धर्मशाळा : वाटसरूंना उतरण्याकरिता व विश्रांतीकरिता असलेली वास्तू. यात्रा, व्यापार व देशपर्यटन इ. कारणांनी गवोगाव फिरणाऱ्या वाटसरूंना व निराश्रितांना निवाऱ्याची जागा असावी, या हेतूने गावोगावी धर्मशाळांची निर्मिती झाली. जनसेवा हीच ईश्वरसेवा या जाणिवेमुळे या कार्यास धर्माचे अधिष्ठान प्राप्त झाले. आपल्या राज्यात येणाऱ्या कोणत्याही पांथस्थाची किंवा यात्रेकरूची गैरसोय होऊ नये, म्हणून भिन्नभिन्न काळात राज्यकर्त्यांनी धर्मशाळा बांधल्या. गावातील लोकांच्या संघटित प्रयत्नांनी बांधलेल्या धर्मशाळा, मठ इ. लोकोपयोगी संस्थांचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आढळतो. भूतदया हाच खरा धर्म असे मानणाऱ्या सम्राट अशोकने अनेक धर्मशाळा बांधून निराश्रितांची व प्रवाशांची सोय केली. गुप्तकाळात एक खास अधिकारी धर्मशाळांवर देखरेख ठेवीत असे. ह्युएनत्संगच्या वर्णनानुसार हर्षवर्धनाच्या काळात मंदिरांबरोबरच धर्मशाळाही बांधण्यात येत व तेथे आवश्यकतेनुसार खाण्यापिण्याची आणि औषधोपचाराची व्यवस्था केली जाई. अनेक सधन लोक आपल्या मानसिक समाधानाकरिता आणि पापक्षालनाच्या हेतूने धर्मशाळा बांधत. मृत आप्तांच्या स्मृतिप्रीत्यर्थही धर्मशाळा बांधण्यात येत.
भांडारकर, पु. ल.