नरेंद्र: (तेरावे शतक). महानुभव पंथीय मराठी कवी. उपनाब अयाचित. नरेंद्र आणि त्याचे नृसिंह आणि शैल्य हे दोघे भाऊ देवगिरीच्या रामदेवराव यादवाचे आश्रित होते. नृसिंह आणि शैल्य हेही कवी होते. महानुभाव पंथीयांच्या ‘साती ग्रंथां’त समाविष्ट असलेला रुक्मिणीस्वयंवर ह्या काव्यग्रंथाचा नरेंद्र हा कर्ता. जुन्या पोथ्यांत ‘नरेंद्र’ या रूपाप्रमाणेच ‘नरींद्र’ हेही रूप आढळते. महानुभाव साहित्यात ह्या कवीचा उल्लेख ‘नरींदृ’ आणि ‘नरेंद्र’ ह्या दोन्ही नावांनी आलेला आहे.

आख्यायिकेनुसार रुक्मिणीस्वयंवर या काव्याचे वाचन यादवांच्या राजसभेत चालू असता, रामदेवराव यादवाने ह्या काव्याच्या अखेरीस आपले नाव घालावे, अशी इच्छा व्यक्त केली. नरेंद्रास हे रुचले नाही. तथापि राजाज्ञेपुढे नाइलाज होऊन आपला ग्रंथ त्याला राजाला देऊन टाकावा लागला. ह्या घटनेमुळे निराश होऊन त्याची वृत्ती संसारविन्मुख बनली आणि सर्वसंगपरित्याग करून तो महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य आणि संघटक श्रीनागदेवाचार्य ह्यांना अनुसरला. असेही म्हणतात, की मुळातल्या काव्यात सु. १,८०० ओव्या होत्या राजाज्ञा झाल्यानंतर एका रात्रीपुरता ग्रंथ घरी ठेवण्याची अनुज्ञा घेऊन नरेंद्राने आपल्या दोन भावांच्या साहाय्याने त्या ग्रंथाची एक प्रत स्वतःसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. सुमारे ९०० ओव्याच त्यांना लिहून घेता आल्या.

नरेंद्राचा मूळ ग्रंथ १,८०० ओव्यांचा होता, असे स्मृतिस्थळावरून दिसते तथापि रुक्मिणीस्वयंवराच्या अनेक पोथ्यांतून ८७९ ओव्याच आढळतात. ह्या काव्यावर महानुभावीयांचे टीपाग्रंथ आहेत, तेही ८७९ ओव्यांपर्यंतचेच. ह्याचा अर्थ, हा ग्रंथ नरेंद्राच्या बरोबर महानुभाव पंथात आला तो अपूर्णावस्थेत, असा होतो. तथापि महानुभाव महत श्रीकृष्णराजदादा पारिमांडिल्य यांच्याकडून उपलब्ध झालेली रुक्मिणीस्वयंवराची संपूर्ण पोथी प्रथम श्रीकृष्णदास महानुभाव (हैदराबाद) यांनी (१९७०) व नंतर सुरेश डोळके ह्यांनी (१९७१) यथामूळ स्वरूपात प्रकाशित केलेली आहे. तीत एकूण २,९३६ ओव्या आहेत. स्मृतिस्थळाच्या आधाराने मूळ ग्रंथ १,८०० ओव्यांचा होता असे धरले, तरी २,९३६ ओव्यांपर्यंत हा ग्रंथ वाढविला कुणी, हा प्रश्न उरतोच. डॉ. वि. भि. कोलते ह्यांच्या मते ही भर १७५५ च्या सुमारास तळेग्रामकर केशव देयाने घातली असावी. आज निर्विवादपणे नरेंद्राच्या म्हणता येतील, अशा ओव्या ८७९ च आहेत. या अपूर्ण काव्याच्या लोकप्रियतेमुळे ते ‘नरेंद्रा’च्याच नावावर पूर्ण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आढळतो. डॉ. कोलते यांना अशा १,५०० व १,६२० ओव्या असलेल्या या संपूर्ण काव्याच्या पोथ्या मिळालेल्या आहेत (त्यांत आरंभीच्या ८७९ ओव्या मूळ नरेंद्राच्याच आहेत). २,९३९ ओव्या असलेल्या य़ा काव्याच्या त्यांना आणखीही दोन पोथ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यावरुन नरेंद्र हा कवी व त्याचे रुक्मिणीस्वयंवर काव्य किती लोकप्रिय झाले होते, याची कल्पना येईल.

या ग्रंथाचा लेखनकाल, या संपूर्ण ग्रंथाच्या उपरोक्त प्रतीत “शके द्वादशोत्तरशत तेरोत्तरे । नंदन नाम संवत्सरे । ग्रंथ केला एकसरे । माघ वदी चौथी ।।” (ओवी २,९३३) असा दिला आहे. या ओवीतील कालाची सविस्तर चर्चा करून सुरेश डोळके यांनी २६ जानेवारी १२९३ रोजी हा ग्रंथ पूर्ण झाला, असे मत मांडलेले आहे तर डॉ. वा. वि. मिराशी ह्यांनी ही तारीख २७ जानेवारी असावी, असा अभिप्राय दिला आहे.

नरेंद्राचे रुक्मिणीस्वयंवर हे मराठीतील आद्य महाकाव्य म्हणता येईल. सर्गबद्ध रचनेचे तंत्र मात्र त्याने अवलंबिले नाही. ह्या काव्यातील वेधक निसर्गवर्णने आणि विलोभनीय कल्पनाविलास पाहता संस्कृतातील अभिजात महाकाव्याचा आदर्श नरेंद्रापुढे होता, असे जाणवते. त्याची सौंदर्यान्वेषी, कलासक्त वृत्तीही ह्या काव्यातून प्रकर्षाने व्यक्त झालेली आहे. पंडिती काव्यपरंपरेतील कवीला साजेल, अशा प्रकारची बहुश्रुतता नरेंद्रापाशी असल्याचेही त्याच्या ह्या काव्यावरून दिसून येते. महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा भाग मात्र ह्या काव्यात फारसा आढळत नाही.

सुर्वे, भा. ग.