पेरिडोटाइट : मुख्यत: ऑलिव्हीनयुक्त [→ ऑलिव्हीन गट ] भरडकणी अग्निज खडक. यामध्ये गडद रंगाची खनिजे विपुल असून सिलिका अत्यल्प प्रमाणात असते. यातील स्फटिक नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात. याचा रंग गडद हिरवा ते काळा असून ताजा पेरिडोटाइट एक सर्वांत जड (वि. गु. ३.१-३.३) खडक आहे. ऑलिव्हिनीशिवाय यात लोह व मॅग्नेशियम विपुल प्रमाणात असणारी हायपर्स्थीन, एन्स्टॅटाइट, ऑजाइट, कृष्णाभ्रक व हॉर्नब्लेंड ही खनिजे यात थोड्या प्रमाणात असतात. प्लॅजिओक्लेज यात जवळजवळ नसते व क्वार्ट्झ नसतेच. क्रोमाइट, मॅग्नेटाइट, इल्मेनाइट, स्पिनेल, अँपेटाइट ही यातील गौण खनिजे असतात. नुसत्या ऑलिव्हिनाच्या खडकाला डनाइट म्हणतात. पेरिडोटाइटातील प्लॅजिओक्लेजाचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास ऑलिव्हीन गॅब्रो, पायरोक्सीन वाढून ऑलिव्हीन घटल्यास पायरोक्सिनाइट आणि हॉर्नब्लेंडाचे प्रमाण वाढून मुख्यत्वे हॉर्नब्लेंड झाल्यास हॉर्नब्लेंडाइट हे खडक तयार होतात. अभ्रकयुक्त पेरिडोटाइटाला ð किंबर्लाइट म्हणतात. पेरिडोटाइटामध्ये सामान्यपणे बदल झालेला असतो व त्यापासून सर्पेटाइन, क्लोराइट,अँक्टिनोलाइट, संगजिरे इ. खनिजे बनतात. कधीकधी पूर्ण ऑलिव्हीन बदलून सर्पेंटाइन झालेले असते व अशा खडकाला सर्पेटाइन खडक म्हणतात.
बहुतेक पेरिडोटाइट समकणी असून त्यांचे वयन (पोत) ग्रॅनाइटाप्रमाणे असते. कधीकधी यात पट्टेदार स्तरित वा प्रवाही संरचनाही आढळते. वयनावरून काही पेरिडोटाइटांत पुष्कळ हालचाल झाल्याचे व ऑलिव्हिनाच्या स्फटिकांचे तुकडे झाल्याचे दिसून येते.
पेरिडोटाइट सामान्यत: अंतर्वेशित (घुसलेल्या) राशींच्या रूपात आढळतात. उदा., भित्ती, ज्वालामुखी नळ, ओबडधोबड राशी. या बहुधा सोडियम व पोटॅशियम विपुल असलेल्या खडकांबरोबर आढळतात. वडीसारख्या स्तरित अग्निज राशींच्या खालील भागातही पेरिडोटाइट आढळतात. तसेच मोठ्या प्रमाणावर घडलेल्या भूकवचाच्या म्हणजे भूसांरचनिक घडामोडींशी पुष्कळ पेरिडोटाइट निगडित असतात उदा., हिमालयासारख्या पर्वतरांगांच्या पट्ट्यात (वायव्य व कुमाऊँ भागांत) पेरिडोटाइटाची अंतर्वेशने आढळतात.
पेरिडोटाइटाशी तुल्य ज्वालामुखी खडक आढळत नसल्याने याच्या उत्पत्तीचे गूढ कायम आहे. काहींच्या मते भूकवचातील बेसाल्टाखालील पेरिडोटाइटी शिलारसाचे सरळ स्फटिकीभवन होऊन पेरिडोटाइट बनले असावेत. गॅब्रो, पायरोक्सिनाइट, अँनॉर्थोसाइट या खडकांच्या भिंगाकार राशी व पातळ थर जेथे आढळतात, तेथील पेरिडोटाइट हे गॅब्रोसारख्या संघटनाच्या शिलारसाचे भिन्नीभवन होऊन (समांग शिलारसातील भिन्न संघटनांचे घटक अलग होऊन त्यांपासून भिन्नभिन्न खडक तयार होऊन) बनलेले असावेत. उदा., आफ्रिकेच्या ट्रान्सव्हाल भागातील पेरिडोटाइट. तेथील किंबर्लाइट मात्र ज्वालामुखी नळात आढळले आहेत. भारतामध्ये दामोदर खोऱ्यात पेरिडोटाइटाच्या भित्ती व लेहच्या दक्षिणेस याची अंतर्वेशने आढळली आहेत.
जवळजवळ सर्व क्रिसोटाइल अँस्बेस्टस यापासून मिळते. क्रोमियमाची सर्व धातुके (कच्च्या रूपातील धातू) याच्यापासून बनलेली आहेत. प्लॅटिनम व संगजिरे यांचा मूळ खडक पेरिडोटाइट आहे. काही ठिकाणी यापासून हिरे, कुरुविंद, मूल्यवान गार्नेट व निकेलाची धातुके मिळतात. पूर्वी मॅग्नेसाइट यापासूनच मिळवीत असत.
मुख्यत: ऑलिव्हिनाचा बनलेला असल्याने व ऑलिव्हिनाला पेरिडोटही म्हणत असल्याचे याचे पेरिडोटाइट हे नाव पडले आहे.
ठाकूर, अ. ना.
“