धार संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य प्रदेश राज्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ ४,६०८ किमी. लोकसंख्या सु. २,५०,००० (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. १६·५ लाख. २२ जुलै १७३२ रोजी थोरल्या बाजीराव पेशव्याने आनंदराव पवाराला धार आणि आसपासच्या परगण्यांचा हक्क दिला. त्यातून संस्थानाचा उगम झाला. अनेक लढायांतून मर्दुमकी गाजवणारा याचा पुत्र यशवंतराव पानिपतला कामी आला (१७६१). राघोबादादाने धारच्या किल्ल्याचा आसरा घेतला. तेथेच दुसऱ्या बाजीरावाचा जन्म झाला. अठराव्या शतकाच्या अखेरीस दिवाण रंगराव ओढेकर प्रबळ झाला. त्याविरुद्ध मदत देणाऱ्या यशवंतराव होळकराने मोबदल्यात ताल-मंडावल, अमीरखान पेंढाऱ्याने बेरसिया, तर शिद्यांनी आगर-सुनेल परगणे आपल्या ताब्यात घेतले. १८०७ मध्ये दुसऱ्या आनंदरावाच्या मृत्यूनंतर मांडव, धार, धरमपुरी एवढेच परगणे पवारांकडे उरले पुढे दासीपुत्र मुराररावाने बंडाळी माजवली. त्या वेळी बडोद्याचा बापू व पुढे रघुनाथ शिंद्यांच्या मदतीने राणी मैनाबाईने संस्थान तगवून धरले. १८१९ मध्ये ते इंग्रजांचे मांडलिक बनले तेव्हा माळवा भिल्ल पलटणी साठी संस्थानाने सालिना सु. ६००० रु. द्यावे असे ठरले. १८५७ च्या उठावात धारच्या सैन्याने भाग घेतल्यामुळे संस्थान जप्त झाले. ते १८६४ मध्ये परत मिळाले पण बेरसिया परगणा कायमचा भोपाळला देण्यात आला. धार, बदनावर, सुंदरसी, कुक्षी, निमनपूर, धरमपुरी असे सहा परगणे माळवा-निमाडमध्ये विभागले होते. धार हीच राजधानी. विसाव्या शतकात जतवारी महसूल, कापसाच्या गिरण्या, नगरपालिका, पक्क्या सडका, वीज, नळ, ग्रामसुधारणा, सहकारी बँका, अनाथाश्रम, डाकतार, संगीत, चित्रकला, शिक्षण, इतिहाससंशोधन अशा अनेक क्षेत्रांत संस्थानात विकास झाला. १९४८ मध्ये संस्थान मध्य भारत संस्थान संघात विलीन झाले व चौथे आनंदराव महाराज मध्य भारत संघाचे कनिष्ठ उपराज्य प्रमुख झाले. पुढे १ नोव्हेंबर १९५६ रोजी संस्थान मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट करण्यात आले.
कुलकर्णी, ना. ह.