जानेवारी : ग्रेगरियन पंचांगातील पहिला महिना. जानस ही दोन तोंडे असलेली दारे-खिडक्यांची रोमन देवता असून तिच्यावरून जानेवारी हे नाव पडले. इ. स. पू. ७०० च्या सुमारास न्यूमा पाँपिलियस यांनी १० महिन्यांच्या रोमन पंचांगात जानेवारी व फ्रेब्रुवारी या महिन्यांची भर घातली, अशी कथा आहे. त्यांनी जानेवारीचे ३० दिवस धरले होते, इ. स. पू. ४६ मध्ये ज्यूलियस सीझर यांनी त्याचे ३१ दिवस केले. रोमन लोक इ. स. पू. २५१ पासून, स्कॉटलंडमध्ये इ. स. १६०० पासून व इतर यूरोपात अठराव्या शतकापासून एक जानेवारी हा वर्षारंभ मानतात. १४ जानेवारीस सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, २ जानेवारीस पृथ्वी उपबिंदूपाशी म्हणजे तिच्या कक्षेत सूर्यापासून जवळात जवळ असते व तिचा वेग जास्तीत जास्त असतो. हिंदू पंचांगाप्रमाणे जानेवारी महिना सामान्यतः पौष-माघ महिन्यांत येतो. दि. ११ लालबहादुर शास्त्री पुण्यतिथी, दि. १२ विवेकानंदांचा जन्मदिन, दि. २३ सुभाषचंद्र बोसांचा जन्मदिन, दि. २६ भारतीय प्रजासत्ताक दिन व दि. ३० महात्मा गांधी पुण्यतिथी हे जानेवारीत येणारे भारतातील राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस आहेत.
ठाकूर, अ. ना.