जहाजबांधणी : जहाजे बांधण्याच्या उद्योगाचे मूळ इतिहासात शोधणे कठीण आहे. तथापि ईजिप्तमध्ये सहा हजार वर्षांपूर्वीची जहाजांची चित्रे उपलब्ध आहेत. शिवाय जगातील सर्व पुराणकथांमध्ये जहाजांचा उल्लेख आणि प्राचीन शिल्पांमध्ये त्यांच्या आकृती अनेक ठिकाणी मिळत असल्यामुळे समुद्रामध्ये व त्यापलीकडेही जाण्याच्या मानवाच्या आकांक्षेची पूर्ती पुरातन काळीच झाली असली पाहिजे.
सुरुवातीला जहाजे लाकडांची बनविली जात व वल्ह्यांनी चालविली जात. जसजसे त्यांचे आकारमान वाढत गेले आणि विशेषतः जेव्हा लांब पल्ला गाठण्याची गरज उत्पन्न झाली तेव्हा शिडांचा वापर सुरू झाला. दूरच्या प्रवासासाठी जहाजांना शिडे वापरणे एकोणिसाव्या शतकातही चालू होते. वाफचलित एंजिने आल्यावर शिडांची जागा प्रथम वल्ह्यांच्या चक्रांनी आणि पुढे प्रचालकांनी (मळसूत्री पंख्यांनी) घेतली (सु. १८४०). ह्यानंतर जहाज बांधण्याच्या शास्त्राची प्रगती फारच झपाट्याने झाली. प्रचालक फिरविण्यासाठी वाफेने फिरणारी टरबाइने आणि अंतर्ज्वलन (एंजिनाच्या सिलिंडरातच इंधनाचे ज्वलन होणाऱ्या) तेल एंजिनांचा वापर सुरू झाला. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अणुभट्टी वापरता येऊ लागल्याने एक नवीन युगच सुरू झाले. त्यामुळे इंधनाचे पुनर्भरण न करता पृथ्वीच्या कित्येक प्रदक्षिणाही करणे आता शक्य झाले आहे. देशादेशांतील व्यापार वाढला आणि यामुळे जहाजांचे वेग व आकारमान वाढत गेले. विवक्षित कार्यासाठीच जहाजे बांधली जाऊ लागली. हजार दोन हजार उतारू नेणारी व घरच्यापेक्षाही अधिक सुखसोईंनी युक्त अशी जहाजे बांधली गेली. एकाच वेळी दोन लक्ष टन तेलाची ने-आण करणारी तेलवाहू जहाजे बांधण्यात आली आहेत. जपानमध्ये बांधलेले कँगॅरू नावाचे जहाज ३८,००० टन वजनाचे असून त्यात माल भरलेल्या स्वयंचलित पडावांचा एक मोठा तांडा वाहून नेण्याची व्यवस्था आहे. हे पडाव मोठ्या बंदरांत उतरवून ते नद्यांतून व कालव्यांतून इच्छित स्थळी नेता येतात. ह्या पद्धतीने मालाची बंदरामध्ये हलवाहलव केल्याशिवाय माल समुद्रकिनाऱ्यापासून तो थेट आतील बंदरांपर्यंत जलद पोहोचविता येतो.
पूर्वीची लहान जहाजे लाकडाची असत, पण आता जहाजांचे आकारमान पुष्कळ मोठे केल्यामुळे लाकडाचे बळ अपुरे पडू लागले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस लाकडाच्याऐवजी लोखंडाचे पत्रे वापरले जाऊ लागले आणि नंतर थोड्याच काळात नरम पोलादाने त्याची जागा घेतली. आता काही भागांसाठी उच्च ताणबलाचे पोलाद व राहण्याच्या वगैरे जागांसाठी मिश्रॲल्युमिनियम यांचा वापर होत आहे.
जगातील जहाजबांधणी केंद्रे : जहाजबांधणी उद्योगात ग्रेट ब्रिटन आघाडीवर असून जपान, प. जर्मनी. स्वीडन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, हॉलंड, फ्रान्स, इटली, डेन्मार्क आणि नॉर्वे हे अनुक्रमाने त्या खालोखालचे देश आहेत. रशिया, पूर्व जर्मनी, पोलंड, यूगोस्लाव्हिया, बल्गेरिया आणि रूमानिया ह्याही देशांनी स्वतःची गरज भागवून काही प्रमाणात निर्यात करण्याइतपत १९५० सालानंतर मजल गाठली आहे.
भारतीय जहाजबांधणी उद्योग : मध्ययुगापूर्वीच्या भारताच्या सुवर्णकाळात ह्या उद्योगाचे आणि तत्संबंधीच्या कलेचेही भारत हे केंद्र होते. डरायस किंवा अलेक्झांडर यांच्या हाताखालील इराणी आणि रोमन अधिकारी आपल्या आरमारासाठी भारतामध्ये बांधलेली शेकडो गलबते विकत घेत असत, असा पुरावा सापडतो. भारतीय बांधणीची जहाजे पश्चिमेकडे आफ्रिकेतच नव्हे, तर मेक्सिकोपर्यंत वापरली जात. तसेच ती पूर्वेकडे जावा, सुमात्रा, बोर्निओ व चीन अशा दूरवरील प्रदेशांतील बंदरांशी व्यापार करीत. ईस्ट इंडिया कंपनीच्या आरंभीच्या काळात भारतीय बनावटीचीच जहाजे लंडनपर्यंत माल घेऊन जात असत. इतकेच नव्हे तर इंग्रजी आरमाराची शेकडो गलबते भारतीय बांधणीचीच होती. ॲडमिरल नेल्सन यांचे मुख्य गलबत व्हिक्टरी व दुसरे गंगा ही भारतीय बांधणीची गलबते आपल्या उत्कृष्ट दर्जाबद्दल प्रसिद्ध होती. भारतीय जहाजांच्या उत्कृष्टतेने प्रभावित होऊन लॉर्ड वेलस्ली यांनी ब्रिटिशांनी सर्व व्यापार भारतीय जहाजांनीच करावा असे सुचविले होते परंतु असे करण्याने ब्रिटनच्या जहाजबांधणी उद्योगास हानी पोहोचेल ह्या भीतीने तसे केले गेले नाही. उलट त्या वेळेपासून भारताच्या या उद्योगाची उपेक्षाच केली गेली. हा उद्योग स्वातंत्र्य-प्राप्तीपर्यंत अगदी निकृष्टावस्थेला गेला होता.
