पेशवे : मुख्यप्रधान या अर्थी मराठी अंमलात वापरलेली संज्ञा. प्राचीन काळी मुख्यप्रधान हे पद अस्तित्वात होते किंवा काय ह्याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. परंतु मुसलमानी अंमलात पेशवा ह्या शब्दाने मुख्यप्रधानाचा उल्लेख आढळतो. एखादे मोठे देवस्थान किंवा एखाद्या मोठ्या घराण्याची जहागीर ह्यांची व्यवस्था पाहणाऱ्या प्रमुख व्यक्तीस पेशवा किंवा प्रधान आणि पुढे मुख्यप्रधान म्हणू लागले. जेजुरी देवस्थानाचे पेशवे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रधान ही घराणी अद्यापि विद्यमान आहेत. शिवछत्रपतींचे पहिले प्रधान किंवा मुख्यप्रधान शामराज रांझेकर या नावाचे गृहस्थ होते.त्यानंतर महादेव मुख्यप्रधान झाले पण दोघांच्याही शिक्यांत मुख्यप्रधान असा शब्द न वापरता ‘मतिमंत्प्रधान’ असा निर्देश आला आहे. शामराजाचा शिक्का शके १५८४ (इ. स. १६६२) पर्यंतच्या, तर महादेवाचा शिक्का १५९४ (इ. स. १६७२) पर्यंतच्या कागदांवर आढळतो. नंतर मोरोपंत त्रिमल पेशवे हे शिवाजी महाराजांचे मुख्यप्रधान झाले. पहिल्या दोन प्रधानांची कर्तबगारी समजण्यास मार्ग नाही पण मोरोपंत पेशवे प्रधान होण्यापूर्वी कित्येक वर्षे शिवछत्रपतींच्या सेवेत असून, त्यांनी कोकणात व देशावर अनेक प्रकारच्या यशस्वी हालचाली केल्यानंतर त्यांना मुख्यप्रधानपद मिळाले. शिवराज्याभिषेकाच्या वेळी तेच मुख्यप्रधान होते. त्यांच्या पहिल्या शिक्क्यात प्रधानकीचा निर्देश नाही पण पुढील दोन्ही शिक्क्यांत त्यांचा मुख्यप्रधान म्हणून निर्देश आला आहे. संभाजीच्या कारकीर्दीच्या आरंभी तेच मुख्यप्रधान होते. ते वारल्यानंतर त्यांचा थोरला मुलगा निळो मोरेश्वर हा मुख्यप्रधान झाला.⇨ छत्रपती शाहू मोगलांच्या कैदेतून १७०७ साली सुटून आल्यानंतर १७१३ पर्यंत निळो मोरेश्वराचा भाऊ बहिरो मोरेश्वर हाच मुख्यप्रधान म्हणून काम पहात होता पण त्यानंतर शाहूने ⇨ बाळाजी विश्वनाथ (कार. १७१४ – २०) या कोकणातील भट घराण्यातील हुशार आणि कर्तबगार इसमास मुख्यप्रधानकी दिली. ती वंशपरंपरेने चालली, म्हणून भट घराण्यास पेशवे घराणे व त्यांच्या कारकीर्दीस पेशवाई असे म्हटले जाते. बाळाजीने मराठी राज्यातील कान्होजी आंग्रे, उदाजी चव्हाण इ. मातबर सरदारांना छत्रपती शाहूच्या छत्राखाली एकत्र आणून मराठी राज्याची विसकटलेली घडी पुन्हा नीट बसविली. त्यानंतर त्याचा थोरला मुलगा ⇨ पहिला बाजीराव (कार. १७२० – ४०) यास शाहूने पेशवेपदाची वस्त्रे दिली. पहिल्या बाजीरावामध्ये धडाडी होती. त्याने आपल्या पराक्रमाने छत्रपती व मराठे सरदार यांमध्ये परस्परविश्वास निर्माण केला आणि मोगलांच्या ऱ्हासाची संधी साधून मराठी राज्याचा विस्तार राजपूत, बुंदेले यांच्या मदतीने उत्तर हिंदुस्थानात केला. शिवाय दक्षिणेतील मोगल सुभेदार आसफजाह निजाम याचा अनेक लढायांत पराभव करून त्याच्यावर वचक बसविला आणि खंडणी वसूल केली.
