धर्मपरिषदा : धर्मविषयक परिषदांचे दोन प्रमुख प्रकार पाडता येतील. पहिल्या प्रकारात एखाद्या विशिष्ट धर्माच्या लोकांच्या परिषदांचा समावेश करता येईल, तर दुसऱ्यामध्ये एकाहून अधिक धर्मांच्या लोकांच्या परिषदांचा समावेश होईल.
एका विशिष्ट धर्मानुयायी लोकांमध्ये होणाऱ्या परिषदांचे एक अतिप्राचीन रूप म्हणजे वैदिक यज्ञाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या लोकांची होणारी परिषद. ह्या परिषदांबाबत ‘परिषद’ असा शब्द वापरण्यात आला नसला, तरी धर्मपरिषदेमध्ये आढळणारी अनेक वैशिष्ट्ये ह्या परिषदांमध्ये आढळतात. ह्या निमित्ताने यज्ञकर्मांविषयींचे वादविवाद व निर्णय होत. त्यांमध्ये एखादी अगदी बारीकशी कृती कशी करावी येथपासून तो एखादा यज्ञ करूच नये येथपर्यंत विविध मते मांडली जात. तेथे मतस्वातंत्र्य असे परंतु आपल्या मताला समर्थक असे कारण देणे हे महत्त्वाचे असे. वैदिक साहित्याच्या ब्राह्मणग्रंथ ह्या साहित्यात अशा चर्चांचा आढळ होतो.
उपनिषदांमध्ये ‘परिषद’ हा शब्द विद्वानांची सभा ह्या अर्थी येतो. प्राचीन काळी गणराज्यांच्या वा राजांच्या परिषदा, सभा, समित्या असत. त्यांत धर्माची व धार्मिक तत्त्वज्ञानाचीही चर्चा वा वादविवाद होत असत. प्राचीन उपनिषदांमध्ये अशा परिषदांचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. भारतीय धर्मेतिहासात धर्मशास्त्रीय ग्रंथांचा मोठा प्रभाव दिसून येतो. स्मृती व तदनुसारी ग्रंथ ह्यांमध्ये ‘परिषद’ हा शब्द येतो. तेथे अभिप्रेत असलेली धर्मपरिषद सामान्यपणे धर्माची (पवित्र अशा कायद्याची) अमंलबजावणी कशी करावयाची, ह्यासंबंधीच्या कामासाठी होई. राजाने न्यायनिवाडा देताना परिषदेचा सल्ला घ्यावा, असा स्मृतींचा आदेश आहे. अर्थातच इतरही धार्मिक प्रश्नांचा विचार परिषदेतच होई. धर्माच्या सूक्ष्म निर्णयात परिषदेच्या कार्याच्या आवश्यकतेचा शंकराचार्यांनी आपल्या बृहदारण्यक उपनिषदभाष्यात (४·३·२) उल्लेख केला आहे. धार्मिक परिषदांमध्ये केवळ शास्त्राचा विचार करून निर्णय घेऊ नये, तर तर्काचाही वापर करावा असे बृहस्पतीने म्हटले आहे. पापी माणसाने परिषदेत आपले पाप जाहीर करून तेथे सांगितले जाईल ते व्रत प्रायश्चित्त म्हणून घ्यावे, असे याज्ञववल्यक्य म्हणतो. मनूच्या मतानुसार परिषदेमध्ये दहा सभासद असावेत. त्यांत तीन वेदांचे प्रत्येकी एक एक असे तीन सभासद, तर्कशास्त्रज्ञ, मीमांसाविद्वान, निरुक्त (व्युत्पत्ती) जाणणारा धर्मशास्त्रज्ञ आणि पहिल्या तीन आश्रमांचा प्रत्येकी एक एक असे दहा सभासद असावेत. धर्म निर्णय हा बहुमतानेच व्हावा असा प्रचीन ग्रंथकारांचा कल आहे. एखादा मनुष्य कितीही विद्वान असला, तरी धर्माचा निर्णय त्याने देऊ नये. कारण धर्माची गती सूक्ष्म असते, असे बौधायनधर्मसूत्रांत (१·१·१३) म्हटले आहे.
