धवला : दिगंबर जैनांच्या ⇨ षट्खंडागम ह्या सिद्धांतग्रंथावरील सर्वांत महत्त्वाची मानली जाणारी टीका. बप्पदेव गुरूने षट्खंडागमावर लिहिलेल्या व्याख्याप्रज्ञप्तिनामक टिकेच्या आधारे वीरसेन ह्या विद्वानाने धवलेची रचना केली. वीरसेनाचा हा टीकाग्रंथ इ. स. ८१६ मध्ये वाटग्रामपूर येथे पूर्ण झाला, असे दिसते. प्राकृत–संस्कृत–मिश्रित ७२ हजार श्लोकांची ही टीका आहे. ह्या टिकेमुळे त्रैलोक्य धवलित झाल्यामुळे हिचे नाव धवला ठेविले, असे ग्रंथकार म्हणतो. दिगंबर—श्वेतांबर आचार्यांच्या साहित्याचा वीरसेनाने उत्तम व्यासंग केलेला होता. सत्कर्मप्रामृत, मूलाचार, अकलंकांचे तत्त्वार्थभाष्य आदी अनेक दिगंबरपंथीय ग्रंथाबरोबरच श्वेतांबर पंथीयांच्या आयारंग, दसवेयालिय आदी ग्रंथांचा उल्लेख अथवा त्यांतील गाथा धवलेत आढळतात.
तगारे, ग. वा.