जम्मू व काश्मीर : भारताचे सर्वांत उत्तरेकडील राज्य. क्षेत्रफळ २,२२,२३६ चौ. किमी. पैकी सु. ७८,२१८ चौ. किमी. पाकिस्तानव्याप्त व सु. ४८,७३५ चौ. किमी. चीनव्याप्त. लोकसंख्या पाकव्याप्त व चीनव्याप्त सोडून ४६,१६,६१२ (१९७१). ३२°१०′ उ. ते ३७° १०′ उ. व ७२°३०′ पू. ते ८० ° ३०′ पू. यांदरम्यान असून दक्षिणोत्तर विस्तार सु. ६४० किमी. व पूर्वपश्चिम विस्तार सु. ४८० किमी. आहे. याच्या सीमांवर पूर्वेस तिबेट, ईशान्येस सिंक्यांग, उत्तरेस सिंक्यांग व अफगाणिस्तान, पश्चिमेस पाकिस्तान आणि दक्षिणेस पंजाब व हिमाचल प्रदेश ही राज्ये आहेत. या अधिकृत सीमांवर पश्चिमेकडून आणि वायव्येकडून १९४७ साली झालेल्या पाकिस्तानच्या आक्रमणानंतर १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाकडे काश्मीर तंटा गेला व १९४९ पासून जी युद्धबंदी रेषा ठरली, ती पश्चिम सीमेच्या आत दक्षिणेच्या मीरपूर जिल्ह्यापासून उत्तरेकडे मुझफरपूर जिल्ह्याच्या मध्यापर्यंत व तेथून पूर्वेस लडाखच्या सीमेपर्यंत जाते. या रेषेच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील प्रदेश पाकच्या ताब्यात असून उरलेला काश्मीर भारतात, त्यातही १९६२ मध्ये चीनने ईशान्य भागावर आक्रमण करून सु. ४२·७३५ चौ. किमी. प्रदेश बळकावला आहे.
भूवर्णन : एखाद्या अनेक मजली घराप्रमाणे काश्मीरची भूमी दक्षिणेकडून उत्तरेकडे पायऱ्या पायऱ्यांनी चढत गेली आहे असे पुष्कळदा म्हटले जाते. मात्र एका मजल्यावरून त्याच्या वरच्या मजल्यावर जाताना प्रथम खाली उतरून मग तो वरचा मजला चढावा लागतो, हे या घराचे वैशिष्ट्य आहे. जम्मूच्या सपाट भूमीवर या घराचा दरवाजा आहे असे मानले, तर त्याच्या उत्तरेस शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याचा ‘कंडी’ नावाचा निर्जल, दगडधोंड्यांचा प्रदेश म्हणजे घराचे जोते व मग शिवालिक किंवा जम्मू व पूंछ टेकड्या, मग हिमाचल किंवा मध्य हिमालय (इं. लेसर हिमालय) त्याच्या धौलधार व पीर पंजाल शाखा, त्यानंतर हिमाद्री (इं. ग्रेटर हिमालय) या दोहोंच्या दरम्यान सुप्रसिद्ध काश्मीरची दरी, हिमाद्रीतील नंगापर्वत, त्यापलीकडे देवसई व झास्कर पर्वंतांची रांग व त्याच्याही पलीकडे लडाख पर्वतरांग व मग उत्तुंग काराकोरम पर्वत असे हे मजल्यावर मजले आहेत. उत्तरेकडील अफगाण सीमेवर हिंदुकुशमधील मिंटका खिंड ही जणू काही त्यापलीकडील पामीरच्या पठाराकडे पहावयाची खिडकीच आहे. या मजल्या-मजल्यांदरम्यान चिनाब, झेलम, सिंधू व तिची मोठी उपनदी श्योक व इतर लहानमोठ्या नद्या व प्रवाह यांच्या दऱ्या व खोरी आहेत. जम्मू व काश्मीरची उत्तुंग पर्वतशिखरे, पर्वतरांगा, पठारे, दऱ्याखोरी, त्यांमधील छोटे छोटे मैदानी प्रदेश, हिमनद्या, नद्या यांनी भरलेल्या अत्यंत डोंगराळ, अरण्यमय व दुर्गम प्रदेशाचे हे अगदी स्थूल स्वरूप आहे.
जम्मू व काश्मीर राज्याच्या ईशान्येस भारतातील सर्वांत जास्त सु. ५,३०० मी. उंचीचे लडाख पठार आहे. हे इतके रुक्ष आहे, की भटके लोकही त्याच्याकडे फिरकत नाहीत. तेथील ५,८००मी. उंचीपर्यंतच्या भागात निदान तीन स्थलीप्राय प्रदेशांचे अवशेष दिसतात. चांगचेन्मो रांगेने या पठाराचे दोन स्पष्ट भाग झाले आहेत. उत्तर भागात चांगचेन्मो या पश्चिमवाहिनी नदीचे सपाट तळाचे खोरे व अनेक उष्णोदकाचे झरे आहेत. या भागात अनेक खाऱ्या पाण्याची सरोवरे व अंतर्देशीय जलोत्सरणाचे खोलगट भाग आहेत. पठार अनेक सपाट्या व डोंगर यांत विच्छिन्न झाले असून त्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे सोड मैदान, अक्साई चीन, लोकझुंग पर्वत, लिंगझिटांग मैदान हे विभाग असून पूर्वीच्या हिमानी क्रियेचे स्पष्ट अवशेष दिसून येतात. सोड मैदानावरील पाणी करकाश नदी उत्तरेकडे वाहून नेते.
लडाख पठाराच्या दक्षिण कोपऱ्यात पंगाँग हे क्षारोदकाचे सरोवर असून त्याच्या दक्षिणेस चुशूल येथे भारतीय संरक्षक सैन्याची एक तुकडी ठेवलेली आहे. राज्याच्या वायव्य भागाकडे पंगाँगपासून गिलगिट बल्टिस्तानपर्यंत प्रथम पंगाँग पर्वत व नंतर उत्तुंग कराकोरम पर्वत गेलेला आहे. काराकोरमच्या उत्तरेस अघिल पर्वतश्रेणी अगदी सीमेवर आहे. पंगाँग व काराकोरम या दोहोंच्यामधून उत्तर सीमेवरील शक्सगम खिंड व देपसंग मैदान यांकडून आलेली सिंधूची उपनदी श्योक आपला वायव्य-आग्नेय मार्ग बदलून काराकोरमच्या पश्चिमेकडून अगदी उत्तर दिशेने वाहत जाते. तिला काराकोरममधून नुब्रा व इतर अनेक नद्या येऊन मिळतात. काराकोरम म्हणजेच कृष्णगिरी. हा उत्तुंग गिरिशिखरे व हिस्पार, सिमो, बिआरी, बलतोरो, सिअचेन यांसारखे प्रचंड हिमनद यांसाठी प्रसिद्ध आहे. सिअचेनमधून नुब्रा नदी निघते, तर सिमो हिमनदीपासून यार्कंद व श्योक या दोन्ही नद्यांना पाणी मिळते. मौंट गॉडविन ऑस्टिन ऊर्फ के-टू हे एव्हरेस्टच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर ८,६११ मी.हिडन ८,०६८ मी. ब्रॉड ८,०४७ मी. व गाशेरब्रुम-२-८,०३५ मी. ही जगातील चौदा ‘आठ हजारी’ शिखरांपैकी चार शिखरे तसेच रकपोशी ७,७८८ मी. हारमोश ७,३०७ मी. मशेरब्रुम ७,८२१ मी. दीसोघील ७,८८६ मी. यांसारखी उत्तुंग शिखरे काराकोरममध्ये आहेत. काराकोरमचे दृश्य सामान्यतः स्टेप प्रदेशासारखे किंवा मरुभूमिसदृश आहे. काही दऱ्याखोऱ्यातून पाणीपुरवठा असेल, तर मात्र सुंदर फळबागांचे मनोरम दृश्य मरुद्यानांसारखे दिसते. ब्राल्डू खोऱ्यातील आश्कोल हे यांपैकी काराकोरममधील सर्वांत जास्त उंचीवरील वस्तीचे ठिकाण आहे. काराकोरममध्ये सासेर-५,३३५ मी. व अघिल पर्वतश्रेणीमधील काराकोरम -५,५८० मी. या खिंडीतून सिंक्यांगमध्ये जाण्यास वाट आहे. ती लडाख श्रेणीतील ५,६०२ मी. उंचीच्या खारडाँग खिंडीतून आलेली आहे. या जगातील सर्वांत जास्त उंचीवरील खिंडी आहेत.
राज्याच्या अगदी आग्नेय सीमेवरील डेमचोकपासून अगदीवायव्यसीमेवरील थूइआन खिंडीपर्यंत एक सरळ रेषा मानली, तर तिचा सु. ६५० किमी. लांबीचा ७५% भाग सिंधू नदीने व्यापलेला आहे. तिबेटमध्ये गारटांग नदी मिळाल्यानंतर डेमचोकच्या आग्नेयीस सिंधू जम्मू-काश्मीरमध्ये शिरते. सु.१०० किमी. गेल्यावर ती एकदम काटकोनात वळून थांगरा येथे लडाख पर्वतश्रेणी भेदून गेल्यावर लडाख वझास्कर पर्वतश्रेणींमधील अरुंद खोऱ्यातून पुन्हा वायव्येकडे वाहू लागते. येथील सुरुवातीचा रुप्शू विभाग लडाख पठाराप्रमाणे उंच – ४,११५ मी. व रुक्ष असून त्यात त्सोमोरीरी हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. लेहजवळून गेल्यावर सिंधूला डावीकडून हिमाद्रीतून आलेल्या झास्कर व त्यानंतर द्रास या नद्या मिळतात व पुढे उजवीकडून श्योक मिळते. तेथे खार्टाक्शो येथे ती पुन्हा झास्कर पर्वताला भेदून पलीकडे जाते. वरील दोन भेदस्थानांमधील लडाख पर्वत हा सु. ३०० किमी. अगदी सरळ गेला असून त्याच्या दोन्ही बाजूंस सु. ४०-५० किमी. अंतरावरून सिंधू व श्योक वाहतात व त्यांच्या दरम्यान लडाख पर्वत ५,७९० मी. पर्यंत उंच जातो. त्याचा उत्तर उतार सौम्य असून त्यावर पूर्वीच्या हिमानी क्रियांचे, त्यांदरम्यानच्या उत्थापनाचे क्षरण पातळ्यांचे पुरावे आढळून येतात. स्कार्डूजवळ सिंधूला उत्तर शिगार नदी मिळते. डेमचोक ते हारमोश शिखराच्या पायथ्यापर्यंतच्या ५६० किमी. लांबीच्या सिंधूच्या प्रवाहाच्या उजव्या बाजूस ग्रॅनाइटी व डाव्या बाजूस तृतीयकालीन वालुकाश्म आणि शेल आहेत. हारमोश शिखराच्या डावीकडे सिंधू तिसऱ्यांदा लडाख पर्वत भेदून देवसई पर्वताला वळसा घालून एकदम दक्षिणेकडे वळून, बुंजीजवळ ५,२०० मी. खोलीच्या एका भयंकर खोल घळईतून वाहू लागते. नंगापर्वताच्या वायव्येकडून आणखी ९० किमी. जाऊन मग ती पाकिस्तानात शिरते. येथील तिच्या उत्तर-दक्षिण मार्गात तिला उजवीकडून गिलगिट आणि डावीकडून अस्तोर या नद्या मिळतात.
