नागपूर जिल्हा : महाराष्ट्र राज्याच्या पूर्व विदर्भ या शासकीय विभागातील जिल्हा. क्षेत्रफळ ९,९२८ चौ. किमी., लोकसंख्या १९,४२,६८८ (१९७१). २०° ३५′ उ. ते २१° ४४′ उ. व ७८° १५′ पू. ते ७९° ४०′ पू. यांदरम्यान विस्तारलेल्या या जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी सु. १५० किमी. व दक्षिणोत्तर रुंदी सु. १३१ किमी. आहे. याच्या पूर्वेस भंडारा, आग्नेयीस व दक्षिणेस चंद्रपूर, नैर्ऋत्येस व पश्चिमेस वर्धा, वायव्येस अमरावती हे महाराष्ट्रातील जिल्हे असून, उत्तरेस व ईशान्येस मध्य प्रदेशातील अनुक्रमे छिंदवाडा व सिवनी हे जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्यातील ३·२४% क्षेत्रफल व्यापणाऱ्या व ३·८२% लोकवस्ती असलेल्या या जिल्ह्याच्या मध्यभागी नागपूर, पश्चिमेस काटोल, उत्तरेस सावनेर व रामटेक आणि दक्षिणेस उमरेड असे पाच तालुके आहेत. नागपूर हे ८,६६,०७६ लोकवस्तीचे शहर, जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व महाराष्ट्र राज्याची दुसरी राजधानी आहे.
पूर्वींच्या मध्य प्रांतातील नागपूर जिल्ह्यात, सध्याच्या वर्धा व भंडारा जिल्ह्यांतील काही प्रदेश होता व १९०८ सालापर्यंत त्याचे अवधे चारच तालुके होते. पाचवा सावनेर तालुका त्या वर्षी नव्याने अस्तित्तावत आला. १९११ पासून १९५५ पर्यंत जिल्ह्याच्या किंवा तालुक्यांच्या सीमांमध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. राज्यपुनर्रचना झाल्यावर १९५६ साली मध्य प्रांतातून हा जिल्हा मुंबई राज्यात व १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला. या जिल्ह्यात १,८८३ खेडी आणि १३ शहरे आहेत (१९७१).
भूवर्णन : संपूर्ण जिल्हा दख्खनच्या पठाराचाच भाग असून त्याची स. स. पासून सरासरी उंची २७५ ते ३०५ मी. आहे. मुख्यतः सातपुडा पर्वत व त्याच्या शाखोपशाखा म्हणजेच या प्रदेशातील उंचवटे आहेत. उत्तरेच्या बाजूला सातपुड्याची एक रांग, पश्चिमेस अरुंद पण पूर्वेकडे विस्तारत जवळजवळ १९ किमी. रुंदीची होते. या रांगेच्या दक्षिणेला अंबागड टेकड्या असून त्यांचा पश्चिम भाग या जिल्ह्यात आहे. या टेकड्यांच्या एका फाट्यावर ४२७ मी. उंचीच्या प्रसिद्ध रामटेक टेकड्या आहेत त्यांस पूर्वी सिंदुरगिरी किंवा तपोगिरी म्हणत. दुसरी रांग पश्चिमेला वर्धा नदीपासून सुरू होते व ती थेट आग्नेयीला वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्यांच्या हद्दी एकमेकींना जेथे भिडतात तेथपर्यंत येऊन पोहोचते. तिसरी उत्तरेकडची रांग, वर्धा आणि वैनगंगा नद्यांची खोरी विभागणारी आहे. तिचा सर्वांत उंच भाग पिलकापार येथे आहे. या सर्व रांगांमुळे जिल्ह्याचे जवळजवळ अर्धेअधिक क्षेत्र ३०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर आहे. डोंगरांची सरासरी उंची ४५० ते ६०० मी. पर्यंत आढळते. पश्चिमेकडील भागात गरमसूर, पिलकापार, महादागड या टेकड्या आहेत. पिपरडोल टेकड्या आणि जामगड टेकड्या उमरेड तालुक्यातील जलविभाजक बनलेल्या आहेत. पूर्वेकडील नद्यांच्या खोऱ्यांच्या सखल भागात चापेगडी टेकड्या एकाकी उंचवट्यासारख्या दिसतात.
