नरनारायण : विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी एक अवतार. धर्म व दक्षकन्या मूर्ती यांच्यापासून चाक्षुष मन्वंतरात उत्पन्न झालेले हे विष्णूचे ऋषिरूप अवतार होत. नारायण मोठा व नर लहान. पूर्ण शांती मिळण्यासाठी हे बदरिकाश्रमात तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपोभंगाकरिता इंद्राने सोळा हजार अप्सरा पाठविल्या. अप्सरा निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्याही जवळ आहे हे दाखविण्यासाठी नारायणाने आपल्या मांडीपासून उर्वशीनामक अप्सरा निर्माण केली व तिला इंद्राकडे पाठविले. सर्व अप्सरा नारायणाला शरण आल्या व त्यांनी ‘तू आमचा पती हो’ असा वर त्याला मागितला. पुढील अवतारी (कृष्ण) विवाह करण्याचे नारायणाने त्यांना आश्वासन दिले. पुढील अवतारात नरनारायण अर्जुन व कृष्ण यांच्या रूपांत जन्माला आले. कृष्णाने सोळा हजार स्त्रियांशी विवाह केला.
नरनारायण तप करीत असता त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे पाहून प्रल्हादाने त्यांची निंदा केली. त्यावरून मोठे युद्ध झाले. शेवटी विष्णूने त्यांची समजूत घालून प्रल्हादास पाताळात पाठविले. नरसिंहाच्या मानवी अंगापासून नर व सिंहमुखापासून नारायण जन्मास आले, असे कालिकापुराणात म्हटले आहे. नर व नारायण हे काल्पनिक अवतार असून नारायण हे अव्यक्त निर्गुण तत्त्व व नर हे व्यक्त सगुण तत्त्व होय, असे महाभारतात म्हटले आहे. नरनारायणाच्या भक्तिसंप्रदायाचा पाणिनीनेही उल्लेख केला आहे.
केळकर, गोविंदशास्त्री