जलोढ : जलोढ म्हणजे पाण्याने (नद्यांनी) वाहून आणलेला गाळ. यात नद्यांनी वाहून आणलेला बारीक कणांचा गाळ, चिखल, रेती, खडकांचा भुगा आणि पाण्याबरोबर तरंगत आलेले पदार्थ या सर्वांचा समावेश असतो. जलोढ प्रदेश सर्वसाधारणपणे सपाट असतात. नद्यांच्या शेवटच्या टप्प्यात नद्या जेथे सागरास मिळतात तेथे आणि नद्यांच्या काठांवर तसेच नदी एखाद्या सरोवरास मिळते तेथेही जलोढ प्रदेश निर्माण होतात. नाईल, गंगा, मिसिसिपी, ह्‌वांग-हो, इरावती, ब्रह्मपुत्रा इ. नद्यांनी आपल्या काठांवर आणि त्रिभुज प्रदेशांत विस्तृत जलोढ-प्रदेश निर्माण केले आहेत. जलोढातील गाळाच्या कणांचे सूक्ष्मतर कणांत रूपांतर होऊन माती बनते. गाळात पाण्याबरोबर वाहून आलेले सेंद्रिय पदार्थ मिसळलेले असल्यामुळे ती माती अधिक सुपीक बनते.

सागरी लाटांमुळे निर्माण झालेल्या जलोढास सागरी जलोढ म्हणतात. असे जलोढ भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आढळतात.

नद्यांच्या काठी, पूरमैदानांत, त्रिभुज प्रदेशांत जलोढ साठवले गेले म्हणजे त्या प्रदेशांना जलोढ मैदान म्हणतात.

डोंगराळ भागातून वाहत येणाऱ्या नद्या ज्या ठिकाणी अधिक विस्तृत अशा दरीत प्रवेश करतात तेथे व त्या सपाट मैदानी भागात प्रवेश करतात तेथे पंख्याच्या आकाराचे जलोढ प्रदेश तयार होतात. विशेषतः कोरड्या हवामानाच्या प्रदेशात या जलोढांच्या निर्मितीस पूरक स्थिती असते. उंचावरून येणाऱ्या नद्या भरपूर गाळ वाहून आणतात. त्या अधिक मोकळ्या भागात आल्यावर कोरड्या पडल्यामुळे जलोढाचे संचयन होऊन पंख्याच्या आकाराचे जलोढ प्रदेश तयार होतात. एकमेकींशेजारी असलेल्या नद्यांनी निर्माण केलेले पंख्याच्या आकाराचे जलोढ विभाग रुंदावत जाऊन सलग अशा गिरिपद मैदानाची निर्मिती होते. असे जलोढ शेतीस उपयुक्त असतात.

पंख्याच्या आकाराच्या जलोढांमध्ये गाळाचे थर अधिक जाडीचे असले आणि उतारही बराच असला म्हणजे जलोढ-शंकू निर्माण होतात. डोंगरपायथ्याशी नद्यांचे पाणी जलद गतीने जमिनीत मुरून गेल्यास किंवा त्या पाण्याचे जलद बाष्पीभवन झाल्यासही गाळाचे संचयन होऊन जलोढ-शंकू तयार होतात.

नद्यांच्या काठांवरील कुरणे बहुधा जलोढाच्या पट्ट्यातच असतात. पुराच्या वेळी या कुरणांना जलोढांचा पुरवठा होतो. नद्यांच्या काठी कमीअधिक उंचीवर वारंवार जलोढ पसरले जाऊन पायऱ्यांची निर्मिती होते. नद्यांच्या मार्गांत अडथळे येऊन पुराचे पाणी आजूबाजूच्या प्रदेशात पसरल्यामुळेही जलोढ प्रदेश निर्माण होतात. नद्यांच्या काठांवर पाण्याच्या खननाच्या पातळीपर्यंत जलोढ प्रदेशाचा विस्तार असतो, तसेच नद्यांच्या वळणांच्या अंतर्वक्र भागावरही जलोढ पसरले जातात.

जलोढांना आर्थिक दृष्ट्या फार महत्त्व आहे. नद्यांच्या पूरमैदानातील व त्यांच्या त्रिभुज प्रदेशातील जलोढांत चांगली पिके होतात. काही जलोढांतून सोने, प्लॅटिनम, कथिल, हिरे इ. पदार्थांचे कण सापडतात. ब्राझीलमध्ये जलोढांतून सापडलेल्या हिऱ्यांच्या कणांमुळे हिऱ्याच्या खाणीचा शोध लागला. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथील काही नद्यांच्या जलोढांतून सोन्यासारख्या मौल्यवान खनिजाचे कण वाहून  आणले जातात. ऑरेंज नदीच्या पायऱ्यांच्या जलोढात हिऱ्याचे कण सापडतात. मलायात कथिलाचे खनिज नद्यांच्या जलोढांत सापडते.

क्षीरसागर, सुधा