भारतामधील पहिला आधुनिक जहाजबांधणी कारखाना विशाखापटनम् येथे १९४१ मध्ये सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीने सुरू केला व १९५२ पर्यंत तेथे प्रत्येकी ८,००० टन वजनाची आठ मालवाहू जहाजे बांधण्यात आली. १९५२ साली भारत सरकारने तो कारखाना आपल्या ताब्यात घेऊन त्याला हिंदुस्थान शिपयार्ड लि. असे नाव दिले व त्याची बरीच सुधारणा केली. त्यामुळे १९५२–७५ या काळात तेथे निरनिराळ्या प्रकारची मिळून ६४ जहाजे बांधण्यात आली. त्या सर्वांचे एकूण वजन ५·५ लाख टन होते. या कारखान्यात आता १५,००० टन वजनाचे सामान्य प्रकारचे मालवाहू जहाज व २५,००० टन वजनाचे राशिमाल नेणारे जहाज बांधण्याची सोय केली आहे.
विशाखापटनम्शिवाय कोचीन, मुंबई आणि कलकत्ता येथेही जहाजे बांधण्याचे सरकारी कारखाने आहेत. मुंबई येथील माझगाव गोदीत युद्धनौकांची बांधणी होते. तेथे ३,००० टन वजनाची लिआंडर वर्गातील हिमगिरी, निलगिरी व उदयगिरी ही तीन लढाऊ जहाजे १९७६ पर्यंत बांधली गेली असून नाविक दलाने आणखी तीन जहाजांची मागणी नोंदविली आहे. कोचीन येथे राशिमाल नेणारी ६०,००० टनांपर्यंतची मोठी जहाजे बांधण्याची सोय केली आहे. कलकत्ता येथील गार्डन रीच वर्कशॉप्स लि. या सरकारी कारखान्यात विविध प्रकारची लहान मोठी जहाजे बांधण्याची सोय असून २८,००० टन वजनाची सागरी जहाजे बांधण्याची सोयही करण्यात येत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी किनारी वाहतूक करणारी गलबते, मच्छीमारी नौका व पडाव बांधण्याचे खाजगी कारखाने आहेत [⟶ जलवाहतूक].
वर्गीकरण : जहाजामध्ये व्यापारी आणि लढाऊ असे दोन मुख्य वर्ग आहेत. व्यापारी जहाजांनी जागतिक आणि देशांतर्गत व्यापार चालतो व लढाऊ जहाजे राष्ट्राच्या किनाऱ्याचे रक्षण करतात आणि युद्धकाळात आपल्या व्यापारी जहाजांच्या तांड्यांना संरक्षण देतात व शत्रूच्या जहाजांवर व बंदरावर हल्ला करून त्यांची शक्ती नष्ट करतात.
व्यापारी वर्गात उतारू, मालवाहू व उतारू-माल मिश्र असे मुख्य प्रकार असून मालवाहू जहाजांचे मालाच्या प्रकारानुसार (तेल, धान्य, खनिजे यांसारखे सुटे पदार्थ माल भरलेले पेटारे यंत्रसामग्री मांस, फळे यांसारखा नाशवंत माल इ. प्रकारांनुसार) विविध प्रकार पडतात. मच्छीमारी जहाजांचाही व्यापारी जहाजांतच समावेश होतो.
लढाऊ वर्गात मोठ्या तोफा आणि मजबूत पोलादी कवच असलेली मध्यम वेगाने जाणारी वजनदार युद्धनौका, वेगाने लांब अंतरावर जाऊ शकणारे जरा हलक्या जातीचे, तोफांचा मारा करू शकणारे लढाऊ जहाज (क्रूझर), तोफा ठेवलेली लहान परंतु वेगाने जाणारी विनाशिका, पाणतीर मारणारी लहान पण वेगवान टोर्पेडो नौका, सुरुंग पेरणारे व सुरुंग काढून टाकणारे, पाणबुडी, क्षेपणास्त्रे सोडणारे, विमानवाहू अशी अनेक प्रकारची जहाजे आहेत.
व्यापारी व लढाऊ जहाजांखेरीज ओढबोट (टग बोट), गाळ उपसणी करणारे जहाज (ड्रेजर), केबल टाकणारे जहाज इ. विशेष कामांकरिता खास जहाजे बांधण्यात येतात.
