पेनुकोंडे : आंध्र प्रदेश राज्यातील इतिहासप्रसिद्ध किल्ल्याचे स्थळ. अंनतपूर जिल्ह्यात ते अंनतपूरपासून सु. ७० किमी. वर गुंटकल-बंगलोर मार्गांवर वसले आहे. टॉलेमीने त्याचा उल्लेख पिकेंडका असा केला आहे. पेनुकोंडा म्हणजे मोठी टेकडी. त्याला पेनुगोंडे असेही म्हणतात. जैनांच्या अठरा तीर्थांपैकी ते एक असून येथे अनेक कोरीव लेख आहेत. १४३२ च्या कोरीव लेखानुसार विजयानगरचा राजा पहिला बुक्क याने हा प्रदेश आपला मुलगा वीर विरूपण्ण उडय्यार (ओडेयर) याच्याकडे सोपविला आणि त्या वेळी हा किल्ला बांधण्यात आला.
या किल्ल्याच्या पायथ्याच्या परिसरात अनेक शिल्पांचे अवशेष आढळतात. गावाच्या चारही बाजूंस हनुमानाची मंदिरे आहेत. येथील किल्ल्याकडील येर्रमांची या प्रमुख दरवाजाजवळील हनुमानाची मूर्ती ३.५ मी. उंच आहे. येथे ३६५ मंदिरे होती, असे परंपरा सांगते त्यांपैकी फारच थोडी अवशिष्ट आहेत. अविशिष्ट मंदिरांत रामस्वामी, ईश्वर, पार्श्वनाथस्वामी, वेंकटरमणस्वामी ही मंदिरे प्रसिद्ध असून शेरखान मशीद, गगनमहाल, पसुपू वक्करिणी तलाव हे वास्तुशैलीदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. रामस्वामी व ईश्वर मंदिरांच्या भिंतींवर रामायण-महाभारतातील कथांचे शिल्पांकन केलेले आढळते. इतरत्र आढळणाऱ्या मूर्तीपैकी विघ्नेश्वर, ईश्वर इ. मूर्ती उल्लेखनीय आहेत.
आधुनिक पेनुकोंडात पंचायत सभा, तहसील कार्यालय, मंडई, विद्यालय, स्टेट बँक, ग्रंथालय इत्यादींच्या इमारती असून लंबाडी जमातीसाठी येथे एक खास वसतिगृह आहे. येथे लोकरीचा धंदा मोठ्या प्रमाणावर चालतो.
पेनुकोंडा रेल्वेस्थानकापासून आग्नेयीस तीन किलोमीटरवर याच नावाचा एक डोंगरी किल्ला आहे. त्याची उंची सु. १८३ मी. असून तो पंधराव्या शतकात विजयानगरच्या सम्राटांनी बांधला. किल्ल्यावर सपाटी फारशी नाही तथापि टेहळणीचे मनोरे, बुरूज व इमारतीचे स्तंभ यांतून विजयानगरकालीन वास्तुशैलीची कल्पना येते. येथील रामबुरूज, गंगमहाल व एक मशीद प्रेक्षणीय आहे. पूर्वेकडील असलेल्या बबय्यनबेटा दर्ग्याचा उरूस भरतो. विजयानगरच्या पडत्या काळात राक्षस-तागडीच्या (तालिकोटच्या) लढाईनंतर सु. १५ वर्षे हे राजधानीचे ठिकाण होते.
खरे, ग. ह.
“