पेरूट्‌झ, माक्स फर्डिनांड : ( १९ मे १९१४ – ). ब्रिटिश स्फटिकवैज्ञानिक व रेणवीय जीववैज्ञानिक. ðरक्तारुणाची (रक्ताचा लाल रंग उत्पन्न करणाऱ्या लोहयुक्त प्रथिनाची हीमोग्‍लोबिनाची ) संरचना आणि प्रथिनांच्या स्फटिकविज्ञानातील जड अणूंनी समरूपी प्रतिष्ठापन करण्याची पद्धत [ ® समरूपता स्फटिकविज्ञान] यांविषयीच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध व १९६२ च्या रसायनशास्त्र विषयांच्या नोबेल पारितोषिकाचे जे. सी. केंड्र्यू यांच्या समवेत सहविजेते. त्यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला आणि शिक्षण थेरेसियानम येथे व पुढे १९३२ ३६ या काळात व्हिएन्ना येथे झाले. व्हिएन्ना येथे व नंतर देशांतर करून केंब्रिज ( इंग्‍लंड) येथे त्यांनी रसायनशास्राचा अभ्यास केला. १९४० मध्ये त्यांना पीएच्‌. डी. पदवी मिळाली. त्यांनी केंब्रिज येथील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत प्रथम जे. डी. बर्नाल व नंतर डब्‍ल्यू. एल्‌. ब्रॅग यांच्याबरोबर १९५३ पर्यंत संशोधन केले. १९४७ मध्ये रेणवीय जीवविज्ञानाविषयीच्या संशोधनासाठी जे. सी. केंड्र्यू यांच्या मदतीने त्यांनी मेडिकल रिसर्च कौन्सिल युनिट फॉर मॉलिक्यूलर बायॉलॉजी या संस्थेची स्थापना केली. पुढे याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या प्रयोगशाळेचे ते अक्ष्यक्ष झाले. १९४२ ४३ या काळात त्यांनी युद्धोपयोगी मुलकी कामे केली. रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये शरीरक्रियाविज्ञानाचे फुलेरियन प्राध्यापक म्हणून १९७३ साली त्यांची नेमणूक झाली.

 

जे. डी. बर्नाल आणि आय्‌. फँकूनचेन यांच्या मदतीने त्यांनी रक्तारुण आणि कायमोट्रिप्सीन यांच्या स्फटिकांचे क्ष-किरण विवर्तनाने [ क्ष-किरण] १९३७ मध्ये प्रथम छायाचित्र घेतले. १९३७ ५३ या काळात पेरूट्‌झ यांनी  क्ष-किरण स्फटिकविज्ञानात मोलाची भर घातली. १९५३ मध्ये त्यांनी रक्तरुणाच्या स्फटिकाच्या अभ्यासासाठी जड अणूंनी समरूपी प्रतिष्ठापन करण्याची पद्धत शोधून काढली. यामुळे स्फटिकीय प्रथिनांची संरचना क्ष-किरण विश्लेषणाने ठरविता येऊ लागली. ह्या शोधाबद्दलच त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५९ मध्ये रक्तारुणाचे त्रिमितीय छायाचित्र घेतले. हिलरी म्यूरहेड व स्वत: पेरूट्‍झ यांनी १९६२ मध्ये असे दाखवून दिले की, कार्बनी संयुगांतील ऑक्सिजनाबरोबर इतर रेणूंची विक्रिया झाल्यास मूळ रेणवीय संरचनेत चार ठिकाणी बदल होतो. या शोधामुळे काही एंझाइमांत ( जीवरासायनिक विक्रियांस मदत करणाऱ्या प्रथिन संयुगांत ) ती कार्यद्रव्याशी जोडल्यावर कसा बदल होतो हे कळू शकले.

याशिवाय त्यांनी हिमनदीच्या प्रवाहावर संशोधन केले. जी. सेलिगमन यांच्याबरोबर १९३८ मध्ये हिमाचे हिमनदीय बर्फामध्ये कसे रूपांतर होते याचा स्फटिकविज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास केला. जे. ए. टी. जेरार्ड व ए. रॉय यांच्या साहाय्याने त्यांनी १९४८ मध्ये हिमनदीच्या प्रवाहाच्या खोलीनुसार असणाऱ्या वेगाच्या वितरणाचे ( उभ्या ) मापन केले. हिमनदीचा सर्वांत जास्ती वेग पृष्ठावर असतो,तर जमिनीलगत तिचा वेग सर्वांत कमी असतो, असे त्यांना आढळून आले.

रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९५४ मध्ये त्यांची निवड झाली. याशिवाय ते अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस इ. संस्थांचे सन्माननीय सदस्य आहेत. १९७१ मध्ये रॉयल सोसायटीच्या रॉयल पदकाचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांनी १९६२ मध्ये प्रोटिन्स अँड न्यूक्‍लिइक सिड्‌स हा ग्रंथ लिहिला.

 

कानिटकर, बा मो.