धोलपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य प्रदेश राज्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ ३,००० चौ. किमी. लोकसंख्या सु. २,७५,००० (१९४१) वार्षिक उत्पन्न सु. १५II लाख रूपये. उत्तरेस आग्रा जिल्हा व भरतपूर संस्थान, पश्चिमेस करौली संस्थान, दक्षिणेस व पूर्वेस ग्वाल्हेर संस्थान यांनी ते सीमित झाले होते. बाराव्या शतकाच्या अखेरीस हा प्रदेश तोमर व जादव राजपुतांच्या ताब्यात होता. पुढे तो दिल्लीच्या सिकंदर लोदीने जिंकला आणि त्यानंतर तो मोगल साम्राज्यात समाविष्ट झाला. आग्र्याजवळच्या बामरोलीच्या जाटांनी १५०६ मध्ये ग्वाल्हेरचा राजा मानसिंग याच्याकडून धोलपूरजवळील गोहदचा प्रदेश मिळविला. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस उत्तर प्रदेशातील इटाव्याच्या कल्याणसिंगाने हा प्रदेश बळकाविला होता. १७६१ नंतर या प्रदेशावर प्रथम भरतपूरच्या जाट राजांचे आणि नंतर शिंद्यांचे स्वामित्व होते. १७८२ मध्ये सालबाईच्या तहाने गोहद शिंद्यांकडे गेले आणि गोहदचा राणा वनवासात गेला. १८०५ मध्ये दौलतराव शिंद्यांशी झालेल्या तहाप्रमाणे धोलपूर, बाडी, राजाखेड आणि सर-मथुरा हे प्रदेश एकत्र करून धोलपूर संस्थानची इंग्रजांनी निर्मिती केली आणि त्यावर गोहदचा राणा कीरतसिंह याची स्थापना केली. मात्र त्यास गोहद शिंद्यांना द्यावे लागले. संस्थान विलीन होण्याच्या सुमारास गीर्द, बाडी, बेसडी, कोलाडी, राजाखेड हे पाच तहसील व सर-मथुरा ही जागीर एवढा प्रदेश संस्थानात अंतर्भूत होता. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रेल्वे, सडका, डाक अशा सुधारणा झाल्या, तरी शैक्षणिक दृष्ट्या संस्थान मागासलेलेच राहिले. १९११ मध्ये गादीवर आलेले महाराज उदयमानसिंहजी नरेंद्र मंडळात व कारभारात बरेच लक्ष घालीत. १९४८ मध्ये संस्थान प्रथम मत्स्य व नंतर बृहद राजस्थान संघात विलीन झाले.

कुलकर्णी, ना. ह.