जांभा–२ : काळसर लाल किंवा पिवळसर तपकिरी रंगाच्या, अंगभर वाकडीतिकडी भोके असलेल्या मातकट खडकांचे कमीजास्त जाडीचे आवरण प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील आणि काही ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशांत आढळून येते. या खडकाचे कापून विटांसारखे ठोकळे तयार करून ते बांधकामासाठी वापरतात. या गुणधर्मावरून लॅटिन भाषेतील ‘लॅटर’ म्हणजे वीट या अर्थाच्या शब्दावरून भारतातील मलबारजवळच्या अशा खडकांना ब्युकॅनन हॅमिल्टन यांनी १८०७ मध्ये लॅटेराइट हे नाव दिले. त्यालाच कोकणपट्टीत जांभा म्हणतात.

 निरनिराळ्या ठिकाणच्या जांभ्याचे रासायनिक संघटन थोडेफार वेगळे असले, तरी त्याच्यात प्रामुख्याने सजल फेरिक ऑक्साइड आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड हे दोन घटक असतात. त्यांशिवाय त्याच्यात थोडेफार मँगॅनीज डाय-ऑक्साइड, टिटॅनियम डाय-ऑक्साइड व मुक्त सिलिकाही असू शकते. जांभ्याचे कमीअधिक प्रमाणातील रासायनिक संघटन पुढीलप्रमाणे आढळते : फेरिक ऑक्साइड ३०–५५%, ॲल्युमिना १०–३५%, सिलिका ५–२०%, टिटॅनिया १–८%, जलांश ११–१८%.

 जांभ्यातील फेरिक हायड्रॉक्साइडाचे प्रमाण कमी होऊन त्याच्या जागी ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइडाचे प्रमाण बरेच वाढले म्हणजे त्याचा रंग पांढरट पिवळसर होतो व त्याचा पोतही मातीसारखा होऊन त्याच्यात कलायाश्मी (वाटाण्याच्या पुंजक्यासारख्या) संरचना दिसतात. अशा ॲल्युमिनाप्रचुर खडकाला बॉक्साइट म्हणतात व ते ॲल्युमिनियमाचे प्रमुख धातुक (कच्च्या स्वरूपातील धातू) आहे [⟶ बॉक्साइट].

 नमुनेदार जांभा खडकात गोएथाइट (HFeO2), लेपिडोक्रोसाइट [FeO·(OH)], हेमॅटाइट (Fe2O3) व लिमोनाइट (2Fe2O3·3H2O) ही लोही खनिजे असून गिब्साइट (Al2O3·3H2O) हे ॲल्युमिनियमाचे खनिज, तसेच टिटॅनियम ऑक्साइड (TiO2) हे घटक असतात.

 हवेत दीर्घ काळ उघडा पडलेला जांभ्याचा पृष्ठभाग दाट काळसर तपकिरी ते लालसर रंगाचा असून धातुमळीसारखा किंवा भोकाभोकांच्या लाव्ह्यासारखा दिसतो. क्वचित काही जांभ्यांचा पोत दाणेदार, कलायाश्मी असतो. जांभ्याचा फोडलेला ताजा पृष्ठभाग त्यामानाने फिकट लालसर किंवा पिवळसर तपकिरी रंगाचा असून खणून काढताना जांभ्याच्या आतील भाग कुऱ्हाडीने किंवा टिकावाने सहज कापता येण्याजोगा मऊ असतो पण दीर्घ काळ हवेत उघडा पडल्यास तोच पृष्ठभाग पुन्हा टणक व घट्ट होतो.

 जांभा खडकांच्या निर्मितीसंबंधी अनेक मते प्रचलित आहेत पण सर्वसामान्य रूढ असलेले मत असे आहे की, उष्ण कटिबंधातील विरोधी स्वरूपाच्या तीव्र उन्हाळी आणि पावसाळी हवामानामुळे खडकांचे आत्यंतिक ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन] घडून येते. या परिस्थितीत लोह आणि ॲल्युमिनियमयुक्त खनिजांचे प्रमाण बरेच जास्त असणाऱ्या अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अल्प असलेल्या) खडकांचे (उदा., बेसाल्ट) रासायनिक अपघटन होऊन (रेणूचे तुकडे पडून) त्यातून विद्राव्य (विरघळणारे) पदार्थ पाण्याबरोबर निघून जातात आणि अविद्राव्य घटक अवशिष्ट निक्षेपांच्या (साठ्यांच्या) स्वरूपात मूळच्या जागीच साचत राहतात. त्यांचा जांभा बनतो.

