धर्मशास्त्र : प्राचीन समाजाचे नियमन धर्माने होत असे. व्यक्तीच्या सर्व व्यवहारांबाबतचे नियम धर्मविषयक ग्रंथांत समाविष्ट झालेले दिसतात. पुढे धर्माचा सामाजिक जीवनावरील प्रभाव जसजसा मर्यादित झाला, तशीतशी धर्म आणि विधी ह्यांची फारकत होत गेली. यूरोपमध्ये हे धर्मसुधारणा आंदोलनानंतर प्रकर्षाने घडून आले. ⇨ रोमन विधी मुळात धर्म व रूढी ह्यांवर आधारलेला होता. पुढे रोमचे साम्राज्य वाढल्यावर व व्यापाराच्या निमित्ताने त्यांचा ग्रीक संस्कृती व तत्त्वज्ञान ह्यांच्याशी संबंध आल्यानंतर रोमन विधीचे स्वरूप बदलले. स्टोइक तत्त्वज्ञानाचा रोमन न्यायशास्त्रावर मोठा परिणाम झाला. ह्यातून इहवादी जस जेनशिअमचा उदय झाला. सर्वसामान्य मानवी व्यवहारांना लागू असणारे विधिनिषेध या अर्थाने जस जेनशिअम ही संज्ञा रोमन काळात रूढ होती. जस सिव्हील म्हणजे केवळ रोमन लोकांनाच लागू असणारे विधी हे जस जेनशिअमपेक्षा अधिक मर्यादित होते. जस जेनशिअम हा आज अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा जनक होय.
जो विधी धर्मग्रंथावर आधारलेला आहे, त्याबाबतचे ⇨ न्यायशास्त्र म्हणजे धर्मशास्त्र, असे सर्वसामान्यपणे म्हणता येईल. हिंदू, मुस्लिम, ज्यू ह्यांचे विधी, धर्म व रूढी ह्यांवर आधारलेले आहेत. याप्रकारे सर्व प्राचीन विधी धर्म व रूढी ह्यांवर आधारलेले आहेत.
धर्म ह्या शब्दाचे अनेक अर्थ शब्दकोशात आढळतात. मुख्यतः धर्म हा शब्द आज्ञा, रूढी, कर्तव्य, अधिकार, न्याय, नीती, गुण, चांगली कृत्ये व कर्म ह्या अनेक अर्थांनी वापरला जातो. ‘धर्मशास्त्र’ हे विशेषनाम मुख्यतः हिंदू समाजाला जे नियम लागू होत, त्या नियमांचे शास्त्र अशा अर्थाने वापरले जाते. हिंदुधर्मशास्त्र हे मुख्यतः वेद, स्मृती आणि पुराणे ह्यांवर आधारलेले आहे. हिंदुधर्मशास्त्रावरील ग्रंथ इ. स. पू. सु. ६०० ते ३०० वर्षांपासून प्रचलित झाले असावेत. ह्या ग्रंथांना ‘धर्मसूत्र’ वा स्मृती म्हणतात. सर्वांत जुने ग्रंथ गौतम, आपस्तंब, असे हिरण्यकेशी व बौधायन ह्यांचे आणि त्यानंतरचे वसिष्ठ आणि विष्णू ह्यांचे आहेत. स्मृतिकारांत मनू, याज्ञवल्क्य, पराशर, नारद, कात्यायन, बृहस्पती इ. प्रमाणभूत मानले जातात. ह्याशिवाय महाभारत, पुराणे आणि स्मृतिग्रंथांवरील भाष्यांनी, टीकांनी व धर्मनिबंधानी धर्मशास्त्र समृद्ध केले.
धर्म सर्वव्यापी असल्याने धर्मशास्त्र माणसाच्या सर्व जीवनाचे नियमन करणारी संहिता आहे. माणसाचे संपूर्ण व्यवहार—व्यक्ती म्हणून, समाजाचा घटक म्हणून—त्याचे इतर माणसांशी संबंध, गोचर तसेच अगोचर वस्तूंशी संबंध, सृष्टीशी संबंध आणि दैवी तसेच भौतिक क्षेत्रातील व्यवहार हे सर्वच ह्या संहितेच्या क्षेत्रात येतात. वर्णाश्रमधर्म, राजधर्म, जातिधर्म, विवाहादी संस्कार, वारसाहक्क, दत्तक, ऋण, सीमा, सेवा इत्यादींसंबंधी नियम, गुन्हे व शिक्षा, साक्षी इ. न्यायालयातील प्रमाणांचा विचार, न्यायदानपद्धती, पापपुण्यविचार, एकंदरीत अनेक प्रकारचे विधिनिषेध धर्मशास्त्रात सांगितले आहेत.
⇨ हिंदू विधीप्रमाणेच ⇨ मुसलमानी विधी ही दैवी उपपत्तीवरच आधारलेला आहे. दोन्हींची भूमिका एकच आहे व ती ही की, अमुक प्रकारचे आचरण परमेश्वराला मान्य आणि त्याप्रमाणे वागण्यातच माणसाचे व समाजाचे हित आहे. हिंदू आणि मुसलमानी विधी धर्माशी इतके निगडित आहेत, की धर्म आणि विधी ह्यांची फारकत होऊ शकत नाही. मुसलमानी विधी हा मुख्यतः कुराणावर आणि प्रेषिताने केलेल्या कृती व त्याची वचने (हदिस) यांवर आधारलेला आहे. कुराण व हदिस यांवर वेळोवेळी जी भाष्ये लिहिली गेली. त्यांचाही त्याला आधार आहे.
यूरोपात धर्म आणि राजसत्ता जोपर्यंत एका सत्तेखाली होती, तोपर्यंत इहवाही कायदा अशी संकल्पनाच नव्हती. परंतु राजसत्तेचे निधर्मीकरण झाल्यावर मात्र धार्मिक संस्थांनी निर्माण केलेला ⇨ कॅनन लॉ हा फक्त त्या संस्थांच्या अंतर्गत व्यवहारांचे नियमन करणारा तसेच त्या संस्थांचे इतर धार्मिक तसेच ऐहिक संस्थांशी असलेल्या संबंधाचे नियमन करणारा विधी म्हणून ओळखला जाऊ लागला परंतु धर्मशास्त्र म्हणजे कॅनन लॉ नव्हे. कारण धर्मशास्त्र हे धर्मावर आधारलेले परंतु व्यक्तीच्या भौतिक तसेच पारमार्थिक व्यवहारांचे नियमन करते.
धर्माधिष्ठित कायद्याचा मूळ आधार रूढी होय. पारंपरिक समाज रूढिप्रिय होता. जसजसा समाज बदलला, तसतसे रूढीचे माहात्म्य कमी होत गेले. धर्म आणि रूढी ह्यांची बंधने कमी झाल्यावर कायदे मंडळांतर्फे कायदे करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. आजही धर्म आणि रूढी ह्यांचे वर्चस्व विधिनियमांवर आहेच. उदा., विवाह. कायद्यानुसार एखादा विवाह वैध ठरण्यासाठी धर्मप्रणीत विधी व्हावे लागतात. रूढीदेखील कायद्याचा आधार आहे. उदा., हिंदू विवाहविषयक कायद्याने विवाह व घटस्फोट ह्यांबाबतच्या रूढीला मान्यता दिली आहे.
साठे, सत्यरंजन
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..