नॅता, जूल्यो : (२६ फेब्रुवारी १९०३ —   ). इटालियन रसायनशास्त्रज्ञ. त्यांना १९६३ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक ⇨ कार्ल त्सीग्लर यांच्याबरोबर विभागून मिळाले. त्यांचा जन्म इटलीतील जेनोआजवळील इंपेरिया येथे झाला. १९२४ साली त्यांनी मिलान येथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून रासायनिक अभियांत्रिकीतील डॉक्टरेट ही पदवी मिळविली. १९३२ मध्ये ते फ्रायबर्ग (जर्मनी) येथे गेले व तेथे त्यांनी उच्च बहुवारिकांच्या (अनेक साध्या रेणूंच्या संयोगाने बनलेल्या जटिल संयुगांच्या) स्फटिकीय संरचनेचा अभ्यास केला. १९३३–३५ या काळात पाव्हीया विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि संचालक, १९३५–३७ या काळात रोम विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक व संचालक आणि १९३७–३८ या काळात तूरीन येथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये औद्योगिक रसायनशास्त्राचे प्राध्यापक व संचालक म्हणून त्यांनी काम केले. १९३८ मध्ये ते मिलान येथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल केमिस्ट्री येथे प्राध्यापक व संचालक म्हणून काम करू लागले. १९३८ साली इटालियन सरकारने त्यांची संश्लेषित (कृत्रिम) रबर तयार करणाऱ्या संस्थेला संशोधनात मार्गदर्शन करण्यासाठी नेमणूक केली.

इ. स. १९२३ मध्ये त्यांनी कार्बनी व अकार्बनी द्रव्यांच्या जालिका संरचनेच्या [→ स्फटिकविज्ञान] अभ्यासासाठी आणि रसायनशास्त्रातील काही समस्या सोडविण्यासाठी क्ष-किरणांचा उपयोग केला. मिथेनॉल, फॉर्माल्डिहाइड, ब्युटिराल्डिहाइड व सक्सिनिक अम्ल यांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या दृष्टीने त्यांचे कार्य पायाभूत ठरले आहे. एथिलिनाच्या ⇨ बहुवारिकीकरणासाठी त्सीग्लर यांनी शोधून काढलेल्या उत्प्रेरकामध्ये (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थामध्ये) आवश्यक तो बदल करून नॅता यांनी कमी किंमतीच्या खनिज तेल उत्पादापासून पॉलिप्रोपिलीन हे उच्च बलाचे व उच्च वितळबिंदू असलेले बहुवारिक तयार केले. अशा बहुवारिकांचा उपयोग फिल्म, प्लॅस्टिक, कृत्रिम तंतू व संश्लेषित रबर यांच्या निर्मितीत करण्यात येतो. या त्यांच्या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. याशिवाय त्यांना इटालियन व इतर देशांतील रसायनशास्त्रीय संस्थांकडून १५ सुवर्णपदके आणि सन्माननीय पदव्या देण्यात आल्या. विविध नियतकालिकांतून त्यांचे सु. ४५० निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

कानिटकर, बा. मो.