पेरेदा, होसे मारिआदे : ( ६ फेब्रुवारी १८३३ – १ मार्च १९०६ ). स्पॅनिश कादंबरीकार. स्पेनमधील सांतादेर शहराजवळील पोलांको येथे एका श्रीमंत, जमीनदार आणि कडव्या कॅथलिक कुटुंबात जन्मला. शिक्षण सांतादेर येथे आणि माद्रिद विद्यापीठात झाले. काही काळ सैन्यात नोकरी केल्यानंतर तो गावी परतला व आपल्या जमीनजुमल्याची व्यवस्था पाहू लागला. १८६४ मध्ये ‘माउंटन सीन्स’ ( इंग्रजी शीर्षकार्थ ) ही त्याची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. तीत केलेले ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण लक्षवेधक होते. यथावकाश वास्तववादी प्रादेशिक कादंबरीकार म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. सोतीलेझा (१८८४) ही त्याची सर्वश्रेष्ठ कादंबरी. सांतादेर येथील कोळ्यांचे जीवन त्याने ह्या कादंबरीत प्रत्ययकारीपणे उभे केले आहे. ह्या कादंबरीची नायिका सोतीलेझा ही पेरेदाच्या प्रभावी व्यक्तिरेखनाची प्रचीती देते. त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्यांत पेद्रो सांचेझ (१८८३) आणि ‘अप द रॉक्स’ (१८९४, इंग्रजी शीर्षकार्थ) ह्यांचा अंतर्भाव होतो. एखाद्या जुजबी संविधानकाच्या आधारे प्रादेशिक जीवनाची विविध रंगरूपे उजळण्याची प्रवृत्ती पेरेदाच्या कादंबऱ्यांतून दिसून येते. त्याच्या कादंबऱ्यांतील भाषाशैली संपन्न व लवचिक आहे. त्याच्या कादंबऱ्यांतील निसर्गचित्रे त्याच्या जिवंत वर्णनशैलीचा प्रत्यय देतात. पेरेदा हा जुन्या विचारांचा, आधुनिकतेबद्दल नाराजी असलेला आणि बोधवादी असा लेखक होता. गजबजलेल्या नागरी जीवनाबद्दल त्याला तिटकारा होता धर्मसंबंधातील उदारमतवाद त्याला मान्य नव्हता. त्याच्या ह्या वृत्ती-प्रवृत्तीचे प्रतिबिंबही त्याच्या कादंबऱ्यांत पडलेले आहे. सांतादेर येथे तो निवर्तला.
कुलकर्णी, अ. र.
“