थापना झाली. त्याचे स्वरूप संलग्नक व अध्यापनात्मक असून त्याच्या कक्षेत अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व यवतमाळ या महसुली जिल्ह्यांतील महाविद्यालयांचा अंतर्भाव होतो. विद्यापीठात १३७ संलग्न महाविद्यालये, तीन घटक महाविद्यालये व २६ अध्यापनशाखा आहेत. विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध असून त्यात विविध विषयांवरील सु. २,१७,०६० ग्रंथ व सु. १३,६०० हस्तलिखिते होती (१९७६). विद्यापीठात मानव्यविद्या व समाजशास्त्रे, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण, विधी, वैद्यक, अभियांत्रिकी व तंत्रविद्या आणि गृहविज्ञान या विषयांच्या विद्याशाखा आहेत. द्विसत्र परीक्षापद्धतीचा अवलंब अभियांत्रिकी व तंत्रविद्या तसेच पदव्युत्तर विधी व वैद्यक या विषयांपुरता केलेला आहे. विद्यापीठात व्यवसायांचे मार्गदर्शन देणारा एक स्वतंत्र विभाग असून त्यातून पदवीधर विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन मिळते. छंदमंदिर हे या विद्यापीठाचे एक वैशिष्ट्य असून कल्पक विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना त्यात वाव लाभतो. या छंदमंदिरात इलेक्ट्रॉनिकी, छायाचित्रण, लाकूडकाम, मृदाशिल्पन (क्ले-मॉडेलिंग) वगैरेंचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळते. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू आणि कुलसचिव हे सवेतन अधिकारी सर्व प्रशासनव्यवस्था पाहतात. विद्यापीठाचे स्वतंत्र आरोग्य केंद्र असून विद्यापीठीय कर्मचारीवर्गास विनामूल्य आरोग्यसेवा तेथे उपलब्ध आहे. विद्यापीठाचा १९७५–७६ चा अर्थसंकल्प ३,४०,९१,००० रुपयांचा होता. १९७५–७६ मध्ये विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांतून ८१,२६२ विद्यार्थी शिकत होते.

नागपूर–अमरावती मार्गावर अंबाझरी तलावाच्या भव्य पार्श्वभूमीवर विद्यापीठ परिसर तयार होत आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात आला असून त्या ठिकाणी विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दृष्टीने सर्व सोयींनी युक्त आणि प्रयोगशाळांनी सुसज्ज अशा इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. यांशिवाय सुशोभित उद्यानही परिसरात तयार करण्यात आलेले  असून परिसरात  प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह, सुसज्ज ग्रंथालय इ. बांधण्यासंबंधींच्या योजना विद्यापीठाच्या विचाराधीन आहेत.

सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम नव्यानेच चालू केलेला असून सांख्यिकी, खनिज तंत्रविद्या इ. विषयांत विभाग चालू करण्याची योजना विद्यापीठाच्या विचाराधीन आहे.

देशपांडे, सु. र.