जर  कलाबतू : चांदीची पातळ व पसरट तार रेशमी, कृत्रिम रेशमी वा सूती धाग्यावर गुंडाळून तयार करण्यात येणाऱ्या धाग्याला ‘चांदीची जर’ किंवा ‘कलाबतू’ असे म्हणतात. ती नम्य (लवचिक) व चकचकीत असून वस्त्रांमध्ये विणता येते. चांदीच्या तारेवर सोन्याचे पाणी देऊन किंवा रासायनिक प्रक्रियेने ‘सोनेरी जर’ तयार करतात. नकली जर तांब्याच्या अथवा पितळेच्या तारेपासून तयार करतात. जर व कलाबतू यांचा उपयोग वस्त्रे विणण्यासाठी व भरतकामासाठी प्रामुख्याने करण्यात येतो.

इतिहास : या कलेचा उगम भारतातच झाला असावा असे मत आहे.  ‘जर’ तयार करण्याची कला आर्यांना माहीत होती. ऋग्वेदात (१०·१५५, ६) ‘हिरण्मयानत्कान’ असा सोनेरी वस्त्रांसंबंधी आणि यजुर्वेदात ‘पेशस्कारी’ म्हणजे ‘जरीची वेलबुट्टी काढणारी स्त्री’ असे उल्लेख आढळतात. ऋग्वेदात पेशस्, पेशन या जरीच्या वस्त्रांचा उल्लेख आढळतो. शुक्रनीतिकारांनी जरीची कला ही चौसष्ट कलांत गणली आहे. रुद्रयामल तंत्रात धातुकल्पामध्ये या कलेचे सविस्तर वर्णन केलेले आहे. तथापि या ग्रंथाचा काळ निश्चित नाही. तसेच महाभारतातही जरीच्या वस्त्रांचा उल्लेख आढळतो. संस्कृतेतर वाङ्‌मयांत जरीचा इतका जुना उल्लेख आढळत नाही, म्हणून ही कला भारतातून मध्य-पूर्व आशियामार्गे यूरोपात आली असावी, असे पाश्चात्त्यांचे मत आहे.

यानंतरचा इतिहास व कलेची प्रगती कशीकशी होत गेली, याबद्दल माहिती उपलब्ध नाही. तरीपण आठव्या-नवव्या शतकात बनारस व पैठण ही शहरे या धंद्यासाठी प्रसिद्ध होती. मुसलमानी अंमलात या

शहरांचे महत्त्व कमी झाले. तथापि त्यांच्या काळात या कलेला उत्तेजनच मिळाले व दिल्ली, लखनौ, कानपूर, बऱ्हाणपूर, बीड, जालना, येवले, सालेम, मदुरा, मद्रास इ. नवीन पेठा तयार झाल्या.

बायबलच्या जुना करारात जरीसंबंधी उल्लेख आढळतो. इलिअड  व ओडिसी   या ग्रीक महाकाव्यांतही जरीच्या वस्त्रांचा उल्लेख आढळतो. ॲसिरिया, बॅबिलोनिया इ. प्रदेशांतील लोकांमध्ये ही कला लोकप्रिय होती. त्यानंतर पर्शियन आणि नंतर ग्रीक लोकांनी या कलेला उत्तेजन दिले. प्लिनी यांच्या ग्रंथात त्यासंबंधी उल्लेख आढळतात. रोमन ग्रंथांतही या वस्त्रांचा उल्लेख आढळतो. ईजिप्त व बॅबिलोनिया येथील थडग्यांत जरीची वस्त्रे सापडली आहेत. मध्ययुगात यूरोपात कॉन्स्टँटिनोपल आणि पालेर्मो येथे जरीची वस्त्रे तयार करीत असत. यानंतर स्पेनमधील मूर लोकांमध्ये बाराव्या शतकात या कलेचा प्रसार झाला. त्यानंतर सायप्रसमध्ये मोठ्या प्रमाणावर व नंतर हळूहळू इटलीत जर तयार होऊ लागली. चौदाव्या शतकानंतर इटली जरनिर्मितीत अग्रेसर होता. त्यानंतर जर्मनीतील न्यूरेंबर्ग येथे जरनिर्मिती होऊ लागली. पोलादी पट्टीतील छेदातून चांदीची तार ओढून बारीक करण्याच्या कृतीचा व साधनाचा (जंत्राचा) शोध न्यूरेंबर्ग येथेच चौदाव्या शतकात लागला असावा, असे तज्ञांचे मत आहे.