धर्मांच्या इतिहासात कालानुरूप काही प्रश्न निर्माण झालेले आढळतात. काही लोक जुन्या तत्त्वांना जुमानत नाहीत आणि नवीन विचार प्रसृत करू लागतात. अशा वेळी जुन्या तत्त्वांचा प्रमाणभूत संग्रह किंवा नवीन तत्त्वांपैकी काहींना अधिकृत मान्यता देणे, ह्यांसारख्या उद्देशांनी एखाद्या विशिष्ट धर्मांतर्गत परिषदा झालेल्या दिसतात.
बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये ह्या परिषदांना उद्देशून ‘संगीति’ असा शब्द वापरला जातो. संगीतीचा शब्दशः अर्थ ‘एकत्रितपणे धार्मिक ग्रंथांचे पठण करणे’, असा आहे. पहिली संगीती राजगृह येथे बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर लगेच काही दिवसांनी झाली. तीत धम्म (तत्त्वे) आणि विनय (वागणुकीचे नियम) निश्चित करण्यात आले म्हणजेच सुत्तपिटक व विनयपिटक हे ग्रंथ निश्चित करण्यात आले. ह्या संगीतीची पार्श्वभूमी अशी : सुभद्द नावाच्या भिक्खूने इतर भिक्खूंना सांगितले, की बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर आपण आता आपल्या मताप्रमाणे वागण्यास मोकळे झालो आहोत. हे कळल्यावर महाकस्सप ह्या भिक्खूला एखादी संगीती भरवून प्रमाणभूत विचार निश्चित करणे आवश्यक वाटले व त्यानुसार त्याने संगीती भरवण्यात पुढाकार घेतला. दुसरी संगीती वैशाली येथे बुद्धपरिनिर्वाणानंतर १०० वर्षांनी भरली. ह्या धर्मपरिषदेची आवश्यकता वज्जी येथील भिक्खूंच्या आचरणामुळे निर्माण झाली. त्या भिक्खूंनी आपल्या वर्तणुकीत दहा नवीन मुद्दे (दसवत्थु) घातले होते. ते दहा मुद्दे म्हणजे (१) शिंगामध्ये मीठ ठेवून ते जवळ बाळगणे, (२) मध्यान्हानंतर जेवण न करता मध्यान्हाच्याच वेळी सावली दोन बोटे झाली असता जेवण करणे, (३) एकाच दिवशी दुसऱ्या गावाला जाऊन पुन्हा जेवण करणे, (४) एकाच प्रदेशात उपोसथविधी एकत्र न करता वेगवेगळा करणे, (५) आधी एखादी गोष्ट करून मागून त्याला संमती घेणे, (६) एकाने एखादी गोष्ट केली असता दुसऱ्यानेही तेवढ्यावरून ती उचित मानून करणे, (७) भोजनानंतर ताक पिणे, (८) ताडी पिणे, (९) दशा नसलेले आसन, वस्त्र वापरणे व (१०) सोने, चांदी इ. जवळ बाळगणे. दुसऱ्या संगीतीमध्ये हे सर्व मुद्दे अयोग्य आहेत हे ठरवले गेले. तिसरी संगीती अशोकाच्या आधिपत्याखाली पाटलीपुत्र येथे झाली. ह्या कालापर्यंत अनेक पंथोपपंथ निर्माण झाले होते व धार्मिक ग्रंथांचे शुध्द रूपात संरक्षण करणे आवश्यक झाले होते. ह्या परिषदेमध्ये कथावत्थुपकरण हा ग्रंथ निश्चित करण्यात आला. त्यात पाखंड मतांचे परीक्षण आणि खंडन आहे. चौथी संगीती कनिष्काच्या काळात (इ. स. १००) भरली होती. ती जलंदर येथे भरली होती, की काश्मीरमध्ये ह्या विषयावर मतभेद आहेत. ह्या संगीतीमध्येही मतभेद मिटविण्याचा प्रयत्न झाला. कनिष्काने ह्याच वेळी त्रिपिटकांवर टीका लिहवून घेतल्या.
भारताप्रमाणेच बौद्धांच्या श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश येथेही अनेक परिषदा झाल्या आहेत.