चिमाजी आप्पा (? – १७४०) हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. बाजीराव मुख्यप्रधान झाल्यावर पहिली काही वर्षे तो अंबाजी त्रिंबक पुरदंरे यांच्यासह साताऱ्यास पेशव्यांचा वकील म्हणून काम करी. पण पुढे तोही स्वाऱ्यांवर जाऊ लागला. त्याने केलेल्या पहिल्या मोठ्या मोहिमेत आमझरे येथे झालेल्या लढाईत त्यावेळचा माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादुर व त्याच्या नातेवाईक दया बहादुर यांना ठार करून सबंध माळवा आपल्या ताब्यात आणला आणि तो शिंदे, होळकर व पवार या तीन सरदारांत वाटूनही टाकला. नंतर त्याने कोकणातील मराठी राज्यास त्रास देणाऱ्या सिद्दी सात यास लढाईत ठार केले व कोकणात कायमचा वचक बसविला. या वेळी बाजीराव उत्तर हिंदुस्थानात होता. तो परत येत असता निजामाने भोपाळजवळ त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चिमाजी आप्पाने निजामाला दक्षिणेतून येणारी मदत बंद करून जेरीस आणले. तेव्हा तो बाजीरावांस शरण आला. चिमाजी आप्पाची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे वसई हस्तगत करणे, ही होय. १७३७ ते १७३९ ही दोन वर्षे अटीतटीचा सामना होऊन शेवटी चिमाजी आप्पाने वसई जिंकली व पोर्तुगीजांचे तेथील बस्तान पार उखडून टाकले. नंतर पुढल्याच वर्षी बाजीराव व चिमाजी आप्पा यांनी औरंगाबादजवळ निजामास गाठून त्याची हांडे व खरगोण ही सरकारे हस्तगत केली. बाजीराव नर्मदेकाठी रावेरखेडी १७४० मध्ये मरण पावला. त्यानंतर त्याचा थोरला मुलगा ⇨ बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब (कार. १७४० – ६१) यास मुख्यप्रधानपद मिळाले. त्याला घेऊन चिमाजी आप्पा पावसाळा संपताच उत्तरेच्या स्वारीवर निघाला पण या वेळी चिमाजीची प्रकृती अतिशय बिघडून तो १७ डिसेंबर १७४० रोजी एदलाबाद येथे मरण पावला.
बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत मराठी राज्याचा उत्तरेत व दक्षिणेत विस्तार झाला. पेशवेपदाचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले व शाहूच्या मृत्यूनंतर (१७४९) छत्रपतिपदाचे महत्त्व कमी होऊन मराठी सत्तेची सूत्रे पेशव्यांकडे आली. दिल्लीचा बादशाह पेशव्यानांच मराठी राज्याचा प्रमुख मानू लागला. बाळाजी बाजीरावाच्या कार्यात चिमाजी आप्पाचा मुलगा सदाशिवराव भाऊ (३ ऑगस्ट १७३० – १४ जानेवारी १७६१) याचे खूप साहाय्य झाले. हा पिलाजी जाधवाबरोबर १७४७ मध्ये प्रथम सोंध्याच्या स्वारीवर गेला होता. तदनंतर त्याने अनेक लहानमोठ्या स्वाऱ्यांमध्ये भाग घेतला. भाऊस राज्यकारभारात अधिकाधिक भाग घेण्यास संधी मिळत गेली. तो राज्याच्या आयव्ययाविषयी विशेष दक्ष होता. तिसऱ्या ⇨ पानिपताच्या लढाईत मराठ्यांचा फार मोठा पराभव झाला. या युद्धात भाऊसाहेब, विश्वासराव व समशेर बहाद्दर हे पेशवे घराण्यातील तीन कर्ते पुरूष धारातीर्थी पडले.
विश्वासराव (२२ जुलै १७४२ – १४ जानेवारी १७६१) हा बाळाजी बाजीरावचा ज्येष्ठ मुलगा. राज्यकारभार व सैनिकी शिक्षण मिळावे म्हणून सिंदखेड, उदगीर व पानिपत अशा तीन स्वाऱ्यांवर यास पाठविले होते. पानिपतच्या लढाईत हत्तीवर बसून लढाईचे निरीक्षण करीत असता शत्रूची गोळी लागून तो मरण पावला. समशेर बहाद्दर (? १७३४ – १४ जानेवारी १७६१) हा मस्तानीस पहिल्या बाजीपासून झालेला मुलगा. याच्याविषयी फार थोडी माहिती मिळते. याची मुख्य कामगिरी उत्तर हिंदुस्थानात १७५६ ते १७६१ पर्यंत आढळते. हा पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या सैन्यात एका पथकाचा सेनापती होता.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर बाळाजी बाजीराव मृत्यू पावला.त्यानंतर ⇨ थोरल्या माधवरावास (कार. १७६१ – १७७२) पेशवाईची वस्त्रे मिळाली. पानिपतच्या पराभवामुळे मराठ्यांचे झालेले नुकसान त्याने आपल्या कर्तबगारीने भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. राक्षसभुवनाच्या लढाईत त्याने निजामास नमवून दक्षिणेत हैदर अलीस वठणीस आणले आणि मराठ्यांचे वर्चस्व स्थापन केले. माधवरावाच्या अकाली मृत्यूने पानिपतपेक्षाही मराठेशाहीचे अधिक नुकसान झाले.