जहाजबांधणी कारखान्याची मांडणी : जहाजबांधणीसाठी पाण्यालगत समतल वा पाण्याकडे किंचित उतार (२० : १) असलेली व पुष्कळ भार सहन करू शकणारी जागा लागते. या जागेवर जहाजबांधणीचे गाळे उभारतात व त्यात जहाजाची काया बांधून तयार झाली म्हणजे ती ढकलून पाण्यात सोडावयाची असते. यासाठी बांधणी गाळ्याला लागून पुरेसे खोल व रुंद, खाडीचे किंवा नदीचे पात्र असावे लागते. जहाजबांधणी कारखाना पोलाद उत्पादन केंद्राशी रूळमार्गाने जोडलेला असावा. दुसऱ्या महायुद्धापूर्वी पुष्कळ वर्षे चालू असलेल्या जहाजबांधणीच्या तंत्रात त्या युद्धानंतर मोठा फरक पडला आहे. वितळजोड (वेल्डिंग) करण्याच्या साहित्यात पुष्कळ सुधारणा झाल्यामुळे त्याचा जहाजबांधणीमध्ये सर्वत्र उपयोग होऊ लागला. पत्र्यांचे जोड करण्यासाठी रिव्हेटांचा उपयोग करण्याऐवजी वितळजोड पद्धती वापरली म्हणजे जहाजाच्या कायेचे वजन बरेच कमी होते. आता अनेक लहान भागांची जुळणी दुसऱ्या प्रशस्त आणि सोयिस्कर जागी करून ती सबंध पोटजुळणी यारीने उचलून अर्धवट बांधलेल्या कायेला सहज जोडता येते. आर्थिक टंचाई, स्पर्धा आणि उत्तरोत्तर महाग होणारे मनुष्यबळ ह्यांमुळे आता शक्य तितके काम दूरचलित यंत्रांच्या साहाय्याने केले जाते. या पद्धतीने प्रत्येक कामगाराला लागणारी वस्तू त्याच्या जवळ आणून पुरविली जाते. पत्र्याच्या तुकड्यासारख्या प्राथमिक भागावर इष्ट ते संस्कार होत होत तो पुढे सरकत आपल्या शेवटच्या ठिकाणावर पोहोचेल असा एक एकदिश प्रवाह वाहत राहतो. कोणत्याही प्राथमिक भागाला किंवा त्यापासून बनविलेल्या दुसऱ्या भागाला मागे आणावे लागत नाही.
मुख्य विभाग : हे पुढीलप्रमाणे असतात : मुख्य व्यवस्थापन कार्यालय, अभिकल्पन कार्यालय (नव्याने तयार करावयाच्या जहाजाची कच्ची चित्रे काढून त्यामधील सर्व महत्त्वाच्या भागांची मोजमापे ठरविण्याची जागा), आरेखन कार्यालय (मोठ्या कागदावर प्रमाणबद्ध आकृत्या काढण्याची जागा,) फर्माशाळा (जहाजाचे विविध भाग बनविण्यासाठी लागणारे कामचलाऊ नमुने तयार करण्याची जागा), ओतशाळा, फर्मागृह, फर्म्यांचे अंकन व कर्तन गृह, पोलादी कच्चा माल साठविण्याची जागा, सामान्य वस्तू भांडार, पोलादी पाट, पत्रे, बडोद, कोन वगैरे कापण्याची व जोडण्याची जागा, यंत्रशाळा (यांत्रिक हत्यारांचा विभाग), जोडणी विभाग, एंजिन-विद्युत् जनित्र बसविण्याची जागा. विद्युत् विभाग, फर्निचर विभाग, बांधणी गृह, बांधणी गाळे (जहाजाची मुख्य काया बांधण्याची जागा), काया उभी करण्याचे धक्के आणि सुकी गोदी. या विभागांची मांडणी करण्याचा एक प्रकार आ. १ मध्ये दाखविला आहे.
कारखान्यातील आवश्यक सोयी :जहाजबांधणी कारखान्यातील सर्वांत महत्त्वाची आवश्यक सोय म्हणजे मालाच्या वाहतुकीची होय. प्रत्येक भांडारात, कर्मशाळेत व विभागात वरच्या बाजूने जाणाऱ्या, विजेच्या शक्तीने चालणाऱ्या मोठ्या याऱ्या, वरून जाणाऱ्या पण लहान जातीच्या आणि खालून चालविता येणाऱ्या याऱ्या, बांधणी गाळ्यातील मोठ्या याऱ्या, लहान मोठी मालवाहने, वाहक पट्टे इ. साहित्य असले पाहिजे. वाकविलेले पोलादी पत्रे उचलताना त्यांच्या आकाराला धक्का न बसेल अशा तऱ्हेने त्यांना पकडणारी चुंबकीय आकर्षणाने धरून उचलणारी यंत्रे (उत्थापक) असतात. पोलादाचे खांब, तुळया, कोन वगैरे भाग भांडारातून संस्कारशाळेत नेण्यासाठी पोलादी लाटण्यांवरून सरकत जाणारे वाहक पट्टे असतात. संस्कार करण्याच्या विभागात ओतशाळा, लोहारी घडवण शाखा, जाड पत्रे तापविण्याच्या भट्ट्या, गरम पत्रे वाकविण्याची लाटणी यंत्रे, सुतारकामाची जागा, यंत्रशाळा, नळ वाकविण्याचा विभाग, विद्युत् विभाग वगैरेंचा समावेश होतो. प्रत्येक विभागात यांत्रिक घणासारखी यंत्रे चालविण्यासाठी संपीडित (दाबाखालची) हवा नळामधून खेळविलेली असते. धातूचे भाग तापविण्यासाठी कोक किंवा वायू वापरतात किंवा विद्युत् शक्तीचा उपयोग करतात. पोलादी पत्र्याची घडवण करताना त्याच्या पृष्ठभागावर सुट्या झालेल्या कणांचे पापुद्रे चिकटलेले असतात. ते नीट साफ करून तो भाग अम्लाच्या सौम्य विद्रावात बुडवून काढतात व नंतर त्यावर कठीण केलेल्या पोलादी गोळ्यांचा मारा करून त्यावर गंजरोधी रंग लावतात. असे केल्याने तो भाग गंजत नाही.
काही कारखान्यांत जहाजाच्या प्रतिकृतीची चाचणी घेण्यासाठी एक लांबलचक हौद असतो. याशिवाय सरकारी नियमाप्रमाणे आवश्यक अशा सुखसोई, रस्ते आणि वाहतूक साधनेही पुरवावी लागतात.
