धुब्री : आसाम राज्याच्या गोआलपाडा जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या ३६,५०३ (१९७१). बांगला देशाच्या सरहद्दीजवळ असलेले हे शहर गौहातीच्या पश्चिमेस सु. १७७ किमी.वर ब्रह्मपुत्रा नदीच्या उजव्या काठावर वसले आहे. येथूनच ब्रह्मपुत्रा नदी दक्षिणेस वळून बांगला देशाच्या मैदानात प्रवेश करते. नदीच्या पुरामुळे शहराला वारंवार धोका पोहोचतो. याच्या आसमंतात पिकणाऱ्या ताग, तांदूळ, मोहरी, तंबाखू, कापूस, चहा यांच्या व्यापाराचे हे एक महत्त्वाचे केंद्र असून येथील आगपेट्यांच्या कारखान्यास जवळच्या पर्वतीय प्रदेशातून आगपेटीस आवश्यक अशा लाकडाचा मुबलक पुरवठा केला जातो. रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्ग ह्यांनी हे महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले असून ते नदीवरील एक लहानसे बंदरही आहे. येथील चर्च आणि व्हिक्टोरिया राणीचा संगमरवरी पुतळा प्रेक्षणीय आहेत. शहरात नगरपालिका असून दवाखाने, सार्वजनिक वाचनालय व शिक्षणाच्या सोयी आहेत.
चौधरी, वसंत