 सर्वसामान्य हवामानात खडकातील खनिजांचे, उदा., फेल्स्पारासारख्या क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ, अल्कली), कॅल्शियम व ॲल्युमिनियमयुक्त सिलिकेटांचे रासायनिक अपघटन होऊन क्षार व कॅल्शियमासारखे क्षारकीय (बेसिक) घटक विद्रावाद्वारा निघून जातात आणि सजल ॲल्युमिनियम सिलिकेटासारखे अविद्राव्य घटक मृत्तिकेच्या रूपात मागे उरतात. पण वर उल्लेखिलेल्या उष्ण कटिबंधातील आत्यंतिक ऑक्सिडीकरणाच्या परिस्थितीत सिलिकेटांचे अपघटन याही पुढची पायरी गाठते. म्हणजे केवळ क्षारकीय घटकांचेच विद्राव न होता सिलिकेटातील सर्व सिलिकाही मुक्त होऊन व्रिदावाद्वारा निघून जाते व मागे फक्त ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड उरते. त्याचप्रमाणे लोहयुक्त खनिजांच्या रासायनिक अपघटनात लोहाची ‘फेरिक’ संयुगे तयार होतात आणि फेरस संयुगांपेक्षा ती जास्त अविद्राव्य असल्यामुळे त्यांचे फेरिक ऑक्साइड व हायड्रॉक्साइडांच्या रूपात अवक्षेपण होते (न विरघळणारा साका तयार होतो).

 जांभा खडक तयार होण्याच्या प्रक्रियेत भूमिजलाचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे दिसून आले आहे. जांभा खडक तयार होण्याच्या प्रदेशात भूपृष्ठावर तसेच पृष्ठाखाली उत्कृष्ट जलोत्सारण असणे आवश्यक असते. कारण भूमिजलाचा उत्तम निचरा असेल, तरच विद्राव्य पदार्थ मूळच्या जागेपासून दूर हलविले जाऊन खनिजांचे ऑक्सिडीकरण पूर्णावस्थेस जाऊ शकते. जांभा खडकाचे बरेच जाड आवरण तयार होण्यासाठी त्याच्या निर्मितीला पोषक अशी परिस्थिती हजारो वर्षे सातत्याने टिकून राहणे आवश्यक असते.

 मूळच्या जागी अविद्राव्य पदार्थ अवशिष्ट निक्षेपाच्या रूपात साचत राहून तयार झालेल्या आवरणाला प्राथमिक किंवा उच्च स्तरीय जांभा म्हणतात. जांभ्याचे अपक्षयामुळे (वातावरणीय प्रकियांमुळे) तुकडे तुटून ते दऱ्याखोऱ्यांतून आणि डोंगर उतारावरून वाहत येऊन सखल भागात पसरून साठलेल्या आवरणाला द्वितीयक किंवा अधोस्तरीय जांभा म्हणतात. प्राथमिक जांभा व त्याच्या खाली असणारे मूळचे जनक खडक यांच्यामध्ये संक्रमणावस्था दाखविणारा एक मातकट थर आढळतो. त्याला लिथोमार्ज असे नाव आहे. रासायनिक दृष्ट्या हा प्राथमिक जांभ्यासारखाच असला, तरी त्याच्यात सिलिकेचे प्रमाण बरेच जास्त असते. द्वितीयक जांभ्याच्या खाली असा थर सापडत नाही.

 भारत, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, क्यूबा, हवाई बेटे, द. आफ्रिका व द. अमेरिका खंडाचा विषुववृत्तीय प्रदेश, उ. अमेरिकेत आर्‌कॅन्सॉ येथे, यूरोपात तुरळक प्रमाणात ऑस्ट्रिया, फ्रान्स, ग्रीस, स्पेन, यूगोस्लाव्हिया व जर्मनी येथे, तसेच मध्य रशियात व चीनमध्येही काही प्रदेशात जांभा खडक आढळतो.

 भारतात कच्छपासून मलबारपर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात, सह्याद्रीच्या उंच पठारावर, मध्य प्रदेश, बिहार व ओरिसा या राज्यांच्या सरहद्दीवरील उंच पर्वतरांगांवर तसेच तुरळक प्रमाणात ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर जांभा खडकाची कमीजास्त जाडीची आवरणे आढळतात.

 जांभ्यातील लोहाचे प्रमाण बरेच (६०% पर्यंत) वाढल्यास त्याचा लोहधातुक म्हणून वापर करता येतो. गोव्यातील तसेच वेंगुर्ल्याच्या दक्षिणेस रेडी येथील लोहधातुकाचे काही साठे जांभ्यापासून तयार झालेले आहेत. क्यूबामध्येही जांभ्याचा लोहधातुक म्हणून वापर होतो. क्यूबातील जांभ्यातून लेशमात्र प्रमाणात निकेलही मिळते. भारतातही ओरिसा राज्यातील सुखिंडा या ठिकाणच्या जांभ्यातून निकेल मिळू लागले आहे.

सहस्रबुद्धे, य. शि.