जैन परिषदांचाही मुख्य उद्देश बौद्ध परिषदांप्रमाणे ग्रंथनिश्चिती हाच होता. त्यांतील पहिल्या दोन परिषदा विशेष महत्त्वाच्या आहेत. महावीराची शिकवण १४ ‘पुव्वां’मध्ये समाविष्ट झाली होती. महावीराच्या निर्वाणानंतर दोन शतकांनी मगधात मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी भद्रबाहूंच्या नेतृत्वाखाली लोक मगघातून बाहेर पडले आणि कर्नाटकात गेले. १४ पुव्वांचे ज्ञान असणारा शेवटचा असा जो स्थूलभद्र तो मगधात राहिलेल्या लोकांचा नेता झाला. मग ज्ञान नष्ट होण्याची शंका निर्माण झाली असता पाटलिपुत्रात पहिली परिषद घेण्यात आली व तीत ११ अंगग्रंथ निश्चित करण्यात आले आणि १४ पुव्व एकत्र करून ते बारावे अंग मानण्यात आले. काही काळानंतर भद्रबाहू मगधात परत आल्यावर मगधातील लोक व त्यांच्याबरोबर बाहेर पडलेले लोक ह्यांच्या आचारविचारांत फरक पडलेला त्यांना दिसून आला. मगधातील जैन पांढरी वस्त्रे वापरू लागले होते. तर भद्रबाहूंचे अनुयायी दिगंबरच होते. मग दिगंबरांनी श्वेतांबरांच्या (पांढरी वस्त्रे वापरणाऱ्यांच्या) ग्रंथांचे प्रामाण्य नाकारले. दिगंबरांच्या मते पुव्व हे शिल्लक राहिलेच नव्हते ते विस्मृत झाले होते. ह्यानंतर काही शतकांच्या काळात पुन्हा श्वेतांबरांच्या साहित्यात अव्यवस्था निर्माण झाल्यामुळे इ. स. पाचव्या-सहाव्या शतकाच्या सुमारास गुजरातमधील वलभी येथे परिषद घेण्यात आली. त्या परिषदेचा उद्देशही धर्मग्रंथांचे संकलन, लेखन ह्यासारखाच होता. पुढील काळातही जैनांच्या अशाच काही परिषदा झाल्या आहेत.
अशाच प्रकारे वेळोवेळी निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी ख्रिस्ती धर्मातही परिषदा घेतल्या जात असत व आजही त्या घेतल्या जातात. उदा., इ. स. २५६ मध्ये कार्थेज येथे झालेल्या परिषदेत फुटीरांनी दिलेला बाप्तिस्मा प्रमाण मानावयाचा का नाही, ह्या विषयावर विचार करण्यात आला. ख्रिस्ती धर्मपरिषदांचा इतिहास विचारात घेता त्यांमध्ये पुढील प्रकार आढळतात : डायॉसिझन् (जिल्हावार), प्रादेशिक, राष्ट्रीय, पौर्वात्य व पाश्चिमात्य आणि वैश्चिक. जितकी परिषद अधिक व्यापक तितका तिचा निर्णयही अधिक व्यापक प्रमाणात मान्य होत असे. काही वेळा परिषदांच्या निर्णयांना राजाची किंवा पोपची मान्यता मिळविण्याची आवश्यकता निर्माण होई. स्थानिक परिषदांमधील निर्णय मर्यादीत क्षेत्रातच प्रमाणभूत राहत व नंतर ते बदलले जाण्याचीही शक्यता असे.