उत्तर शिगार आणि नुब्रा या नद्यांदरम्यानचा बल्टिस्तान व राज्याच्या अगदी वायव्येकडील गिलगिट हे प्रदेश अत्यंत डोंगराळ, उंच गिरिशिखरे व २,५०० ते ३,०००मी. उंचीवरील दऱ्याखोरी यांनी भरलेले, दुर्गम व हुंझा, नगिर, गिलगिट, यासीन यांसारख्या अलग अलग वस्तीच्या विभागांनी युक्त आहेत. गिलगिट-अफगाण सीमेवर हिंदुकुशमधील ४,७५५ मी. उंचीवरील मिंटाका खिंड आहे.
हिमाद्री (ग्रेटर हिमालय) ची सुरुवात काश्मीरमध्ये नंगापर्वतापासून होते. हा ८,१२६ मी. उंचीचा प्रचंड गिरिपिंड मुख्य रांगेपासून किशनगंगा व अस्तोर नद्यांच्या खोऱ्यामुळे आणि त्यांमधील बुर्झिल खिंडीमुळे काहीसा अलग दिसतो. नंगापर्वताचा गाभा ग्रॅनाइटी असून त्यावर अल्गाँक्वियन काळातील गाळखडकांचे थर आहेत. येथून वायव्य-आग्नेय दिशेने हिमाद्रीची ५,५०० मी. उंचीची रांग ८५० किमी. जाते. तिच्या दोहोबाजूंस लहानमोठ्या द्रोणी असून त्यांपैकी देवसई द्रोणी तिच्या उभ्या बाजू व सपाट तळ यांमुळे प्राचीन काळचे हिमगव्हर (सर्क) असावे वाटते. राज्याचा हा भाग अत्यंत उंचसखल व ओबडधोबड असून येथून ३,५२९ मी. उंचीच्या झोजी ला या महत्वाच्या खिंडीतून हिमाद्री ओलांडून करगिलवरून झास्कर पर्वत व सिंधू नदी ओलांडून लडाखची राजधानी लेहकडे एकमेव रस्ता जातो.
काश्मीर खोरे हा जम्मू-काश्मीरचा सर्वांत दाट लोकवस्तीचा आणि अत्यंत महत्वाचा विभाग होय. झेलम नदीच्या खोऱ्याचा हा वरचा भाग म्हणजे एका प्राचीन सरोवराचा तळ असून ती एक सांरचनिक द्रोणी आहे. ती उत्तरेस हिमाद्रीची एक शाखा व दक्षिणेस हिमाचलाची (लेसर हिमालय) शाखा पीर पंजाल यांच्या दरम्यान १,७०० मी. उंचीवर असून तिची आग्नेय-वायव्य लांबी १५० किमी. व रुंदी ८० किमी. आणि क्षेत्रफळ १५,१२० चौ. किमी. आहे. पौराणिक कल्पनेप्रमाणे कश्यप ऋषींनी येथील सरोवराच्या पाण्याला वाट करून देऊन ते कोरडे केले व तेथे वस्ती करविली. भूविज्ञानाप्रमाणे हे सरोवर गाळाने भरून येऊन मग त्यांचे उत्थान होऊन त्याला हल्लीचे स्वरूप आले. खोऱ्याच्या दक्षिणेच्या व्हेरनाग झऱ्यातून झेलमचा उगम होतो. ती वळणे घेत घेत १३० किमी. वायव्येकडे वुलर सरोवरापर्यंत जाते. हे भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर होय. त्यातून सोपूरजवळ बाहेर पडून ती पीर पंजालमधील घळईत शिरते. तिला डोमेलजवळ किशनगंगा नदी येऊन मिळाल्यानंतर ती मुझफराबादजवळ एकदम दक्षिणवाहिनी होऊन भारत-पाक सीमेवरून जाते. १०० किमी. गेल्यावर तिला पूंछ नदी मिळते व मग ती भारताबाहेर पडते. झेलमला उजवीकडून सिंद आणि लिद्दार नद्या मिळतात. लिद्दारच्या खोऱ्यात पहलगामजवळ मिहानी क्रियेचे अवशेष दिसतात. विशव, रोमुशी, सुखनाग, दूधगंगा, रामबियास या काश्मीरमधील इतर काही नद्या होत. झेलमच्या तीरावरील पूरमैदानावर ‘केरवा’ या स्थानिक नावाने प्रसिद्ध असलेले सपाट माथ्याचे उंच दरडींसारखे भाग आहेत ते कोठे १३० मी. तर कोठे १,१०० मी. उंचीचे आहेत. ते सरोजन्य गाळाने किंवा कधी कधी पूर्वीच्या हिमोढांचे बनलेले असून दरवर्षी त्यांवर हिम पडते. त्यांपैकी काही केवळ पावसावर अवलंबून असतात, तर काहींना डोंगरातील प्रवाहांचे पाणी मिळून त्यांवर तांदूळ, मका किंवा केशर यांची लागवड होते. अनंतनागपासून बारमूलपर्यंत झेलम नौकासुलभ आहे. वुलर व इतर सरोवरेही काश्मीर खोऱ्यातील प्राचीन सरोवरांचे अवशेष नसून झेलमचेच पूर्वीचे परित्यक्त भाग किंवा धनुष्कोटी सरोवरे आहेत वा डोंगरावरून आलेल्या गाळाने अडविलेले जलाशय आहेत. काश्मीर खोऱ्यात गुलमर्गसारखी सुंदर स्थळे पुष्कळ आहेत. खुद्द श्रीनगर हे १,८९३ मी. उंचीवरील झेलमच्या दोन्ही तीरांवर वसलेले आहे. त्याच्याजवळच सुप्रसिद्ध दल सरोवर आहे.या खेरीच शेषनाग, अनंतनाग, मानसर, सुरिमसर, सनसर, अंचार, मानसबल, गंगाबल, कौंसरनागसारखी गोड्या पाण्याची अनेक सरोवरे व नीलनाग, बेहामा, अच्छीबल, केरीनाग, कुकरनाग, मलिकनाग, चष्मशाही असे कित्येक झरे काश्मीरच्या जलवैभवाची प्रतीके आहेत.
पीर पंजाल पर्वंतश्रेणी काश्मीर खोऱ्याच्या दक्षिण सीमेवर असून तिची सुरुवात नंगापर्वताच्या नैर्ऋत्येस सु. १०० किमी. वर हिमाद्रीपासून होते व ती ४०० किमी. आग्नेयीकडे जाऊन मग चिनाब व रावी या नद्यांमधील जल-विभाजक बनते. चिनाब (चंद्रभागा) नदी जेथे पीर पंजालला भेदून जाते तेथे किश्तवार व भद्रवाह ही दोन छोटीशी सुंदर खोरी आहेत. पीर पंजाल श्रेणीत ३,४९४ मी. उंचीवरील पीर पंजाल व २,८३२ मी. उंचीवरील बनिहाल या खिंडी आहेत. बनिहाल खिंडीतून काश्मीर खोऱ्यात जाता येते. या खिंडीखालून २,१९५ मी. उंचीच्या जवाहर बोगद्यातून आता मोटाररस्ता झाला आहे. पीर पंजालची सरासरी उंची ४,०००मी. असून पूर्वेकडे त्याची शिखरे हिमाच्छादित असतात व तेथुन हिमनद्याही निघतात. रावी व चिनाब यांना बर्फाच्या पाण्याचाही पुरवठा होतो. चिनाब ही हिमाचलातील वैशिष्ट्यपूर्ण नदी होय. सु. २०० मी. उंचीवर पादर येथे या राज्यात शिरते. किश्तवार येथे तिला वडवान नदी मिळते आणि नुनकुन या ७,१३५ मी. वरील हिमनदीच्या पाण्याचा तिला बारमहा पुरवठा होतो. अखनूर येथे चिनाब सपाटीवर येते. रावी-कथुआ विभागातून राज्याच्या सीमेवरून जाते. पीर पंजालचे सर्वोच्च शिखर ४,७४३ मी. उंचीचे तटाकुटी, हे मात्र श्रीनगरच्या नैर्ऋत्येस ५० किमी. आहे. हिमालयाचा (लेसर हिमालय) या राज्यातील पट्टा सु. १०० किमी. रुंद व सरासरी ३,०००मी. उंच असून मुझफराबादजवळील झेलम घळईजवळ त्याची किमान उंची ४४० मी. आहे.
हिमालयाच्या दक्षिण पायय्याच्या शिवालिक टेकड्या काश्मीरमध्ये झेलमपासून रावीपर्यंत पसरल्या आहेत. त्या पुष्कळच विच्छिन्न असून त्यामुळे कित्येक अधोवलींना आता कटक माथ्यांचे स्वरूप आले आहे. जम्मू शहर के एका टेकडीवरच वसलेले आहे, तिच्या पायथ्याजवळून तावी नदी वाहते, पठाणकोट-जम्मू रस्त्यासाठी तावी व उझ नद्यांवर उंच पूल बांधावे लागले आहेत.या टेकड्यांच्या दक्षिणेस ‘कंडी’ नावाचा दगडाळ रुक्ष प्रदेश असून जम्मू टेकड्यांच्या उत्तरेस पुंछ टेकड्या आहेत. त्या ३,०००मी.पर्यंत उंच असून वालुकाश्म आणि शेल यांच्या बनलेल्या आहेत. पुंछ-उरी रस्ता पीर पंजालच्या हाजीपीर खिंडीतून जातो.
राज्याच्या नैर्ऋत्य सीमेवर सु. २४ किमी. रुंदीची मैदानी पट्टी सु. ३५० मी. उंचीवर आहे. ती पुष्कळशी घळ्यांनी भरलेली आहे.
या राज्यात हिमालयाचा सु. ३,५०,०००चौ. किमी. क्षेत्रफळाचा अत्यंत डोंगराळ व सर्वांत रुंद भाग समाविष्ट झालेला आहे. उंचसखलपणा, दुर्गमता, हवामान, मृदा, अरण्ये, प्राणिजीवन या दृष्टींनी त्याच्या वेगवेगळ्या भागांत विविधता आहे. हिमालय विभागतील सर्वांत जास्त हिम व हिमनद्या याच राज्यात आढळून येतात.