जहाजबांधणी कारखान्याच्या यंत्रसामग्रीमध्ये धातूचे जाड पत्रे दाबून त्यांची पातळी सुधारण्याची मोठी लाटण यंत्रे (मँगल), जाड पत्र्याच्या बाजूवर काठ घडविणारी यंत्रे, शंकूसारखा आकार देणारी यंत्रे, साधी दाबयंत्रे, पत्रे कापण्याच्या कातऱ्या, जाड पट्टीचे काठ रंधणारी यंत्रे, नळ वाकविण्याची यंत्रे, छिद्रण यंत्रे, स्वयंचलित वायुज्योत कर्तन यंत्रे आणि वितळजोड यंत्रे यांचा समावेश असतो.
संघटन व्यवस्था आणि कर्मचारी वर्ग : कारखान्याचे संचालन करणारा मुख्य अधिकारी हा उत्तम व्यवस्थापक किंवा उत्तम तंत्रज्ञ असतो. हा कुशाग्र बुद्धीचा, तंत्रज्ञान आणि व्यापार उद्योग या दोनही क्षेत्रांतील चांगला अनुभवी असला पाहिजे. त्याच्या हाताखाली कारखाना व्यवस्थापक असून तो दैनंदिन कामावर लक्ष ठेवतो. त्याच्यावरच कारखान्यातील उत्पादनाची जबाबदारी असते. यांशिवाय नव्या कामाची योजना तयार करणारा व त्यातील प्रत्यक्ष कामाचे मार्गदर्शन करणारा एक आयोजक-उत्पादन संचालक असतो व तो भावी कार्याचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे काम करवून घेण्यास जबाबदार असतो. नौशिल्पज्ञाकडे जहाजाच्या आकाराची रचना आकर्षक आणि उपयुक्त करण्याची जबाबदारी असते. जहाजबांधणीसंबंधीचे सर्व चालू आरेख व नव्या जहाजाचे आरेख बनविण्याची जबाबदारी सरआरेखकाकडे असते. यांत्रिक कर्मशाळेत त्या त्या कामात निष्णात असणारा माणूस विभागप्रमुख असतो. जहाजबांधणी कारखान्यात फर्मासाचाकार, छिद्रकार, पट्टकार, रिव्हेट जोडारी, फटबंदकार, वितळजोडकार, सुतार, लोहार, नळकामगार, वीजतंत्री, रंगारी आणि दोरकामगार असे विविध प्रकारचे धंदेवाईक कामगार लागतात. मुख्य कार्यालयात सामान्य व्यवस्था पाहण्याचा विभाग, नवीन जहाजाचा आकार व मोजमापे ठरविण्याचा विभाग, निरनिराळ्या भागांच्या किंमती ठरविण्याचा विभाग, खरेदी-विक्री व जमाखर्च विभाग, अधिकारी, निरीक्षक आणि कामगार यांचे हजेरी विभाग, इमारती आणि क्षेत्र परिरक्षण विभाग, राखण आणि पहारा विभाग यांचा समावेश होतो. जहाजबांधणी उद्योग मोठा गुंतागुंतीचा असल्यामुळे कोणत्याही एका विभागात शैथिल्य आले, तर संपूर्ण कारखान्याच्या कामात व्यत्यय येण्याची भीती असते. म्हणून या कारखान्याचे काम सुरळीत चालण्यासाठी आधुनिक सामग्रीबरोबर आधुनिक पद्धतीचे व्यवस्थापनही असणे आवश्यक असते.
जहाजबांधणीची पद्धत : पोलादी पत्रे, खांब, तुळया, कांबी वगैरे माल रूळमार्गाने किंवा समुद्रमार्गाने कारखान्यात आल्यावर हा माल क्षैतिज (आडव्या) पातळीत ठेवून अर्ध्या किंवा पाऊण मी. उंचीच्या थप्प्यांनी साठविला जातो. तेथून जरूरीप्रमाणे वस्तू संस्कारशाळांत हालवून तेथे त्यांचे तुकडे करून व त्यांवर जरूर ते संस्कार करून त्यांच्या उपजुळण्या बनविल्या जातात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर जागतिक विमा व जहाजांचे वर्गीकरण करणाऱ्या सरकारमान्य संस्थांनी जहाजाच्या पत्र्यांचे जोड करण्यासाठी वितळजोडास मान्यता दिल्याकारणाने १९५० पासून सर्व जहाजांच्या बांधणीत वितळजोड पद्धत रूढ झाली आहे. अज्ञात अंतर्गत भाराने अखंड पोलादी पट्टीत चीर पडली, तर ती चीर विशिष्ट मर्यादेपुढे पसरून घातक परिणाम होऊ नये म्हणून त्या पट्टीवर मधूनमधून रिव्हेट जोड वापरतात. एवढाच रिव्हेटांचा उपयोग करतात. वितळजोड पद्धती वापरल्याने उत्पादन पुष्कळ सोपे झाले असून बांधणीच्या कार्यपद्धतीतही आमूलाग्र फरक झाला आहे. त्रिमितीय लहान उपजुळण्या एका मुख्य मोठ्या जोडशाळेत वरच्या यारीच्या साहाय्याने एकत्र आणून त्या एकामागून एक अशा जोडल्या जातात. त्यामुळे पूर्वी संकुचित जागेत जे सर्व काम करावे लागे ते आता प्रशस्त जागेत करता येऊ लागले आहे व त्यामुळे त्याच्या दर्जात सुधारणा होऊन वेळातही बचत होऊ लागली आहे. जहाजाचा एक एक भाग जसजसा उपजुळण्यांनी तयार होतो तसतसा तो मोठ्या यारीने उचलून गोदीत नेतात आणि मुख्य जोडशाळा दुसरे संच जोडण्यास परत रिकामी केली जाते. गोदीमध्ये अशा रीतीने एकामागून एक उपजुळण्या जोडून सबंध काया तयार करतात. सबंध काया तयार झाली म्हणजे ती पाण्यात ढकलली जाते अथवा सुक्या गोदीत असल्यास गोदीत पाणी भरून काया तरती करतात. नंतर मुख्य एंजिने व अवांतर यंत्रसामग्री आणि उपकरणे आत बसविण्यासाठी जहाज कामाच्या धक्क्याला लावून ठेवतात.
