पीची : केरळ राज्याच्या त्रिचूर जिल्ह्यातील व तालुक्यातील एक प्रमुख धरण आणि पर्यटन केंद्र. प्रामुख्याने पूरनियंत्रण व किनाऱ्यापासून त्रिचूरपर्यंतच्या जलवाहतुकीसाठी नियमित जलपुरवठ्याच्या उद्देशाने, त्रिचूर शहराच्या पूर्वेस सु. २३ किमी. मानाली नदीवर पीची हे धरण बांधण्यात आले आहे. लांबी २१३·३६ मी., उंची ४०·८४३ मी., जलसंचयनक्षमता ११३·२७ द. ल. घ. मी., जलाशयाखालील क्षेत्र १,२९५ हेक्टर. कालव्यांची एकूण लांबी १४१·६ किमी. पैकी ७·०८ क्यूमेक्स जलवहनक्षमतेचा व ३७ किमी. लांबीचा उजवा कालवा, तर ४५ किमी. लांबीचा व ३·५४६ क्यूमेक्स जलवहनक्षमतेचा डावा कालवा आहे. १९५३ मध्ये धरणाच्या कामास सुरुवात होऊन १९५७-५८ मध्ये ते पूर्ण झाले. २·३५ कोटी रु. खर्चून बांधलेल्या या धरणामुळे सु. १८,६१५ हेक्टर जमिनीला त्याचप्रमाणे त्रिचूर शहरालाही पाणीपुरवठा केला जातो.
येथील आकर्षक व विस्तीर्ण वनस्पती-उद्याने, बगीचे आणि त्यांतील कांरजी, प्रपातमाला, छानदार सरोवरे, पोहण्याचे सुंदर तलाव व वनश्रीने विनटलेल्या सभोवतीच्या टेकड्या यांमुळे एक पर्यटन केंद्र म्हणूनही पीची प्रसिध्द आहे. येथील मानवनिर्मित जलाशयातून विहार करताना काठावरील रानटी प्राणी पाहण्याची मजाही पर्यटकांना लुटता येते. जून १९६० मध्ये स्थापन झालेली ‘केरळ रिसर्च एंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट’ येथे असून तीमधील धरणे, बंदरे, विद्युत्शक्ती प्रकल्प, पूल व राज्यामधील इतर कुशल अभियांत्रिकी कलाकृतींचे नमुने प्रेक्षणीय आहेत. त्यांशिवाय ‘केरळ मॉडेल’ या वास्तूमधील भूमिस्वरूपे, धरणे, पूल, विद्युत्शक्ती प्रकल्प, रस्ते इ. स्थलाकृतींनी दर्शवलेली केरळ राज्याची मृत्तिका-प्रतिकृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. पर्यटकांच्या आकर्षणासाठी सर्व सोयींनी युक्त अशी ‘पीची हाउस’ व ‘पीची हॉटेल’ ही दोन वसतिस्थाने शासनाने येथे बांधली आहेत.
चौधरी, वसंत