जिल्ह्याचा सामान्य उतार पूर्वेकडे व आग्नेयीकडे आहे. मात्र काटोल तालुक्याचा बराच भाग पश्चिमेकडे उतरता आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग उत्तरेकडे सु. ६५० मी. पासून कन्हान नदीजवळ सु. २५० मी. पर्यंत उतरत गेलेला, ऊर्मिल पठाराचा आहे.
मृदा : जिल्ह्यात मुख्यत्वे मध्यम-काळी कपाशीची जमीन असून मोरांड-हलकी, पिंगट रंगाची खरडी-वाळूमिश्रित करड्या रंगाची बरडी-लालसर, रेताड व दगडगोट्यांची या मृदा आहेत. सावनेर, वर्धाखोरे व नागपूर, कामठी मैदान या भागांत काळी माती आहे. जिल्ह्यातील मोरांड माती कापूस आणि ज्वारीच्या पिकाला सोयीस्कर असून ती बहुतेक सर्व तालुक्यांत आढळते. रामटेक तालुक्याच्या उत्तर भागात व सुर नदीच्या खोऱ्यात तिचा रंग बराच हलका आढळतो. जिल्ह्याच्या पूर्व भागात भातशेतीची जमीन म्हणजे खरडी, तर बरडी ही डोंगरमाथ्यावर व उतारांवर आणि विशेषतः काटोल तालुक्यात आहे.
खनिज संपत्ती : खनिज संपत्तीच्या दृष्टीने नागपूर जिल्हा समृद्ध आहे. बोखारा (गोधनी), कामठी व उमरेड येथे दगडी कोळसा रामडोंगरी, कोदेगव्हाण, मनसर, कांद्री, खापा, गुमगाव, पारशिवनी येथे मंगल कोराडी येथे अभ्रक भिवापूर येथे लोखंड कांद्री, पटगौरी, देवलापार येथे चुनखडी चोरखैरी, खैरी, खापरी, बाजारगाव येथे चिकण माती यांखेरीज फेल्स्पार, गारगोटी, टंगस्टन, अँटिमनी वगैरे खनिजेही मिळतात.
नद्या : जिल्ह्याचा एकतृतीयांश भाग वर्धा नदीच्या खोऱ्याने व उर्वरित दोनतृतीयांश वैनगंगा नदीखोऱ्याने व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर काही भागात वर्धा नदी वाहते, तर पूर्व सरहद्दीवर थोड्या भागात वैनगंगा नदीचा प्रवाह आहे. काटोल तालुक्यातील जाम नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन वर्धेस मिळते. वुन्ना नदी नागपूर व उमरेड तालुक्यांतून वाहत येऊन वर्धेलाच मिळते. दक्षिणेकडील नंद नदी वर्धेला मिळते. जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागांतील सुर, आंब, पेंच, कन्हान, कोलार, चंद्रभागा, सांड, नाग व ईशान्य सीमेवरील बावनथरी वगैरे प्रमुख नद्या वैनगंगेच्या उपनद्या किंवा उपोपनद्या आहेत. पेंच, कन्हान, कोलार आणि वुन्ना या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत.
सुर नदीवरील रामसागर हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तलाव आहे. त्याशिवाय नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबाझरी तलाव व गोरेवाडा तलाव हे महत्त्वाचे जलाशय आहेत. वुन्ना नदीवरही बांध घालून तलाव निर्माण केलेला आहे. यांशिवाय अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने भरणारे उमरेड, कुही, भिवापूर, मांढळ, पांढरबोडी, मनसर इ. लहानमोठे तलाव आढळतात.
