धर्मविद्या : ‘थिऑलॉजी’ ह्या इंग्रजी शब्दासाठी वापरण्यात आलेला हा मराठी पर्याय आहे. ‘थिऑलॉजी’ ह्याचा शब्दशः अर्थ ‘देवविद्या’ किंवा ‘ईश्वरविद्या’ असा आहे. पण रूढ अर्थाने थिऑलॉजी किंवा धर्मविद्येमध्ये ईश्वर, मानवी आत्मा, ईश्वराचा जगाशी व जीवात्म्याशी असलेला संबंध, आत्म्याची मुक्ती किंवा ‘तारण’ या साऱ्यांचा समावेश होतो. ह्या अर्थाने धर्मविद्येचा उदय आणि विकास ग्रीक तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेल्या ख्रिस्ती धर्मपरंपरेत झाला. ग्रीक तात्त्विक परंपरेत प्लेटो-ॲरिस्टॉटल यांसारखे तत्त्ववेत्ते व ‘देववेत्ते’ यांमध्ये फरक करण्यात येत असे. देववेत्ते म्हणजे होमर, हेसिअड यांच्यासारखे देवांविषयीच्या पौराणिक कथा सांगणारे आर्ष कवी किंवा डेल्फायच्या संप्रदायाचे पुजारी [⟶ ग्रीक धर्म] तत्त्ववेत्ते बुद्धिप्रणीत तत्त्वांना अनुसरून विश्वाचे आणि मानवी आत्म्याचे स्वरूप, विश्वाला आधारभूत असलेले तत्त्व आणि त्याचा मानवी आत्म्याशी असलेला संबंध ह्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत. देववेत्ते आपल्या पारंपरिक धार्मिक श्रद्धेचा उद्घोष करीत आणि या श्रद्धेचा आशय स्पष्ट करीत. आपल्या उपास्य देवतांचे स्वरूप स्पष्ट करणे. त्यांच्या चरित्राचे वर्णन करणे, त्यांच्या उपासनेच्या पद्धतीचे विवरण करणे हे देववेत्त्यांच्या कार्याचे स्वरूप होते. ख्रिस्ती धर्मविद्येचे स्वरूप आणि आशयही याच प्रकारचा राहिला. ख्रिस्ती धर्मश्रद्धेचा स्वीकार करणाऱ्यांनी ह्या श्रद्धेचा आशय स्पष्ट करण्याचा आणि त्याचे समर्थन करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे ख्रिस्ती धर्मविद्या. असे करताना अर्थात ह्या श्रद्धेचा आशय काही सिद्धांतांच्या स्वरूपात मांडला पाहिजे — उदा., ईश्वराचे स्वरूप, आत्म्याचे स्वरूप, सृष्टी ह्याविषयीचे सिद्धांत – ह्या सिद्धांताला एका सुसंगत व्यवस्थेत गोविले पाहिजे आणि ह्या सैद्धांतिक व्यवस्थेचा विज्ञान, तत्त्वज्ञान, इतिहास इ. ज्ञानशाखांशी सुसंगत समन्वय साधला पाहिजे. ख्रिस्ती धर्मविद्येचे स्वरूप असे आहे. ह्या अर्थाने इतर धर्मपंथांच्याही धर्मविद्या असतात. कोणत्याही धर्मपंथाचे अनुयायी ईश्वर, आत्मा, विश्व यांच्याविषयीच्या ज्या सिद्धांतांद्वारा आपल्या धार्मिक श्रद्धेचा आशय आणि आपल्या आचरणाचे नियमन करणारी अंतिम मूल्ये स्पष्ट करतात, त्यांची सुसंगत बौद्धिक व्यवस्था म्हणजे त्या धर्माची धर्मविद्या.