कालानुसार व बदलत्या परिस्थितीत निर्माण झालेल्या समस्यांचा विचार करण्यासाठी भरवल्या गेलेल्या धर्मपरिषदांमध्ये एक उदाहरण म्हणून अलीकडील काळात झालेल्या (२२ ते २४ जानेवारी १९६६) विश्वहिंदुपरिषदेचा उल्लेख करता येईल. हिंदू धर्मात अनेक पंथोपपंथ असून त्यांच्यात परस्परांसी सामंजस्य व ऐक्य कित्येकदा आढळून येत नाही. इस्लाम व ख्रिस्ती ह्या धर्मांमध्ये इतिहासकाळात बळजबरीने अगर प्रलोभनाने बाटवल्या गेलेल्या हिंदूंची संख्याही मोठी आहे. त्यामुळे हिंदू धर्मांचे सामर्थ्य, ऐक्य आणि त्यातील धार्मिक आचार-विचारांची मूलभूत समता अबाधित राहण्यासाठी काय केले पाहिजे, ह्यावर विचार करण्यासाठी ही परिषद प्रयाग येथे भरली. त्यात हिंदूंच्या विविध पंथांचे लोक व धार्मिक नेते उपस्थित होते. हिंदूंचे एकीकरण व संस्कारांचा पुनर्निर्णय करण्यासाठी ह्या परिषदेने एक विद्वतपरिषदही नेमली. ह्या विद्वतपरिषदेने पुढे सभा घेऊन पुढील महत्त्वाचे निर्णय घेतले : नामकरण, विवाह व अंत्येष्टी हे संस्कार हिंदूंचे मूलभूत संस्कार असावेत. परदेशातील हिंदूंनी भारतोत्पन्न वृक्षांचे संवर्धन, त्रिवेणीजलकुंभस्थापना, स्थलांना भारतीय नावे देणे ह्यांसारख्या प्रकारांनी हिंदुत्व सांभाळावे. सर्व पंथीयांनी विजयादशमी, दीपावली, गुरूपौर्णिमा, रक्षाबंधन ह्यांसारखे सण पाळावेत. हिंदू धर्मासंबंधी इतक्या व्यापक व आधुनिक दृष्टीकोनातून अशी परिषद ह्यापूर्वी घेतली गेली नसल्याने ही परिषद महत्त्वाची आहे. पुढे विश्वहिंदुपरिषदेची इतरही काही सार्वत्रिक किंवा प्रादेशिक अधिवेशने झाली आहेत.
एकाहून अधिक किंवा पुष्कळ धर्माच्या एकत्र परिषदांपैकी जुन्या काळातील परिषद हर्षवर्धनाच्या कारकीर्दीत झाली होती, असे ह्युएनत्संगाच्या वृत्तांतावरून कळते. ती परिषद कनौज येथे झाली होती व त्याला बौद्ध धर्माचे व हिंदू धर्मातील अनेक पंथांचे विद्वान उपस्थित होते. ह्या परिषदेसंबंधी ह्युएनत्संगाने दिलेले सर्वच तपशील इतिहासकारांना मान्य होतील असे नाहीत. विशेषतः त्यामध्ये त्याने स्वतःची प्रौढी फारच मिरविली असल्याने संशयास जागा उरते परंतु अनेक धर्मांच्या एकत्र परिषदेच्या कल्पनेचे एक बीज तेथे सापडत असल्याने ह्या परिषदेचे महत्त्व अजिबात नाकारता येत नाही.
ह्यानंतरची दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे अकबराने घेतलेल्या अनेक धर्मपरिषदांची. ह्याबाबतही अकबराच्या एकूण धार्मिक हालचालींविषयी व त्याने स्थापिलेल्या ⇨ दीन – ए – इलाही (दैवी धर्म) ह्याविषयी पुष्कळ साधार माहिती मिळते. आपल्या सर्व राज्यात एकच धर्म असावा असे अकबराला वाटत होते व आपण धार्मिक नेता व्हावे अशी त्याला महत्त्वाकांक्षा होती. काहींनी ह्या बाबतीत त्याला विरोध केला, तरी तो त्याने दडपला. कुराण, ब्राह्मणांचे ग्रंथ, बायबल ह्यांतून काही तत्त्वे घेऊन आपण नवा धर्म स्थापून त्याचे प्रमुख व्हावे असे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने १५८२ मध्ये एक धर्मपरिषद बोलावली. त्याने नजीकच्या शहरांतून विद्वान आणि सेनापती बोलावले. त्यावेळी फादर रिडॉल्फो आक्वाव्हीव्हा याने अकबराला विरोध केला पण अकबराला मानणाऱ्यांनी तो मोडून काढला. सर्वांचा एकच धर्म झाल्याने देवाची सेवा, प्रजेत शांतता व