नॅस्टर्शियम: फुलझाडांपैकी एका वंशाचे लॅटिन नाव. या वंशात सु. २०–२५ जाती (जे. सी. विलिस यांच्या मते सहा) असून त्या जगभर पसरल्या आहेत. भारतात औषधी दृष्ट्या महत्त्वाच्या फक्त चारच जाती नमूद आहेत. त्यांची शारीरिक लक्षणे ⇨ क्रुसिफेरी कुलात (मोहरी कुलात) वर्णिल्याप्रमाणे आहेत. ह्या जाती उथळ पाण्यात किंवा जमिनीवर वाढतात. खोड शाखायुक्त, गुळगुळीत किंवा केसाळ असून पाने साधी, एकाआड एक, अखंड किंवा थोडीफार विभागलेली असतात. फुले लहान, पांढरी, पिवळी व क्वचित छदयुक्त पाकळ्या क्वचित नसतात. केसरदले २, ४ किंवा ६ तंतूवर पंख किंवा दाते नसतात [→ फूल]. सार्षपक (शेंगा) साधारणपणे फुगीर असून त्यांतील छद्मपट (खोटा पडदा) पातळ असतो बिया लहान, फुगीर व दोन रंगांत चिकटलेल्या असतात.
या वंशातील दोन जाती महाराष्ट्रात सापडतात त्यांपैकी ‘लुतपुतिया’ या नावाची ओषधीय [→ ओषधि] जाती पाणथळ जागी वाढते. तिला इंग्रजीत ‘वॉटरक्रेस’ (हिं. ब्रह्मी साग लॅ. नॅस्टर्शियम ऑफिसिनेल, नॅ. फाँटॅनम) म्हणतात. ती मूलतः यूरोप, पश्चिम आशिया व उ. आफ्रिका येथील असून तिचा प्रसार सर्वत्र झाला आहे. ती अनेक वर्षे जगणारी व अनेक शाखायुक्त आहे. भारतात पंजाब, प. बंगाल, ओरिसा व इतरत्र उंच डोंगराळ प्रदेशात (२,१०० मी. पर्यंत) ती लागवडीत आहे. खोड पोकळ नळासारखे, रांगते (०·६–१·२मी.) पाने पिंगट हिरवी, संयुक्त व पिसासारखी दले बिनदेठाची, ३–५ जोड्या असून शिवाय टोकास एक दल असते. मंजऱ्यांवर लहान पांढरी फुले येतात केसरदले २, ४ किंवा ६ शेंगा (१·५–२·५ सेंमी.) लांब, गोलसर व सरळ असतात. बिया बारीक, अपक्ष (पंखहीन) व लाल असतात. नवीन लागवड बिया किंवा छाट कलमांनी करतात. ब्रिटन व अमेरिका येथे सॅलडकरिता (बहुधा न शिजविलेल्या स्वरूपात, इतर पदार्थांबरोबर मिसळून थंड स्थितीत खाण्याकरिता) हिची वाफ्यात लागवड करतात हिला स्वच्छ व सतत संथपणे वाहणाऱ्या पाण्याची आवश्यकता असते. वाढलेल्या सु. १५ सेंमी. लांबीच्या फांद्यांच्या जुड्या बांधून पाण्यात ठेवतात व नंतर वापरतात. पाने तिखट असून त्यांची भाजी करून किंवा कच्ची खातात. सार, बिस्किटे, फळांचे रस इत्यादींत पाने चिरून घालतात खाद्यपदार्थांच्या बशांत शोभेकरिता ठेवतात. ती क्षुधावर्धक (भूक वाढविणारी) व उत्तेजक असून छातीच्या विकारांवर व रक्तपित्त व्याधीवर (स्कर्व्हीवर) उपयुक्त असतात त्यांत खनिजे व जीवनसत्त्वे असतात. लघवी साफ न होणे व गलगंड यांवर ही वनस्पती देतात. घशाला कोरड पडणे, दमा, क्षय, रक्तशुद्धी, जंतविकार, मूत्रविकार इत्यादींवर ही उपयुक्त ठरली आहे. या वनस्पतीत ८९·२% पाणी, २·९% प्रथिने, ५·५% कार्बोहायड्रेटे, ०·२% मेद व २·२% खनिजे ही द्रव्ये असतात तसेच तिच्यात अ आणि क जीवनसत्त्वे असतात. शिवाय कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, गंधक, मँगॅनीज, जस्त, तांबे व आर्सेनिक यांची खनिज द्रव्ये कमीजास्त प्रमाणात आढळतात.
