नांदी: संस्कृत नाट्यप्रयोगाचा आरंभ पूर्वरंगनामक विधीने होई. भरत नाट्यशास्त्राप्रमाणे पूर्वरंगाची आतील नऊ, बाहेरची (प्रेक्षकांसमोरची) नऊ व मध्यंतरात गीतविधी अशी एकूण १९ अंगे आहेत. पहिली नऊ संगीताच्या पूर्वतयारीची असून पुढील नवांमध्ये उत्थापना, परिवर्त, नांदी या क्रमाने नांदी हे तिसरे किंवा एकंदर क्रमाने तेरावे अंग ठरते. ईशवंदना, स्तुती, नाट्याभिनयाची थोडी तयारी, संगीताने प्रेक्षकांचे मनोरंजन आणि प्रयोगाला पोषक अशी वातावरणनिर्मिती, नाटककार आणि नाटक यांची प्रस्तावनारूप ओळख, प्रेक्षकांची आराधना असे पूर्वरंगाचे विविध उद्देश आहेत. त्यात नांदीचे कार्य ईशस्तवन, मंगलाचरण, संरक्षण-कुशलासाठी प्रार्थना हे आहे. व्याख्येप्रमाणे नांदीत देव, द्विज, नृप इत्यादींची स्तुती आणि आशीर्वचन असते. नांदी ‘नित्य’ म्हणजे प्रत्येक प्रयोगारंभी म्हणावयाची असून तिचे स्वरूपही ‘नित्य’ म्हणजे ठरलेले असते, तसेच तो सूत्रधाराचा ‘पाठ’ असून पूर्वपरंपरेने आलेला किंवा गुरूपासून घेतलेला अथवा स्वतः रचलेला असतो. ‘परिवर्त’ या नांदीपूर्व अंगात सूत्रधार दोन पारिपार्श्विकांसह रंगमंचावर येऊन दिग्देवतावंदन, परिवर्तनी ध्रुवागानाच्या तालात व लयीत करतो. त्यानंतर शुष्कावकृष्टाध्रुवा (शब्दरहित गीत) चतुरस्त्र तालात व मध्य लयीत म्हणण्यात येते. या सुरातच नांदीगानाला आरंभ होतो. भरताने तीन स्वरजाती मानल्या आहेत, त्यांतील मध्यम स्वर (जाती), हा एक असून मध्यम स्वर (‘म’) हा षड्ज कल्पून मोठ्या आवाजात नांदी म्हणावयाची असते.
नाट्यशास्त्रात दिलेल्या नांदीच्या नमुन्यात (अध्याय ५, श्लोक १०५ ते १०८) चार अनुष्टुभांच्या आठ ओळी आणि सु. बारा वाक्यखंड आहेत. नांदी ‘अष्टपदा’ किंवा ‘द्वादशपदा’ या दृष्टीने सूत्रधार नांदीगान करीत असता, प्रत्येक पदानंतर, म्हणजे एकेक वाक्यखंड संपल्यावर, दोन्ही पारिपार्श्विकांनी ‘एवमस्तु’ (असेच असो!) अशी संमती द्यावयाची असते.
आरंभीच्या काळात संवादरूपाने संस्कृत नाट्य विकसित होण्यापूर्वी नाट्यकथा बहुतांशी गीतरूपाने आणि आंगिक अभिनयाने सादर होई. या अवस्थेत पूर्वरंगाचे महत्त्व रंजनदृष्ट्या फार होते परंतु नाटक साहित्यिक अंगाने उभे राहू लागल्यावर पूर्वरंगाचा विस्तार अनावश्यक झाला. भरतानेही पूर्वरंग लांबवू नये अशी सूचना दिलेली आहेच तरीही विघ्नोपशांतीसाठी नांदी, नाट्यप्रस्तावना आणि प्रेक्षकांची प्ररोरचना ही पूर्वरंगाची अंगे परिस्थिती आणि मनोधारणा या दृष्टींनी गाळता येण्यासारखी नव्हती. त्यामुळे पुढे त्याचे परिवर्तन झाले ते असे, की मूळ सूत्रधाराची ही जबाबदारी नाट्यकारांनी आपल्याकडे घेतली. नांदी वगैरे अंगांचे मूलभूत रूप आणि उद्देश त्यांनी कायम ठेवले, पण रचनेचे मात्र स्वातंत्र्य घेतले. त्यामुळे परिणामतः नाट्यशास्त्रातील नांदी आणि अभिजात संस्कृत नाटकातील नांदी यांच्या स्वरूपात तफावत निर्माण झाली. ‘(देवांना) आनंद देते ती नांदी’ ही व्युत्पत्ती पुढील भाष्यकारांचीच आहे. नांदीत शंख, चंद्र, गौ यांचा उल्लेख असावा, हे भरताच्या मंगलाचे अनुकरण असून इष्टदेवतेचे स्मरण ही नाटककारांनी त्यात घातलेली भर आणि ‘पद’ चा अर्थ अक्षरापासून श्लोकचरणापर्यंत काहीही, ही नाटककारांनी घेतलेली सवड आहे. काही नाटककारांनी ईशस्तुती, आशीर्वचन इत्यादींच्या जोडीला काव्यार्थसूचना (नाट्यकथा, पात्रे यांचे सूचन) नांदीश्लोकात आणून नांदी नाट्यकथेच्या अधिक जवळ आणली.
