नगरराज्य : (सिटी स्टेट). यूरोपात, विशेषतः प्राचीन ग्रीस व इटली या देशांत, इ. स. पू. ८०० ते इसवी सनाच्या सुरुवातीच्या काही शतकांपर्यंत अस्तित्वात असणारी स्वायत्त लोकतांत्रिक नगरे. प्राचीन ग्रीसमध्ये त्यांना ‘पलिस’ म्हणत. बॅबिलोनिया, सुमेरिया, फिनिशिया, क्रीट वगैरे प्राचीन संस्कृतींत नगरराज्याची संकल्पना होती पण तिचे स्वरूप एक प्रगत ग्रामीण समाजव्यवस्था वा जमातव्यवस्था असे होते. मात्र ग्रीसमधील प्राचीन नगरराज्ये सांस्कृतिक दृष्ट्या सुधारलेली आणि मुख्यत्वे शहरांभोवती एकवटलेली होती. त्यांच्या आधिपत्याखाली सभोवतालचा ग्रामीण समाज व भूभाग असे. शिवाय त्यांनी राजकीय संविधानांपासून तत्त्वज्ञान, व्यापार, आरमार, शिक्षण वगैरे बहुविध क्षेत्रांपर्यंत प्रगती केली होती. ॲरिस्टॉटलने नगरराज्यांपैकी १५८ नगरराज्यांच्या संविधानांचे विश्लेषण दिले आहे. ग्रीसमधील अथेन्स, स्पार्टा, कॉरिंथ इटलीतील मिलान, फ्लॉरेन्स, व्हेनिस, नेपल्स ही नगरराज्यांची काही ठळक उदाहरणे होत.
भारतीय गणराज्ये व ग्रीक नगरराज्ये ही सकृतदर्शनी समान तत्त्वांवर आधारलेली दिसत असली व कधीकधी गणराज्य व नगरराज्य या दोन्ही संज्ञा समान अर्थी वापरल्या जात असल्या, तरी त्या दोहोंत फरकही होता. गणराज्यात अभिजनवर्गातील बहुसंख्य लोक सहभागी होत मात्र यूरोपीय नगरराज्यांत अल्पसंख्य जमीनदारच सर्व सत्ता उपभोगीत. गणराज्यात सामान्य नागरिकांनाही स्वातंत्र्य व इतर नागरी हक्क होते पण नगरराज्यात गुलामांना कोणतेच नागरी अधिकार नव्हते.
नगरराज्यांचे आद्य स्वरूप अनिश्चित असून ती निश्चितपणे केव्हा अस्तित्वात आली, याविषयी तज्ञांत एकमत नाही. नगरराज्ये ही जमातीच्या समूहांपेक्षा वेगळी होती आणि तत्कालीन आर्थिक गरजेतून त्यांचा उदय आणि विकास झाला असावा, असे समजतात. नगरराज्यांच्या शासकीय व्यवस्थेत सर्वत्र एकसूत्रता आढळत नाही. राजेशाहीपासून साम्यवादापर्यंतच्या सर्व तत्त्वप्रणालींची बीजे कमीअधिक प्रमाणात त्यांत दिसून येतात. त्यांत सर्वसत्ताधारी राजा ही संस्था नव्हती, असे दिसते. नगरराज्यांनी विविध क्षेत्रांत प्रगती केलेली दिसते. पण तंत्रविद्या व उद्योग यांबाबत ते अप्रगत राहिले आपापले वेगळेपण टिकविणे हेच त्यांचे बलस्थानही होते आणि कमकुवतपणाही होता. पुढे पुढे त्यात अंतर्गत कलह व सेनापतींची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यांना वाव मिळाला. नगरराज्यांनी एकत्र येऊन कायम स्वरूपाची लोकशाही वा स्वायत्त संघटना उभारण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे पुढे मॅसिडोनिया आणि रोमन साम्राज्यसत्ता यांना प्रतिकार झाला नाही व नगरराज्यांची कल्पना नामशेष झाली.
पहा: गणराज्ये ग्रीक संस्कृति.
संदर्भ : 1. Cantor, N. F. Western Civilization : Its Genesis and Destiny, Vol. I., Glenview, 1969.
2. Ehrenberg, Victor, Greek State, London, 1960.
3. Fowler, W. W. The City-State of The Greeks and Romans, London, 1960.
देशपांडे, सु. र.