मृदा : सामान्यतः हिमालयातील मृदांवर प्रदेशाची उंची, वनाच्छादन, उतार, प्रदेशाचा मोहरा, हिमानी क्रिया यांचा परिणाम झालेला असतो. अगदी तळभागी जेथे डोंगर सुरू होतात तेथे खडे, माती व जाड वाळू आढळते. नद्यांच्या खोऱ्यात गाळमाती व काही ठिकाणी तांबूस दुमट मृदा दिसते. उष्णकटिबंधीय जंगलात मृदांचे अपक्षालन होते. त्यामुळे क्षारादी द्रव्ये खालच्या थरांत जातात किंवा वाहून जातात. तथापि या मृदांत कुजलेले सेंद्रिय अवशेष-ह्यूमस पुष्कळ असतात. वरच्या थरात ऑक्सिडीकरण पुष्कळच झालेले असते. मध्यम उंचीच्या पर्वतरांगांपर्यंत नद्यांच्या खोऱ्यात गाळमातीचे पट्टे आढळतात. नद्यांकाठच्या उंच प्रदेशात चांगली जलोढ मृदा असते. सूचिपर्णी वृक्षांच्या व पाइनच्या अरण्यांत अम्लधर्मी व पॉडसॉल (पडझोल) मृदा तयार होतात. ओक वृक्षांच्या अरण्यांत पिंगट वन्यमुद्रा असतात. दलदलीच्या प्रदेशांत पीट जातीच्या मृदा असतात. तीव्र उतारांवर अपक्क, पातळ, खडकाळ मृदा असते. उंच पर्वतीय भागांत प्रवाहांमुळे व हिमानी क्रियेमुळे झालेली, तर हिमनद्यांच्या व हिमक्षेत्रांच्या प्रदेशांत धोंडेमाती व उत्खालित मृदा असते.
जम्मू काश्मीरच्या कथुआ, साबा, जम्मू, अखनूर व राजौरी जिल्ह्यांत खडे, रेव व लोहमय माती असलेली मृदा आढळते, या दुमट, कमी चिकणमातीच्या आणि कमी चुन्याच्या परंतु भरपुर मॅग्नेशिया असलेल्या मृदेची अम्लता चुन्याने कमी होते. रासायनिक व हिरव्या खतांनी आणि शिंबी लागवडीने या मृदा जास्त उपयुक्त होत आहेत. हिमाचलाच्या (मध्य हिमालय) प्रदेशात ओक, पाइन, स्प्रूस, फर यांची बने धारण करणारी जाड मृदा आहे. किश्तवार व भद्रवाह प्रदेशांत खालच्या खडकांपासून निर्माण झालेल्या मृदेचा जाड थर आहे परंतु रामबन विभागात स्लेट व शेलमुळे मृदा पातळ आहे. वनप्रदेशात पालापाचोळा कुजून मृदेत खतमातीचा भरपूर पुरवठा होतो. काश्मीर खोऱ्यातील गाळमातीत वनस्पती, प्राणी यांपासून मिळालेल्या द्रव्यांमुळे सेंद्रिय व नत्रयुक्त द्रव्ये भरपूर आहेत. खोऱ्याच्या कमी पावसाच्या भागात नत्रयुक्त खते देऊन सफरचंद, अक्रोड, बदाम, चेरी, पेअर, प्लम, पीच, जर्दाळू, द्राक्षे इत्यादींच्या बागांसाठी योग्य अशा मृदा तयार करतात. खोल, दुमट, अल्कली नसलेली आणि निचरा होणारी मृदा फळबागांस चांगली असते.
काश्मीर खोऱ्यात मृदांना विशिष्ट नावे आहेत. गुर्ती मृदेत चिकणमातीचे प्रमाण जास्त असते. ती नद्यांच्या गाळाबरोबर येते. बहिल मृदेत दुमट अंश अधिक असतो. तिची नीट परीक्षा करून मगच तिला रासायनिक खत द्यावे लागते. भातशेतीला ही काळी मृदा चांगली असते. सेकिल ही लोम व रेतीमिश्रित मृदा पाणीपुरवठा केल्यास भातशेतीला चांगली असते. ती काश्मीर खोऱ्याच्या वायव्येस आढळते, सुरझमीन मृदा ही भाजीपाल्याच्या उत्पादनास उपयोगी असते. नदीनाल्यांकाठी सोनखत आणि कंपोस्टसारखी खते घालून व पाणी देऊन तिचा उपयोग करतात. लेंब जमिनीत झरे असतात. ही घट्ट, कठीण, चिकणमातीची मृदा असते. तरत्या बागांसाठी माती व गवत यांचे मिश्रण चटईसाठी वापरून याच्या गवतावर किंवा लव्हाळ्यांवर पसरून ते तळ्याच्या किंवा नदीच्या पाण्यावर तरंगत ठेवतात आणि मग त्याच्यावर अनेक प्रकारच्या भाज्यांचे उत्पन्न काढतात. करेवा मृदा ही लोम, लोहयुक्त चिकणमाती व जाड वाळू यांची बनलेली असते. खोलीप्रमाणे ती अधिक घट्ट होत जाते. तिच्यात सेंद्रिय द्रव्ये कमी असतात व आर्द्रता धरून न ठेवता आल्यामुळे ती फारशी उपयोगीही येत नाही. तिचे अपक्षालन होते व ती पावसावर जास्त अवलंबून असते. नंबल मृदा चुनायुक्त असून तिचा सहज भुगा होतो. ती दलदलीच्या भागात आढळते. भातशेताला व मका-राईसारख्या पिकांना ही चांगली असते. गाळाने दलदली भरून येऊन अधिक जमीन उपलब्ध होणे शक्य असते.
खनिजे : जम्मू प्रांतात अँथ्रासाइटसारखा व काश्मीर खोऱ्यात हलका कोळसा थोड्या प्रमाणात सापडतो. कश्मीर खोऱ्यात करेवाच्या भागात लिग्नाइट कोळसा सापडतो, पाकिस्तानमधील तेलक्षेत्र कोटली, नौशहर, सरूइन सर, मानसर बाजूने रावीपलीकडे ज्वालामुखी क्षेत्रात गेले आहे. मानसर-रामनगर भागात नैसर्गिक वायू आढळला आहे. चक्कर सलाल, खंडी आणि पुआनी येथे लोहधातुक आहे. रियासी भागात बॉक्साइटचे मोठे साठे आहेत. तांब्याची धातुके अनंतनाग जिल्ह्यात, सिंधु खोऱ्यात व चिनाब खोऱ्यात आढळत आहेत. करगिल भागात सिंधूच्या खोऱ्यात क्वचित थोडे सोने सापडते. श्रीनगरजवळ घर्षके व किश्तवारच्या पादरभागात क्वॉर्ट्झ मिळते. सोनमर्ग व कर्ना येथील क्वॉर्ट्झ दाब विद्युत्धर्मी आहे. जम्मू प्रांतात रामबन, बटोटे व अस्सर येथे आणि काश्मीर प्रांतात उरी, बारमूल व लच्छीपुरा येथे व अनंतनागजवळ जिप्सम मिळते. जम्मूत चेक्कर टिकरी व जंगलगली (सलाल) येथे चिनीमाती मिळते. बेंटोनाइट जम्मूत व संकोचन मृत्तिका (मुलतानी माती) बारमूलजवळ रामपुरा व जम्मूत राजौरी व बुदिल येथे मिळते. उरी तहसिलीत गेरू सापडतो. त्याचा अपयोग रंग, गिलावा वगैरेत होतो. ग्रामीण भागात घरे, दारे रंगविण्यास गेरूच वापरतात. किश्तवारमधील पादर येथे ४,४२० मी. उंचीवर कॉरंडम सापडते, व माणकेही सापडण्याची शक्यता आहे. बल्टिस्तानात द्रास येथे, स्कार्डूत दासू येथे, काश्मीर प्रांतात कर्ना येथे व किश्तवारमधील पादरभागात वैर्दूय व ॲक्वामरीन ही रत्ने सापडतात. शिगारच्या उत्तरेस मिळणाऱ्या सर्पेंटाइनपासून हिरवट रंगाच्या चहादाण्या, पेले इ. वस्तू बनवितात. पादर येथे सापडणाऱ्या रॉक क्रिस्टल व फेल्स्पारचा उपयोग ध्वनिक्षेपणाच्या कामी होतो आणि त्यापासून गुंड्या, कर्णभूषणे इ. वस्तूही होतात. पाकव्यास प्रदेशातील चुनखडक, ग्रॅफाइट इत्यादींचा उपयोग करता येत नाही. स्लेट इंडिअनाइट वगैरे इतर काही खनिजे मिळण्यासारखी आहेत. त्यासाठी वाहतुकीच्या चांगल्या सोयी होणे आवश्यक आहे.
हवामान : अवघ्या सु. ६५० किमी, विस्तारात ३००मी. पासून ८,०००मी. पलीकडे वाढत गेलेली उंची, इराण-अफगाणिस्तानकडून येणारी सौम्य आवर्ते, नैर्ऋत्य मोसमी वारे व लडाख पठारावरील वेगवान वारे यांमुळे जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांत हवामानाचे तीव्र स्वरुपाचे बदल जाणवतात, जम्मू भागात सु. १११·६ सेंमी. पाऊस व उष्णकटिबंधीय हवामान, तर लडाखमध्ये अवघा ९·३ सेंमी. पाऊस व उप-आर्क्टिकसारखे हवामान असा फार मोठा फरक आहे. भूमध्य समुद्राकडून इराण-अफगाणिस्तानमार्गे येणाऱ्या सौम्य आवर्तांमुळे झेलमच्या खोऱ्याचा व आजूबाजूचा प्रदेश सु. पाच महीने हिमाच्छादित राहतो.
जम्मू विभागात म्हणजे जम्मू, कथुआ, उधमपुर, दोदा व पूंछ जिल्ह्यांत हिवाळ्यात तपमान ७°से, ते २३°से. पर्यंत असते आणि उन्हाळ्यात ते ४६°से. पर्यंत जाते. पर्जन्यमान पश्चिमेकडे ६३·५ सेंमी. व पूर्वेकडे ५२·८ सेंमी.पर्यंत असते. तपमान व पर्जन्यमान यांवर सर्वत्र उंची, आडोसा व झाडी यांचा परिणाम जाणवतो. जम्मू येथे वर्षास १११·६ सेंमी, पाउस पडतो. बसोली १४८ सेंमी. उधमपुर ३४ सेंमी. भद्रवाह १११ सेंमी. मीरपूर १०७ सेमीं. रामबन ९८ सेंमी. व किश्तवार ९१ सेंमी. असे पावसाचे प्रमाण असून पाऊस मुख्यतः जुलै ते सप्टेंबर या काळात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळतो.