कच्चा माल  निर्मिती : सोने, चांदी, तांबे व पितळ यांच्या अतिशय बारीक तारा हे पदार्थ जरनिर्मितीतील प्रमुख कच्चा माल होत. यांशिवाय उत्कृष्ट प्रतीचा रेशमी धागा, विशिष्ट जाडीचा रेयॉन धागा व सुती धागा यांचाही जरनिर्मितीत वापर केला जातो.

पूर्वी खरी जर उष्ण विलेपन (तापवून लेप देण्याच्या) प्रक्रियेने तयार करीत. विद्युत् विलेपनाने (विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने लेप देण्याच्या प्रक्रियेने) तयार केलेल्या जरीपेक्षा ही जर टिकाऊ असते व तिच्यावर ओरखडे उठत नाहीत. चांदीमध्ये २-४ टक्के तांबे मिसळून ३०-३४ सेंमी. लांब, ५ सेंमी. व्यासाचे गज तयार करतात आणि ठोकून त्यांना दंडगोल आकार देऊन दोन्ही टोके निमुळती करतात. ते सुवर्णपर्णात गुंडाळून जवळजवळ दोन्ही वितळेपर्यंत तापवितात. विलेपित गज गुळगुळीत जेडने (एक प्रकारच्या हिरव्या खनिज पदार्थाने) घासतात व थंड होऊ देतात.

सुवर्णविलेपित चांदीच्या गजाचे एक टोक पकडीच्या (क्लँपच्या) साहाय्याने पकडलेल्या पोलादी पट्टीच्या छिद्रात घालतात व लाकडी रहाटासारख्या साधनाच्या मदतीने बाहेर ओढून काढतात. पुनःपुन्हा अधिकाधिक लहान छिद्रातून तार ओढून काढतात. या कामात मेणाचा वंगण म्हणून उपयोग करतात. १२ ग्रॅम वजनाची ११ मी. लांबीची तार होईपर्यंत वरीलप्रमाणे तार ओढून काढतात. या कामाला एक ओढणारा व दुसरा तार आत घालणारा असे दोन मजूर लागतात. तार आत घालणारा तार गरम ठेवतो व तिला मेण लावतो. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या दोन रुळांमध्ये ठेवलेल्या छिद्रयुक्त पोलादी थाळीतून ओढून मग ही तार आणखी बारीक करतात. तार मोठ्या रुळाला गुंडाळतात, एक टोक थाळीमधून जाऊन लहान रुळावर पक्के केलेले असते व ते फिरवितात. सर्व तार काढून झाल्यावर पहिली थाळी काढून लहान छिद्रांची दुसरी थाळी बसवितात व उलट्या दिशेने तार ओढतात. जरूर तेवढी बारीक तार निघेपर्यंत वरील प्रक्रिया करतात. काही निर्मितिकेंद्रात पोलादी थाळीऐवजी पितळी थाळी वापरतात. त्यांच्या छिद्रात रत्नाचे खडे बसविलेले असतात. पट्टीचे नुकसान न होता तार तयार करण्याची पद्धती अजून तरी उपलब्ध झालेली नाही. अंगमेहनतीमुळे जरीच्या उत्पादनाची किंमत वाढते. केसासारखी बारीक तार उत्तम गुळगुळीत केलेल्या बहिर्वक्र ऐरणीवर गुळगुळीत केलेल्या बहिर्वक्र हातोडीने ठोकून पसरट करतात.

ही पसरट तार रेशमी किंवा सुती धाग्यावर गुंडाळतात. सामान्यतः जरीसाठी नारिंगी रेशमी धागा वापरतात व कलाबतूसाठी पांढरा रेशमी धागा वापरतात. छतामध्ये एक आकडा बसवून त्यापासून धागा लोंबता सोडतात व तारेचे एक टोक धाग्याला जोडून ती बाजू कामगार आपल्या हातात धरतो. टकळी फिरवून कामगार धाग्यावर तार गुंडाळतो.