जहाजाचे महत्त्वाचे घटक : जहाजाच्या संरचनेतील महत्त्वाच्या घटकांच्या नावांचा परिचय होणे येथे आवश्यक आहे. निरनिराळ्या प्रकारच्या जहाजांच्या रचनेत फरक असतो, पण वर्णनासाठी सामान्य मालवाहू जहाजाचे उदाहरण चालण्यासारखे आहे (आ. २).
कणा : (कील). जहाजाची लांबीतील मध्य रेषा सामावणारी अगदी तळाची (पायालगतची) आडव्या पट्टांची ओळ (सपाट कणा) व तीवर बसवलेली उभ्या पट्टांची ओळ (उभा कणा) यांनी मिळून झालेला भाग, हा कणा जहाजाच्या पुढच्या टोकापासून (नाळेपासून) मागच्या टोकापर्यंत (वरेपर्यंत) सबंध लांबीत सलग जोडलेला असतो. सपाट कण्याला जोडलेले दोन्ही बाजूंचे पट्ट त्याच्यासह जहाजाचे बाहेरील जलाभेद्य कवच बनवतात.
आडवी आणि लांबीच्या दिशेतील धरणे : (फ्लोअर व लाँजिट्यूडिनल). खालच्या बुडावर रुंदीच्या आणि लांबीच्या दिशेत अंतराअंतरावर लावलेले उभे पत्रे म्हणजे ही धरणे.
आतील तळ : खालच्या तळाशी समांतर असा धरणांवर आधारलेला पत्र्यांचा तळ. दोन्ही तळांमध्ये अर्धा-पाऊण मी. अंतर असते. हाच आतला तळ मालाच्या कोठारांचा तळ असतो व तसेच एंजिने वगैरे बसवायलाही तो उपयोगी पडतो. या दोन तळांमधील जागा पाण्याच्या टाक्या म्हणून वापरतात.
तक्तपोशी : (डेक). इमारतीच्या मजल्यावरील जमिनीसारखे समांतर तळ.
व्यवधान : (बल्कहेड). हे पत्र्यांचे पडदे असतात व ते भिंतीचे काम करतात. यांच्यामुळे जहाजात खोल्या व दालने पडतात.
बाजू–चौकटी : (साइड फ्रेम्स). या बाजूच्या कवचाच्या पत्र्याला बाहेरील पाण्याचा दाब सहन करण्याचे सामर्थ्य देतात. तक्तपोशी बडोदांवर आधारलेली असते व बडोदांची टोके मोठ्या तुळयांवर टेकलेली असतात. मोठ्या तुळयांना खांबांनी आधार देतात. दोन पट्टांच्या लांबीच्या कडांच्या सांध्याला जोड आणि रुंदीच्या कडांच्या सांध्याला नुसताच सांधा म्हणतात. जहाजाच्या लांबीत बसलेली कवचातील पत्र्यांची एक रांग म्हणजे उभारणी पट्टा (स्तंभी पट्टा) अर्थात मग स्तंभ पट्ट्यांना जोडणारे ते जोड आणि त्यांमध्ये येणारे ते सांधे.
जहाजबांधीसाठी वापरावयाचे पदार्थ आणि साहित्य : जहाजबांधणीचा मुख्य पदार्थ म्हणजे नरम पोलाद. ह्या पोलादाचे घटक व गुणधर्म विमा आणि सरकारमान्य वर्गीकरण करणाऱ्या संस्थांनी ठरविलेल्या विनिर्देशाप्रमाणे (वर्णनाप्रमाणे) असावे लागतात. लढाऊ जहाजांसाठी अधिक ताकद व सुरक्षितता येण्यासाठी अधिक कठीण व उच्च ताणबलाचे पोलाद वापरले जाते. त्यातील काही प्रकारचे पोलाद नरम पोलादाच्या दीड व दुप्पट ताकदीचे असते. या पोलादाचे हे विशेष गुण मिश्रण व औष्णिक उपचारांनी मिळू शकतात. युद्धनौकांच्या कायांची पृष्ठे विशेष कठीण बनविली जातात. अलीकडे ॲल्युमिनियमाचा वापर जहाजबांधणीत मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. विशेषतः तक्तपोशीवरील खोल्यांची संरचना, प्राणरक्षक नौका, कोठारांची झाकणे वगैरेंसाठी त्याचाच वापर होतो. मॅग्नेशियम असलेल्या काही मिश्रधातू या समुद्राच्या पाण्यामुळे होणाऱ्या क्षरणास (गंजण्यास) रोध करणाऱ्या असतात. जहाजाचा सांगाडा व काया यांसाठी नरम पोलादाचे पट्ट, बडोद व कांबी यांचा वापर करतात. सुकाणूकडील सांगाडा व त्यावरील काही पत्रे घडीव किंवा ओतीव पोलादाचे करतात. प्रचालकाचा दंड ठेवण्याचा नळ, सुकाणू चौकट, एंजिनाच्या बैठकी, नांगर, नांगर बिळे (साखळी नळ) इ. भाग ओतीव पोलादाचे असतात. कवच, तक्तपोशीचा तळ व आतल्या मोठ्या भिंतींसाठी (बल्कहेडसाठी) पोलादी पत्रे वापरतात व चौकटीसाठी पोलादी दंड, तुळया व कांबी वापरतात. त्याशिवाय ओतीव लोखंड, तांबे, जस्त, शिसे, कथिल, कासे, पितळ, लाकूड, कॅनव्हास, बूच (कॉर्क), ॲस्बेस्टस, लिनोलियम, ताग, सुती दोर, वाख, रबर, डांबर, कागद, काच, चामडे, प्लॅस्टिक, सिमेंट, एनॅमल रंग असे अनेक पदार्थ जहाजबांधणीसाठी लागतात परंतु अशा पदार्थांचे प्रमाण थोडे असते.