मराठी रंगभूमी संस्कृत नाट्याचा वारसा घेऊन उभी राहिली. विष्णुदास भाव्यांची ⇨ लळिते भरतप्रणीत पूर्वरंग आणि मराठी नाटकांचे प्राथमिक प्रयोग यांशी बरीच जुळती आहेत. किर्लोस्करांच्या शाकुंतलाने मराठी रंगभूमीवर नाट्यारंभ झाल्यामुळे साहजिकच या आरंभीच्या, विशेषतः पौराणिक नाटकांत नांदी, सूत्रधार आणि पारिपार्श्विक किंवा नटी व त्यांच्या संवादाची प्रस्तावना इ. बाबी संस्कृत नाटकांप्रमाणे आल्या आणि नांदीची प्रथा रूढ झाली. वस्तुतः प्रसिद्धी, जाहिरात इ. संस्कृत नाटकाला उपलब्ध नसलेली साधने मराठी नाटकाच्या हाताशी होती त्यामुळे प्रस्तावना, नाटककाराची ओळख इ. गोष्टी मराठी नाटकाला आवश्यक नव्हत्या. नांदीरूपाने ईशस्तवन, मंगलाचरण करायचे की नाही हेही नाटककारांना ठरविता येण्यासारखे होते आणि नांदी योजिल्यास इष्टदेवता किंवा नाट्यदेवता (नटेश्वर, शिव) अथवा आपले गुरू, यांना वंदन करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना होते याचे प्रत्यंतर किर्लोस्कर, खाडिलकर, कोल्हटकर, गडकरी इत्यादींच्या नाट्यपुस्तकांत पहावयास मिळते. तथापि पूर्वापार पद्धतीला अनुसरूनच मराठी नाटककारांनी नांदीला आपल्या नाटकात स्थान दिलेले आढळते. शेक्सपिअरच्या नाटकांची ओळख झाल्यावर मात्र नाट्यलेखनाचे वेगळे रूप मराठी नाटककारांना दिसले. पुढे इब्सेनच्या प्रभावाने आणखी त्याचे नवे रूप प्रकट झाले. परिणामतः माधवराव जोशींसारख्या एखाद्या नाटककाराने फ्रेंच प्रहसनांची रूपांतरे करतानाही नांदी, सूत्रधार-पारिपार्श्विक-नटी, संवाद योजण्याची पूर्वापार प्रथा अनुसरली तरी, सामाजिक आशयाच्या नाटकांतून ही अंगे दिसेनाशी झाली. क्वचित नांदी पडद्याआड (भरत-प्रथेविरुद्ध) म्हटली जाऊ लागली, तर कधीकधी नांदी, प्रस्तावना इ. गोष्टींना फाटा देखील मिळाला, त्यामुळे नांदी आज मूळ किंवा परिवर्तित रूपातही मराठी रंगभूमीवर राहिलेली नाही परंतु नांदीगानाच्या मागे जी प्रेरक धार्मिक भावना आहे, ती नष्ट झाल्याचे वाटत नाही. अत्याधुनिक नाट्यप्रयोगाचीही सुरुवात पडद्याआड नटेश्वरपूजन केल्याशिवाय होत नाही, हे त्याचेच गमक आहे.
भट, गो. के.
“