काश्मीर खोऱ्यात पीर पंजाल श्रेणीच्या अडथळ्यामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे क्वचितच पोहोचतात. तेथे वायव्येकडून येणाऱ्या सौम्य आवर्तांचा परिणाम अधिक जाणवतो. डिसेंबरपासून मार्चपर्यंत प्रदेश हिमाच्छादित असतो. मोसमी वारे फारतर उटी निदरीपर्यंत जातात. मार्चमध्ये सुरू झालेला वसंतऋतू मे महिन्यापर्यंत टिकतो व त्याच काळात सर्वांत जास्त पाऊस पडतो. जुलै आणि ऑगस्ट हे उन्हाळ्याचे महिने बहुतेक कोरडेच जातात. तथापि एका वेळी हवेची आर्द्रता पुष्कळच असते. त्यामुळे या महिन्यात काश्मीर खोऱ्यातील हवा उत्साहवर्धक नसते. ऑक्टोबर हा येथील सर्वोत्तम महिना होय. श्रीनगर येथे हिवाळा चांगलाच कडक असतो. जानेवारीचे सरासरी तपमान -०·७° से. असते ते जुलैमध्ये २२·८° से पर्यंत च़ढते. वर्षाच्या एकूण ६५·३ सेंमी. पावसापैकी ३८ सेंमी. पाऊस जानेवारी ते मे या काळात बराचसा हिमरूपाने पडतो. जुलै-ऑगस्टमध्ये तो सु. १२ सेंमी. पडतो. श्रीनगरची उंची १,५८५ मी. तर झेलमच्या तीरावरील करेवांची व डोंगरांची उंची ३,६०० मी. पेक्षाही जास्त होत जाते. ईशान्येकडील पर्वतांमुळे लडाख पठारावरून येणारे अतिथंड वारे खोऱ्यात शिरत नाहीत. यामुळे काश्मीर खोऱ्याचे हवामान समशीतोष्ण, भूमध्यसामुद्रिक हवामानासारखे आहे. लडाखचे हवामान अगदी कोरडे व विषम आहे. लेह येथे सर्व वर्षात ८·५ सेंमी. पाऊस पडतो. उन्हाळ्यात व दिवसा जमीन व हवा फार तापते व हिवाळ्यात आणि रात्री अत्यंत थंड होते. वारे विलक्षण वेगाने वाहत असतात. लेह येथे जानेवारीचे सरासरी तपमान -८·२°. से व जुलैत १७° से. असते. प्रत्यक्ष किमान तपमान -२८·३°. से. पर्यंत उतरते. पश्चिमेस स्कार्डू येथे हवा यापेक्षा थोडी सौम्य आहे. तीन हजार मी. पेक्षा अधिक उंचीच्या या भागात वातावरणाच्या विरळतेमुळे सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेचा (सौरतापमानाचा) व निघून जाणाऱ्या उष्णतेचा (प्रारणाचा, विकिरणाचा) वेग फार मोठा असतो. यामुळे खडकाचे आकुंचन-प्रसरण मोठ्या प्रमाणात होऊन त्यांचे कायिक विदारण जास्त होते. पूर्वेकडे जेथे पर्वतरांगा संपतात आणि हिमनद्या किंवा हिमक्षेत्रापासूनही पाणी मिळत नाही, तेथे कायम स्वरूपी मनुष्य वस्ती अशक्यप्रायच होते.
उंचीप्रमाणे स्थूलमानाने पाहता ८००मी. पर्यंत हवा उबदार, उष्णकटिबंधीय, ८००ते १,२००मी. पर्यंत उबदार, उपोष्ण कटिबंधीय १,२००ते २,४००मी. पर्यंत, थंड समशीतोष्ण २,४००ते ३,६००मी. पर्यंत शीत, समशीतोष्ण आणि ३,६०० मी. पेक्षा जास्त उंचीवर आर्क्टिक प्रकारची असते. गिलगिट-बल्टिस्तानमध्येही उंचीचा हा परिणाम दिसून येतो.
वनस्वती व प्राणी : समुद्रसपाटीपासून १,५५० मी. उंचीपर्यंत बांबू व झुडपे, पायथा टेकड्यात उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वृक्ष, आर्द्र समशीतोष्ण भागात सदाहरित ओक, लॉरेल व चेस्टनट १,५५० ते १,८६० मी. उंचीपर्यंत देवदार, प्लेन, स्प्रूस त्याच्यावर ३,१४० मी. उंचीपर्यंत सावलीच्या बाजूला ओक व उन्हाच्या बाजूला सीडार, सिल्व्हर फर, पाइन, यू, ब्ल्यू पाइन आणि अक्रोड ३,७२० मी. पेक्षा जास्त उंचीला शुष्क समशीतोष्ण भागात सूचिपर्णी वृक्ष, देवदार, ज्यूनिपर, ओक, ॲश अल्पाइन हवामानात सिल्व्हर फर, ज्यूनिपर, पाइन, बर्च, ऱ्होडो डेंड्रॉन, विलो व सदाहरित झुडपे असे झाडांचे प्रकार या राज्यात आढळतात. चीन व चिनार वृक्ष हे काश्मीरचे वैशिष्ट्य आहे. ते सर्वत्र दिसतात. राज्याचा सु. १४% भाग वनाच्छादित आहे. पूर्व बल्टिस्तानात हिमरेषेखाली तुरळक गाळमैदानात झाऊ, डेंगरउतारावर बर्त्सेसारखी झुडपे, काही वन्य झुडपे व तुरळक गवत उगवते. बल्टिस्तानात २,४१० ते ३,१०० मी. उंचीवर दऱ्याच्या उताराला पाइन व देवदारांची काही बने व प्रवाहांच्या कडेने पॉप्लर व विलो वृक्ष आहेत. फळझाडांपकी अक्रोड, जरदाळू, सफरचंद, पेअर, पीच, प्लम, तुती व बेरीजातींचे प्रकार बागांप्रमाणे वनांतूनही मधूनमधून आढळतात. काश्मीर खोऱ्यातील असंख्य उपयुक्त औषधी व मसाल्याच्या वनस्पतींपैकी धूपाचा गुग्गुळ, धाग्यासाठी अंबाडी, हिंग, जिरे, कमळबी, पाणगवत, अंतर्सालीकरता भूर्ज, बाभळीच्या जाती, तूण, धामणी, मंज, पपई, जंगली करडई, दंती, कुमुद, नीळ, टाकळा, बाहवा, अडुळसा,कण्हेर, डाँबिया, बोर, फुलाई इत्यादींचा उल्लेख करता येईल. वन्य प्राण्यांत विशेष उल्लेखनीय बारशिंगा, हनगाल काळवीट, मारखेर हा रानबकरा, कस्तुरीमृग, काळे व पिंगट अस्वल, आयबेक्स, लांडगा, खोकड, गोरल आदी जनावरे व निळा बगळा, हिमकुक्कुट, चकेर, पार्ट्रिज, फेझंट, सँड ग्राउज, ग्रीब, गल, प्लवर, स्नाइप, करकोचा, पारवा, वुलर सरोवरावरील गूज व बदकांचे अनेक प्रकार, गरुड, नाइटजार, खिफ्ट, कोकीळ, ससाणे, घुबडे, खंड्या, हूपू, बुलबुल इ. पक्षी आहेत. नद्यांतून १३ प्रकारचे मासे सापडतात. गुना, पोहर इ. विषारी सर्पही आढळतात.
ओक, शा. नि.
इतिहास : इतिहासपूर्व काळापासून काश्मीरसंबंधी माहिती आढळते. काश्मीरमध्ये ⇨बुर्झाहोम येथील उत्खननात सापडलेल्या दगडी आयुधांवरून आणि खळग्यांवरून लोक जमिनीत खोदलेल्या खड्ड्यांत रहात होते, असे तज्ञांनी अनुमान काढले आहे. बुर्झाहोम येथील संस्कृतीचे ब्रह्मपुरी (कोल्हापूर) व मस्की येथील संस्कृतींशी साम्य आढळते.महाभारत, बृहत्संहिता, नीलमत या ग्रंथांत काश्मीरसंबंधी माहिती सापडते. बाराव्या शतकातील कल्हण पंडिताच्या राजतरंगिणी व तिच्या जोनराज, श्रीवर, प्राज्यभट्ट व शुक या कवींच्या ग्रंथांवरून १५८८ पर्यंत काश्मीरसंबंधी ऐतिहासिक माहिती मिळू शकते. पुढील माहिती फार्सी व इंग्रजी ग्रंथांवरून उपलब्ध होते.
काश्मीरमध्ये पुरातनकालापासून नाग, पिशाच, यक्ष लोकांची वस्ती होती, अशी समजूत आहे. त्यांनी आर्यांना विरोध केला. कश्यप, शंकर, पार्वती, विष्णू, श्रीलक्ष्मी, नीलनाग यासंबंधी तेथे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. राजतरंगिणीवरून काश्मीरमध्ये अनेक शतके गोनर्दीय वंशाचे राज्य होते असे दिसते. गोनर्द व त्यांचे तीन वारसदार मगध देशाच्या जरासंधाचे नातलग होते. गोनर्दाने श्रीकृष्णाविरुद्ध जरासंधाला मदत केली होती. त्याच्या कारकीर्दीत कौरव-पांडव युद्ध झाले. त्या घराण्यात ३५ राजे होऊन गेले. राजतरंगिणीत त्यांच्यासंबधी माहिती आढळत नसली, तरी रत्नाकर या कवीने त्यासंबंधी माहिती दिलेली आहे. गोनर्दाच्या नंतर तेथे पांडव घराण्यातील राजांनी राज्य केले. अशोकापूर्वी तेथे लव, कुश, खाजेंद्र, गोधर, सुवर्ण, जनक हे राजे होऊन गेले.
ख्रि. पू. ५१२ च्या सुमारास इराणच्या पहिल्या डरायसने काश्मीरचा प्रदेश जिंकला होता. अलेक्झांडर हिंदुस्थानच्या स्वारीतून परत जात असताना पूंछ व नौशहर येथील राजा अभिसार त्यास शरण गेला. अशोक तक्षशिला येथे राज्यपाल असल्यापासून त्याचा काश्मीरशी संबंध आला होता. तो वरचेवर काश्मीरला भेट देत असे. कल्हणाच्या मताप्रमाणे श्रीनगर शहर अशोकाने वसविले. त्याने अनेक स्तूप व विहार बांधले. त्यानेच तेथे बौद्ध धर्माचा प्रसार केला. अशोकाच्या मुलांनी काश्मीरमध्ये राज्य केले. त्याच वंशातील दामोदर याला काश्मीरच्या सरहद्दीवर राज्य स्थापन करणाऱ्या म्लेंच्छांविरुद्ध युद्ध करावे लागले. तेथे ग्रीक-बौद्ध कलेचा किंवा गांधार कलेचा विकास झाला.
पहिल्या शतकात कुशाण वंशातील राजा कनिष्क याने काश्मीर जिंकून कनिष्कपूर शहर वसविले. कनिष्क, हुविष्क, जुष्क यांनी तेथे बौद्ध धर्माचा प्रसार केला. कनिष्काने तिसरी बौद्धसभा काश्मीरमध्ये भरविली होती. जुष्कानंतर गादीवर आलेल्या अभिमन्यूने बौद्ध धर्माला विरोध करुन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्यानेच अभिमन्यूपूर गाव वसविले. ५१५ मध्ये हूण वंशातील मिहिरकुल याने काश्मीरवर ताबा प्रस्थापित केला. त्याने तेथे मिहिरेश्वराचे मंदिर बांधले. माळव्याचा यशोवर्मन व मगधाचा बालादित्य यांनी काश्मीरवर हल्ले केल्यामुळे मिहिरकुलाचे राज्य फार काळ टिकू शकले नाही. त्याच्यानंतर गादीवर बसलेल्या राजांपैकी युधिष्ठिर नावाच्या राजाला काश्मीरच्या रहिवाशांनी पदच्युत केले. त्यांनी विक्रमादित्याच्या एका नातलगास बोलावून आणून पहिला प्रतापादित्य या नावाने गादीवर बसविले. त्याने प्रजेची चांगली काळजी घेतली.