क्षीरसागर, व. ग. परांडेकर, शं. आ.
गार्डन नॅस्टर्शियम: (इं. ईस्ट इंडियन क्रेस, गार्डन क्रेस लॅ. ट्रोपिओलम मॅजुस कुल-ट्रोपिओलेसी). ही सदैव फुलणारी वर्षभर जगणारी, आरोही (आधारावर चढणारी) शोभिवंत ओषधी मूळची पेरू (द. अमेरिका) देशातील असून हल्ली सर्वत्र लागवडीत आहे. हिच्या सर्व भागांत मोहरी तेलासारखे तेल असते. खोड सु. १–२ मी. लांब असून पाने लांब व स्पर्शग्राही (संवेदी) देठाची, रुंदट अंडाकृती ते गोलसर, पाच बोथट दात्यांची अखंड व छत्राकृती आणि खालच्या बाजूस करडी हिरवी असतात (व्यास ३–५ सेंमी.). सच्छद फुले पानांच्या बगलेत, लांब देठाची, बरीच मोठी (सु. ६ सेंमी. व्यासाची), सुवासिक व द्विलिंगी असतात. संवर्त पिवळा असून त्याला खाली लांब शुंडिका (नळीसारखे उपांग) असते. पाकळ्या पाच, सुट्या, पिवळ्या ते भडक लाल रंगाच्या अनेक छटांच्या असून कधीकधी त्यांवर पट्टे असतात त्या सर्व सारख्या नसून नखरयुक्त (बारीक देठाच्या) व संवर्तावर तळाशी आधारलेल्या असतात. केसरदले आठ किंजदले तीन व जुळलेली ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात एक लोंबते बीजक असते [→ फूल]. पक्व बीजात पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) नसतो. बोंड त्रिकोणी असून फुटून त्याचे तीन फलांश (कुड्या) होतात.
याचे विविध रंगांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. अभिवृद्धी बियांनी करतात डोंगराळ भागात मार्च–एप्रिलमध्ये व मैदानी भागात सप्टेंबर ते ऑक्टोबरात पेरणी करतात. सु. ७७५ मी. उंचीपर्यंत व मध्यम सकस जमिनीत खूप फुले येतात. लावल्यानंतर अडीच ते तीन महिन्यांनी फुले येतात हलकी व निचऱ्याची जमीन आणि भरपूर सूर्यप्रकाश यांना आवश्यक असतो वाफ्यात लावून बागेस शोभा आणता येते. आठ जाती बागेत विशेषेकरून लावतात.
ट्रोपिओलेसी या लहान कुलात फक्त ट्रोपिओलम हा एकच वंश असून त्यात सु. ५० जाती अंतर्भूत आहेत. पूर्वी यांचा अंतर्भाव ⇨ जिरॅनिएलीझ कुलात (भांड कुलात) केला जाते असे परंतु स्वतंत्र अलग केसरदले, पालिभेदी फळ आणि एकबीजी तीन फलांश या लक्षणांमुळे हे कुल भांड कुलापासून निराळे ओळखता येते. ट्रोपिओलम वंशातील जातीत किंजपुटावर चोचीसारखा भाग नसतो. (चित्रपत्र ५३).
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1966.
2. Kirtikar, K. R. Basu, D. B. Indian Medicinal Plants, Delhi, 1975.
3. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
“