मोठ्या कारखान्यात तार काढणे, ती पसरट करणे व ती धाग्यावर गुंडाळणे ही कामे विजेवर चालणाऱ्या यंत्रांनी केली जातात. ग्रॅफाइटाच्या मुशीत चांदी वितळवून व पोलादी साच्यात ओतून ३७·५ सेंमी. लांबीचे चांदीचे गज बनवितात. त्यांची ताकद व नम्यता वाढावी म्हणून तीत ०·५ टक्का तांबे मिसळतात. ते यांत्रिक हातोड्याने ठोकून ११२·५ सेंमी. लांब व १·२५ सेंमी. व्यासाचे दंडगोल बनवितात व हाताने यंत्र चालवून त्यांची टोके निमुळती करतात. शक्तीवर चालणाऱ्या फिरत्या चक्कीमधून ते पाठवून त्यांचे ०·६ ते ०·९७ सेंमी. व्यासाचे दंड बनवितात. ह्या दंडांची पोलादी मुद्रांनी भरड तार काढतात. तिच्या १२ ग्रॅमची लांबी ४·८ मी. भरते. मेणाचा वंगण म्हणून उपयोग करतात. तिसऱ्या वा चौथ्या काढणीला तार लाकडी गाभ्याच्या रिळावर गुंडाळतात व कोळशाच्या उष्ण राखेच्या भट्टीत तिचे १५–३० मिनिटे मंद शीतन करतात.

भरड तारेचे मंद शीतन केल्यावर ती पितळी रिळावर गुंडाळतात. मृदू साबणाचे पाणी, तेल व मेण यांचे मिश्रण किंवा तेल आणि साबण यांचे पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण) यांनी भरलेल्या भांड्यात रिळे ठेवतात आणि मग हिऱ्याच्या निरनिराळ्या मुद्रांनी पुनःपुन्हा तार काढून ती एवढी बारीक करतात की, १२ ग्रॅम वजनाची तार सु. २४४ मी. लांब भरते. अगदी बारीक जरीची तार काढण्यासाठी ‘७ पी’ थाळी व कलाबतूसाठी ‘८ पी’ थाळी वापरतात. त्याच्यापेक्षा बारीक तार न तुटता काढता येत नाही. ७ पी थाळीने काढलेली तार सुती धाग्यावर गुंडाळतात व ८ पी थाळीने काढलेली तार रेशमी धाग्यावर गुंडाळतात. बारीक तार दोन थोड्या ओल्या केलेल्या शमाय चामड्याच्या तुकड्यांमधून पाठवून व मग खूप वेगाने फिरणाऱ्या चक्कीच्या गुळगुळीत केलेल्या दोन रुळांमधून पाठवून पसरट करतात. अशा तारेला उत्तम चमक असते.

तार रिळावर गोळा करून सुती किंवा रेशमी धाग्यावर यांत्रिक चात्यांनी गुंडाळतात. गुंडाळी यंत्राच्या मागे रंगविलेला रेशमी धागा भरलेले लाकडी रीळ ठेवलेले असते. चातीच्या छिद्रातून धागा जातो व पुढच्या बाजूला बसविलेल्या लाकडी रिळावरून पुढे काढला जातो. धागा भरलेले लाकडी रीळ जोरात फिरणाऱ्या चातीवर सैल ठेवलेले असते. त्या चातीला धोटा जोडलेला असतो. त्यामुळे रिळावरून धागा सुटण्यास मदत होते. धोटा जोरात फिरतो व रेशमावर धागा एकसारखा गुंडाळला जातो. धागा गुंडाळणाऱ्या यंत्रात ३०–५० चात्या असतात व एखादा धागा तुटला, तरी त्याकडे लक्ष देण्याची स्वयंचलित रचना असते.

