जातके : गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मासंबंधीच्या कथा ‘जातके’ किंवा जातककथा म्हणून ओळखल्या जातात. जातक ह्या शब्दाचा  अर्थ ‘जन्मासंबंधी’ असा आहे. बुद्धत्व प्राप्त होण्यापुर्वी गौतम बुद्धाला अनेक योनींत जन्म घ्यावे लागले. दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, क्षांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री व अपेक्षा ह्या  दहा पारमितांचा (पारंगतता) उत्तरोत्तर विकास त्याने ह्या जन्मात करून घेतला आणि ह्या विकासाची परमोच्च अवस्था गाठल्यानंतर ‘गौतम बुद्ध’ म्हणून तो अवतरला, अशा श्रद्धेतून ह्या कथा आकारलेल्या आहेत. ह्या जातककथांतून बुद्ध हा ‘बोधिसत्त’ (बोधिसत्व) ह्या नावाने कथानायक, कथेतील दुय्यम पात्र वा कथेतील घटनांचा एक प्रेक्षक म्हणून वावरलेला आहे. बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असा प्राणी, अशा अर्थाने बोधिसत्व हा शब्द वापरला गेला आहे. पशू, पक्षी, जलचर आदी विविध योनींत बोधिसत्वाने जन्म घेतला, असे ह्या कथांतून दाखविलेले असले, तरी तो मादीरूपात मात्र आढळत नाही.

बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गौतम बुद्धाच्या अनुयायांनी ह्या जातककथांचा उपयोग केला, हे निःसंशय प्रत्यक्ष गौतम बुद्धानेही तो केला असावा. सद्धर्मपुंडरीक  ह्या बौद्ध ग्रंथात तसा उल्लेख आढळतो (२·४५, वैद्य संपादित आवृ.). व्यावहारिक नीतिकथा दीर्घ साहसकथा, निखळ विनोदी कथा अशा विविध प्रकारच्या जातककथा आहेत. एकूण भारतीय कथासंचितातील लौकिक कथांमध्ये आवश्यक ते फेरफार करून त्यांना बौद्ध जातककथांचे स्वरूप दिले गेल्याचेही दिसते. जातकांत रूपांतरित झालेल्या काही कथा नुसत्या ‘कथा’ म्हणून बौद्ध सुत्तांत (सूत्रांत) पहायला मिळतात. त्यांत बोधिसत्वाची व्यक्तिरेखा अर्थातच नसते. अशा कथांना पुढे केव्हा तरी जातकांचे स्वरूप दिले गेले असावे.

‘एके समयी काशीराष्ट्रात वाराणसी येथे ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता. त्या वेळी …’ अशा आशयाच्या ओळींनी जातककथेची सुरुवात होते. प्रत्येक जातककथेचे पाच भाग असतात : (१) ‘पच्चुप्पन्नवत्थु’. ‘वर्तमानकाळाची कथा’ असा ह्या संज्ञेचा अर्थ. संबंधित जातककथा गौतम बुद्धाने आपल्या अनुयायांना केव्हा सांगितली, हे येथे सांगितलेले असते. (२) ‘अतीतवत्थु’ म्हणजे (गौतम बुद्धाच्या) मागील जन्माची कथा. (३) गाथा किंवा पद्ये. ही सर्व साधारणतः जातककथेशी संबंधित असतात परंतु पुष्कळदा त्यांचे दुवे वर्तमानकाळाच्या कथेशी जोडलेले असतात. अशा गाथांना ‘अभिसंबुद्ध गाथा’ (बुद्धाला आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याने म्हटलेल्या गाथा) असे संबोधिले जाते. (४) वेय्याकरण, म्हणजे गाथांचे शब्दशः स्पष्टीकरण. (५) समोधान किंवा उपसंहार. त्यात प्रत्यक्ष गौतम बुद्धाकडून संबंधित जातककथेतील मागील जन्मीच्या व्यक्तींची हल्लीच्या जन्मातील व्यक्तींशी सांगड घातली जाते.

बौद्धांच्या ⇨ त्रिपिटकातील ⇨ सुत्तपिटक  ह्या ग्रंथाचा ‘खुद्दकनिकाय’ म्हणून जो पाचवा भाग आहे, त्याचे पंधरा पोटविभाग असून त्यांतील क्रमाने दहावा भाग ‘जातक’ हा आहे. ह्या दृष्टीने जातके ही त्रिपिटकाचाच एक भाग होत, असे मानले जाते. तथापि जातक ह्या विभागात विविध जातककथांशी संबंधित असा मुख्य गाथाच आहेत प्रत्यक्ष जातककथा नाहीत. केवळ गाथांवरून जातककथांची कल्पना येणे अवघड म्हणून त्यांच्या स्पष्टीकरणार्थ जातक – अट्ठकथा  लिहिली गेली. ती मुळात पाली भाषेत होती नंतर तिचा सिंहली भाषेत अनुवाद झालेला होता. ह्या अनुवादात मूळ जातक गाथा मात्र पालीतच ठेविलेल्या होत्या. पुढे पाली अट्‌ठकथा नष्ट झाली आणि तिच्या उपलब्ध सिंहली अनुवादावरून गद्यानुवादाच्या रूपाने सिंहली आणि जातकट्ठवण्णना (जातकार्थवर्णना) ह्या नावाने ती पुन्हा पालीत आणली गेली. हे कर्तृत्व ⇨ बुद्धघोषाचे असे काही अभ्यासकांचे मत असले, तरी त्याबाबत ऐकमत्य नाही. जातकट्ठवण्णना  हा ग्रंथ जातककथांच्या अभ्यासाचा आजचा मुख्य आधार आहे.

