जामिआ मिल्लिया इस्लामिया : या संस्थेची स्थापना १९२० मध्ये प्रथम अलिगढ येथे झाली. तिच्या संस्थापकांत महात्मा गांधी, मौलाना महंमद अली, हाकिम अजमल खान, डॉ. अन्सारी, मौलाना अबुल कलाम आझाद, झाकिर हुसेन इ. राष्ट्रीय नेत्यांचा समावेश होता. तिचे स्वरूप निवासी व अध्यापनात्मक शिक्षणसंस्था असे प्रथम होते. तीत शिशुशिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्व स्तरांवर समाकलित अध्यापनाची व्यवस्था आहे. १९२५ मध्ये ही संस्था हाकिम अजमल खान यांनी दिल्लीस हलविली आणि १९६२ मध्ये या संस्थेस विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. या विद्यापीठात तीन घटक महाविद्यालये असून जामिआ ग्रामीण संस्था ग्रामीण भागाशी संबंधीत विषयांत अध्यापन करते. या विद्यापीठात प्रथमपासूनच प्रौढ शिक्षण, सहशिक्षण व मूलोद्योग शिक्षण यांवर भर दिला असून स्त्रियांना आणि विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना खासगी रीत्या प्रयोगांव्यतिरिक्त होणाऱ्या परीक्षांस बसता येते.
स्वातंत्र्य चळवळीच्या ऐन प्रभात काळात राष्ट्रीय दृष्टीने हे विद्यापीठ स्थापन झाले. तिचे संविधान इतर शैक्षणिक संस्थांपेक्षा वेगळे आहे. भारतीय मुसलमानांना राष्ट्रीय विकास व ऐक्य लक्षात घेऊन धार्मिक शिक्षण द्यावे, तसेच सर्व जातिजमातीत सामंजस्य निर्माण करावे, ही उद्दिष्टे त्यात नमुद केली आहेत. १९२८ पासून झाकिर हुसेन यांच्याकडे या संस्थेची सुत्रे आली. तेव्हापासून सेवाभावाने कमीत कमी वेतन (रु. १५०) घेणाऱ्या शिक्षकांनी ही संस्था चालविली.
याची क्षेत्रमर्यादा विशिष्ट नाही तथापि निवासी विद्यापीठ म्हणून येथील वसतिगृहांकडे जास्त लक्ष पुरविले जाते. पुरुषांकरिता व स्त्रियांकरिता प्रत्येकी एक अशी स्वतंत्र दोन वसतिगृहे असून विद्यापीठात एकूण २,१७९ विद्यार्थी शिकत होते (१९७२).
विद्यापीठात मानव्यविद्या, समाजशास्त्रे आणि शिक्षण यांच्या विद्याशाखा असून शिक्षणाचे माध्यम मुख्यतः ऊर्दू भाषा हे आहे तथापि हिंदी आणि इंग्रजी या भाषांतूनही शिक्षण देण्याची सोय आहे. या संस्थेतर्फे जामिआ नावाचे उर्दू मुखपत्र आणि समाजशिक्षणविषयक एक मासिकही प्रसिद्ध केले जाते. विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात ३९,८४८ ग्रंथ असून सु. २१५ नियतकालिके ग्रंथलयात येतात (१९७२). याशिवाय प्रत्येक महाविद्यालयाचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्प २७·५१ लाख रु. होता. (१९७२).
घाणेकर, मु. मा.