हवामान : देशातील मध्यवर्ती स्थानामुळे नागपूर जिल्ह्याचे हवामान सामान्यपणे कोरडे व अतिशय विषम आहे. मे महिन्यात कमाल सरासरी तपमान ४२·७° से. असते. दिवसाचे कमाल तपमान ४७·७° से. पर्यंत नोंदलेले आहे. जानेवारी महिन्यात किमान तपमान ३·९° से. पर्यंत उतरल्याची नोंद आहे. संक्रांत झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून उष्णता वाढू लागते आणि मे महिन्यापर्यंत उष्ण हवामान असते. मे महिना सर्वांत जास्त तपमानाचा असतो. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारा पाऊस सप्टेंबरअखेरपर्यंत चालू असतो व वातावरणात दमटपणा आढळतो. दिवाळीपासून संक्रांतीपर्यंत (ऑक्टोबर ते जानेवारी) हिवाळ्याचे दिवस असतात. हिवाळ्याचा कालावधी अल्प असला, तरी त्या काळात हवामान आल्हाददायक असते. उन्हाळ्यात दिवस लांबलचक असले, तरी रात्री बऱ्याचशा थंड असतात. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी तपमान २६·८° से. आहे.
पावसाचे वितरण संपूर्ण जिल्हाभर समान नाही. पश्चिमेकडे ते कमी आणि पूर्व विभागात अधिक आढळते. काटोल तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १०१ सेंमी. आहे. तर रामटेकचे १२१ सेंमी. आहे. जूनच्या दुसऱ्या सप्ताहात पावसास आरंभ होत असला, तरी तो जोरदार नसतो. जुलै व ऑगस्टमध्ये पावसात बऱ्याच वेळा खंड पडतो. सप्टेंबरमध्ये मात्र पाऊस नाही, असे होत नाही. ऑक्टोबरमधील सरी स्थानिक स्वरूपाच्या असतात. जानेवरी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांत गारांचे पाऊस होतात. वर्षातील ९०% पाऊस जून ते सप्टेंबरमध्ये होतो. उन्हाळ्यातील पावसाच्या सरी धुळीच्या वादळांसह येतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप भीषण असते. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११६·१७ सेंमी. आहे.
वनस्पती व प्राणी : जिल्ह्यातील १८·५% क्षेत्र जंगलव्याप्त आहे. जंगलांचे मुख्यतः दोन विभाग आहेत. रामटेक तालुक्यात पेंच नदीच्या पूर्व व पश्चिम बांजूस, सातपुड्याच्या पायथ्याकडील भागात एक आणि तुटकतुटक तुकड्यांनी बनलेला काटोलपासून उमरेडपर्यंत पसरलेला दुसरा. सावनेर व रामटेक तालुक्यांत दाट जंगले आहेत, तर काटोल व उमरेड तालुक्यांत विरळ आहेत. त्या भागांत गवती कुरणेही आहेत. जिल्ह्यातील जंगलात साग, ऐन, शिसव, सालई, बाभूळ, धावडा, खैर, बोर, बांबू, पळस, मोह, टेंबुर्णी, बेल इ. वनस्पती आहेत. रामटेक तालुक्यातील साग उधई (वाळवी) न लागणारे म्हणून, लाकडी सामानाकरिता उपयोगी हे. सालईच्या लाकडाची खोकी संत्री रवाना करण्यासाठी वापरतात. रंग, लाख, चारोळी, डिंक, मध, गुंजा वगैरे वस्तू व जळाऊ लाकूड आणि कोळसा, जंगलातील वनस्पतींपासून मिळतो. टेंबुर्णीची पाने विड्यांसाठी उपयोगी पडतात.
जिल्ह्यातील तलावांत अनेक प्रकारचे मासे मिळतात. काही ठिकाणी मत्स्यसंवर्धन केंद्रे आहेत. जंगलात वाघ, चित्ता, तरस, अस्वल, बारशिंगा, चितळ, सांबर, काळवीट, चिंकारा, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, ससा, साळिंदर इ. वन्यपशू, अनेक प्रकारचे पक्षी व सर्प आहेत. वन्यप्राणिसंरक्षणासाठी पेंच राष्ट्रीय उद्यान हे अभयारण्य राखलेले आहे.