विद्युत् विलेपन कुंडामध्ये चांदीच्या तारेला सोन्याचे पाणी देतात. धाग्याची गती, तापमान, कुंडातील द्रव्याची संहती (विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण) व विद्युत् प्रवाहाची तीव्रता यांवर नियंत्रण ठेवून निक्षेपणाचा (लेपनाचा) एकसारखेपणा व विशिष्ट छटा मिळवितात. चांदीची तार सहा बश्यां‌च्या गटातून जाते. पहिल्या बशीत वाळू व सोडियम कार्बोनेटाचा तीव्र विद्राव असतो. त्यामधून तार गेली असता ती स्वच्छ होते. दुसऱ्या बशीत ऊर्ध्वपातित (वाफ करून व मग ती थंड करून मिळविलेल्या) पाण्याने ती धुतली जाते. सोने व पोटॅशियम यांचे दुहेरी सायनाइड असलेल्या तिसऱ्या बशीत विलेपन होते. उरलेल्या बश्यांमध्ये विलेपित तार स्वच्छ होते आणि धुतली जाते. त्यांत अनुक्रमे क्षाराच्या (अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देणाऱ्या पदार्थाच्या, अल्कलीच्या) अल्पांशाचे ⇨उदासिनीकरण  करण्यासाठी विरल ॲसिटिक अम्ल, रिठ्याचा अर्क, बारीक वाळू व उर्ध्वपातित पाणी असते. पहिल्या व तिसऱ्या बश्यांचे तापमान विद्युत् तापनाने नियंत्रित करतात. शेवटच्या बशीतून बाहेर येणारी विद्युत् विलेपित तार हवेच्या उष्ण प्रवाहाने सुकविली जाते आणि रिळावर गुंडाळली जाते. उष्ण विलेपनापेक्षा विद्युत् विलेपन स्वस्त असते. कारण त्यामध्ये तारेच्या उघड्या भागावर विलेपन होते, तर उष्ण विलेपनात तारेच्या दोन्ही बाजूंवर विलेपन होते. विद्युत् विलेपित तारेत कमाल सु. १·५ टक्का सोने असते, तर उष्ण विलेपित तारेत ६ टक्के सोने असते.

निरनिराळ्या आकारमानांत जरीची निर्मिती केली जाते. साधारणतः प्रत्येक २८ ग्रॅममध्ये सु. १,१०० ते २,३०० मी. लांब तार मावेल अशा आकारमानात जर तयार करण्यात येते. २८ ग्रॅममध्ये किती लांब जर आहे, यावरून त्यांच्या आकारमानांचे क्रमांक देतात. एका गुंडाळीचे २८ ग्रॅम वजन असलेल्या व अशा आठ गुंडाळ्या असलेल्या पाकिटांमधून (मार्कमधून) सोन्या-चांदीची जर आणि २८ ग्रॅमच्या रिळाच्या स्वरूपात चांदीची तार बाजारात मिळते. 

खरी जर बहुधा काळी पडत नाही. ती जाळल्यास पांढरी पडते. तिचा कस पांढरा दिसतो.

नकली जर नकली जर तयार करण्यासाठी तांब्याची व पितळेची तार मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. खरी जर तयार करण्याच्या प्रक्रियेनेच नकली जर तयार करण्यात येते. सर्वसाधारणतः ३० एसडब्ल्यूजी (स्टँडर्ड वायर गेज, प्रमाणित जाडीची तार) तांब्याच्या सर्पिल तारेवर स्थिर कुंडात सोन्या-चांदीचे विद्युत् विलेपन करतात. विलेपित तार धुवून अखंड यंत्रातून पुन्हा काढून हवी तेवढी बारीक व पसरट करुन सुती धाग्यावर गुंडाळतात. नकली सोन्याची तार तयार करण्यासाठी चांदीच्या तारेवर पितळेचे गिलीट करतात किंवा लॅकर व्हार्निशाचा सोनेरी रंग देतात.

नकली जर तयार करण्यासाठी लोखंड, जर्मन सिल्व्हर इत्यादींचा वापर करण्यात येतो. नकली जर लवकर काळी पडते. जाळली असता ती काळी पडते. तिचा कस लाल दिसतो. हल्ली ‘प्लॅस्टिक जर’ या नावाने ओळखण्यात येणारी नकली जर तयार करण्यात येते.

भारतीय उद्योग : जरीच्या उद्योगाची सुरुवात भारतातच झाली असावी, असे मानले जाते. मोगल काळात या धंद्याला ऊर्जितावस्था आली व त्या काळात तयार होणारी जरदोझी, कलाबतू, कशिदा व कालघाई ही वस्त्रे भारतात व परदेशी लोकप्रिय होती. ही वस्त्रे इटली, जर्मनी व फ्रान्स या देशांना निर्यात करण्यात येत होती.


 विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समधून आयात होणाऱ्या जरीमुळे भारतीय धंद्याला उतरती कळा आली. पहिल्या महायुद्धामुळे आयात बंद झाली व धंदा थोडाफार सावरला गेला पण युद्ध थांबल्यानंतर मात्र परत आयात सुरू झाली म्हणून १९२२ मध्ये चांदीची तार व तत्सम मालाच्या आयातीवर ३०% आयात कर बसविण्यात आला, त्यामुळे परकीय मालाच्या स्पर्धेत हा धंदा थोडाफार टिकू शकला. याच वेळी त्या वेळच्या मुंबई सरकारच्या मदतीमुळे उत्पादन पद्धतीत सुधारणा झाल्या व परंपरागत चालत आलेल्या उष्ण विलेपन पद्धतीऐवजी विद्युत् विलेपन पद्धतीचा वापर जरनिर्मितीत करण्यात येऊ लागला. त्यामुळे उत्तर भारताची जरीची मागणी पुरविणे शक्य झाले.

इ. स. १९३१ मध्ये सरकारने आयात कर ५०% पर्यंत वाढविला. यामुळे उत्तर भारताबरोबरच दक्षिण भारताची गरज देशी उत्पादनामुळे भागू लागली. दुसऱ्या महायुद्धामुळे जरीची आयात पूर्णपणे बंद झाली.

भारतात हा धंदा सुरत व बनारस येथे मोठ्या प्रमाणावर चालतो. यांशिवाय दिल्ली, जलंदर, अजमेर व बंगलोर येथेही थोड्या प्रमाणात हा धंदा चालतो.

सुरतेत हा धंदा मोठ्या प्रमाणावर व चांगल्या संघटित रीतीने चालतो. जर तयार करण्याच्या सर्व प्रक्रिया असणारे फारच थोडे कारखाने सुरतेत असून इतर कारखान्यांतून विशिष्ट प्रक्रियाच करण्यात येत असत. येथील कारागीर तीन प्रकारचे आहेत. काही यंत्रमालक असून कच्चा माल विकत घेऊन पक्का माल विकणारे, तर काही यंत्रमालक असून कच्चा माल पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांकरिताच निर्मिती करणारे, तर काही व्यापाऱ्यांच्या कारखान्यात काम करणारे आहेत. १९५५ साली सुरतेत सु. ५०० पेक्षा जास्त कारखाने खरी जर व सु. १,००० पेक्षा जास्त कारखाने नकली जर तयार करीत होते व या सर्वांत मिळून सु. २५,००० पूर्ण वेळ आणि सु. ३,००० अर्ध वेळ कामगार काम करीत होते.

बनारसमधील धंदा हा कुटिरोद्योग स्वरूपाचा असून प्रत्येक कारखान्यातून एक-दोन प्रक्रिया करण्यात येतात. कच्चा माल व्यापारी पुरवितात. तेथे १९५५ साली सु. २५० कारखाने होते आणि त्यांत सु. २,५०० लोक काम करीत होते.

सोन्या-चांदीच्या नकली जरनिर्मितीबद्दल दिल्ली प्रसिद्ध आहे. १९१४ पर्यंत तेथे हातानेच जरनिर्मिती करण्यात येत असे. सुरतेला यंत्रांचा वापर सुरू झाल्यापासून दिल्लीला नकली जर मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येऊ लागली. यासाठी लागणारी यंत्रे फ्रान्स व जर्मनी येथून मागविण्यात आली.

जरनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालापैकी सोने व चांदी देशातच उपलब्ध होतात. तांब्याची तार अमेरिकेहून आयात करण्यात येत असे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ती जपान व जर्मनीमधून आयात होत असे. जरनिर्मितीसाठी लागणारे रेशीम, रेयॉन आणि सुती धागा देशातच उपलब्ध आहे. जरनिर्मितीसाठी लागणाऱ्या मुद्रा माणकाच्या व हिऱ्याच्या करतात आणि त्या सुरत व बनारस येथे तयार होतात. मंदुरोला चांदीची पिवळी तार हळदीचा वापर करून हाताने तयार करण्यात येते व मग ती रंगविलेल्या सुती धाग्यावर गुंडाळली जाते.

भारतात तयार होणाऱ्या जरीचा दर्जा आयात करण्यात येणाऱ्या जरीइतकाच उत्कृष्ट असतो.

जमदाडे, ज. वि.