३५० मध्ये काश्मीरमधील हूणांची सत्ता नाहीशी झाली. तेव्हा गोनर्द घराण्यातील मेघवाहन याला राजपद देण्यात आले. तो बौद्ध धर्माचा पुरस्कर्ता होता. त्याने मेघवान गाव वसविले. त्याच्यानंतर गादीवर आलेला प्रवरसेन याने नष्ट झालेले श्रीनगर शहर पुन्हा वसविले. सहाव्या शतकानंतर प्रवरपूर ही काश्मीरची राजधानी झाली. प्रवरसेनानंतर गादीवर आलेल्या हिरण्य आणि तोरमाण यांच्यात तंटा सुरू झाला. हिरण्याच्या कारभाऱ्याने उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य हर्ष याची मदत मागितली. तेव्हा विक्रमादित्याने मातृगुप्ताला काश्मीरमध्ये राज्य करण्यास सांगितले. काही काळ काश्मीर उज्जयिनीच्या विक्रमादित्याचे मांडलिक होते. पहिल्या प्रवरसेनाचा नातू दुसरा प्रवरसेन याने मातृगुप्ताला पळवून लावून आपल्या वंशाची गादी परत मिळविली. त्याने विक्रमादित्याचा मुलगा प्रतापशील याजकडून काश्मीर हस्तगत केले. त्याच्यानंतर दुसरा युधिष्ठिर, नरेंद्रादित्य, बालादित्य यांनी राज्य केले. बालादित्याला मुलगा नसल्याने गोनर्द वंश नाहीसा झाला.
कर्कोट वंश : सातव्या शतकाच्या पूर्वार्धात बालादित्याचा जावई दुर्लभवर्धन हा काश्मीरच्या गादीवर बसला. यानेच कर्कोट घराण्याची स्थापना केली. दुर्लभवर्धनाने साठ वर्षे राज्य केले. त्याच्या कारकीर्दीतील अनेक नाणी सापडतात. त्यावेळेपासूनच काश्मीरचा तारीखवार इतिहास उपलब्ध होते. तक्षशिला, हजारा, राजोरी, परणोत्य (पूंछ) येथील सत्ताधीश दुर्लभवर्धनाचे मांडलिक होते.नर्मदेपासून तिबेटपर्यंत त्याचे राज्य पसरले होते. त्याच्याच कारकीर्दीत चिनी प्रवासी ह्युएनत्संगने काश्मीरला भेट दिली होती. दुर्लभवर्धनानंतर दुर्लभक व त्याचे मुलगे चंद्रापीड, तारापीड, ललितादित्य हे राजे होऊन गेले. तारापीड जुलमी होता. ललितादित्य हा कर्कोट वंशातील सर्वश्रेष्ठ राजा होता. त्याने कनौजच्या यशोवर्धनाचा, राष्ट्रकूट राजाचा, वल्लभीच्या मैत्रकाचा आणि चितोडच्या मौर्याचा पराभव करुन कनौज, मगध, गौड, कलिंग हे प्रदेश पादाक्रांत केले. त्याने तिबेटच्या राजाचाही पराभव केला. अशा तऱ्हेने त्याने काराकोरम पर्वतापर्यंत राज्यविस्तार करुन हिंदुस्थान व चीन यांना जोडणाऱ्या रस्त्यावर आपला ताबा प्रस्थापित केला. गुप्त साम्राज्यानंतर बलाढ्य भारतीय साम्राज्य ललितादित्याचेच होते. त्याने जनतेच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या. त्याने बारमूला (वराहमूल) खोऱ्यातील नदीचे पात्र मोकळे करून तेथे होणारा पुराचा त्रास कमी केला. खोलगट भागात बांध घालून कालवे काढले. ललितादित्याने काश्मीरमध्ये अनेक देवालये आणि वास्तू बांधल्या. ललितपूर, फलपूर, पर्णोत्स इ. गावे वसविली. त्याने बांधलेले मार्तंडमंदिर व परिहासपूर नगर हे वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने म्हणून समजले जातात. ललितादित्य विद्येचा भोक्ता होता.
ललितादित्यानंतर क्रमाने गादीवर आलेले व त्याचे मुलगे वज्रादित्य, पृथ्व्यापीड, संग्रामापीड हे राजे दुर्बळ होते. पण त्याचा भाऊ जयापीड मात्र ललितादित्यासारखा पराक्रमी होता. त्याने प्रयागपर्यंत स्वाऱ्या करुन अनेक छोटी राज्ये आपल्या सत्तेखाली आणली. त्याने विद्वान पंडितांना उदार आश्रय दिला परंतु त्याने ब्राह्मणांचा छळ केला.जयापीडानंतर गादीवर आलेले राजे कर्तृत्ववान नव्हते. त्यांतील शेवटचा राजा व त्याचा नातू बृहस्पती अल्पवयी असल्याने त्याच्या मामाने राज्य बळकाविले. अशा तऱ्हेने कर्कोट वंशाचा शेवट झाला.
उत्पल घराणे : बृहस्पतीचा मामा उत्पल, याचा नातू व या घराण्याचा संस्थापक ⇨अवंतिवर्मन् ८५५ मध्ये गादीवर आला. त्या वेळी काश्मीरची एकंदर परिस्थिती विस्कळित झालेली होती. अवंतिवर्मन्ने राज्यातील परिस्थिती सुधारून, शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली. त्याने अवंतिपूर हे गाव वसविले. त्याच्या सूर्य (सूय्य) नावाच्या पंतप्रधानाने वितस्ता नदीला बांध घालून कालवे काढले. त्याने मुक्ताकण, शिवस्वामिन्, आनंदवर्धन, रत्नाकर इ. विद्वानांना आश्रय दिला होता. अवंतिवर्मन्नंतर त्याचा मुलगा शंकरवर्मन् गादीवर आला. हा जुलमी होता. त्याने काबूल येथील शाही या हिंदू घराण्यातील राजा लल्लिय याच्या प्रदेशावर स्वारी करून अनेक मंदिरे लुटली. त्याने सुरू केलेली वेठबिगारीची पद्धत अनेक वर्षे काश्मीरमध्ये चालू राहिली. शंकरवर्मन् मेल्यानंतर काश्मीरमध्ये अराजकता निर्माण झाली. ९०२ मध्ये गादीवर बसलेला गोपालवर्मन् अल्पवयी असल्याने त्याची आई सुगंधा कारभार पहात असे. गोपालवर्मन् मेल्यानंतर सुगंधेने ९०४ ते ९०६ पर्यंत राज्य केले. तिने गोपाळपूर हे गाव वसविले. थोड्याच दिवसांत तंत्री नावाच्या सेना पथकाने आपल्या हातात सत्ता घेतली. त्यांनी सुगंधेला गादीवरून दूर केले. तंत्रींनी सुगंधेचा एक नातलग, पार्थ याला गादीवर बसविले. त्यानंतर निर्जितवर्मन्, चक्रवर्मन्, संभुवर्धन असे एकापाठेपाठ एक राजे होऊन गेले. चक्रवर्मन्ने डामरांच्या साह्याने तंत्रींचा पराभव करून सत्ता हस्तगत केली परंतु चक्रवर्मन् व त्यांच्यानंतर गादीवर आलेला उन्मत्तावंती हे दोघेही भोगविलासात मग्न असत. कमलवर्धन या सेनापतीने तंत्रींचा पराभव करुन ब्राह्मणांच्या संमतीने यशस्कराला राज्यपद दिले (९३९–४८). त्याच्या कारकीर्दीत काश्मीरला शांतता व सुव्यवस्था लाभली. तो मरण पावल्यावर संग्रामदेव, क्षेमगुप्त हे गादीवर बसले. क्षेमगुप्ताने लोहराधिपती सिंहराज याची मुलगी दिद्दा हिच्याशी लग्न केले. क्षेमगुप्त ९५८ मध्ये मरण पावला. त्याचा मुलगा अभिमन्यु हा अल्पवयी असल्याने दिद्दा राणीच सर्व कारभार पहात असे. ती क्रुर, संशयी व विलासी होती. तिच्या प्रधानाने केलेले उठाव तिने मोडून काढले. सुरुवातीला अभिमन्युची पालक म्हणून, नंतर राज्यकारभार पाहणारी मुख्य आणि शेवटी सर्वश्रेष्ठ सत्ताधीश राणी म्हणून तिने ९८१ ते १००३ पर्यंत सत्ता गाजविली. ती मरण पावल्यावर तिचा लोहर घराण्यातील भाचा संग्रामराज याला काश्मीरचे राज्य मिळाले.
लोहर घराणे : संग्रामराज हा लोहर घराण्याचा संस्थापक. त्याने १००३ ते १०२८ पर्यंत राज्य केले. तो कर्तबगार होता. त्याच्या कारकीर्दीत काश्मीरची भरभराट झाली. त्याच्यानंतर हरिहरराज, अनंतदेव हे राजे होऊन गेले. अनंतदेवाची पत्नी सूर्यमती ही कर्तबगार असून, हळूहळू तिने सर्व सत्ता आपल्या हातात घेतली. तिने स्वतःचा मुलगा कलश याच्यासाठी अनंतदेवाला राज्यपद सोडण्यास भाग पाडले. कलशाने राज्यात अनेक सुधारणा केल्या. त्याने काश्मीरच्या पश्चिमेकडील उरशा (हजारा) पासून पूर्वेकडून कस्तवतपर्यंतचा प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला. छोट्या छोट्या सत्ताधीशांची राजधानीत सभा भरविली. कलशाचे शेवटचे दिवस त्याचा मुलगा हर्ष याच्याशी भांडण्यात गेले. हर्षाची विश्वासघातकी वागणूक पाहूनही कलश पुन्हा भोगविलासात मग्न होऊ लागला. त्याने त्याचा धाकटा मुलगा उत्कर्ष यास गादीवर बसवून हर्षाला तुरुंगात टाकले. १०८९ मध्ये हर्ष मेल्यानंतर उत्कर्षाला राज्यपद मिळाले. तो विद्वान व कवी होता. त्याला अनेक भाषा येत होत्या. तो कलेचा भोक्ता होता. ११०१ मध्ये तो मेल्यानंतर लोहर घराण्यातील उच्चल्ल (११०१–१२) व सुस्सल (१११२–२०) आणि जयसिंह (११२८–५५) यांनी काश्मीरमध्ये राज्य केले. परंतु राज्यातील अंतर्गत कलहामुळे हिंदू राजांची सत्ता दुर्बळ झाली. या दुहीचा फायदा परकीयांनी घेऊन त्यांनी काश्मीरवर स्वाऱ्या केल्या.
