जाफरी गेंद : (जाफरी गुंडी इं. ग्लोब ॲमरँथ, बॅचलर्स बटन लॅ. गॉम्फ्रिना ग्लोबोजा कुल-ॲमरँटेसी). ही सु. ३०–९० सेंमी. उंच, सरळ, केसाळ, द्विशाखाक्रमी (पुनःपुन्हा दोनदा विभागलेल्या) खोडाची, वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी [→ ओषधि], मूळची अमेरिकेतील असून तिची शोभेकरिता बागेत लागवड करतात. तथापि बागेतून निसटून ती कोठेकोठे पडीत जागी उगवलेली आढळते. पाने साधी दीर्घवृत्ताकृती किंवा मुकुलाकृती (कळीच्या आकाराची), लांबट, २·५ ते ४ सेंमी. व्यासाची असतात. पिवळट पांढऱ्या किंवा लाल रंगाची गोलसर स्तबके फांद्यांच्या टोकांस पावसाळ्यात वा हिवाळ्यात येतात. छदे पानासारखी व छदके (फुलांच्या किंवा फुलोऱ्यांच्या तळाशी असलेली उपांगे) गुलाबी किरमिजी असून फुले फार सूक्ष्म व भिन्न रंगछटा असलेले अनेक प्रकार उपलब्ध आहेत सुकल्यावरही स्तबकांचा आकार व रंग कायम राहतो [→ ॲमरँटेसी]. मोल्यूकसमध्ये या वनस्पतीची भाजी करतात काही देशांत मुळे खोकल्यावर देतात. पाळीव जनावरे गवतापेक्षा गॉम्फ्रिनाच्या इतर जाती जास्त आवडीने खातात. नवीन लागवड बियांपासून करतात. मे-जून मध्ये रोपे तयार करून लावल्यास सु. अडीच महिन्यांत फुले येऊ लागतात. खडकाळ जमिनीत विशेषेकरून लावतात बागेत वाफ्याच्या कडेनेही लावतात. फुलदाणीत भिन्न रंगांची फुले एकाच वेळी ठेवल्यास अधिक शोभा येते.
जमदाडे, ज. वि.
“