नंगा पर्वत : (दियामीर). भारताच्या जम्मू व काश्मीर राज्याच्या पाकव्याप्त प्रदेशातील हिमाद्रीचे सर्वोच्च शिखर. उंची ८,१२६ मी. जगातील अत्युच्च पर्वतशिखरांत याचा नववा क्रमांक आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची न मोजता पायथ्यापासून माथ्यापर्यंत ती मोजली, तर याचा जगात बहुधा पहिलाच क्रमांक लागेल. काश्मीरच्या उत्तरभागात असल्यामुळे याच्या भोवतीच्या प्रदेशाला राजकीय व लष्करी दृष्ट्या मोठे महत्त्व आले आहे. ग्रॅनाइट, नाइस, फिलाइट इ. खडकांचा बनलेला हा पर्वत उभे कडे व हिमप्रपात यांमुळे अत्यंत दुर्गम आहे. याच्या दक्षिणेच्या सु. ५,२७२ मी. उंचीच्या उभ्या भिंतीच्या पायथ्याशी रूपाल दरी आणि उत्तरेकडील सु. ७,०१० मी. उंचीच्या खड्या उताराच्या पायथ्याशी सिंधू नदी आहे. या उतारावरून राकिओत ही हिमनदी वेगाने खाली येते. येथील सिंधूच्या पात्राची सु. १०० मी. उंची व शेजारीच नंगा पर्वताची आठ हजार मी.हून अधिक उंची हा उंचीतील फरक जगात एकमेव मानण्यात येतो. या प्रदेशाला सिंधू उत्तरेकडून वळसा घालून जाते. तिच्या अस्तोर उपनदीची खोल दरी नंगा पर्वताच्या पूर्वेस असून तिच्या काठचे अस्तोर हे गाव नंगा पर्वतापासून सू. २७ किमी. व स्कार्डूच्या पश्चिमेस आहे. पर्वताच्या दुसऱ्या बाजूस बुनार नदीची खोल दरी आहे. नद्यांनी पर्वताचा बहुतेक भाग वेढल्यामुळे नंगा पर्वत मुख्य पर्वतश्रेणीपासून एकटाच अलग उभा राहिल्यासारखा दिसतो. त्याच्या दियामीर या स्थानिक नावाचा अर्थ ‘पर्वतांचा राजा’ असा आहे. यांच्या उत्तरेकडे बर्फ वर्षभर टिकून असते. परंतु दक्षिणेकडे हिमप्रपातच अधिक आहेत. प्रतिकूल हवामान व हिमप्रपात यांमुळे अनेक गिर्यारोहकांचा या पर्वतावर मृत्यू ओढवला आहे. १८९५ च्या मोहिमेतील ममेरी परत आलाच नाही व १९३७ च्या मोहिमेतील ११ जर्मन गिर्यारोहक आणि १५ शेरपा अचानक हिमप्रपातात सापडून प्राणास मुकले. नंगा पर्वतात मुख्यतः जर्मन नेतृत्वाखाली मोहिमा झाल्या. तेनसिंग व हिलरी यांनी एव्हरेस्ट सर केल्यावर जर्मनांना पुन्हा चेव आला आणि ३ जुलै १९५३ रोजी पहाटे अडीच वाजता पाचव्या मुक्कामावरून एकटाच निघालेला हेर्मान बुहल कमालीच्या घाडसाने व चिकाटीने रांगत रांगत संध्याकाळी सात वाजता शिखरावर पोहोचला. उतरताना त्याने एका खडकाच्या आश्रयाने तंबू व योग्य कपडे इ. संरक्षणाअभावीच रात्र काढली. दुसऱ्या दिवशी हिमदाहाने पाय दुखावलेल्या स्थितीत तो मुक्कामावर परत आला, तेव्हा त्याचे सोबती चकितच झाले. त्यांनी त्याची आशा सोडलेली होती. सहा मोहिमांत ३१ बळी घेतल्यावर अखेर सातव्या मोहिमेत नंगा पर्वताने मानवाला आपल्या माथ्यावर येऊ दिले.
खातु. कृ. का.
“