राज्याची सुरक्षितता ह्या सर्व गोष्टी घडतील, असे अकबराने आवाहन केले आणि उपस्थितांना आपली मते मांडण्यास सांगितले. अकबराला पाठींबा देणाऱ्यांनी सर्व राज्याला देव, उत्सव, कर्मकांड, आचारनियम सांगण्याची अकबरालाच विनंती केली. परिषदेतील ठरावाची माहिती सर्वत्र देण्यात आली. राजा भगवान दास ह्याला अकबराचे विचार मान्य नव्हते पण तो परिषदेस गेला होता की नाही हे कळण्यास पुरावा नाही. त्याचाच मुलगा कुंवर मानसिंह अकबरास स्पष्ट सांगतो, की अकबराने आज्ञा दिल्यास मी इस्लाम धर्म स्वीकारीन पण ह्या नव्या धर्मास माझा विरोध आहे. अकबराचा नवा दीन-ए-इलाही विविध धर्मांतील विचारांचे मिश्रण करून तयार झाला होता. अकबर स्वतः त्यानुसार वागत असे, या धर्माची दीक्षा देण्याचा विधी त्याने तयार केला. ह्या धर्मात प्रवेश केल्यावर मांसाशनास बंदी होती. सूर्य, अग्नी ह्यांच्या उपासनेचा त्यात अंतर्भाव होता. गोहत्याबंदी होती व गोहत्या करणारास मृत्यूची शिक्षाही होती. दाढी ठेवणे, लसूण, कांदा खाणे ह्यांसही बंदी होती. एकंदरीने हिंदू, जैन व पारशी धर्मांचा ह्या नव्या धर्मावर प्रभाव पडू लागला होता परंतु ह्या धर्माला फारसे अनुयायी मिळाले नाहीत व लवकरच तो नष्टही झाला. एकूण ही सर्वच चळवळ अकबराच्या अतिमहत्त्वाकांक्षेचा एक आविष्कार होती. तरी सर्व धर्मांचा अभ्यास आणि त्यांतील तत्त्वांना मान देणे, अनेक धार्मिक विचारवंतांनी एकत्र येणे, हे मुद्देसुद्धा त्या काळची परिस्थिती विचारात घेता अतिशय महत्त्वाचे आहेत.
ह्या सर्वधर्मपरिषदेचे एक अत्यंत परिणत रूप म्हणजे शिकागो येथे १८९३ साली ‘पार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलिजन्स’ ह्या नावाने भरलेली सर्व धर्मपरिषद. १८८९ सालाच्या शेवटी अशी जागतिक सर्वधर्मपरिषद भरवावी, ह्या कल्पनेच्या विचारासाठी एक समिती स्थापन झाली. १८९१ च्या जूनमध्ये समितीने एक प्रारंभिक निवेदन सर्वत्र पाठविले. त्यात ह्या परिषदेचे उद्देश व गरज ह्यांविषयीचे निवेदन होते. धार्मिक साहित्याचे अधिकाधिक उत्साहाने व बंधुभावाने सर्वत्र अध्ययन करण्याची आवड कशी वाढत आहे, यावर त्यात भर दिला होता. जगातील प्रमुख व्यक्तींनी बंधुभावाने श्रेष्ठ तत्त्वांचे प्रतिपादन व आधुनिक समस्यांबाबत धर्माचे मार्गदर्शन ह्या गोष्टी सांगाव्यात, अशी समितीने विनंती केली. ईश्वराचे अस्तित्व गृहीत धरून ईश्वरोपासनेबाबत आणि सर्व मानववंशांमध्ये ऐक्य प्रस्थापित करण्याच हेतु ह्या धर्मपरिषदेमागे आहे, हेही ह्या समितीने जाहीर केले. सर्वधर्मपरिषदेच्या कल्पनेचे सर्वत्र स्वागत झाले. माक्स म्यूलरसारख्यांना अशा परिषदांमुळे तौलनिक धर्मशास्त्राच्या अध्ययनास मदत होईल असे वाटले. ख्रिस्ती धर्मातील विशिष्ट भाग आपले श्रेष्ठत्व ह्या प्रसंगी सिद्ध करू शकेल अशी आशा काहींना वाटली. काहींना असे वाटले, की आपला धर्म उपेक्षित असून अशा परिषदेद्वारे आपण धारण करीत असलेल्या सत्यांकडे सर्वांचे लक्ष जाईल, तर काहींना असे वाटले, की ह्या परिषदेमुळे सर्व ख्रिस्ती लोक अधिक जवळ येतील. परिषदेचे उद्देश मात्र सर्व ऐतिहासिक धर्मांचे प्रतिनिधी एकत्र आणणे, सर्व धर्मांतील महत्त्वाची तत्त्वे व सदृश्य विचार ह्यांचे सम्यकदर्शन घडवणे व मानवी बंधुभाव वाढविणे हे होते.
