नवद्वीप: नडिया. पश्चिम बंगाल राज्याच्या नडिया जिल्ह्यातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र. लोकसंख्या ९४,२०४ (१९७१). कलकत्त्याच्या उत्तरेस सु. ९७ किमी. भागीरथी व जलांगी नद्यांच्या संगमाजवळ भागीरथी नदीच्या उजव्या काठावर वसले असून भागीरथीच्या प्रवाहबदलामुळे हे जिल्ह्याच्या इतर भागांपासून अलग झाले आहे. पूर्वी येथे असलेल्या नऊ बेटांवरूनच यास नवद्वीप हे नाव पडले असावे. १०६३ मध्ये याची स्थापना झाली असून बंगालच्या सेन वंशाच्या राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. वैष्णव संत व गौडीय वैष्णव संप्रदायाचा संस्थापक चैतन्य याचे हे जन्मस्थान होय. १८६९ पासून येथे नगरपालिका आहे. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून यास बंगालचे बनारस असे म्हटले जाते. येथील फाल्गुन पौर्णिमेची व कार्तिक मासातील मुख्य यात्रा आणि नित्यनैमित्तिक उत्सव यांमुळे येथे वर्षभर भाविक लोकांची गर्दी असते. चैतन्य प्रभूंच्या स्मरणार्थ येथे अनेक मंदिरे बांधण्यात आली आहेत. हिंदूंचे शिक्षणकेंद्र व पारंपरिक संस्कृत शाळांबद्दल हे प्रसिद्ध असून कलकत्ता विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, दवाखाने इ. सोयी येथे उपलब्ध आहेत. याच्या आसमंतात पिकणाऱ्या भात, जवस, ताग, ऊस यांच्या बाजारपेठेचे हे केंद्र असून मुख्यतः मातीची व पितळी भांडी, धातुसामान निर्मिती इ. उद्योग येथे चालतात.
चौधरी, वसंत