पपायरस: (ईजिप्शियन पेपर प्लँट, पेपर रीडलॅ. सायपेरस पपायरस कुल-सायपेरेसी). ही ⇨ लव्हाळ्यासारखी ओषधीय [→ओषधि] व अनेक वर्षे जगणारी वनस्पती आफ्रिकेतील उष्ण भागात, विशेषतः मोठ्या सरोवरांच्या प्रदेशांत आढळते. सिसिलीत थोड्या क्षेत्रात तिचा प्रसार झाला आहे. ईजिप्तमध्ये प्राचीन काळात तिचा प्रसार खालच्या नाईलपर्यंत आणि भूमध्य सामुद्रिक किनाऱ्यापर्यंत होता. तेव्हा तिच्या खोडातील मगजापासून (गरापासून) कागद बनवीत असत त्यावरून वनस्पतीला वरील इंग्रजी नावे दिली गेली. नद्यांच्या देखाव्यांच्या तेव्हाच्या चित्रांत ही वनस्पती दाखविलेली आढळते. हलक्या नौका तयार करण्यासाठी तसेच नौकांमधील जोड जलाभेद्य करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग करण्यात येत असे. ईजिप्शियन थडग्यांत या वनस्पतीपासून बनविलेले दोरही आढळतात. थीओफ्रॅस्टस (इ. स. पू. सु. ३७२–२८७) या ग्रीक तत्त्वज्ञांनी या वनस्पतीचे प्रथम अचूक वर्णन केलेले आढळते.
पाणथळ जमिनीत हिची जाडजूड व शाखायुक्त ग्रंथिक्षोडे व मूलक्षोडे [→खोड] पसरून वाढतात आणि त्यांपासून जमिनीवर हिरवी, त्रिकोणी, गुळगुळीत व सु. ४·५ मी. उंच खोडे येतात. त्यांच्या तळाशी खवले व टोकाशी लांब गवतासारख्या पानांचा झुबका येतो. तेथेच असंख्य लहान फुलांची कणिशे चवरीसारख्या फुलोऱ्यात येतात [→पुष्पबंध]. फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे ⇨ सायपेरेसी कुलात (मुस्तक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. ही वनस्पती शोभेकरिता बागेत लावतात. हिची नवीन लागवड बियांपासून करतात.
प्राचीन ईजिप्शियन, रोमन व ग्रीक लोक हिच्या खोडांच्या तुकड्यांतील मगज काढून आणि त्याचे उभे व आडवे थर एकमेकांवर ठेवून बडवून सपाट लहान तक्ते बनवीत व फक्त महत्त्वाचा मजकूर लिहिण्यास ते वापरीत. रोमन शास्त्रज्ञ थोरले प्लिनी (इ.स. २३–७९) यांनी आपल्या Historia Naturalis या ग्रंथात पपायरसापासून त्या काळी कागद तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कृतीचे वर्णन दिलेले आहे. ईजिप्शियन पुरोहित वैद्यांनी पपायरस कागदांवर लिहिलेले वैद्यकीय ग्रंथ बनविले होते. रंगीत चित्रे काढण्यासाठी हा कागद अकिकाच्या साहाय्याने गुळगुळीत करून वापरीत. हजारो वर्षांनंतर आज तो कागद ठिसूळ, फिकट व भुरकट झाला असला तरी त्यावरचे लिखाण जसेच्या तसे दिसते. चर्मपत्राचा शोध लागल्यानंतर पपायरसाचा उपयोग कमी होत गेला. पपायरस शब्दावरूनच कागद या अर्थाचा ‘पेपर’ हा इंग्रजी शब्द आला आहे.
जमदाडे, ज. वि.
“