तत्त्वज्ञानातही विश्वाचे समग्र स्वरूप, विश्वाला आधारभूत असलेल्या मूलतत्त्वाचा (असे तत्त्व असलेच तर) आणि मानवी आत्म्याचा संबंध इ. अंतिम प्रश्नाचा विचार होतो पण सामान्यपणे तत्त्वज्ञानात हा विचार केवळ बुद्धिप्रणीत आणि तार्किक तत्त्वांच्या आधाराने होतो. काही भारतीय दर्शने वेदांच्या प्रामाण्यावर आधारलेली आहेत पण दर्शनांचे स्वरूप केवळ तात्त्विक दर्शने असे राहत नाही, अशी दर्शने धर्मविद्येचा भाग ठरतात. उलट धर्मविद्येत हा विचार प्रमाणभूत मानलेल्या पारंपरिक श्रद्धेच्या चौकटीत होतो. ह्या परंपरेच्या मुळाशी बहुतेकदा ईश्वराने किंवा विश्वातील दिव्य तत्त्वाने प्रकट केलेले, केवळ बुद्धीला असाध्य असलेले पण पूर्णपणे प्रमाण असे ज्ञान असते आणि हे ज्ञान अधिकृत ग्रंथात ग्रंथित केलेले असते. धर्मविद्या अशा दिव्य ग्रंथांचे प्रामाण्य मान्य करून त्याच्यात स्पष्टपणे किंवा सुप्तपणे अंतर्भूत असलेल्या सिद्धांतांचे स्पष्टीकरण करते. ह्यामुळे तत्त्वज्ञान आणि धर्मविद्या यांच्यात अनेक समान समस्यांचा परामर्ष होत असला, तरी त्यांच्या विचारपद्धती भिन्न असतात. धर्मविद्येच्या विशिष्ट विचार पद्धतीमुळे तिला कित्येक विशिष्ट कार्ये पार पाडावी लागतात. धर्मग्रंथांचा भाषिक आणि ऐतिहासिक अभ्यास करावा लागतो आणि त्यांत गर्भित असलेले सिद्धांत आणि तत्त्वे विशद करावी लागतात. म्हणजे पवित्र धर्मग्रंथांचा अधिकृत भाष्यकार, ही भूमिका वठवावी लागते. कोणत्याही धर्माचे मूलभूत सिद्धांत, त्या धर्माच्या अगदी प्रारंभीच्या काळापासून विकसित किंवा उत्क्रांत होत जाऊन मग त्यांना बरेचसे स्थिर स्वरूप प्राप्त झालेले असते असे आढळून येते. अनेकदा ह्या विकासात, पवित्र ग्रंथांचा धार्मिक श्रद्धेच्या क्षेत्रात जो सर्वोच्च अधिकार असतो त्याहून कमी दर्जाचा अधिकार असलेल्या व्यक्तींनी किंवा ग्रंथानी भाग घेतलेला असतो ह्या विकासाला एक दिशा दिलेली असते. धर्मविद्येत सिद्धांतांच्या ह्या विकासाचा परामर्ष घ्यावा लागतो दुय्यम दर्जाच्या अधिकारी व्यक्तींनी किंवा ग्रंथांनी ह्या सिद्धांतांत जी भर घातलेली असते, त्यांचा जो अर्थ लावलेला असतो, तो कितपत प्रमाण आहे हे ठरवावे लागते आणि ह्या प्रकारच्या ऐतिहासिक प्रक्रियेमुळे जर काही अप्रमाण किंवा निराधार मते आणि प्रथा यांना धार्मिक परंपरेत स्थान लाभले असेल, तर त्यांना बाजूला सारून मुळची शुद्ध व पूर्णपणे प्रमाण अशी परंपरा स्पष्ट करावी लागते. कोणतीही धर्मविद्या जरी काही विशिष्ट पवित्र ग्रंथावर आधारलेली असली व त्यांच्यात व्यक्त झालेल्या किंवा गर्भित असलेल्या सिद्धांतांना सुसंगत रूप देण्याचे काम मुख्यत्वेकरून पार पाडीत असली, तर इतर धर्मही असेच आपापल्या पवित्र ग्रंथांवर आधारलेले आहेत आणि त्यांच्या आधारावर ते विरोधी