जहाजबांधणीचे टप्पे : करार, आरेख व विनिर्देश : जहाजाचा भावी मालक जहाजबांधणी कारखान्याला जहाज बांधण्याचा आदेश देताना एक करार करतो. त्या कराराला काही महत्त्वाचे स्थूल स्वरूपाचे नकाशे (आरेख) जोडलेले असतात. या नकाशांत वाहतूक करावयाची व माल ठेवण्याची एकूण जागा, जहाजाचे जास्तीत जास्त वजन, डूब, बांधणीसाठी कोणता माल वापरावा वगैरे मूलभूत व महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असतो. या स्थूल नकाशांनुसारच पुढे जहाजाचे प्रत्यक्ष आरेख बनविले जातात. जहाजाचा अभिकल्प करताना त्याला केव्हा तरी भयानक वादळाचा तडाखा सहन करावा लागेल, असे गृहीत धरतात व त्यासाठी मुख्य एंजिनापासून ते पाकगृहापर्यंतची सर्व यंत्रणा मजबूत पायावर उभारतात. परंतु जहाजातील सर्व जागेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याकडे जहाजबांधणीचा मुख्य कटाक्ष असतो. जहाजाचे अभिकल्पन हा जहाजबांधणीतील पहिला टप्पा आहे आणि करारातील वर्णनाप्रमाणे प्रत्यक्ष कामाचे आरेख तयार करणे हा दुसरा टप्पा आहे. दुसरा टप्पा झाल्यावर जहाजबांधणीसाठी लागणाऱ्या सामानाची जंत्री बनविली जाते व त्यानुसार मागणी केली जाते. जहाजाला लागणाऱ्या एकंदर पोलादापैकी एकतृतीयांश माल भांडारात आला म्हणजे जहाजबांधणीच्या कामास सुरुवात करतात. हाच तिसरा टप्पा होय. या वेळी सपाट लाकडी तक्तपोशीवर पूर्णमानात प्रत्येक चौकटीशी किंवा पट्टाची आकृती काढतात आणि त्यावरून जाड कागदावर किंवा पातळ लाकडी चादरीवर त्याचा फर्मा (कामचलाऊ नमुना) तयार करतात. अशा फर्म्यावर प्रत्यक्ष पोलादी भागावर करावयाच्या सर्व संस्कारांची नोंदही करून ठेवतात. या फर्म्याच्या मदतीनेच पोलादी पत्र्याचे भाग कापून घेतात व त्यांपासून जहाजात वापरावयाचे घटक तयार करतात. आरेखांवरून फर्मे बनविणे हा बांधणीतील चौथा टप्पा असून त्यानंतर पुढील कामे क्रमाने होण्यास सुरुवात होते.
काही कारखान्यांत फर्मा बनविणे आणि त्याच्या मदतीने पोलादी पत्र्यावर आखणी करणे ही दोनही कार्ये छायाचित्रण पद्धतीने साधली जातात. या पद्धतीत मांडणीगृह हे छायाचित्रणाच्या अंधारखोलीसारखे (डार्क रूमसारखे) असते. याकरिता विशेष प्रकारचे आरेख तयार करतात व ते व्यस्त (निगेटिव्ह) चित्रावर छायाचित्रित करतात. या छायाचित्रित आरेखाचे मग अंधारखोलीत सरळ पोलादी पत्र्यावर क्षेपण करतात व पत्र्यावर मिळणाऱ्या आरेखानुसार आखणी करण्यात येते. मूळ आरेख लहान आकारमानाचे करता येतात आणि फर्मा बनविण्याचे काम व पूर्णाकृती उठविण्याचे काम फार लवकर आणि कमी खर्चात करता येते. उदाहरणासाठी घेतलेल्या सामान्य मालवाहू जहाजाची रचना आ. ३ मध्ये दाखविली आहे.
जहाजाला लागणारे पोलादाच्या पत्र्यांचे भाग फर्म्याप्रमाणे आखून तयार झाले म्हणजे ते यांत्रिक करवतीने कापून घेतात आणि त्यांचे काठ पुन्हा नीट रंधून साफ करतात. अर्धेअधिक भाग तयार झाल्यावर बांधणीचा पाचवा टप्पा सुरू करतात. हा टप्पा म्हणजे कायेची बांधणी असून ते कार्य बांधणी गाळ्यात करतात. या वेळी मुख्य बांधणी गाळ्यात प्रथम जहाजाचा कणा मांडतात व त्याला दोन्ही बाजूंकडे पत्र्याचे भाग जोडत जाऊन सबंध काया उभी करतात. नंतर सहावा टप्पा म्हणजे ती काया पाण्यात सोडून कायेमध्ये बाकीची यंत्रसामग्री बसवून जहाजाची बांधणी पूर्ण करतात.
