धातुरूपण : अभियांत्रिकी कामामध्ये व इतर व्यवहारांत निरनिराळ्या धातू व मिश्रधातूंपासून विविध प्रकारच्या संरचना वा वस्तू निरनिराळ्या पद्धतींनी तयार करतात. उदा., इमारतींचे व पुलांचे भाग, मनोरे, टाक्या, लोहमार्ग, वाहने, एंजिने, शस्त्रे, यंत्रे, हत्यारे, गृहोपयोगी वस्तू, नाणी इत्यादी. यासाठी धातूंच्या तप्त किंवा थंड अवस्थेत त्यांना हवा तसा आकार (रूप) निरनिराळ्या प्रक्रियांनी देतात. या प्रक्रियांना धातुरूपण असे म्हणतात. जेव्हा अशा वस्तू वा संरचना थोड्याच संख्येने हव्या असतात तेव्हा त्या कुशल कारागीर, साधने व हत्यारांच्या साहाय्याने वा हाताने तयार करतात परंतु त्यांची फार मोठ्या संख्येने निर्मिती करावयाची असल्यास शक्तीवर चालणारी यंत्रे वापरतात.
बहिःसारण : आपण ज्याप्रमाणे सोऱ्यात साधारण घट्ट असलेल्या भाजणीचा गोळा घालून सोऱ्याच्या दांड्यावर हाताचा दाब देऊन तळाच्या चकतीतील छिद्रातून बाहेर पडणाऱ्या भाजणीची चकली बनवितो त्याप्रमाणे बहिःसारण पद्धतीत धातूचा तप्त मऊ गोळा ओतीव मिश्रपोलादाच्या सिलिंडरामध्ये ठेवून त्याच्या तळास बसविलेल्या हव्या त्या आकाराच्या छिद्रातून रेटकाने दाब देऊन हव्या त्या आकाराची सळई बनवितात. याकरिता द्रवीय दाबयंत्राने दाब देतात [⟶ दाबयंत्र].
मुद्रेच्या व धातूच्या पृष्ठभागावरील ताण कमी करण्यासाठी काचेची पूड किंवा ग्रॅफाइटाची भुकटी वापरतात. तप्त धातूपासून बहिःसारण पद्धतीने अजोड (अखंड, जोड नसलेल्या) नलिका बनवितात. या कामासाठी मिश्रपोलादाच्या दोन द्विशंक्वाकार लाटांतून (रोलर्समधून) तप्त धातूचा गज किंवा कांब पुढे सारत असताना पुढच्या तोंडात अणकुचीदार टोक असलेला मिश्रपोलादाचा दंडलाग (आधार) प्रथम वेधन केलेल्या जागेत यांत्रिक क्रियेने खुपसला जातो आणि गज जसजसा पुढे सरकत जातो तसतसा तो पोटात उमलत जाऊन नलिकेचा आकार तयार होतो. द्विशंक्वाकार लाटा गजाच्या बाह्यांगाचे परिवलन करतानाच गजाला गतीने पुढे सारत असतात. या प्रक्रियेसाठी बहिःसारण यंत्राची गती व त्याचा दाब जरूर तितका ठेवावा लागतो. तसेच धातूचे तापमान योग्य असावे लागते. नंतर प्रथम तयार झालेली जाड नलिका निरनिराळ्या लाटण यंत्रांतून किंवा मुद्राजोड्यांतून सारून शेवटी तिच्या बाह्यांगावर चकाकी व गुळगुळीतपणा आणतात.
ॲल्युमिनियम, तांबे, शिसे वगैरे मऊ धातूंच्या नलिका थंड अवस्थेत बहिःसारण पद्धतीने तयार करतात. आ. ३ मध्ये दाखविल्याप्रमाणे प्रथम थंड धातूची खेचण पद्धतीने वाटी तयार करून ती एका विशिष्ट आकाराच्या पोलादी मुद्रेत ठेवतात. नंतर तिच्यावर एका विशिष्ट आकाराच्या मुद्राकारकाने दाबयंत्राच्या साहाय्याने उभा दाब देतात. या पद्धतीने हव्या त्या लांबीची आणि जाडीची नलिका बनविता येते. मलम, टूथपेस्ट वगैरेंच्या धातुपिशव्या, तळाकडून बंद असलेल्या आखूड नलिका, दबणाऱ्या नळ्या ॲल्युमिनियमाच्या थंड चकतीतून बहिःसारण पद्धतीने एका विशिष्ट आकाराच्या मुद्रा आणि मुद्राकारकांच्या साहाय्याने तयार करतात.
