पेरॉन, ह्वान दोमिंगो : (८ ऑक्टोबर १८९५-१ जुलै १९७४), लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिनाचा राष्ट्राध्यक्ष. ब्वेनस एअरीझ प्रांतातील लोबोस या गावी मध्यमवर्गीय इटालियन घराण्यात त्याचा जन्म. तेथेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण. १९११ ते १९१३ या काळात लष्करी अकादमीतून पुढील शिक्षण पूर्ण केले. १९३० च्या बंडात त्याने सैनिकी दलाचे नेतृत्व केले. त्यानंतर १९३०-३५ दरम्यान तो संरक्षणमंत्र्याचा खाजगी सचिव व १९३६-३७ मध्ये चिली वकिलातीत सैनिकी सहाय्यकी होता. त्यानंतर त्याने दोन वर्षे इटलीतील सैनिकी दलाचा अभ्यास केला. या काळात त्याने फॅसिस्ट इटली व नाझी जर्मनी यांचे जवळून निरीक्षण केले. त्याच्या गटाने १९४३ मध्ये अवचित सत्तांतराद्वारे देशातील उदार सरकार उलथून पाडण्यात पुढाकार घेतला. त्यानंतर पेरॉनला मजूरमंत्री करण्यात आले. त्याने मजूर संघटना, मजुरी, कामाचे तास, पगारी सुट्या, घरांची व आरोग्याची सोय यांत सुधारणा करून मजुरांची संपूर्ण सहानुभूती मिळविली. त्याची उपराष्ट्राध्यक्ष व युद्धमंत्री म्हणून निवड झाली (१९४४). १९४५ च्या ऑक्टोबरमध्ये काही अधिकारी व तथाकथित राज्यघटनावादी लोकांनी बंड करून पेरॉनला सत्तेवरून खाली खेचले आणि तुरुंगात डांबले परंतु त्याची प्रेयसी नभोवाणी कलाकार एव्हाद्वार्ते (दुसरी पत्नी) व त्याचे मजूर चळवळीतील काही सहकारी यांनी उग्र निदर्शने करून त्याची सुटका केली. १९४६ मध्ये ते अध्यक्ष म्हणून निवडून आला. त्याने राज्यघटनेत बदल करून राष्ट्रपतीच्या पुनर्निवडणुकीवरील बंधन रद्द केले (१९४८) तसेच रेल्वे व इतर अनेक व्यवसायांचे राष्ट्रीयीकरण केले आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अमेरिकेविरुद्ध धोरण अवलंबिले व लॅटिन अमेरिकेतील विकसनशील राष्ट्रांना सर्वतोपरी साहाय्य दिले. याशिवाय मजुरांसाठी लॅटिन अमेरिकन लेबर फेडरेशन (अँटलास) ही संस्था काढून तिच्या शाखांचे जाळे सर्व दक्षिण अमेरिकेत पसरविले.
त्याची १९५१ मध्ये फेरनिवड झाल्यावर त्याच्या सुरुवातीच्या कडक धोरणात सौम्यता आली. सुरुवातीस दुर्लक्षिलेल्या शेतीकडे त्याने अधिक लक्ष दिले व अमेरिकेबरोबरचे आपले धोरण सौम्य केले स्त्रियांस समान हक्क दिले व मजुरांस स्वाभिमानाने जगता येईल अशी परिस्थिती निर्माण केली. तथापि त्याची लष्करी हुकूमशाही आणि तिने लादलेली मतस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य इ. संविधानात्मक स्वातंत्र्यावरील बंधने तसेच रोमन कॅथलिकांविरुद्धचे धोरण, वाढती महागाई, लाचलुचपत आणि दडपशाही यांमुळे त्याची लोकप्रियता हळूहळू कमी होऊ लागली. यातूनच आरमार व नौदल यांच्या शिपायांनी लोकशाहीनिष्ठ अधिकाऱ्यांच्या साहाय्याने बंड करून पेरॉनला बडतर्फ केले. तो पॅराग्वायला पळून गेला (१९५५). नंतरची बरीच वर्षे त्याने हद्दपारीत काढली. १९७३ मध्ये तो अर्जेंटिनात आला आणि त्याची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याची पहिली पत्नी कर्करोगाने मरण पावली (१९३८). त्यानंतर त्याने एव्हा द्वार्ते हिच्याबरोबर दुसरा विवाह केला (१९४५). तिने पेरॉनिस्ट चळवळीद्वारे पेरॉनची लोकप्रियता वाढवली. तीही १९५२ मध्ये कर्करोगाने मरण पावली. त्यानंतर पेरॉनने आपली खाजगी चिटणीस मारिया इस्टेला (इझाबेला) हिच्याबरोबर विवाह केला (१९६१). तिने पेरॉनिस्ट चळवळ अर्जेंटिनात वाढवून पेरॉनला पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडून आणले (१९७३). पुढे तो आजारी पडला आणि त्यातच हृदयविकाराने मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर इझाबेला अध्यक्ष झाली. मार्च १९७६ मध्ये तिला लष्करी गटाने सत्तेवरून दूर केले.
संदर्भ : 1. Barager, J. R., Ed., Why Peron Came to Power, New York, 1968.
2. Ferns, H. S. Argentina, New York, 1969.
देशपांडे, सु. र.
“