जस्टिनिअन, पहिला : (सु. ११ मे ४८३–१४ नोव्हेंबर ५६५). ‘कॉर्पस ज्युरिस सिव्हिलिसनावाची रोमन विधिसंहिता तयार करणारा बायझंटिन सम्राट. पूर्ण नाव फ्लाविअस पेट्रस सेबेशिअस जस्टिनिअनस. इलिरीकम प्रांतात टाउरेशिया (तूरिन) येथे एका शेतकरी कुटुंबात जन्म. त्याचा चुलता पहिला जस्टिन याने त्यास सु.५१८ मध्ये दत्तक घेतले व त्याचे पूर्वीचे उपरौदा नाव बदलून जस्टिनिअन ठेवले. त्याच्या शिक्षणाचे वराजकीय दृष्ट्या  प्रगतीचे श्रेय त्याच्या चुलत्यालाच आहे. इ. स. ५२३ मध्ये थीओडोरा नावाच्या एके काळच्या नटीशी त्याने विवाह केला. १ ऑगस्ट ५२७ रोजी जस्टिन वारल्यानंतर तो गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत ग्रीन व ब्ल्यू पक्षांच्या भांडणामुळे कॉन्स्टँटिनोपलचा बराच मोठा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

जस्टिनिअन ख्रिस्ती होता. त्याने रोमन साम्राज्यात ख्रिस्ती हा एकच धर्म असावा म्हणून प्रयत्न केला व शासन कार्यक्षम करून उद्योगधंद्यास उत्तेजन दिले. रेशमी किडे त्याने प्रथमच आयात केले. त्याने अनेक सार्वजनिक इमारती, कालवे व पूल बांधले व भूकंपाने उद्‌ ध्वस्त झालेली शहरे पुन्हा वसविली. कॉन्स्टँटिनोपलमधील हॅगिओ सोफिया हे त्याने बांधलेले चर्च तर कलाकृतीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. लोकांना सुलभ व लवकर न्याय मिळावा म्हणून त्याने प्रांतात जादा पुनर्विचार न्यायालये स्थापन केली. ट्रिबोनिअनच्या नेतृत्वाखाली दहा विद्वानांचा आयोग नेमून रोमन कायद्याची कॉर्पस ज्युरिस सिव्हिलिस(जस्टिनिअन कोड) नावाची संहिता तयार करण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य त्याने केले. उ. आफ्रिका, इटली इ. प्रदेश त्याने परत मिळविले. अत्यंत विद्वान, हुशार, विद्येचा पुरस्कर्ता, योजक, अविश्रांत उद्योगी म्हणून त्याची ख्याती आहे. जनतेवर लादलेल्या भरमसाट करांमुळे मात्र तो लोकप्रिय होऊ शकला नाही.

खोडवे, अच्युत