दाबकोरण : या क्रियेने पत्र्यातून हव्या त्या आकाराचा भाग दाबयंत्रात बसविलेल्या मुद्रा (डाय) व मुद्राकारकात (पंच) पत्रा पकडून दाबाच्या साहाय्याने कातरला (कापला) जातो. कातरलेला भाग कामासाठी उपयोगात आणतात. त्याला मूलाकार भाग (ब्लँक) म्हणतात. बाकीचा पत्र्याचा भाग निकामी (भंगार) असतो.
वेधन : हव्या त्या आकाराचे आरपार छिद्र दाबयंत्रात बसविलेल्या मुद्रा आणि मुद्राकारकांत पत्रा किंवा मूलाकार भाग पकडून दाबाच्या साहाय्याने पाडतात. पत्रा किंवा मूलाकार भाग कामासाठी वापरतात, तर खाली पडलेल्या छिद्राच्या आकाराचा भाग निकामी असतो. पत्र्यावर एकाच वेळी वेधन व दाबकोरण क्रिया करून धातूंचा वॉशर बनवितात. त्यासाठी खास प्रकारचा मुद्रासंच वापरतात.
कर्तन : यांत्रिक कातऱ्यांत पत्रा वक्र किंवा सरळ रेषेत कातरण्याच्या अथवा पत्र्याच्या पट्टया कातरण्याच्या क्रियेस कर्तन म्हणतात.
झिलईकरण : पत्र्यापासून बनविलेल्या दंडगोल वस्तूंच्या किंवा भागांच्या आतल्या अंगाला गुळगुळीतपणा व चकाकी आणण्यासाठी ही क्रिया करतात.
नमन : (वाकविणे). प्रेस ब्रेक नावाच्या विशेष प्रकारच्या दाबयंत्रात पत्र्याच्या लांबीच्या दिशेत किंवा कडांवर विविध आकारांच्या मुद्रासंचांत पत्रा दाबून निरनिराळ्या उलटसुलट कोनांत किंवा वळणांत वाकविण्याच्या क्रियेस नमन म्हणतात. पन्हळी पत्रे किंवा पोलादी कपाटे, टेबले वगैरे फर्निचरसाठी प्रेस ब्रेक वापरतात. यात पत्र्याच्या कडा दुमडता येतात. आ. ५ मध्ये मुद्रासंचात पत्र्यांना काही प्रकारचे बाक दिलेले दाखविले आहेत.
मुद्रांकन : धातूंच्या जाड पत्र्यापासून नाणी किंवा बिल्ले तयार करण्यासाठी ही क्रिया वापरतात. मुद्राजोडीत असा पत्रा पकडून त्यावर विशिष्ट प्रकारच्या दाबयंत्राने दोन्ही बाजूंनी दाब देतात. त्यामुळे मुद्रेत कोरलेली अक्षरे, आकडे वा चित्रे पत्र्याच्या तुकड्यावर किंवा मूलाकार भागावर उमटतात. नाण्यांच्या परिघीय भागावर खाचा पाडण्याची क्रिया दुसऱ्या खास यंत्रावर करतात.
दाबछिद्रण : दाबयंत्रात बसविलेल्या मुद्रा आणि मुद्राकारक यांच्यामध्ये पत्रा ठेवून त्याला हव्या त्या मापाचे गोल छिद्र (भोक) दाब दिल्याने कर्तन क्रियेने पडते. मुद्राकारकावर दाब दिल्याने पत्र्याला गोल छिद्र पडून मुद्राकारक मुद्रेच्या आरपार गोल गाळ्यात शिरतो व भोकाच्या आकाराची टिकली गाळ्यातून खाली पडते. गोल गाळ्याचे तोंड तळाकडे रुंदावलेले ठेवल्याने चकती गाळ्यात चिकटून राहत नाही. वेधन क्रियेत कोणत्याही आकाराचे छिद्र पत्र्यात किंवा त्याच्या भागात पाडतात, तर दाबकोरण क्रियेत कोणत्याही आकाराचा मूलाकार भाग पत्र्यातून कातरला जातो.
