पाम स्प्रिंग्ज : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर व विश्रामस्थान. लोकसंख्या २०,९३६ (१९७०). हे लॉस अँजेल्सच्या आग्नेयीस सु. १६० किमी., सॅन जसिंटो पर्वतपायथ्याशी कॉचिला दरीत वसले आहे. जॉन गथ्री माकॅलम याने १८८४ मध्ये याची स्थापना केली. गरम पाण्याच्या झऱ्यामुळे हे ‘आग्वा काल्येंटे’ म्हणून ओळखले जात होते. १९३८ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला. याच्या पश्चिमेस व दक्षिणेस अनुक्रमे सॅन जसिंटो व सांता रोझा हे पर्वत असल्याने किनारी पाऊस व धुके यांपासून याचे संरक्षण झाले आहे. येथील कोरडे, उबदार व उत्तेजक हवामान आणि निसर्गसौंदर्य यांमुळे देशातील अत्यंत लोकप्रिय आरोग्यस्थानांमध्ये याची गणना होते. याच्याजवळच ‘जॉशुआ वृक्ष राष्ट्रीय स्मारक’ आहे.
गाडे, ना.स.