बांधणी गाळा : बांधणी गाळ्याची जमीन जहाजाचा भार सहज सहन करण्याइतकी घट्ट आणि कठीण असली पाहिजे. अशी जमीन तयार करण्यासाठी बहुतेक ठिकाणी जमिनीत प्रथम अनेक मजबूत खांब (स्तंभिका) ठोकून पुरतात आणि त्यांवर लाकडी ओंडके आडवे ठेवून जमिनीला मजबुती आणतात. या ओंडक्यांवरच जहाजाचा कणा मांडला जातो. कण्याला जोडावयाच्या कायेच्या भिंतींना बाहेरून आधार देण्यासाठी आडवे आणि उभे असे दोनही प्रकारचे टेकू लावतात. या टेकूंची रचना अशा प्रकारे करतात की, जहाजाची काया बांधून तयार झाली म्हणजे काया पाण्यात सोडण्यापूर्वी जहाजाचे वजन टेकूवरून काढून घसरपट्टीवर सोडता येते.
जहाजाची काया बांधून तयार झाली म्हणजे ती पाण्यात कोणत्या पद्धतीने सोडावयाची, हे कणा मांडण्यापूर्वीच ठरवावे लागते. बांधलेली काया सुकाणूच्या दिशेने घसरत जाणार असेल, तर कणा ठेवण्याचे ओंडके २० : १ असा उतार दिलेल्या जमिनीवर ठेवतात. जहाजाची काया जर एका बाजूकडून पाण्यात सोडावयाची असेल किंवा ती सुक्या गोदीत बांधावयाची असेल, तर जहाजाचा कणा मांडण्याचे ओंडके एकाच पातळीत असलेल्या जमिनीवर बसवितात. जहाजाचा सपाट कणा ओंडक्यांवर बरोबर बसविला म्हणजे त्याच्या मध्यरेषेवर उभा कणा जोडतात, असे केल्याने तुळईसारखा मजबूत मिश्रकणा तयार होतो. पूर्वी म्हटल्याप्रमाणे गाळ्याच्या दोन्ही बाजूंना मोठाल्या चालत्या याऱ्या आणि काही लहान याऱ्या बसविलेल्या असतात. मिश्रकण्याची जोडणी पूर्ण झाल्यानंतर कण्याच्या दोन्ही बाजूंकडे जहाजाच्या तळाचे पत्रे जोडून दोन्ही भिंतींपर्यंतचा तळभाग तयार करतात. या तळभागावरच उभ्या कण्याला समांतर व तितक्याच उंचीचे जाड पत्रे उभे करतात आणि त्या पत्र्यांना जोडणारे काही आडवे पत्रेही मधून मधून उभे करतात. त्यामुळे अनेक चौकोनी कप्पे असलेली घट्ट तळचौकट तयार होते. या चौकटीवर तळभागाला समांतर असा वरचा तळपत्रा जोडतात. या दोन तळपत्र्यांमधील रिकामी जागा टाकीसारखी वापरता येते. वरचा तळपत्रा जोडल्यानंतर खालच्या तळाच्या काठावर दोन्हीकडील भिंतींना आधार देणारे खांब उभे करतात व त्याच वेळी जहाजातील तक्तपोशीला आधार देणारे खांबही वरच्या तळपत्र्यावर उभे करतात. सर्व खांब उभे केल्यावर त्यांवर आडव्या तुळया जोडतात. त्यामुळे सबंध कायेला आधार देणारी चौकट तयार होते. ही चौकट तयार झाल्यावर बाहेरच्या कवचाचे पत्रे बोल्ट घालून चौकटीला तात्पुरते जोडतात व जहाजाचा एकंदर आकार नीट तपासून पाहतात. हा आकार बरोबर आहे असे समजले म्हणजे त्या सर्व पत्र्यांचे जोडकाम वितळ पद्धतीने पूर्ण करतात. ज्या ठिकाणी पत्र्यांचे जोडकाम करण्यासाठी रिव्हेट मारतात, तेथे सांध्याची फट चांगली बंद होण्यासाठी घडवण पद्धती वापरून ती बंद करतात. असे केल्याने रिव्हेटांचे सांधे चांगले जलाभेद्य करता येतात. भिंतींच्या सर्व पत्र्यांचे जोडकाम पूर्ण झाले म्हणजे जहाजाच्या आतील भिंतींचे जोडकाम करून जहाजाचे अनेक स्वतंत्र भाग तयार करतात व त्यांमध्ये क्रमाक्रमाने पाणी भरून सर्व सांधे तपासतात. खालच्या भागात कोठेही पाणी गळत नाही असे दिसून आले म्हणजे क्रमाक्रमाने जहाजाच्या आतील तक्तपोशी जोडीत जातात व जहाजाची काया पूर्ण करतात. काया पूर्ण होत असतानाच बहुतेक कारखान्यांत जहाजाचे सुकाणू आणि प्रचालक जोडतात.
जहाजाच्या कायेचा जलप्रवेश : बांधणी गाळ्यात बांधीत असलेल्या जहाजाची काया तयार झाली म्हणजे ती आ. ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे पाण्यात सोडतात व ती धक्क्याजवळ नेऊन नीट बांधून ठेवतात. तेथे असतानाच जहाजाची सर्व एंजिने आणि यंत्रसामग्री आत बसवितात व जहाजातील धुराडे, उतारूंच्या खोल्या, दूरसंदेशवहन, विजेचे दिवे वगैरे बाकीचे सर्व काम पूर्ण करतात. बांधणी गाळ्यातील काया पाण्याकडे सरकवण्यापूर्वी कायेचा सर्व भार टेकूंवरून काढून घसरपट्ट्यांवर उतरवावयाचा असतो. घसरपट्ट्यांचे दोन भाग असतात. त्यांपैकी खालचा भाग स्थिर राहणारा असून तो जमिनीवर घट्ट बसविलेला असतो. वरचा भाग सरकाणारा असून तो जहाजाच्या कायेला जोडतात. अचल पट्ट्या कायेच्या दोन्ही बाजूंकडे बसविलेल्या असतात आणि त्यांच्या रांगा पाण्याच्या तळापर्यंत नेलेल्या असतात. वरच्या पट्ट्या आणि खालच्या पट्ट्या यांच्या घर्षणी भागावर वितळविलेल्या चरबीचा जाड थर देतात व तो थर सुकल्यानंतर त्यावरून मऊ साबण चोळतात. चरबी आणि साबणाचा थर दोन्हीकडील पट्ट्यांना वंगण म्हणून उपयोगी पडतो. जहाजाचे वजन घसरपट्ट्यांवर आले म्हणजे जहाजाच्या कायेला बांधलेले साखळदंड सैल करीत जातात, त्यामुळे जहाजाची काया आपल्या वजनानेच उतारावरून सरकू लागते व हळूहळू पाण्यात शिरते. पाण्यात उतरलेली काया काठापासून फार दूर अंतरावर जाऊन दुसऱ्या वस्तूवर आपटू नये म्हणून गतिरोधक योजना करावी लागते.