महंमूद गझनीने १०१५ व १०२१ साली काश्मीरवर दोनदा स्वारी केली. पण त्यांत त्याला यश आले नाही. बाराव्या शतकात सुस्सल व भिक्षाचार यांच्यात यादवी चालू असताना तुर्कांनी काश्मीरवर स्वारी केली. सु. १२९५ ते १३२४–२५ पर्यंत काश्मीरच्या गादीवर राजा सिंहदेव (सहदेव) राज्य करीत होता. त्याच्या कारकीर्दीत तिबेटमधून रिंचिन (१३२०–२३) व स्वातमधून शाह मीर हे काश्मीरमध्ये आले. राजाकडे नोकरी धरल्यामुळे त्यांना जहागिऱ्याही मिळाल्या. तेच सिंहदेवाविरुद्ध उठले. याच सुमारास चंगीझखानाच्या वंशातील एकाने काश्मीरवर स्वारी केली. सिंहदेव किश्तवारला पळाला. तेव्हा त्याचा प्रधान रामचंद्र याने स्वतः राजा झाल्याचे जाहीर केले. रिंचिनने त्याचा खून करुन स्वतःच्या हातात सत्ता घेतली. काश्मीरचा हाच पहिला मुसलमान सत्ताधीश. रिंचिनने रामचंद्राची मुलगी कोटा राणी हिच्याशी लग्न केले. त्याने सद्रुद्दीन ही पदवी धारण केली. रिंचिनने हिंदू धर्म स्वीकारावा असा कोटा राणीने आग्रह धरला. राज्यात अनेक सुधारणा केल्या असल्या, तरी रिंचिनने हिंदूंचा छळ केला. रिंचिनच्या हातून सत्ता काढून घेण्यासाठी सिंहदेवाचा भाऊ उदयनदेव याने त्याच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाला. १३२० मध्ये तो मरण पावला. उदयनदेव जेव्हा मोठे सैन्य घेऊन गेला, तेव्हा कोटा राणीला त्याच्याविरुद्ध टिकाव धरणे शक्य नव्हते. तिने रिंचिनापासून झालेला मुलगा हैदर याचा गादीवरील हक्क डावलून उदयनदेवाला राज्य दिले आणि त्याच्याशी लग्न केले. तिने आपल्या स्वरूपाची, हुषारीची त्यावर छाप पाडली. कोटा राणी धैर्यवान होती. उदयननंतर शाह मीर या प्रधानाने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु तिने नकार दिला. शाह मीरच्या सैन्याने तिला घेरले. तेव्हा ती त्यास शरण गेली. वरकरणी लग्नाचे आश्वासन देऊन प्रत्यक्ष त्याच्या सहवासात राहण्याची वेळ आली, तेव्हा तिने स्वतःला खंजिराने मारून घेतले. अशा तऱ्हेने काश्मीरमधील एका राजकारणी, कारस्थानी स्त्रीचा शेवट झाला.
१३४३ मध्ये शाह मीर शम्सुद्दीन हे नाव धारण करून काश्मीरमध्ये राज्य करू लागला. १३४३ पासून काश्मीरमध्ये मुसलमानांचे राज्य सुरू झाले. १३४३ ते १५५४ पर्यंत अनेक सुलतान होऊन गेले. १५३२ मध्ये हुमायूनचा भाऊ कामरान याने काश्मीरवर स्वारी केली परंतु त्याला यश आले नाही. १५५४ ते १५८६ पर्यंत काश्मीरमध्ये चक घराण्याची सत्ता होती. चक हे शिया पंथाचे होते. गाझीखान हा या घराण्यातील पहिला सत्ताधीश. त्याने अनेक हिंदूंना बाटविले. चक घराण्यात सात सत्ताधीश होऊन गेले. त्यांच्या कारकीर्दीत काश्मीरमध्ये यादवी माजली. चकांच्या काळात काश्मीरचे स्वातंत्र्य नष्ट झाले.
१५८७ मध्ये अकबराने काश्मीर आपल्या सत्तेखाली आणून मोगल साम्राज्यास जोडले. जहांगीरला काश्मीर पृथ्वीवरील स्वर्ग वाटले. औरंगजेबाच्या कारकीर्दीपर्यंत काश्मीरमध्ये अनेक मोगल सुभेदारांनी कारभार केला. औरंगजेबाच्या पश्चात मोगली सत्तेस उतरती कळा लागली. दिल्ली येथील अनागोंदी कारभाराचा परिणाम काश्मीरवर झाला. मुहम्मदशाहाच्या कारकीर्दीत काश्मीरमध्ये बारा सुभेदार होऊन गेले. मोगली सत्तेच्या पडत्या काळात मराठ्यांचा दिल्लीच्या राजकारणातील वरचष्मा पाहून जम्मूचा राजा रणजितदेव याने दुर्रानीचे वकील आपल्या राज्यातून हाकून लावले होते पण पुढे अहमदशाह दुर्रानीने काश्मीर जिंकल्यापासून तेथे अफगाणसत्ता सुरू झाली. १८१९ पर्यंत त्यांची सत्ता तेथे होती. अफगाणांच्या जुलमाला कंटाळून काश्मीरच्या पंडितांनी रणजितसिंगाची मदत मागितली. ही मदत रणजितसिंगाने ताबडतोब दिली. १८१९ मध्ये पठाणांचा पराभव झाला.
गुलाबसिंग हा काश्मीरमधील डोग्रा घराण्याचा संस्थापक. जम्मू भोवतालच्या प्रदेशात राजपूत सत्ताधीशांची सत्ता होती. मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागली, तेव्हा राजा ध्रुव व त्याचा मुलगा राजा रणजितदेव यांच्या नेतृत्वाखाली सर्व राजपूत एकत्र झाले. गुलाबसिंग याच रणजितदेव वंशातील होता. जम्मूमध्ये गोंधळ आहे असे पाहून रणजितसिंगाने १८०८ मध्ये भाई हुकूमसिंगाला जम्मू शीख राज्यात समाविष्ट करण्याची आज्ञा दिली. १८१५ ते १८२० च्या काळात गुलाबसिंगाने सरहद्दीवरील लढ्यात प्रामुख्याने भाग घेतला. १८२० मध्ये त्याला जम्मूचा प्रदेश जहागीर म्हणून दिला. १८४१ साली त्याने किश्तवार, लडाख, बल्टिस्तान हे प्रांत काश्मीर राज्यास जोडले. १८४५ साली झालेल्या इंग्रज-शीख युद्धात गुलाबसिंग तटस्थ राहिला. इंग्रजांना जय मिळाल्यानंतर त्यांनी गुलाबसिंगाला काश्मीर प्रांत दिला. गुलाबसिंगाने त्यानंतर गिलगिट प्रांत जिंकला. अशा तऱ्हेने काश्मीर संस्थान अस्तित्वात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संस्थाने जेव्हा भारतीय संघराज्यात विलीन झाली, त्या वेळी जम्मू व काश्मीरच्या राजाने भारतात विलीन हेण्याबाबत निर्णय देण्यास विलंब लावला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थानिकांना भारताशी ‘जैसे थे करार’ करण्याची परवानगी होती. भारत आणि काश्मीर संस्थान यांच्यात’जैसे थे करारा’ संबंधी चर्चा होण्यापूर्वीच पाकिस्तानने काश्मीरच्या सरहद्दीवर हल्ले सुरू केले. २० ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानने काश्मीरवरील आक्रमणाचा दिवस मुक्रर केला होता. त्या वेळी काश्मीरच्या महाराजांनी भारत सरकारकडे लष्करी मदत मागितली. जम्मू व काश्मीरला मदत देण्यापूर्वी भारत सरकारने तेथील महाराजांशी सामीलनाम्याचा करार करून घेतला. गव्हर्नर जनरल माउंटबॅटनने या कराराला संमती दिली. अशा तऱ्हेने कायदेशीर रीत्या जम्मू आणि काश्मीर हे २६ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतात विलीन होऊन एक घटक राज्य झाले. [→ काश्मीर समस्या].
राजकीय स्थिती : काश्मीरवर झालेल्या पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळी तेथील महाराज व त्यांचे मंत्रिमंडळ यांनी श्रीनगर सोडल्यामुळे तेथे कोणतेच सरकार नव्हते. त्यामुळे तेथे गोंधळ माजण्याचा संभव होता. तेव्हा नॅशनल कॉन्फरन्सने पुढाकार घेऊन स्थानिक कारभार आपल्या हातात घेतला. तेथे आणीबाणीचा कारभार सुरू झाला. त्यामुळे तेथे पंतप्रधानांचा आणि सरकारचा असा दुहेरी कारभार सुरू झाला. हा कारभार सुरळीतपणे चालत नसल्याने काश्मीरच्या महाराजांनी ५ मार्च १९४८ रोजी जबाबदार राज्यपद्धती सुरू करण्यास मान्यता दिली. आणीबाणीच्या काळातील सरकारचे रूपांतर मंत्रिमंडळात होऊन शेख अब्दुल्लांची मुख्य प्रधान म्हणून नेमणूक झाली. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय नॅशनल कॉन्फरन्सला निर्णय घेता येत नव्हते. म्हणून १९५० साली नॅशनल कॉन्फरन्सच्या सल्लागार मंडळाने संविधान समितीसाठी निवडणुका घ्याव्यात, असे सुचविले. १९५१ च्या मे महिन्यात युवराजाने प्रौढ मतदान पद्धतीने निवडणुका व्हाव्यात म्हणून जाहीर केले. झालेल्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला ७५ जागा मिळाल्या. राज्यासाठी घटना तयार करून केद्र सरकारशी राज्याकारभारविषयक व्यवस्था करणे, सत्ताधीश राजघराण्याचे भवितव्य ठरविणे, सोयीस्कर घटना तयार करणे इत्यादींसाठी घटना समिती बोलाविण्यात आली. घटना समितीने निरनिराळ्या उपसमित्या नेमल्या. नवीन घटना अंमलात येईपर्यंत घटना समितीचे रूपांतर राज्यविधिमंडळात करावयाचे ठरले. घटना समितीने जम्मू व काश्मीरच्या प्रमुखाला सदर-इ-रियासत संबोधण्याचे ठरविले. त्याची निवडणूक पाच वर्षांनी विधानसभेकडून होऊ लागली. जम्मू व काश्मीर संस्थानने अंतर्गत राजकीय सत्ता स्वतःकडेच ठेवल्यामुळे पंतप्रधान शेख अब्दुल्लांना अंतर्गत कारभारात संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले. भारतापासून अलग होण्याची त्यांची इच्छा होती. जम्मूमधील प्रजापरिषदेने त्यांना काश्मीरच्या स्वतंत्र घटनेस व ध्वजास विरोध केला. सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताच्या घटनेत जम्मू-काश्मीरची घटना समाविष्ट करावी, असे प्रजापरिषदेचे मत होते. १० एप्रिल १९५२ रोजी भारतीय संविधान काश्मीरला लागू होऊ देणार नाही, म्हणून अब्दुल्लांनी जाहीर केले.
