जालना : औरंगाबाद जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ९१,०९९ (१९७१). हे कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर, कादिराबादच्या समोर मनमाड–नांदेड लोहमार्गावर वसलेले आहे. श्रीरामचंद्राच्या काळापासून हे अस्तित्वात आहे, असे म्हणतात. अनेक ऐतिहासिक घटना याच्याशी निगडीत असून अबुल फज्ल, औरंगजेब, शिवाजी महाराज इत्यादींनी या शहराला भेट दिली होती. येथील किल्ला १७२५ मध्ये बांधला असून त्याचे भग्नावशेष पहावयास मिळतात. येथील एक मशीद व सराई प्रेक्षणीय असून हिंदू मंदिरांत आनंदस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे. १८२७ मध्ये येथे लष्करी ठाणे बांधण्यात आले व १९०३ पर्यंत हे निजामाचे लष्करी ठाणे होते. येथे कापूस, भरड धान्ये, गहू, भुईमूग इत्यादींचा व्यापार चालतो. येथे तेलाच्या गिरण्या आणि विड्यांचे कारखाने आहेत.
कापडी सुलभा