चालक एंजिन व इतर सर्व साहित्याची जुळवाजुळव : पाण्यात उतरलेली काया धक्क्याला बांधून ठेवली म्हणजे तिच्या आतील एंजिन व इतर साहित्याची क्रमाक्रमाने नीट जुळवणी करतात व ते भाग लगेच तपासूनही पहातात. यांत्रिक भागांची जुळवणी चालू असतानाच जहाजाचा वरचा भाग बांधण्याचे कामही चालू करतात. त्यासाठी सुतारकाम, तक्तपोशीचे व गच्चीचे काम, नळ जोडण्याचे काम, किरकोळ यंत्रे बसविण्याचे काम, वातानुकूलनाची आणि शीतनाची सामग्री बसविण्याचे काम, विजेच्या तारा बसवण्याचे काम व रंग लावण्याचे काम अशी अनेक प्रकारची कामे एकदम चालू करतात व जहाजबांधणीचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष देतात. जहाजाच्या गच्चीचे काम पूर्ण झाल्याबरोबर माल उचलणाऱ्या याऱ्या उभ्या करतात. नांगर ओढण्याचे रहाट बसवितात व नांगर टांगून ठेवतात. याच वेळी संदेशवहनाची यंत्रणा, प्राणरक्षक नौका, प्राणरक्षक पट्टे वगैरे इतर साहित्यही बसवितात. वरच्या मजल्यावरील सेतूचे बांधकाम पूर्ण झाले म्हणजे तेथे सुकाणू फिरविण्याची यंत्रे व जहाज चालनाची इतर सर्व यंत्रसामग्री बसवितात.
निरीक्षण : मुख्य यंत्रसामग्री बसवून झाली म्हणजे ती पुन्हा एकदा चालवून तिचे चांगले निरीक्षण करतात. या वेळी जहाजाचा मालक, कारखान्याचे प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारीही हजर असतात. या वेळी मूळ कराराप्रमाणे सर्व बाबी पूर्ण झाल्याची खात्री करून घेतली जाते. याच वेळी मुख्य एंजिनाचीही चाचणी घेतात व प्रचालकाचे कामही तपासतात. या वेळी एंजिनाचा वेग पूर्ण रेटा उत्पन्न होईपर्यंत हळूहळू वाढवितात.
परीक्षण : एंजिनाची व प्रचालकाची चाचणी पूर्ण झाल्यावर जहाज उथळ पाण्यात नेऊन नांगर टाकण्याची व उचलण्याची चाचणी घेतात. यानंतर होकायंत्राचे काम पाहणे, वेगाची कमाल मर्यादा पाहणे, सुकाणू एका टोकापासून दुसऱ्या टोकास नेण्याचा काळ मोजणे, वळणाचा व्यास मोजणे, विविध कोनांत वळण्यास लागणारी जागा ठरविणे इ. गोष्टी नोंदल्या जातात. शेवटी पूर्ण वेगाने पुढे जात असताना सुरुवात करून पूर्ण वेगाने मागे जाण्यास लागणारा वेळ व अंतर यांची नोंद करतात. यानंतर इंधनाचा खप समजण्यासाठी व सहनशक्तीच्या परीक्षेसाठी लांब अंतरावरचा प्रवास करतात. जहाजाची एका बाजूकडे कलण्याची सीमा ठरविण्यासाठी जहाजातील वजन मुद्दाम एका बाजूकडे सरकवतात व जहाजाची कमाल कलण्याची मर्यादा तपासतात. वरील परीक्षणात मिळालेली सर्व माहिती नोंदली जाते व तिची एक प्रत जहाजावर कायम ठेवलेली असते. पुढील परीक्षणात या माहितीचा संदर्भ म्हणून चांगला उपयोग होतो. या सर्व परीक्षेत जहाज समाधानकारक रीतीने उतरले म्हणजे मालकाचे प्रतिनिधी ते ताब्यात घेतात.
जहाजाचा मालक आणि बांधणी कारखाना यांच्यामधील करारात नेहमीच हमीच्या अवधीची एक अट असते. तो अवधी पूर्ण होईपर्यंत जहाजात कराराचा भंग होणारा कोणताही दोष उत्पन्न झाला, तर तो दुरुस्त करून देण्याची जबाबदारी कारखान्यावर राहते.
पहा : जहाज जहाज प्रचालन नाविक वास्तुशिल्प.
संदर्भ : 1. Arnott, D., Ed. The Design and Construction of Steel Merchant Ships, New York, 1955.
2. Baker, E. Introduction to Steel Shipbuilding, New York, 1953.
3. Hardy, A. C. Tyrrell, E. Shipbuilding, London, 1964.
4. Hind, J. A. Ships and Shipbuilding, London, 1959.
5. Munroe-Smith, R. Applied Naval Architecture, London, 1967.
6. Munroe-Smith, R. Merchant Ship Design, London, 1964.
भिडे, कृ. ज.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..