मात्र काहींनी परिषदेला विरोध केला. अमेरिकेतील अनेक नियतकालिकांनी ह्या परिषदेच्या कल्पनेचा प्रसार होऊ लागताच विरोध सुरू केला. प्रेसबिटेरियन चर्चने ह्या धर्मपरिषदेच्या विरोधी ठराव घाईघाईने पास केला. मात्र पुढे त्यातील काहींनी परिषदेला पाठिंबा दिला. तुर्कस्तानच्या सुलतानाचाही परिषदेला विरोध होता. कँटरबरीच्या आर्चबिशपने असे लिहले, की ख्रिस्त धर्म हा एकमेव धर्म आहे. इतर धर्मांशी तो सारख्या पातळीवर आहे असे मानल्याशिवाय परिषदेत भाग घेता येणार नाही. शिवाय धर्म ही गोष्ट अतिपवित्र असून तो चर्चेचा विषय नाही. म्हणून मी धर्मपरिषदेस येणार नाही. ही गोष्ट माक्स म्यूलर यांना कळली, तेव्हा त्यांनी ह्याबाबत खेद व्यक्त केला. प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ वाटत असला, तरी दुसऱ्याच्या धर्माचा आदर करण्याची वेळ एक दिवस निश्चित येईल, असा आशावाद त्यानी प्रकट केला.
प्रत्यक्ष परिषद सप्टेंबर १८९३ मध्ये झाली. ह्या परिषदेत पुढील धर्मांचा प्रमुख भाग होता : ख्रिस्ती, ज्यू, इस्लाम, हिंदू, पारशी, बौद्ध, कन्फ्यूशन, ताओ, शिंतो इत्यादी. परिषदेच्या वेळी दररोज व्याख्याने, निबंधवाचन असे कार्यक्रम होत. निरनिराळ्या शंका विचारून त्यांचे समाधान करून घेण्यासाठी काही खोल्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यांचा उपयोग बौद्ध व कॅथलिक्स ह्यांनीच मुख्यत्वेकरून केला. परिषदेच्या शेवटी सर्वांनीच परिषदेचे यश मान्य केले. परिषदेमध्ये कोणतेही मत दाबण्याचा प्रयत्न झाला नाही, तर त्याच्या स्पष्ट उच्चारणास परवानगी मिळाली. परस्परसहिष्णुता, सौजन्य आणि सदिच्छा ह्यांचे वातावरण निर्माण झाले. शिकण्याच्या व शिकवण्याच्या इच्छेला वाव मिळाला. अनेक लहान पंथांनी आपले प्रतिनिधित्व दाखवण्याचा प्रयत्न केल पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. तसेच काहींचे प्रचारकी प्रयत्न असफल झाले. ह्या धर्मपरिषदेत बारीकसारीक धर्मपंथांना किंवा संकुचित भावनेला आश्रय दिला गेला नाही. तुलना व चिकित्सा ह्यांचे महत्त्व प्रतिपादिले गेले.
ह्या परिषदेनंतरच्या काळात लहानमोठ्या प्रमाणावर सर्व धर्मपरिषदा अनेकदा भरत आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे केवळ धर्मांचा विद्यापीठीय पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्वानांचीही संमेलने भरत असतात. परस्परधर्माचा अभ्यास करणे, हे तत्त्व आता सिद्ध झाले आहे व त्याचे श्रेय अशा सर्व धर्मपरिषदांनाच देता येईल.
संदर्भ : Barrows, J. H. The Worlds’ Parliament of Religions, Chicago, 1893.
थिटे, ग. उ.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..