धृपद–धमार : धृपद : हिंदुस्थानी रागदारी संगीतात धृपद अथवा ध्रृवपद हा प्राचीन व उच्च श्रेणीचा गानप्रकार मानला जातो. रागाची, स्वरोच्चारांची आणि शब्दच्चारांची शुद्धता ह्यांवर विशेष भर देणारा हा एक गानप्रकार आहे.
पंधराव्या शतकातील ग्वाल्हेरचा राजा मान तोमरने धृपद गायकीला विशेष प्रोत्साहन देऊन तिचा प्रसार केला. त्याच्याच प्रेरणेने ह्या गायकीवर मानकुतूहल हा हस्तलिखित ग्रंथ निर्माण झाला. अठराव्या शतकातील पं. भावभट्टाच्या अनूपसंगीत रत्नाकर ह्या ग्रंथात धृपदासंबंधीचा पुढील उल्लेख आढळतो :
“गीर्वाणमध्यदेशीयभाषासाहित्यराजितम् ।
द्विचतुर्वाक्यसंपन्नं नरनारीकथाश्रयम् ।।
शृंगाररसभावाद्यं रागालापपदात्मकम् ।
पादांतानुप्रासयुक्तं पादांतयुगकं च वा ।।
प्रतिपादं यत्रबद्धमेवं पादचतुष्टयम् ।
उद्ग्राहध्रुवकाभोगांतरं ध्रुवपदं स्मृतम् ।। ”
या श्लोकाचा भावार्थ असा : संस्कृत अथवा मध्यदेशीय (हिंदी) भाषेत रचलेले असे गीत, की ज्यात दोन किंवा चार वाक्ये (भाग) असतात स्त्रीपुरुषांचे चरित्रवर्णन रागालापाच्या माध्यमाने ज्यात केलेले असते शृंगारादी रसांना पोषक असे शब्द ज्यात असतात व चरणांची पूर्ती अनुप्रास वा यमकांनी केलेली असते व अशा प्रकारचे जे पद उद्ग्राह, ध्रुव, आभोग व अंतरानामक चार चरणांत रचलेले असते, त्यास ‘ध्रुवपद’ म्हणतात.
धृपद गायकीत आलापीला प्राधान्य असते. आलापगायनाच्या दोन शैली रूढ आहेत. प्राचीन रागालाप, रूपकालाप, आलाप्ती इ. अनिबद्ध गानप्रकार तसेच प्राचीन निबद्ध गीतांचे काहीसे बदललेले स्वरूप पहिल्या प्रकारात आढळून येते व त्यात रागाचे स्थायी, अंतरा, संचारी, आभोग असे धृपदाच्या रचनेनुसार आलाप केले जातात. आलापीचा दुसरा प्रकार खडमेरू व यतिप्रस्तार ह्या प्राचीन ग्रंथांवर आधारलेला आहे. त्यात विलंबित, मध्य व द्रुत लयीत क्रमशः एकेक स्वर वाढवीत तारसप्तकापर्यंत जाऊन पुन्हा त्याच क्रमाक्रमाने मूळ षड्जावर येतात. ह्या शैलीचे आधुनिक काळातील प्रवर्तक विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या जयपूर घराण्याचे विद्वान गायक बहेरामखाँ होत. प्राचीन काळी आलाप विस्तार ‘ओम् अनंत हरि नारायण’ ह्या मंत्रोच्चाराच्या आधारे होत असे. पुढे मोगल काळात ह्याचाच अपभ्रंश होऊन ‘ने, ते, री, र, न, नोम्, तोम्, ता, ना, री ’ इ. अक्षरांनी दोन्ही शैलीत आलाप करण्याची प्रथा पडून तिचे ‘नोम् तोम्’ पद्धती असे नामकरण झाले.
आलापीनंतर धृपदाची बंदिश धृपदाच्या चरणानुसार पेश करण्यात येते. बंदिशीनंतर धृपदाचा विस्तार करण्याचे दोन प्रकार प्रामुख्याने आढळतात. पहिल्यात मूळ लय कायम ठेवून अर्थानुकूल शब्दाचे फेरबदल करीत, कोणत्याही मात्रेपासून प्रारंभ करून धृपदाची मूळ सम गाठून गायक रसनिष्पत्ती करतात. दुसऱ्यांत शब्दांना लयकारीत गुंतवून उपज अंगाने ‘बोलबाँटा’ सह विस्तार करून गायक समेवर येतात. तालप्रधान लयकारीच्या प्राधान्यामुळे भावार्थाला गौण स्थान मिळते व त्यामुळे शांत, करुण, शृंगारादी रसयुक्त धृपदांमध्ये भावनिष्पत्तीचा अभाव तीव्रतेने जाणवतो. बहुसंख्य धृपदे चौतालात गायली जातात. मृदंगावर वाजविल्या जाणाऱ्या सूलताल, झम्पा, तीव्रा, ब्रह्म, रुद्र, लक्ष्मी इ. तालांतही धृपदे पेश करतात. धृपदपरंपरेत खंडार, नोहार, डागुर, गोबरहार ह्या चार ‘बानीं ’ चा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. ही ‘घराणी’ आज नामशेष झालेली आहेत. धृपद गायकीच्या इतिहासात वृंदावनचे स्वामी हरिदासजी डागुर, ⇨ तानसेन, नायक बैजू, गोपाललाल, बितीयाचे नवलकिशोर व जुगलकिशोर बंधू, चिंतामणी-मिश्र ही नावे चिरस्मरणीय आहेत. अलीकडच्या काळातील बहेरामखाँच्या परंपरेतील जाकिरउद्दीनखाँ व अल्लाहबंदेखाँ हे बंधू आणि ह्या उभयतांचे सुपुत्र जियाउद्दीनखाँ आणि नसीरउद्दीनखाँ, जयपूरचे करामतखाँ ह्या काही उल्लेखनीय व्यक्ती होत.
धमार : धृपद गायकीच्या अंतर्गत श्रीकृष्णाच्या होळीचे व रासक्रीडेचे वर्णन असणाऱ्या व धमार नावाच्या चौदा मात्रांच्या तालात गायल्या जाणाऱ्या गीतप्रकाराला ‘धमार’ अथवा ‘होरी-धमार’ असे म्हणतात. मुख्यत्वेकरून गीताचे शब्द निरनिराळ्या लयींमधून उपज अंगाने सादर केले जातात. साहजिकच धमार गानप्रकारात लयकारीला भरपूर वाव असतो.
गिंडे, कृ. गुं.