आर्थिक स्थिती : शेती हा प्रमुख व्यवसाय असून १९७३–७४ मध्ये एकूण जमिनीपैकी ५५% जमीन लागवडीखाली होती. जिल्ह्यातील सु. ६,८९,३०० (३५·५%) कामकऱ्यांपैकी ३,४५,३०० (५२·२%) लोक शेतीव्यवसायात असून १,५१,००० (२१·९%) शेतकरी व १,९४,३०० (२८·२%) शेतमजूर आहेत. ज्वारी सर्व तालुक्यांत होते, पण प्रामुख्याने काटोल, सावनेर व नागपूर तालुक्यांत होते, गहू-रामटेक, नागपूर व उमरेड तालुक्यांत कापूस–काटोल, सावनेर, नागपूर तालुक्यांत धान-रामटेक व उमरेड येथे होते. ज्वारी, तूर, कापूस, भुईमूग व धान ही खरीप पिके आहेत तर गहू, हरभरा, जवस, वाटाणा ही रब्बी पिके आहेत. जिल्ह्यास १,८२६ तेलएंजिने ७,५२२ वीजपंप ७९ ट्रॅक्टर व ७ तेलघाण्या आहेत.
जिल्ह्यातील फळबागाही प्रसिद्ध आहेत. सुप्रसिद्ध नागपुरी संत्री ही कोहळी, मोहपा, काटोल, कळमेश्वर, उबाळी, कोंढाळी, सावनेर, नरखेड येथून येतात. काटोल, सावनेर, धापेवाडा, कुही येथील आंबे प्रसिद्ध आहेत. यांशिवाय बिना व कोराडी येथे सीताफळे आणि बोरे अरोली व कोदामेंढी येथे सोनकेळी धामणा येथे द्राक्षे थारसा येथे ऊस होतो. विड्याच्या पानांचे तांडे (मळे) रामटेक, नरखेड, पारशिवनी, मोवाड इ. ठिकाणी आहेत. जिल्ह्यातील लागवडीखालील जमिनीपैकी १९७३–७४ मध्ये ८% जमीन ओलिताखाली होती. त्यापैकी सु. २५·७% जमीन शासकीय कालव्यांनी, ५३·२% विहिरींनी व १५·४% तलावांनी आणि बाकीची इतर मार्गांनी भिजते. ओलिताखाली मुख्यत्वे तांदूळ, गहू, संत्री, कडधान्ये, मिरच्या इ. पिके होतात. जिल्ह्यात मोठा सिंचनप्रकल्प नाही. रामटेक, पांढरबोडी, वेणा (वुन्ना) व उमरी तलाव आणि कन्हान व चंद्रभागा प्रकल्प हे मध्यम प्रकल्प आणि अनेक छोटे बांधबंधारे, उपसायोजना वगैरे आहेत. यांशिवाय सु. ९०,००० हे. क्षेत्राला पाणी पुरविण्यास पेंच प्रकल्प कामठी–खैरी येथे पुरा होत आहे तसेच सावनेर, राजेगाव, मकर धोकडा, लिंगा येथे धरणे होत आहेत.
पशुधन – जिल्ह्यात १९७२ मध्ये २,००,५८४ बैल २,१३,६८९ गाई १,८८,६०० वासरे १,७८८ रेडे ३६,२३४ म्हशी २१,९४९ पारडी २१,४९० मेंढ्या १,७३,८०४ शेळ्या व २,३६,७९६ कोंबड्या-बदके होती.
