नंदीवाले : महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण भटकी जमात. यांना नंदीबैलवाले ऊर्फ तिरमल असे म्हणतात. आंध्रमध्ये यांना गंगेड्डू म्हणत. यांच्या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल तज्ञांत एकमत नाही. तिरुपतीच्या व्यंकटेशाचे भक्त असल्यामुळे ते तिरमल या नावाने प्रसिद्धीस आले असावेत किंवा त्यांच्या मूळ पुरुषाचे नाव तिरुमल नंदीवाला असावे. यांचे मूळ दैवत तिरुपतीचा व्यंकटेश असले, तरी हे शिवभक्तही आहेत. आंध्र प्रदेशातून ते सु. ८०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले असावेत. त्याचे निश्चित कारण उपलब्ध नाही. १९६९ ते १९७२ या काळात केलेल्या सर्वेक्षणात यांची लोकसंख्या सु. २,८०० होती. यांच्या भटकण्याच्या कक्षा विवक्षित असून त्या कुटुंबानुसार आखलेल्या असतात. भटकत असताना पूर्वी एक नंदी वडापुरी (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) येथे अचानक मरण पावला. त्या गावालाच त्यांनी दैवतस्थान मानले आहे. तेथे यांची इतरही अनेक दैवते आहेत. दैवते व पितृपूजेसाठी दरसाल आषाढ-श्रावणांत ही सर्व जमात वडापुरी येथे वस्ती करते पण गेल्या २०—२५ वर्षांपासून दर तीन वर्षांनी ते एकत्र जमतात. याच वेळी नवस फेडणे, बळी देणे, लग्नविधी उरकणे, भांडणतंट्यांचा निकाल लावणे इ. कामे उरकली जातात.
त्यांचा व्यवसाय नंदीबैलाचे खेळ करणे व भविष्य सांगणे हा असून प्रत्येक कुटुंबाजवळ नंदीबैल असतो. त्यांची खेडी व गावे ठरलेली असतात आणि वर्षातून एकदा ते सर्व बिऱ्हाड घेऊन त्या ठिकाणी जातात. शिवाय शेतकऱ्यांना खोंडे विकणे आणि कर्ज देणे हा दुय्यम व्यवसायही ते करतात. स्त्रिया पोत, मणी, सुया, सागरगोटे इ. वस्तू विकतात. सामान्यतः अंगात अंगरखा, कमरेला शेल्यासारखा पंचा, कोक्याला लालरंगी रुमाल असा पुरुषांचा वेश असतो.
सर्व जमात निरक्षर आहे. त्यांची मातृभाषा तेलुगू असली, तरी हे कन्नड व मराठी भाषाही बोलतात.
पाटील, चौगुले, कोमटी व दवंडीवाले असे यांच्यात चार पोटविभाग असून विवाह त्या गटांत होतात. लहानपणीच आईवडील मुलामुलींची लग्ने उरकतात. घटस्फोटाची पद्धत नाही, मात्र विधवाविवाहास संमती आहे.
मृताला ते पुरतात. लोकरंजन करणारी ही जमात अद्यापि खेड्यापाड्यांतून लोकप्रिय आहे.
संदर्भ : 1. Malhotra, K. C. Bulletin of the International Committee on the Urgent Anthropological and Ethnological Research, Bio-Social Investigations Among the Nandiwallas, Vol. 16, Vienna, 1974.
२. अत्रे, त्रिं. ना. गांव-गाडा, मुंबई, १९५९.
कीर्तने, सुमति