धातु –२ : विशिष्ट शरीरघटक शरीराचे धारण करतात म्हणून यांना धातू म्हणतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र असे ते सात घटक धातू होत. शरीरात तीन प्रकारचे घटक प्राधान्याने आहेत. दोष, धातू व मल या तिहीत धातू हे प्रधान घटक आहेत. शरीर म्हणजे धातू व तज्जन्य अवयव होय. दोष हे या धातूंच्या कार्याकरिता आहेत, म्हणजे ते गौण होत. धातूच्या पचनात जे शरीराच्या बाहेर घालवून देण्यासारखे पदार्थ तयार होतात त्यांना मल म्हणतात. तेही शरीरातून निघून जाण्याच्या क्षणापर्यंत धातूच समजले जातात. तसे दोषही शरीराच्या गरजेइतके शरीरात असले, तर शरीर धारण करतात म्हणून धातूच समजले जातात. दोष हे धातू व धातूजन्य अवयवांचे पचन, पोषण, घटक, वहन, मल, मोचन इ. क्रिया सतत करतात.
शरीरघटक नाशाची आपत्ती शरीरावर जेव्हा अतिसारासारख्या रोगरूपाने कोसळते तेव्हा शरीर प्रथम मल, नंतर दोष व नंतर धातू शरीराबाहेर घालवते. धातूंमध्येही रसापेक्षा रक्त, त्यापेक्षा मांस असे उत्तरोत्तर श्रेष्ठत्व असल्याने अगोदर रस, त्यानंतर रक्त, त्यानंतर मांस या क्रमाने धातुघटक शरीराबाहेर घालवते. लंघन केल्यावरही या क्रमाने धातुघटक क्षीण होतात. सारांश, दोषधातुमल यांत शरीराला धातू अधिक महत्त्वाचे व रसादि धातूंमध्ये उत्तरोत्तर धातू आणि शुक्र धातू सर्वांत महत्त्वाचा धातू वाटतो. उत्तरोत्तर धातू अधिकाधिक प्रसादरूप असतात. शुक्र धातू तर निर्मळ असतो. इतरांना मल असतात.
शरीरात दोषधातुमल शुद्ध, विशुद्ध, विशुद्धतर व अगदी क्वचित विशुद्धतम अशा सर्व प्रतीचे असतात. दोषादींपैकी जितके अधिक वरच्या दर्जाचे तितके अधिक शरीर आरोग्यसंपन्न, दीर्घायुषी, धीधृतिस्मृतियुक्त, बलवान असते. विशुद्ध धातुयुक्त पुरूष तर योगीच असतो. जितके दोषादी विशुद्धतम तितका तो श्रेष्ठ योगी होय.
पहा : दोषधातुमलविज्ञान.
जोशी, वेणीमाधवशास्त्री