उद्योगधंदे : नागपूर जिल्ह्यात अनेक लहानमोठे उद्योगधंदे चालतात. नागपूर (लगुडी व खण), उमरेड (जरीकाठी धोतरे, उपरणी) या दोन प्रमुख हातमाग केंद्रांशिवाय कामठी, जलालखेडा, मौदा, सावनेर, भिवापूर, धापेवाडा, खापा येथे हातमागावर कापड विणतात. नागपूर, खापा, जलालखेडा, कामठी येथे यंत्रमागही आहेत. नागपूर, कामठी, खात, कोदामेंढी येथे विडीउद्योग नागपुर, कामठी, उमरेड, नरखेड येथे तेलघाणी बिना, कामठी, मनसर, कुही, उमरेड, खापरखेडा येथे विटा व कौले नागपूर, सावनेर, काटोल, केलोद, नरखेड, कोंढाळी येथे कापूस पिंजून गठ्ठे बांधण्याचे कारखाने असून, नागपूर येथे कापडगिरणी आहे. कन्हान येथे सिमेंटच्या नळांचा कारखाना आहे. यांशिवाय कन्हान येथे मंगल शुद्ध करण्याचा कारखाना उमरेड, मौदा येथे धानाच्या गिरण्या (भात सडण्याच्या गिरण्या) आहेत. कन्हान येथे चहा डब्यात भरण्याचा व जनावरांच्या हाडांचा चुरा करण्याचा कारखाना कामठीला कागदाची गिरणी नागपूरला साबण, बर्फ, फुगे इ. वस्तू बनविण्याचे व इतर वीस-पंचवीस प्रकारचे लहानमोठे कारखाने आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येपैकी हजारी १५ लोक कारखान्यांत काम करतात. जिल्ह्याची विजेची गरज भागविण्यासाठी खापरखेडा (१२० मेवॉ. तास) आणि कोराडी येथे औष्णिक वीजउत्पादन केंद्रे आहेत. कोराडी येथे १,०८० मेवॉ. तास क्षमतेचे आणखी एक मोठे औष्णिक केंद्र उभारले जात आहे. १९७४–७५ मध्ये दरडोई वीजखप १७५·४९ हजार किवॉ. तास होता. १९७५ पर्यंत १३ शहरांस व १,०७२ गावांस वीज पुरविलेली होती. पेंच प्रकल्पाचीही वीज मिळावयाची आहे.
दळणवळण व संपर्कसाधने : नागपूर शहर हे भारताच्या जवळजवळ केंद्रस्थानी असल्यामुळे भारतातील हवाई, लोहमार्ग व सडका या तीनही प्रकारच्या मार्गांचे ते केंद्रस्थान आहे. नागपूर जिल्ह्यातून ६ व ७ क्रमांकांचे धुळे-जळगाव-नागपूर-कलकत्ता व वाराणसी-नागपूर-कन्याकुमारी हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यांची जिल्ह्यातील लांबी १९५·४० किमी. आहे. जिल्ह्यात नागपूर-उमरेड-चंद्रपूर नागपूर-छिंदवाडा नागपूर-सावनेर-मुलताई खरंगणा-कोंढाळी-काटोल-चिचोळी व नागपूर-बोरी-वर्धा-यवतमाळ हे पाच राज्य महामार्ग असून त्यांची जिल्ह्यातील लांबी २६७·३४ किमी. आहे. त्यांशिवाय ४६६·८२ किमी. चे प्रमुख जिल्हामार्ग २३६·१८ किमी. चे इतर जिल्हामार्ग १,४०२·३ किमी. चे. ग्रामरस्ते व ५१६ किमी. चे नगरपालिका रस्ते आहेत. जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दररोज सु. ३२६ बसगाड्या २८५ मार्गांवरून धावतात. त्या दररोज १,१८,६२७ उतारूंची वाहतूक करतात. लोहमार्ग-जिल्ह्यात मार्च १९७५ अखेर एकूण ३८४·४६ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. त्यांपैकी १६९·४१ किमी. रुंदमापी-एकेरी ८५·०५ किमी रुंदमापी-दुहेरी व १३० किमी. अरुंदमापी होते. यांत मुंबई-भुसावळ-नागपूर-हावडा नागपूर-इटारसी नागपूर-रामटेक नागपूर-नागभिड नागपूर-छिंदवाडा सावनेर-खापा या लोहमार्गांचा या जिल्ह्यातील भाग समाविष्ट होतो. या लोहमार्गांमुळे जिल्ह्याच्या खनिजसमृद्ध व फळबागांच्या प्रदेशांचा विकास घडून आला आहे. हवाईमार्ग-नागपूरजवळ सोनेगाव विमानतळ असून तेथून देशातील मुंबई, दिल्ली, कलकत्ता व मद्रास या प्रमुख ठिकाणी प्रवासी व टपाल विमाने जातात-येतात. जिल्ह्यात १९७४–७५ मध्ये २९२ डाकघरे ७१ तारघरे ११,०६४ दूरध्वनी व ७३,४१० रेडिओ परवानाधारक होते. १,२८६ गावांत ग्रामीण प्रक्षेपण खात्यातर्फे दिलेले रेडिओ आहेत. नागपूर येथे नभोवाणी केंद्र आहे.