घटनेसंबंधी जम्मू-काश्मीर व केंद्र सरकार यांच्यात बोलणी झाल्यानंतर २४ जुलै १९५२ रोजी दिल्ली करारात भारतीय संघराज्यातील जम्मू व काश्मीर राज्याचे स्थान निश्चित ठरले. भारताने काश्मीरला विशेष स्थान, दर्जा व अंतर्गत संपूर्ण स्वायत्तता देण्याचे मान्य केले. वंशपरंपरेप्रमाणे राजाकडे असणारे अधिकार निवडून दिलेल्या सदर-इ-रियासतकडे देण्यात आले. राष्ट्राध्यक्षांना आणीबाणीच्या वेळी जादा अधिकार देण्यात आले. शेख अब्दुल्लांनी या कराराची अंमलबजावणी केली. १२ नोव्हेंबर १९५२ रोजी घटना समितीने महाराजांच्या जागी सदर-इ-रियासतची नेमणूक केली. सदर-इ-रियासतच्या पदी निवडून आलेल्या युवराजाला राष्ट्राध्यक्षांनी मान्यता दिली. काश्मीरमधील राजेशाहीसत्ता नाहीशी होऊन लोकसत्ताक राज्यपद्धतीस सुरुवात झाली.
राज्याच्या एकीला व स्थैर्याला धोका पोहचू नये म्हणून ८ ऑगस्ट १९५३ रोजी सदर-इ-रियासतने शेख अब्दुल्लांना मुख्यमंत्रिपदावरुन बडतर्फ करून, कैद केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बरखास्त केले. त्यानंतर ९ सप्टेंबर १९५३ रोजी बक्षी गुलाम मुहंमद हे मुख्यमंत्री झाले. १९५४ च्या फेब्रुवारीत घटना समितीने बक्षी गुलाम मुहंमद व त्यांचे मंत्रिमंडळ यांवर अविश्वासाचा ठराव संमत केला. ६ फेब्रुवारी १९५४ रोजी घटना समितीने भारतात सामील होण्याचे नक्की केले. १४ मे १९५४ रोजी राष्ट्राध्यक्षांच्या हुकुमाप्रमाणे राज्यसंविधान समितीच्या शिफारशी भारतीय संविधानात अंतर्भूत करून घेतल्या. १० ऑक्टोबर १९५६ रोजी मसुदा तयार करणाऱ्या समितीने विधानसभेला नवीन संविधान सादर केले. १७ डिसेंबर १९५६ रोजी तिचा स्वीकार झाला.
काश्मीरच्या राज्यघटनेत आणि भारतीय घटनेत बरेच साम्य आहे. काश्मीरच्या राज्यघटनेत लोकशाही पद्धतीचे सरकार, द्विसदनी विधान मंडळ, प्रौढ मतदान, स्वतंत्र न्यायमंडळ, लोकसेवा आयोग इ. गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. उच्चतम न्यायालयाच्या अधिकारकक्षा आणि भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे अधिकार इतर घटक राज्यांप्रमाणेच आहेत. घटना धर्मनिरपेक्षता तत्त्वावर आधारलेली आहे. जम्मू आणि काश्मीरवरील भारताच्या निवडणूक मंडळाची व उच्चतम न्यायालयाची अधिकारकक्षा वाढविण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचे विधानसभेने ठरविले.
शासनाच्या सोयीसाठी जम्मू व काश्मीर राज्याचे काश्मीर (सरहद्दीवरील लडाख भाग धरून) आणि जम्मू असे दोन प्रांत पाडले. त्यांत श्रीनगर, बारमूल, अनंतनाग, लडाख, जम्मू, उधमपूर, कथुआ, दोडा, पूंछ व राजौरी हे दहा जिल्हे असून ३ नगरपालिका, ६ नगरक्षेत्र समित्या व २४ अभिसूचित क्षेत्र समित्या आहेत. श्रीनगर ही राजधानी आहे. अधिकृत राजभाषा उर्दू व इंग्रजी आहेत. विधिमंडळ द्विसदनी असून, विधानसभेचे ७५ आणि परिषदेचे ३६ सदस्य आहेत. काश्मीरमधून भारताच्या लोकसभेत ६ व राज्यसभेत ४ सदस्य निवडून दिले जातात. १८ मे १९७४ रोजी लोकसभेत ५ काँग्रेसचे व १ अपक्ष सभासद जम्मू आणि काश्मीर राज्याचे होते.राष्ट्राध्यक्षांनी नेमलेल्या राज्यपालाच्या संमतीनुसार मुख्यमंत्री काम पाहतात. जम्मू येथे उच्च न्यायालय आहे. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसला ६१, नॅशनल काँग्रेसला ५, जनसंघ ३, अपक्ष २ व ४ जागा रिकाम्या असे पक्षांचे सदस्य होते. गुलाम मुहंमद सादिक यांनी मुख्यमंत्रिपदाची सुत्रे हाती घेतली. त्यानंतर १९७४ मध्ये शेख अब्दुल्ला यांना मुक्त करण्यात आले आणि ते जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्री बनले (१९७५).
गोखले, कमल
आर्थिक स्थिती : कृषी हा राज्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. १९७१ च्या जनगणनेप्रमाणे शेतकरी व शेतीकामगार मिळून सु. ९·३२ लाख किंवा एकूण काम करणऱ्याच्या संख्येपैकी ६७·८३ होते. भात, गहू व मका ही मुख्य पिके असून लडाखमध्ये ‘ग्रिम’ नावाची भरड बार्ली, अन्यत्र ‘बकव्हीट’ (रानगहू) सारखी किरकोळ पिके आणि जम्मू प्रदेशात ज्वारी व बाजरी काढण्यात येते. मूग, मटकी वगैरेंसारखी डाळी व कडधान्यांची पिकेही काढतात. शेतीखाली ८·६७ लाख हेक्टर जमीन असून त्यातल्या १·७५ हेक्टरवर एकाहून अधिक पिके निघतात. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेअखेर एकूण ओलित जमीन ३·२३ लाख हेक्टरवर होती. राज्यउत्पन्नाचा ३०% वाटा शेती उत्पादनाचा आहे. १९७२–७३ मध्ये तांदळाचे पीक सु. ३·४३ लाख, गव्हाचे १·८० लाख, मक्याचे ३·८० लाख मे. टन होते. १९७३–७४ मध्ये अन्नधान्ये १०·१३ लाख टन व ६१,००० हे. क्षेत्रातील फळे २·१६ लाख टन असे उत्पादन झाले. १·८६ लाख टन फळे निर्यात झाली. राज्यात १९७३ पर्यंत कथुआ कालवा व प्रताप कालवा या १७,१४० हे. क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या योजना पूर्ण झाल्या असून तावी लिफ्ट योजनेत १३,८४० हे. क्षेत्राला पाणी मिळेल. शिवाय जवस, सरसूसारखी पिके अल्प प्रमाणात काढण्यात आली. चौथ्या योजनेतील संकल्पित २१२ नलिकाकूपांपैकी जम्मू भागात २४ पुरे झाले होते. भातशेतीला शेणखत पाटाच्या पाण्यानेच देण्यात येते, हिवाळ्यात ते साठवून ठेवलेले असते, उन्हाळ्यात गुराढोरांना व शेळ्यामेंढ्यांना शेतात बसवतात. जमिनीला कस आणण्यासाठी दलदलीकाठची गवताळ ढेकळेही शेतात घालतात. गुरचराईनंतर त्या जमिनीवर मका काढल्याने पीक चांगले येते. करेवा या पायऱ्यापायऱ्यांच्या शेतीत कमी पावसाच्या भागात कपाशी निघू शकते. झेलमकाठच्या कुजलेल्या गवताच्या चिखलमातीत मका पिकतो. नद्यांच्या पाण्यात बिलोची झाडे लावून त्या रांगेपासून कडेपर्यंत चिखलाचा भराव घालून तयार केलेल्या जमिनीवर फळे, मका, तंबाखू व मोहरीसारखी पिके काढण्यात येतात. जेमतेम लागवड होऊ शकणाऱ्या जमिनीतून हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीतही भरड गहू व ग्रिमसारखी निकृष्ट बार्लीची पिके लडाखचे कष्टाळू शेतकरी काढतात. काश्मीरखोऱ्यात डोंगरघळीतल्या प्रवाहांचे पाणी करेवा शेतीला पायथ्याच्या भागात, सहकारी ‘कुल’ पद्धतीने शेतांच्या कडेकडेने जाणाऱ्या नागमोडी पाटांनी देण्यात येते. हे डोंगरी प्रवाह नवा गाळ आणून जमिनीचा कसही वाढवतात. सरोवरांच्या पाण्याखालील वनस्पती काढून गुरांना चारा देण्यात येतो. सरोवरांच्या पृष्ठभागांवर तराफे बांधून त्यांवर दलदलीतील ढेकळे व गवत बसवून केलेल्या तरत्या शेतांतून कांदे, बटाटे, टोमॅटो, वांगी, भेंडी, कोबी, नवलकोल, मिरची, गाजर, मुळा, काकडी इ. भाज्यांचे उत्पादन करण्यात येते. शहरांची घाण भाजीपाल्याच्या शेतीत कामी येते. फळबागा हे काश्मीरच्या कृषिव्यवसायातील महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. १९७२–७३ मध्ये फळबागांखालील क्षेत्र ५६,७०० हे. होते व त्या वर्षी या राज्यातून १·५५ लाख टन फळे निर्यात झाली होती. समशीतोष्ण प्रदेशातील बहुतेक फळे आणि उंच प्रदेशात कवचीची फळे मोठ्या प्रमाणात काढण्यात येतात. ताज्या फळांत सफरचंद व सुक्या फळांपैकी जर्दाळू व अक्रोड ही निर्यातीत जास्त असतात. केशराचे उत्पादन अल्प प्रमाणात होते व द्राक्षमळ्यांचे पुनरुज्जीवन चालू आहे. नद्या-तळ्यांतून मच्छीमारी चालते. लडाख, गिलगिट व बल्टिस्तान या प्रदेशांत याक, मेंढ्या, बकऱ्या व तट्टांची पैदास होते. उंच पर्वतप्रदेशात ऋतुमानाप्रमाणे कळपांबरोबर गवताळ माळराने शोधीत हिंडणारे घोष स्थलांतरी भटके मेंढपाळ असतात. कथुआ, जम्मू, उधमपूर, राजौरी या भागांत गाई म्हशी पाळतात, तर हा भाग आणि लडाख सोडून इतर भागांत गाई व मुख्यतः शेळ्या-मेंढ्या पाळतात. कुक्कुटपालन व मत्स्योद्योगही विकास पावत आहेत. १९६६ मध्ये राज्यात १७,९१,००० गाई-बैल ४,२८,००० म्हशी ११,५२,००० मेंढ्या ६,०५,००० शेळ्या ६६,००० घोडे व १५,३५,००० कोंबड्या-बदके होती. वनव्यवसाय कापीव व जळाऊ लाकूडतोडी, मधुसंचय, राळ उत्पादन, औषधी वनस्पती संकलन अशा प्रकारचे आहेत. उपव्यवसाय – रेशमाची पैदास, रेशमी व लोकरी हातमागावरील कापड, कुटिरोद्योग, तसेच कोरीव लाकूडकाम, पॅपया मॅशे (लगदाकाम), चांदीवरचे नकसकाम, गालिचे, गब्बे, नमदे आणि चामड्याचे सामान बनविणे हे हस्तव्यवसाय राज्यात आहेत. रेशमी व लोकरी कापडांवर प्रक्रिया करण्याचे कारखाने श्रीनगरला, राळीचे जम्मू व मिरानसाहेब येथे, लाकडाचे बारमूल येथे आणि साखरेचा नवाबशहरला आहे. राज्यात आता अठरा व्यापारवसाहती चालू करण्यात आल्या आहेत. पर्यटनव्यवस्था हा सर्वप्रमुख उद्योग असून त्या खालोखाल रेशीम-पैदास हा आहे. जे. अँड के. मिनरल्स लि. व जे. अँड के. इंडस्ट्रीज लि. ही दोन राज्य महामंडळे १८ औद्योगिक वसाहतींची व्यवस्था पाहतात. त्यांत धागा कातणाऱ्या गिरण्या, राळ व टर्पेंटाइन कारखाना, रेशीम व लोकरी कापडांच्या गिरण्या, जोडकाम गिरण्या, आगपेटी कारखाना, विटा व कौले कारखाना, सिमेंट कारखाना, पूर्व-प्रतिबलित काँक्रीट कारखाना, इष्टिका संयंत्र यांचा समावेश आहे. रेशीम-पैदास हा महत्त्वाचा मोठा व्यवसाय असून त्यात २,००० लोकांस काम मिळते. शिवाय ४०,०० लोक रेशमाचे कोश मिळविण्याचा जोडधंदा करतात. श्रीनगर येथे एच्. एम्. टी. चा घड्याळांचा कारखाना व इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीजचा अवलंबी कारखाना निघाला आहे. प्रमुख कुटिरोद्योग गालिचे व शाली विणण्याचे आहेत. तसेच लाकडावरील कोरीवकाम व इतर हस्तकला वगैरे परंपरागत व्यवसायांत ६०,००० लोक आहेत. १९६९ अखेर रेशीमकिड्यांच्या अंड्यांची आयात थांबवल्याने वर्षाला १५ लाख रु. परकीय चलन आता वाचू लागले आहे.