सिद्धांत प्रतिपादन करीत असतात, ह्याची जाणीव प्रत्येक धर्माला असते. ख्रिस्ती धर्म किंवा इस्लाम यांसारखे धर्म केवळ आपले सिद्धांत पूर्णपणे सत्य आहेत आणि इतर धर्मांचे सिद्धांत असत्य किंवा अर्धसत्य आहेत, असा दावा करतात. हिंदू धर्मासारखे धर्म जरी असा दावा करीत नसले, तरी अशा धर्मातही अनेक पंथ असतात आणि स्वतःचा प्रामाण्यासाठी पवित्र ग्रंथांतील वचनांचा विशिष्ट रीतीने अर्थ लावण्याच्या पद्धतीचा ते आधार घेत असतात. यामुळे स्वतःच्या पवित्र ग्रंथाचे प्रामाण्य ‘वस्तुनिष्ठ’ दृष्टीने सिद्ध करण्यासाठी तसेच त्यांचा अर्थ लावण्याच्या पद्धतीचे समर्थन करण्यासाठी व इतर रीतींचे खंडन करण्यासाठी धर्मविद्येला युक्तिवादांचा आश्रय घ्यावा लागतो. आधुनिक कालात विज्ञानाचा आणि वैज्ञानिक पद्धतीचा उदय झाल्यानंतर धार्मिक दृष्टिकोनाचे तसेच ईश्वर (किंवा कोणत्याही स्वरूपात स्वीकारलेले दिव्य तत्त्व) आणि दृश्य विश्व यांच्या संबंधाविषयीचे जे विशिष्ट सिद्धांत धर्मविद्येने स्वीकारले असतील त्यांचे समर्थन करणे, हे धर्मविद्येचे एक महत्त्वाचे कार्य ठरते. सारांश, विशिष्ट पवित्र ग्रंथ आणि धार्मिक परंपरा यांच्या प्रामाण्यावरील श्रद्धा हा जरी धर्मविद्येचा आधार असला तरी ह्या चौकटीत सिद्धातांची मांडणी आणि त्यांचे तार्किक समर्थन करण्यासाठी धर्मविद्येमध्ये सूक्ष्म आणि चोख विचाराची कास धरावी लागते.
सामान्य अनुभवांच्या पलीकडे असलेल्या आणि श्रद्धेने स्वीकारलेल्या दिव्य तत्त्वाचे स्वरूप निश्चित करणे, हे धर्मविद्येचे मूलभूत कार्य असले, तरी ह्या श्रद्धेशी सुसंगत अशी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनसरणी कशी असावी, हे स्पष्ट करण्याचे कामही धर्मविद्येला करावे लागते. दिव्य तत्त्वाचा ऐहिक वास्तवतेशी असा सांधा जोडण्याच्या धर्मविद्येच्या प्रयत्नामुळे आणि धर्मविद्येच्या बौद्धिक प्रगल्भतेमुळे धर्मविद्येचा एकंदर मानवी संस्कृतीवर बराच प्रभाव पडलेला आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा व हिंदू धर्मशास्त्राचा निकटचा संबंध आहे. पाश्चात्य परंपरेत देकार्त, स्पिनोझा आणि लायप्निट्झ ह्या कांटपूर्वीच्या आधुनिक तत्त्ववेत्त्यांवर ख्रिस्ती आणि ज्यू धर्मविद्येतील संकल्पनांची दाट छाया आढळून येते. तसेच हेगेल, मार्क्स आणि अस्तित्ववादी तत्त्ववेत्त्यांच्या दूरीभवन इ. संकल्पना ख्रिस्ती धर्मविद्येतील कित्येक संकल्पनांनी धारण केलेली नवीन रूपे होत, असे म्हणणे योग्य ठरेल.
संदर्भ : 1. Kirk, K. E. Ed. The Study of Theology, New York, Harper, 1939.
2. Rahner, Karl Vorgrimler, Herbert Trans. Theological Dictionary, New York, 1965.
3. Tillich, Palu, Systematic Theology, 3 Vols., Chicago, 1951—63.
रेगे, मे. पुं.
“