लोक व समाजजीवन : नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे व सर्व प्रकारच्या दळणवळण साधनांनी देशातील इतर भागांशी जोडलेले असल्यामुळे तेथील लोकजीवनावर देशभरच्या सर्व गोष्टींचा प्रभाव पडलेला असला, तरी सर्वसामान्य जीवन वऱ्हाडी किंवा नागपुरी पद्धतीचे आहे. जाडेभरडे धोतर, सदरा, फेटा किंवा टोपी हा पुरुषांचा वेष, तर लुगडे-चोळी हा स्त्रियांचा वेष असतो. शहर व गावातील फरक यात जमेस धरलेला नाही. लोकांची भाषा मराठी असली, तरी तीवर हिंदी व अन्य भाषांचे झालेले संस्कार त्रयस्थाला तेव्हाच जाणवतात. खेड्यांतील व शहरांतील जुनी घरे विदर्भातील इतर भागांप्रमाणे दगडमातीची आणि कौलारू आसतात. खेड्यांतील घरांना लहानसे कुंपण असते. घरे लहान, मातीची पण स्वच्छ असतात. हिवाळ्यातील कडक थंडी व उन्हाळ्यातील आग पाखडणारी दिवसाची उष्णता यांना तोंड देता यावे अशी घरांची रचना असते. शहरात मोठी, उंच घरे, विटा-दगड-सिमेंटने बांधलेली असतात. नागपूरसारख्या औद्योगिक दृष्ट्या विकसित होणाऱ्या शहराच्या मध्यभागात इमारतींच्या गर्दीमुळे मोकळी हवा भरपूर मिळू शकत नाही. विस्तारणाऱ्या भागांत व खेड्यांत मात्र, स्वच्छ व मोकळी हवा भरपूर आहे. लोकांचे मुख्य अन्न ज्वारीची भाकरी, तुरीच्या डाळीचे वरण आणि रुचीसाठी हिरव्या मिरच्यांची किंवा लसणाची चटणी, कांदा व तेल हे आहे. नद्या, नद्यांचे संगम, देवळे यांची संख्या जिल्ह्यात बरीच आहे. राम, महादेव गणपती, देवी यांची देवळे व इतर धर्मीयांची पूजास्थाने पुष्कळ आहेत. धार्मिक महत्त्वाच्या दिवशी भरणाऱ्या यात्रांत लोक उत्साहाने भाग घेतात. दिवाळीच्या सुमारास हुरडापार्ट्या होतात. पोळा, गोकुळाष्टमी (कान्होबा), दहीहंडी वगैरे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतात. नाटक, तमाशा व देशीविदेशी खेळ यांची लोकांना बरीच आवड आहे. लोक रसिक आणि कलांचे आश्रयदाते आहेत. एकमेकांस, विशेषतः पाहुण्यास, विडा देण्याघेण्याची पद्धत विशेष प्रचलित आहे. १९७१ च्या जनगणनेप्रमाणे जिल्ह्याच्या एकूण लोकवस्तीपैकी १०,१०,९११ पुरुष व ९,३१,७७७ स्त्रिया आहेत. ४५·७% वस्ती ग्रामीण व ५४·३% शहरी आहे. लोकवस्तीची घनता ग्रामीण भागात दर चौ. किमी. स ९३, शहरी भागात ३,१४५ व एकूण सरासरी दर चौ. किमी.