छिद्रण : या क्रियेने पत्र्यात सारख्या अंतरावर आरपार कोणत्याही आकाराची छिद्रे विशिष्ट मुद्रासंच दाबयंत्रात बसवून पाडतात.
फुगवण : या प्रक्रियेने हव्या त्या आकाराच्या लोहेतर धातूच्या फुगीर वस्तू त्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचा मूलाकार भाग मुद्रेमध्ये रबरी मुद्राकारकाने दाब देऊन घुसवून तयार करतात. यासाठी मुद्रेचे दोन भाग केलेले असून तयार झालेली वस्तू त्यामुळे मुद्रेतून बाहेर काढता येते. रबरी मुद्रासंचाने गुरीन व मार्फॉर्म नावाच्या प्रक्रियांनी अनुक्रमे उथळ व खोल वस्तू तयार करतात.
द्रवदाबरूपण : या प्रक्रियेत धातूची मूलाकार चकती बिडाच्या लाग कड्यावर ठेवतात. यंत्राच्या शीर्षभागात मुद्रा म्हणून घुमटाच्या आकाराची पोकळी असून तिच्या तोंडावर लवचिक पटल बसविलेले असते. या पोकळीत द्रव सोडण्यासाठी मार्ग ठेवलेला असतो. यंत्राच्या बैठकीकडील भागात एका सिलिंडरामध्ये दट्ट्या बसवून त्याच्या खालच्या बाजूने पंपाने द्रव भरण्याची व्यवस्था केलेली असते. दट्ट्याच्या वरच्या तोंडावर घुमटाच्या आकाराचा मुद्राकारक बसविलेला असून तो लाग कड्यातून धातूची मूलाकार चकती घुमटी मुद्रेतून घुसवीत असतानाच पंपाच्या साह्याने घुमटी मुद्रेत द्रव भरला जातो. त्यामुळे एकाच वेळी चकतीवर दोन्ही बाजूंनी सारखा दाब बसल्याने विशिष्ट आकाराची वस्तू जलद तयार होते व तिची जाडी सर्व जागी सारखी असते.
विद्युत् चुंबकीय प्रक्रिया : या प्रक्रियेने विविध अवघड आकार धातुपत्र्याला किंवा नलिकांच्या अंगावर देता येतात. या प्रक्रियेत एका विद्युत् धारित्रातील (विद्युत् ऊर्जा साठविणाऱ्या साधनातील) विद्युत् प्रवाह एका तारेच्या वेटोळ्यातून पाठवितात. वेटोळ्यातील प्रवाहामुळे धातुमूलाकार चकतीत (वा नलिकेत) विद्युत् प्रवाह प्रवर्तित होतो. त्यामुळे निर्माण झालेले प्रवर्तित चुंबकीय क्षेत्र व वेटोळ्याचे चुंबकीय क्षेत्र यांतील परस्परक्रियेने चुंबकीय स्पंदने सुरू होऊन जरूर ती प्रेरणा उपलब्ध होते. ही स्पंदने १० ते २० दशलक्षांश सेकंद कालावधीची ३८,५०० किग्रॅ./चौ.सेंमी.पर्यंत प्रेरणा निर्माण करू शकतात. आ. ७ मध्ये विद्युत् चुंबकीय प्रक्रिया करून प्रसरण पद्धतीने धातुनलिकेवर गोट निर्माण केलेला दाखविला आहे. आ. ७ (अ) मध्ये प्रक्रियेची मांडणी दाखविली असून (आ) मध्ये नलिकेच्या अंगावर गोट निर्माण झालेला दाखविला आहे. या प्रक्रियेसाठी एकच मुद्रा लागते, मुद्राकारक लागत नाही. नलिकांच्या तोंडाचा भाग या प्रक्रियेने क्षणार्धात विस्फारित केला जातो.