थोरल्या माधवरावाच्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा भाऊ नारायणराव (१० ऑगस्ट १७५५ – ३० ऑगस्ट १७७३)याजकडे मुख्यप्रधानकी आली. ही प्रधानकी मिळाल्यापासून १० महिन्यांच्या आतच त्याचा खून झाला. नारायणरावानंतर त्याचा मुलगा ⇨ सवाई माधवराव हा सव्वा महिन्याचा असतानाच त्यास सातारच्या छत्रपतींकडून मुख्यप्रधानपदाची वस्त्रे आणविली होती. माधवराव लहान असल्यामुळे सखारामबापू बोकील व नाना फडणीस असे दोघे त्याचे प्रतिनिधी म्हणून मुख्यप्रधानकीचे काम पहात होते. नारायणरावाचा वध घडवून आणण्यात ज्याने प्रमुख भाग घेतला होता, त्या त्याच्या चुलत्याने म्हणजे ⇨ रघुनाथरावाने खुनानंतर मुख्यप्रधानपद स्वत:स मिळवण्याचा चंग बांधला सवाई माधवरावापूर्वी थोडे दिवस त्याने ते पद उपभोगले. ऱघुनाथरावाची कृती निषेधार्ह वाटल्यामुळे सखारामबापू, नाना फडणीस व त्यांचे इतर सहकारी यांनी ते पद रघुनाथरावास काही झाले तरी मिळू द्यावयाचे नाही, असा निश्चय करून त्यासाठी पक्की योजना आखली. त्या योजनेला ⇨ बारभाईंचे कारस्थान असे म्हणतात.
रघुनाथराव बारभाईंना शरण आला व त्याचे राजकीय जीवन संपले. माधवराव सज्ञान झाल्यावर राज्यकारभाराचे काही काम पाहू लागला. ⇨ खर्ड्याचीलढाई झाली (१७९५), तेव्हा तीत सवाई माधवराव उपस्थित होता. ती लढाई म्हणजे नाना फडणीसाच्या मुत्सद्देगिरीचा कळस होता. खर्ड्याची लढाई संपल्यावर सवाई माधवरावाला ताप येऊ लागला आणि त्या तापाच्या भरात त्याने शनिवारवाड्यातील गणेश महालाच्या दुसऱ्या मजल्यावरून दक्षिणेच्या कारंजावर उडी टाकली. दोन दिवसांतच दिनांक २७ ऑक्टोबर १७९५ रोजी तो मृत्यू पावला. त्याला मूलबाळ नव्हते. यामुळे आता पेशवेपदावर कुणाला बसवावे, याविषयी नाना फडणीसास पेच पडला. त्याने सवाई माधवरावाची बायको यशोदाबाई हिच्या मांडीवर अमृतरावास (रघुनाथरावाचा दत्तक पुत्र) दत्तक देऊन राज्यकारभार सुरू केला. पण शिंदे व होळकर यांमध्ये वाढते वितुष्ट उत्पन्न झाले. तेव्हा नाना फडणीसाने ⇨ दुसऱ्या बाजीरावास (कार. १७९५– १८१८) पेशवेपदावर बसविले. नाना फडणीसास राज्याची बिघडलेली घडी पुन्हा नीट बसवता आली नाही. नाना फडणीस मेल्यानंतर (१८००) दुसऱ्या बाजीरावाच्या राज्यकारभारात गोंधळ उत्पन्न झाला. सरदार त्यास विचारीनासे झाले. तेव्हा निरूपाय होऊन १८०२ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी वसई येथे तह केला आणि त्यांची जवळजवळ मांडलिकी पतकरली. पुढे त्याने इंग्रजांविरूद्ध उठाव करण्याचे ठरवले परंतु सर्व मराठी सरदारांना एकत्र आणून इंग्रजांशी लढण्याचे कर्तृत्व त्यास दाखविता आले नाही. ⇨ बापू गोखले हा त्याचा कर्तबगार सेनानी अष्टीच्या इंग्रज-पेशवे लढाईत मरण पावला (१८१८). पुढे इंग्रजांनी दुसऱ्या बाजारावाची उत्तर हिंदुस्थानात कानपूरजवळ विठूर येथे रवानगी केली आणि वार्षिक आठ लाख रूपये पेन्शन घेऊन तेथेच कायमचे वास्तव्य करण्यास त्यास सांगितले. अशा तऱ्हेने शिवकालात चालू झालेले पेशवेपद १८१८ मध्ये संपुष्टात आले.
१८२७ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने माधव नारायणराव या आप्ताचा मुलगा नानासाहेब (१८२० ? – १८५९) यास दत्तक घेतले. त्याचे मूळ नाव गोविंद धोंडोपंत. बाजीरावाच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी त्याला पेन्शन नाकारले. १८५७ च्या उठावात २७ जुलै १८५७ रोजी त्यास तात्या टोपे व त्यांच्या सहकार्यानी पेशवा म्हणून जाहीर केले. या उठावात पराभव झाल्याने तो नेपाळात निघून गेला. त्याच्याविषयी अनेक आख्यायिका रूढ आहेत.
पहा : मराठी अंमल.
संदर्भ :1. Majumdar, R. C. Ed. The Maratha Supremacy, Bombay, 1977.
२. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, मध्यविभाग चार भाग व उत्तर विभाग, दोन भाग, पुणे, १९२५.
खरे, ग. ह.
“