स १९६ आहे. शेतकरी, शेतमजूर यांखेरीज पशुपालन, वनोद्योग, मासेमारी या व्यवसायांत १४,४०० खाणकामात ११,४०० उत्पादनप्रक्रिया व दुरुस्ती यांत १,१७,१०० बांधकामात १३,००० व्यापार उदिमात ५६,१०० वाहतूक, साठा व संपर्कसाधने यांत ३५,५०० इतर सेवांत ९६,९०० लोक आहेत. तसेच १५,०३,७०० हिंदू २,८२,६०० बौद्ध १,१९,९०० मुस्लिम १६,९०० ख्रिस्ती ११,३०० जैन ६,५०० शीख आणि १,२०० इतर आहेत. अनुसूचीत जातिजमातींचे ८०,३०० आहेत. मराठी, हिंदी आणि उर्दू या प्रमुख भाषा असून इतर सु. १७ भाषा व बोली बोलणारे प्रत्येकी ५,००० हून अधिक लोक आहेत. प्रत्येकी १,००० हून अधिक लोक बोलतात, अशा सु. १८ भाषा व बोली असून प्रत्येकी १०० हून कमी लोक बोलतात अशा बोली सु. ११२ आहेत. मराठी भाषिक ७४·५% हिंदी भाषिक १०·४% व उर्दू भाषिक ४·६% आहेत. मराठी भाषा नागपुरी वळणाची आहे. बहुतेक लोक दोन किंवा तीन भाषा बोलणारे आहेत. साक्षरतेचे प्रमाण ४५·२६% असून पुरुषांत ५६·४१% व स्त्रियांत ३३·९९% आहे. १९७३–७४ मध्ये जिल्ह्यातील १६३ पूर्व-प्राथमिक शाळांतून २,२२१ मुले व ६७ शिक्षक १,८३२ प्राथमिक शाळांतून २,३१,४५७ विद्यार्थी व ७,०३१ शिक्षक ३१० माध्यमिक शाळांतून १,५२,५०७ विद्यार्थी व ५,८९६ शिक्षक उच्च शिक्षणाच्या ४७ संस्थातून १५,६२३ विद्यार्थी व १९५७ शिक्षक होते. अनुसूचित जाति-जमातींचे एकूण ८८,४५४ विद्यार्थी होते. १९७३–७४ मध्ये ७१,४१४ भागासवर्गीय विद्यार्थांवर शिक्षणासाठी ३४ लाख रु. व १९७४–७५ मध्ये १,१४,३०० विद्यार्थ्यांवर ५०·३ लाख रु. खर्च झाले.
जिल्ह्यातील आरोग्याची स्थिती सुधारत आहे. १९७४ मध्ये सु. एक लाख मुलांस देवी टोचण्यात आल्या. ३·५ लाखांहून अधिक लोकांना पुन्हा देवी टोचण्यात आल्या. ६·३७ लाखांहून अधिक लोकांस पटकीची लस टोचण्यात आली. हिवताप, पटकी, देवी या रोगांस बराच आळा बसला आहे. तथापि, क्षय, फुप्फुसाचे रोग, हगवण, मुदतीचा ताप, कर्करोग इत्यादींमुळे होणारे मृत्यू एकूण मृत्युसंख्येच्या सु. २०% आहेत. जिल्ह्यात मार्च १९७५ मध्ये २९ कुटुंबनियोजन केंद्रांत १२,५०० च्या वर शस्त्रक्रिया करण्यात आल्या, जिल्ह्यात १९७४ मध्ये २१ रुग्णालये १०६ दवाखाने १४ प्रसूतिगृहे ८ आरोग्यकेंद्रे १४ प्राथमिक आरोग्यकेंद्रे २७० डॉक्टर ५७ वैद्य १,६५० परिचारिका ३,९७३ रुग्णशय्या होत्या व तेथे राहून दीड लाखांहून अधिक लोकांनी व २१ लाख बाह्यरुग्णांनी उपचार घेतले. नागपूरमधील मेयो रुग्णालय सर्व वैद्यकीय सोयींनी सुसज्ज आहे.
