पुरुम : मणिपूर राज्यातील एक आदिवासी जमात. ‘कुकी’ या आदिवासी जमातीचे जुने कुकी व नवे कुकी असे दोन पोटभेद आहेत. त्यांपैकी पुरुम हे जुन्या कुकींपैकी असून त्यांची लोकसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार उपलब्ध नाही मात्र १९६१ मध्ये ती ८२ होती. तथापि त्यांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये या लहान गटातसुद्धा प्रकर्षाने जाणवतात. त्यांची वस्ती इंफाळ खोऱ्यात प्रामुख्याने आढळते. हे लोक ठेंगणे, गहू वर्णाचे असून पुरुम किंवा मैथेयी ही भाषा बोलतात. छातीपासून पोटऱ्यांपर्यंत एकच वस्त्र परिधान करण्याची स्त्री-पुरुषांत पद्धत आहे. पुरुष कधीकधी डोक्याला पगडीसारखे वस्त्र गुंडाळतात. त्यांच्यात मोजके दागिने असून पितळी मण्यांच्या माळा, हार व अंगठ्या घालण्याची पद्धत आहे. डोंगराच्या उतरणीवर ते स्थलांतरित पद्धतीची शेती करतात आणि तीत भात व कापूस ही पिके काढतात.
यांशिवाय शेतीची अवजारे तयार करून ती विकणे, हाही यांचा एक जोडधंदा आहे. सांप्रत मैथेयी लोकांच्या सान्निध्याचा परिणाम म्हणून त्यांच्याकडून दरी-खोऱ्यातील जमीन विकत घेऊन तेथे कायम पद्धतीची शेती ते करू लागले आहेत. त्यांच्या पोशाखातही बदल झाला असून ते शिवलेले तयार कपडे वापरू लागले आहेत. यांत बहिर्विवाही मुख्य सहा सहोदरे असून त्यांची प्रत्येकी तीन-चार उपसहोदरे असतात. प्रत्येक सहोदर-कुळीचा एक मुख्य असतो. त्याला ‘पिप’ म्हणतात. सर्व जमातीचा मुखिया धार्मिक विधी करतो. संपत्तीचा वारसाहक्क धाकट्या मुलाकडे जातो. त्यांत विभक्त कुटुंबपद्धती प्रचलित आहे. निपुत्रिकाची संपत्ती मात्र सहोदरांच्या प्रमुखांत वाटून घेतात. बहुपत्नीत्व असूनही एकपत्नीत्वास प्राधान्य आहे. वयात आल्यानंतरच मुला-मुलींचे विवाह होतात. नियोजित वराला सासऱ्याच्या घरी लग्नापूर्वी सेवेसाठी तीन वर्षे रहावे लागते. या काळात वधू-वरांचा शरीरसंबंध होऊ देत नाहीत. योग्य कारणासाठी घटस्फोट मिळतो पण वांझपणा हे कारण होऊ शकत नाही. पुरुम हे जडप्राणवादी आहेत तथापि ते कृष्ण, देवी, महादेव, यम या हिंदू देवतांना भजतात. मुंगचुंगबा ही त्यांची ग्रामदेवता आहे. तिचा वर्षातून दोनदा उत्सव साजरा करतात. मुख्य ग्रामदेवी मुंगचुंगबा हिच्या जागेस ‘लमण’ म्हणतात. ग्रामपंचायतीचे सार्वजनिक काऱ्यालय ‘रुइशांग’ या नावाने प्रसिद्ध असते. या जागेमध्ये तरुण मुले-मुली धार्मिक विधीच्या वेळी नाचगाणी म्हणतात. बहुतेक धार्मिक विधींत, मग मुलाचे जावळ काढणे असो वा अंत्यविधी असो, डुकराचे मांस खातात. अविवाहित मुलींचा एक विशिष्ट समारंभ ऑगस्ट महिन्यात साजरा करतात.
ते मृताला त्याच्या हत्यारांसह पुरतात. प्रेत शवपेटिकेत घालून स्मशानात नेतात. अनैसर्गिक रीत्या मृत्यू आल्यास जावयाकडून खड्डा खणविला जातो. दुष्ट भुतांमुळे मृत्यू येतो, अशी त्यांत समजूत आहे.
संदर्भ :Das. T.C. The Parums, London, 1945
कीर्तने, सुमति