पेले :( २२ ऑक्टोबर १९४० – ). ब्राझीलचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू. संपूर्ण नाव एड्सन आरेंटीस डू नाशसिमेंटू. ब्राझीलमधील ट्रेस कुरसँइस येथील एका गरीब निग्रो कुटुंबात जन्म. लहानपणापासूनच त्याला फुटबॉलची आवड होती. त्याचे वडील जो रामोस डू नाशसिमेंटू हेही चांगले फुटबॉल खेळाडू होते. त्यांनी स्वत: तर पेलेला शिकवलेच पण त्यांचा मित्र असलेल्या विल्दमीर द ब्रितो या उत्कृष्ट फुटबॉलपटूच्या मार्गदर्शनाचा लाभ पेलेला मिळवून दिला. द ब्रितोमुळेच पेलेचा ब्राझीलमधील ‘सांतोज’ या सुप्रसिद्ध क्लबमध्ये प्रवेश झाला. क्लबतर्फे खेळत असतानाच त्याचे फुटबॉलमधील नैपुण्य विकसित होत गेले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी पेले व्यावसायिक व ज्येष्ठ खेळाडूंच्या तुलनेत सरस ठरला. सोळाव्या वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय सामन्यांत भाग घेऊ लागला व १९५८ साली तो ब्राझीलकडून जागतिक करंडकाच्या स्पर्धेत उतरला. त्यानंतर फुटबॉलचा खेळ हाच त्याचा व्यवसाय बनला व त्यातच त्याला यश व प्रचंड संपत्ती लाभली. १९५८ पासून बारा वर्षे पेलेने जागतिक करंडक ( वर्ल्ड कप जूल्ह रिमेट ट्रॉफी ) स्पर्धेत स्वत:चे आणि ब्राझीलचे नाव गाजवले. त्याने ब्राझीलला चारपैकी तीन स्पर्धांत जागतिक विजेतेपद मिळवून दिले (१९५८,१९६२ व १९७०). पेले ब्राझीलकडून एकूण ११२ सामने खेळला. त्यात त्याने ९७ गोल रचले. सांतोज क्लबकडून तो अठरा वर्षे खेळला. त्यात त्याची गोलसंख्या १,१४५ झाली. १९७५ पासून तो न्यूयॉर्कच्या ‘कॉसमॉस’ संघाकडून खेळू लागला. पेलेची एकूण गोलसंख्या १,३६३ सामान्यांत १,२८१ झालेली आहे.गोलसंख्येत जगामध्ये पेलेचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलच्याच अर्तूर फ्राइडेनराइखने आपल्या २५ वर्षांच्या कारकीर्दीत १,३२९ गोल केलेले आहेत. १ ऑक्टोबर १९७७ रोजी, वयाच्या ३७ व्या वर्षी पेले फुटबॉल खेळातून निवृत्त झाला. त्याच्या काळातील तो आतील आघाडीवर (इनसाइड फॉरवर्ड खेळणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू मानला जातो. अप्रतिम कौशल्य, कमालीचे चापल्य, आक्रमकता, अचूक अंदाज आणि शारीरिक सुदृढता यांच्या बळावर पेलेची कारकीर्द यशस्वी ठरली. गोल करण्याची त्याची क्षमता अद्वितीय होती. तो पहिला लक्षाधीश फुटबॉलपटू होय.१९६० साली ब्राझीलने त्याला राष्ट्रीय धन ( नॅशनल ट्रेझर ) म्हणून गौरविले. जगभरचे चहाते त्याला ‘किंग’ पेले किंवा ‘ब्लॅक पर्ल’ म्हणून ओळखू लागले. १९६० ते १९७० या दशकातील तो सर्वांत श्रेष्ठ खेळाडू समजला जातो. अमेरिकेत त्याने फुटबॉलचा खेळ लोकप्रिय केला व त्या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तो एकदा भारतातही येऊन गेला. २४ सप्टेंबर १९७७ रोजी कलकत्त्याला झालेल्या कॉसमॉस व मोहन बगान या दोन संघांतील फुटबॉल सामन्यात पेले कॉसमॉसकडून खेळला. त्याचा खेळ सु.७०,००० प्रेक्षकांनी पाहिला. १९७७ साली ‘युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड’ ला मदत दिल्याने संयुक्त राष्ट्रांतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. विश्व-नागरिक ( वर्ल्ड सिटिझेन ) म्हणून त्याला मानपत्र देण्यात आले.
पंडित,बाळ ज.
“