ध्रुव–२ : (ज्योतिषशास्त्र). एखादा स्थिर बिंदू. एखाद्या गोलाच्या मध्यातून जाणाऱ्या प्रतलाने (पातळीने) त्याचा छेद घेतला असता बृहद्वृत्त मिळते. या बृहद्वृत्तावरील प्रत्येक बिंदूपासून ९०° कोनीय अंतरावर असणारे गोलावरचे जे दोन बिंदू असतात त्यांना त्या बृहद्वृत्ताच्या संदर्भात ध्रुव म्हणतात. गोलावरील कोणत्याही बृहद्वृत्ताला दोन ध्रुव असतात. गोलाला एखाद्या आसाभोवती गती असेल आणि आसाला बृहद्वृत्त लंब असेल, तर बृहद्वृत्ताच्या ज्या बाजूकडून ती गती अपसव्य (घड्याळातील काट्यांच्या गतीच्या उलट) दिसेल, त्या बाजूचा उत्तर ध्रुव व उलट बाजूंचा दक्षिण ध्रुव असे समजतात (आ.१).
पृथ्वी जवळजवळ गोलाकार आहे. तिचे विषुववृत्त हे एक बृहद्वृत्तच आहे. तिच्या भ्रमणाक्षाची पृथ्वीवरील दोन टोके उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव हे विषुवृत्ताचे ध्रुव आहेत. व्यावहारिक दृष्ट्या जरी हे भौगोलिक उत्तर व दक्षिण ध्रुव आपण स्थिर समजत असलो, तरी पृथ्वीचे सममिति-अक्ष (ज्यामुळे पृथ्वीचे आकाराच्या दृष्टीने एकसारखे भाग होतात असा अक्ष) व भ्रमणाक्ष किंचित प्रमाणात वेगळे असल्याने व पृथ्वी संपूर्णतया घन नाही असे सिद्ध झालेले असल्यामुळे ध्रुवबिंदूच्या मध्यममानाच्या स्थानात सु. २० मी. एवढा जास्तीत जास्त फरक पडतो.
पृथ्वीचा भ्रमणाक्ष वाढविला असता ज्या दोन काल्पनिक बिंदूंत खगोलास छेदतो, ते खगोलीय ध्रुव आणि पृथ्वीचे विषुववृत्त प्रतल ज्या बृहद्वृत्तात खगोलास छेदते ते खगोलीय विषुववृत्त होय. भौगोलिक उत्तर ध्रुवाकडील बाजूस जो ध्रुव असतो तो खगोलीय उत्तर ध्रुव व भौगोलिक दक्षिण ध्रुवाकडील बाजूस असतो तो खगोलीय दक्षिण ध्रुव होय. म्हणजेच पृथ्वीचा भ्रमणाक्ष खगोलास ज्या बिंदूंत छेदतो ते खगोलीय ध्रुव होत. पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी खगोलीय उत्तर अगर दक्षिण ध्रुव त्या स्थानाच्या अक्षांशाइतक्या ⇨ उन्नतांशावर असतो. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे आकाशात दररोज सूर्य, चंद्र व सर्व तारे पूर्वेकडे उगवतात आणि पश्चिमेकडे मावळतात. म्हणजे त्यांची पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्ताशी समांतर वर्तुळात गती भासमान होते परंतु ध्रुवबिंदूच्या बाबतीत मात्र गती भासत नाही ते स्थिरच वाटतात. दोन्ही खगोलीय ध्रुवांवर प्रत्यक्षात एकही तारा नाही. तेथे तारा असता, तर तो अगदी स्थिरच दिसला असता. आपण आकाशातील ⇨ ध्रुवतारा म्हणून जो ओळखतो तो खगोलीय उत्तर ध्रुवाला अगदी जवळात जवळचा तारा अगदी तंतोतंत अक्षाच्या दिशेत नसून खगोलीय उत्तर ध्रुवापासून ५५ मिनिटे अंतरावर आहे. त्यामुळे हा ताराही खगोलीय उत्तर ध्रुवाभोवती तितक्या कोनीय व्यासाचे २४ तासांत वर्तुळ पूर्ण करतो. हे वर्तुळ फारच लहान असल्याने आपण ध्रुवतारा स्थिर समजतो. ⇨ संपातचलनामुळे खगोलीय ध्रुवसुद्धा खगोलावरील आपले स्थान दीर्घ मुदतीत अत्यंत सावकाशपणे बदलतात.
पृथ्वीच्या कक्षीय भ्रमणामुळे सूर्य खगोलावर ज्या वृत्तावरून सरकत असल्याप्रमाणे दिसतो ते ⇨ क्रांतिवृत्त होय. या वृत्तांच्या ९०° अंतरावरच्या बिंदूना क्रांतिवृत्ताचे ध्रुव अथवा कदंब म्हणतात. खगोलाच्या उत्तर गोलार्धात असेल तो उत्तर कदंब आणि दक्षिण गोलार्धात असेल तो दक्षिण कदंब होय. उत्तर कदंब कालिय तारकासमूहात होरा १८ता., क्रांती ६६° ३३′ [ → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धती] या ठिकाणी आणि दक्षिण कदंब असिदंष्ट्र तारकासमूहात होरा ६ ता., क्रांती ६६° ३३′ या ठिकाणी आहे. संपातचलनामुळे खगोलीय ध्रुव आपले स्थान हळूहळू कसे बदलतात, हे आ. २ वरून लक्षात येईल. वर सांगितलेल्या उत्तर कदंबाभोवती २३° २७′ कोनीय त्रिज्येने काढलेल्या खगोलावरील लघुवर्तुळावरील बिंदू क्रमाक्रमाने खगोलीय उत्तर ध्रुव होतात. सु. २५,८०० वर्षांत या लघुवर्तुळावरील खगोलीय उत्तर ध्रुवांची प्रदक्षिणा पूर्ण होते. ४,६०० वर्षांपूर्वी थुबन (आल्फा ड्रॅकोनिस) हा ध्रुवतारा जवळजवळ होता, तर ५,३०० वर्षांनंतर अल्डरामिन (आल्फा सीफाय) हा होईल. साधारण किती किती वर्षांनी कोणकोणते बिंदू उत्तर ध्रुव होतील हे आकृतीवरून स्पष्ट होईल. अशाच प्रकारचे लघुवर्तुळ खगोलीय दक्षिण ध्रुवाची स्थाने दाखविण्यासाठी दक्षिण कदंबाभोवती निघेल.
आपले सूर्यकुल ज्या दीर्घिकेत (तारामंडलात) आहे, ती आकाशगंगा व या आकाशगंगेच्या बरोबर मध्यभागातून जाणारे प्रतल ते गांगेय प्रतल होय. हे गांगेय प्रतल खगोलास ज्या वर्तुळास छेदेल ते गांगेय विषुववृत्त आणि या विषुववृत्ताला अनुसरून जे ध्रुव असतात ते गांगेय कदंब होत. हे कदंबही दोन असतात. उत्तर गोलार्धात असणारा तो उत्तर कदंब व दक्षिण गोलार्धात असणारा तो दक्षिण कदंब. उत्तर कदंबाचे सहनिर्देशक होरा १२ ता. ४० मि. व क्रांती २८° असे आहेत. क्षितिज हेही एक बृहद्वृत्तच असल्याने ⇨ खस्वतिक आणि ⇨ अधःस्वस्तिक हे क्षितिजाचे ध्रुवच आहेत. पृथ्वीखेरीज इतर ग्रहांना पृथ्वीप्रमाणेच अक्ष, विषुववृत्त आणि ध्रुव या गोष्टी आहेत.
गोखले, मो. ना.
“