जिल्ह्यात १९७४–७५ मध्ये ६८४ ग्रामपंचायती व १० नगरपालिका, नागपूर महानगरपालिका आणि कामठी कँटोनमेंट बोर्ड होते. शेती सहकारी संस्था ७५१, इतर सहकारी संस्था १,११२ व बँका १२० होत्या. छापखाने ३९० होते व ५ मराठी, ७ हिंदी व २ इंग्रजी मिळून १४ दैनिके ८ मराठी, २ हिंदी व २ इतर मिळून १२ साप्ताहिके व २ मराठी, १ हिंदी व १ इतर मिळून ४ नियतकालिके प्रसिद्ध होत होती. ती बहुतेक नागपूरमध्येच होती. नागपूर टाइम्स व हितवाद (इंग्रजी) नवभारत, युगधर्म (हिंदी) महाराष्ट्र, तरुण भारत, मराठा, नागपूर समाचार, सुदर्शन, जयविदर्भ (मराठी) ही वृत्तपत्रे लोकप्रिय आहेत. सुषमा व युगवाणी (मराठी) आरती, रेखा (हिंदी जीवनविकास, वारकरी (मराठी अभिसेवक (हिंदी) इ. नियतकालिकेही लोकप्रिय आहेत. अंध विद्यालय व अनाथ विद्यार्थिगृह, भारत सेवक समाज, भगिनी मंडळ, श्रीरामकृष्ण आश्रम, भोसले मूक विद्यालय, भोसले वेदशास्त्र विद्यालय, अनेक व्यायाम-व क्रीडासंस्था, सेवासदन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विदर्भ साहित्य संघ, विदर्भ संशोधन मंडळ, विदर्भ हरिजन सेवक संघ . अनेक सामाजिक व सांस्कृतिक संख्या जिल्ह्यात कार्य करीत आहेत. कामगार कल्याणाच्या अनेक सोयी असून मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शिक्षणवर्ग, घरे, कर्ज इ. गोष्टी समाजकल्याण खात्यातर्फे केल्या आहेत.
प्रेक्षणीय स्थळे : नागपूर हे जिल्ह्याचे ठिकाण असून देशातील व राज्यातील एक ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, लष्करी व दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कापडगिरण्या, बर्फ आणि इतर वस्तूंचे कारखाने, व्यापार, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठ इ. गोष्टी येथे आहेत. ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी, लोहमार्ग व विमानमार्ग यांचे केंद्र, आकाशवाणी आणि टपाल वाहतूककेंद्र आहे. औद्योगिक वसाहत, संत्राबाजार, लाकूडबाजार, छपाईचे कारखाने तेलगिरण्या, कापडगिरण्या, प्रेक्षागार यांमुळे त्याचे महत्त्व खूप वाढलेले आहे. येथील तेलंखेडी, अंबाझरी तलाव, बगीचे, महाराज बाग, वस्तुसंग्रहालय, गांधीनगर, वैद्यकीय महाविद्यालय, सीताबर्डीचा किल्ला इ, गोष्टी प्रेक्षणीय आहेत. अदासा, आंभोरा, बेला, धापेवाडा, कोराडी ही गावे मंदिरांसाठी व यात्रांसाठी प्रसिद्ध आहेत. रामटेक हे डोंगरावरील निसर्गरम्य ठिकाण प्रवाशांचे आकर्षणकेंद्र बनलेले आहे. रामटेकजवळ खिंडसी येथे रामसागर हा जलाशय असून तेथील वनशोभा लक्षणीय आहे. रामटेकच्या उत्तरेस देवलापूर हे ठिकाण शिकारीसाठी प्रसिद्ध असून चितळ, हरिण, कोल्हा, ससा, वाघ वगैरे प्राणी या जंगली भागात पाहावयास मिळतात. याशिवाय कामठी, कळमेश्वर, हिंगणा, जलालखेडा, जुनापाणी, भिवगड, काटोल, केलोद, खापा, मनसर, मोहपा, नगरधन, सावनेर, उमरेड इ. गावे निरनिराळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत.
देसाई, दा. सी. कुमठेकर, ज. ब.
“