जातककथांची संख्या नेमकी किती, ह्या विषयीही ऐकमत्य नाही. जातकट्ठवण्णना  ह्या ग्रंथात एकूण ५४७ कथांचा अंतर्भाव असून त्यांची विभागणी बावीस निपातांत किंवा गटांत केलेली आहे. ती करताना त्या त्या जातककथेशी संबंधित अशा गाथांची संख्याच विचारात घेतलेली आहे. उदा., ‘एक-निपात’ ह्या पहिल्या गटात एक गाथा आणि तिच्या संबंधित असलेले एक जातक अशा व्यवस्थेने एकूण १५० जातके आलेली आहेत. ह्या ५४७ कथांपैकी काही पुनरावृत्त झालेल्या आहेत, तर काहींचा समावेश अन्य विस्तृत अशा जातककथांत झालेला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही संख्या ५४७ पेक्षा कमीच–धर्मानंद कोसंबी ह्यांच्या मते सु. ५३४–आहे. श्रीलंका, इंडोचायना, ब्रह्यदेश आदी देशांतील बौद्ध परंपरांनुसार जातकांची संख्या ५५० आहे. ब्रह्मदेशातील पगान येथे ५५० जातककथा चित्रित केलेल्या आहेत. भारतात सांची, भारहुत आणि आंध्र प्रदेशांतील अमरावती ह्या ठिकाणच्या स्तूपांवर विविध जातककथांतील दृश्ये कोरलेली आहेत. ह्या स्तूपांचा काळ पाहता इ. स. पू. तिसऱ्या-दुसऱ्या शतकांत जातककथांची लोकप्रियता प्रस्थापित झालेली होती, असा निष्कर्ष काढता येतो. जातकट्ठवण्णना  ह्या ग्रंथाचा काळ मात्र इसवी सनाचे पाचवे शतक असा सर्वसाधारणतः मानला जातो.

चरिया-पिटक ह्या खुद्दकनिकायाच्या अखेरच्या भागात ३५ पद्य जातके आली आहेत. ह्या जातककथा गौतम बुद्ध स्वतःच सांगत असल्याचे दाखविले आहे. बौद्धांचे साहित्य जसे पालीत आहे, तसे ते संस्कृतातही आहे. जातकमाला  ह्या नावाने विख्यात असलेल्या संस्कृत काव्यात एकूण ३४ जातके आली आहेत. त्यांतील बरीचशी पालीतून आली असली, तरी ती अत्यंत काव्यमय भाषेने फुलविली आहेत. आग्नेय आशियातील काही देशांत ५० जातकांचा एक संग्रह प्रसिद्ध असून त्यांतील जातके जातकट्ठवण्णना  ह्या ग्रंथातील जातकांपेक्षा बरीचशी भिन्न आहेत.

एकूण भारतीय कथासंचितातून अनेक कथा जातकनिर्मितीसाठी घेण्यात आल्यामुळे राजा दशरथ, राम, सीता, युधिष्ठिर, विदुर, कृष्ण ह्यांसारख्या रामायण-महाभारतातील व्यक्तिरेखाही जातकांतून येतात. जातक आणि पंचतंत्र  ह्यांत काही कथा समान आहेत. इसापाच्या नावावर मोडणाऱ्या ग्रीक बोधकथांपैकी काही जातकांत आहेत. सोमदेवाच्या कथासरित्सागरातही काही जातककथा आहेत. 

जातकट्‌ठवण्णना  ह्या ग्रंथाचे रोमन लिपीतील संपादन व्ही. फाउसबोल ह्या यूरोपीय विद्वानाने केले असून ते सहा खंडांत प्रसिद्ध केले आहे. (१८७७–९७). ह्या ग्रंथाचा सातवा खंड सूचीचा असून ती डी. अँडरसन ह्याने तयार केलेली आहे. ह्या ग्रंथाचा अनेक लेखकांनी केलेला इंग्रजी अनुवाद ई. बी. कॉवेलने संपादित केला आहे. (तीन खंड, १९५६). मराठीत चिं. वि. जोशी आणि धर्मानंद कोसंबी ह्यांनी केलेले जातककथांचे अनुवाद प्रसिद्ध आहेत. दुर्गा भागवत ह्यांनी अनुवादिलेल्या जातककथांचा एक संग्रह सिद्धार्थ जातक  ह्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे (१९७५). 

संदर्भ : 1. Law, Bimala Churn, A History of Pali Literature, 2 Vols., London, 1933.

   2. Winternitz, M. A History of Indian Literature. Vol.II, Calcutta, 1933.

   ३. कोसंबी, धर्मानंद, जातककथासंग्रह, भाग पहिला, पुणे, १९२४.

   ४. कौसल्यायन, आनंद, जातक, ६ खंड, प्रयाग, १९४१–५६.

   ५. जोशी. चिं. वि. जातकांतील निवडक गोष्टी –प्रथमार्ध अंक १ ते ३३९, बडोदे, १९३०.

बापट, पु. वि.