नलिकावलन व मुख विस्फारण : धातूच्या नळ्या व नलिका अनेक कामांसाठी वक्राकार वाकवाव्या लागतात. नळ्या जाड असल्याने त्यांना बाक देताना यांत्रिक किंवा द्रविय दाबयंत्रे वापरतात. नळ्यांच्या पृष्ठभागाची गोलाई जशीच्या तशी रहावी म्हणून या यंत्रात नळीला योग्य अशा बिडाच्या वक्रण ठोकळ्याचा किंवा संरूपकाचा लाग देतात. तांब्याच्या नळ्यांची वेटोळी वातानुकूलन व प्रशीतन यंत्रणेत वापरतात. नलिकेची जाडी फारच कमी असल्याने तिचा पृष्ठभाग दाबाने चपटा होण्याचा संभव असतो. त्यासाठी नलिकेत योग्य मापाचा व लांबीचा कुंडल स्प्रिंगेचा दंड सारून नंतर त्यास बाक देतात. बाक दिल्यावर दंड फिरवून बाहेर काढतात. परंतु कुंडलाकार नलिकेतून तो बाहेर निघणे शक्य नसल्याने अशा प्रकारच्या बाकासाठी प्रथम नलिकेत पोलादाच्या गोळ्या भरतात आणि बाक दिल्यावर त्या काढून टाकतात. नलिका आखूड असल्यास तीत प्रथम शिसे किंवा राळ वितळवून ओततात व बाक दिल्यावर नलिका गरम करून काढून टाकतात. नळ्यांची वा नलिकांची तोंडे नसराळ्याच्या आकाराप्रमाणे काही कामासाठी विस्फारावी लागतात. त्यासाठी यंत्रात पोलादी नलिका प्रसरक बसवून दाबाच्या साहाय्याने नलिकांचे मुख विस्फारण करतात. नळ्यांची तोंडे निमुळती करण्यासाठी खास घूर्णी (परिभ्रमी) मुद्राठोकण यंत्र वापरतात.
ओतकाम प्रकार : धातूंचा रस करून त्यापासून हव्या त्या आकाराचे घन किंवा पोकळ यंत्रभाग किंवा इतर वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेस ओतकाम म्हणतात. या प्रक्रियेत प्रथम लाकडाचे किंवा धातूंचे हव्या असतील त्या आकाराचे फर्मे तयार करून ते उच्च तापमानास टिकणाऱ्या रेतीमध्ये दाबून त्या आकाराचे ठसे उमटवून साचे बनवितात. असे साचे धातूचा रस भट्टीमध्ये करून त्या रसाने भरतात [⟶ ओतकाम].
धातुचूर्ण प्रकार : या प्रक्रियेत प्रथम धातूचे चूर्ण करतात आणि नंतर असे चूर्ण पोलादी मुद्रासंचात विशिष्ट दाबयंत्राच्या साहाय्याने ठासून हव्या त्या धातूचा किंवा मिश्रधातूचा हव्या त्या आकाराचा यंत्रभाग शीत अवस्थेत बनवितात. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीत व इतर देशांत आणि अलीकडे भारतातही या पद्धतीने लहानसहान धातुभागांचे रूपण करतात. मुद्रासंचातून जो घन भाग तयार होतो तो नंतर एका विशिष्ट भट्टीत भाजतात. अशा भागांचे यंत्रण करावे लागत नसल्याने काहीही धातू वाया जात नाही, तसेच धातुचूर्णाबरोबर इतर पदार्थही मिसळता येतात [⟶ चूर्ण धातुविज्ञान].
संदर्भ : 1. Crane, F. A. A Mechanical Working of Metals, New York, 1964.
2. Lindberg, R. A. Processes and Materials of Manufacture, Boston, 1964.
3. Ludwig, O. A. Metalwork Technology and Practice, Blomington, 1962.
4. Wilson, F. W. Harvey, P. D., Eds. Tool Engineering Handbook, New York, 1959.
ओक, वा. रा. दीक्षित, चं. ग.
“