१९७२–७३ च्या अर्थसंकल्पात राज्याची अपेक्षित आवक (५५·७९ कोटी रु. केंद्रीय साहाय्य धरून) १०२·२१ कोटी रु. होती व अपेक्षित खर्च १०७·५२ कोटी रु. होता. उत्पन्नात आयकर ३·४४ कोटी राज्य अबकारी ३·१ कोटी वनविभाग ६·७५ कोटी कर्जरोखा ४·४६ कोटी रुपये आणि खर्चात शिक्षण ११·२४ कोटी सार्वजनिक कामे ९·९४ कोटी पाणीपुरवठा १·३१ कोटी आरोग्य ५·९ कोटी पोलीस ५·९ कोटी कृषी २·५३ कोटी कारभार १·७६ कोटी कर्जसेवा १६ कोटी रुपये या प्रमुख बाबी होत्या. १९७२–७३ ची वार्षिक योजना खर्चाची तरतूद ४०·७२ कोटी रु. होती. स्वातंत्र्योत्तर काळात गंडेरबाल (१५ मेवॉ.), चेनानी (१५ मेवॉ.) व कालाकोट (२२·५ मेवॉ.) या विद्युत् योजना पूर्ण झाल्या आहेत. अपरसिंदे योजना, लेअर झेलम हायडेल योजना, सलाल जलविद्युत् योजना या कार्यान्वित आहेत. १९७३–७४ मध्ये वीजनिर्मिती क्षमता ८३ मेवॉ. ची होती. राज्यातील १,४१२ गावांत १९७३ पर्यंत वीज पोहोचलेली आहे. पर्यटनव्यवस्था हा राज्याचा एक महत्त्वाचा अर्थदायी उद्योग आहे. १३० कुटिरे, १३८ निवासस्थाने व ४१३ नौकागृहे पर्यटकांसाठी सिद्ध असून २० प्रवासी एजन्सीज नोंदलेल्या आहेत.
दळणवळण : क्रमांक १ ए हा राष्ट्रीय हमरस्ता जम्मूपासून उधमपूरवरून बनिहाल बेगद्यातून श्रीनगरवरून बारमूल व उरीपर्यंत जातो. जम्मु ते पूंछ व श्रीनगर ते सोनमर्ग हे दोन पक्के रस्ते वगळल्यास सोनमर्गहून बुझिर्ल खिंडीतून गिलगिटवरून मिंटाका खिंड हा उत्तरेकडचा आणि सोनमर्गहून झाजी खिंडीतून करगिलवरून लेह हा पूर्वेचा, हे डोंगरी रस्ते केवळ तट्टू, खेचर, याक यांच्या मदतीने वाहतूकीस शक्य आहेत. लेहहून दक्षिणेस हिमाचल प्रदेशातील मनालीपर्यंत, पूर्वेस तिबेट सीमेवरील साका खिंडीपर्यंत आणि उत्तर सीमेला काराकोरम खिंडीपर्यंत दुर्गम पर्वतीय पथ आहेत. झेलम नदीचा उपयोग मुझफराबादपर्यंत नावेने मालवाहतुकीसाठी होऊ शकते. ३ डिसेंबर १९७२ रोजी जम्मू-पठाणकोट हा लोहमार्ग सुरू होऊन हे राज्य भारतीय रेल्वेशी जोडले गेले. पाऊस, धुके किंवा बर्फ नसेल तेव्हा विमानवाहतूक दिल्ली ते श्रीनगर किंवा जम्मू अशी होऊ शकते. १९७१-७२ मध्ये राज्यात पक्के ५,५६४ आणि कच्चे ३,२६२ मिळून ८,८२६ किमी. रस्ते होते. १९७२ मध्ये राज्यात सरकारी आणि खाजगी १,१४० बसगाड्या होत्या. ३,३३० खाजगी गाड्या व जीप ५,२६० ट्रक व २,०८० मोटार सायकली ३९५ टॅक्सी ५७ ऑटोरिक्षा ही इतर वाहने होती. १९६८ मध्ये ३५३ दूरध्वनी केंद्रे व सुमारे ६,००० दूरध्वनी होते.श्रीनगर, जम्मू व दिल्ली यांत थेट दूरध्वनी सेवा उपलब्ध आहे. १९७३ अखेर जम्मू, लेह व श्रीनगर येथे आकाशवाणी केंद्रे असून २,३५,४१६ रेडिओ परवाने होते. जानेवारी १९७३ मध्ये श्रीनगर येथे दूरचित्रवाणी केंद्र सुरू झाले व १९७३ अखेर राज्यात ८०६ दूरचित्रवाणी यंत्रे होती. काश्मीर खोऱ्यात २७२ सामूहिक यंत्रे बसविलेली आहेत. १९७३ मध्ये राज्यात १९ दैनिके, १११ साप्ताहिके व २३ इतर नियतकालिके प्रसिद्ध होत होती.
लोक व समाजजीवन : काश्मीरी लोक बव्हंशी आर्यवंशीय आहेत. १९७१ च्या शिरगणतीत राज्याच्या एकूण ४६ लाखांवर प्रजेपैकी सु. ३०·४ लाखांवर मुस्लिम, १४ लाखांवर हिंदू, अर्धा लाख बौद्ध, एक लाखावर शीख व अत्यल्प संख्येत ख्रिस्ती (७,१८२), जैन व १,१५० अन्य धर्मीय होते. बरेचसे काश्मीरी मुसलमान जुने धर्मांतरित हिंदू आहेत. त्यांच्यात सुन्नी पंथीय बहुसंख्य असून शिया, वहाबी, मैलवी, नूरबक्षिया, नक्षबंद अशा पंथांचे किंवा उपपंथांचे आहेत. मुस्लिमांतही व्यवसायानुसार जातिभेद आढळतो पण ते सामान्यतः सौम्य, कष्टाळू व शांतताप्रिय लोक आहेत. हिंदूंत ब्राह्मण काश्मीरी पंडितांचा भरणा विशेष आहे. ते शैवपंथी पण हिंदूंच्या शिव, विष्णू, देवी या परंपरागत देवता मानणारे आहेत. या देवतांखेरीज रघुनाथ, कृष्ण, महावीर, भैरवनाथ, गणेशजी, शारदादेवी ही दैवते व वीर, सती, नाग अशी प्रतीकेही त्यांना पूज्य असतात. जम्मू भागातील डोग्रा हे हिंदू व मुस्लिमही आहेत. गिलगिट प्रदेशातील शिया इस्माइली पंथांचे आहेत, तर बल्टिस्तानातील सुन्नींचे उपपंथ स्थानिक श्रद्धांनुसार विविध आहेत. लडाखचे बौद्ध लामा पंथाच्या रक्तवस्त्र व पीतवस्त्र अशा दोन शाखांचे आहेत. काश्मीरी मुसलमानांत अजूनही जुन्या हिंदू चालीरीती आढळतात. जातकर्म, उपनयन व विवाह या संस्कारांत धर्म भिन्न असले, तरी काही रुढी मुस्लिमांत सारख्या दिसतात. असे समारंभ पुष्कळ दिवस चालतात आणि त्यांत मुसलमान स्त्रियाही भाग घेतात. विवाहप्रसंगी वधूवरांना गोलाकार रंगीत ‘व्यूग’नामक आकृतीवर उभे करुन साखर खायला देतात व नंतर सप्तपदी होते.सामान्यतः वधूवरांची निवड आईबापच करतात. जम्मूच्या हिंदूंत आणि लडाखच्या मुसलमानांतही साटेलोटे-वधूच्या भावाचे वराच्या बहिणीशी लग्न पद्धत होती. बराला या जमातीत इच्छुक वराला भावी सासऱ्याकडे नोकरी करावी लागे, लडाखी बौद्धात बहुपतित्वाचा रिवाज असे, परिस्थितीबरोबर अशा जुन्या प्रथाही बंद होत आहेत. काश्मीरी लोक संपन्न जीवनाचा उपभोग हौसेने घेणारे असून समारंभांत व जत्रांत उत्साहाने भाग घेतात. अमरनाथ, त्रिकूटतीर्थ येथील तशाच विष्णुदेवीची, चिनेनी शिवाजीची अशा जत्रा लोकप्रिय आहेत. लोकरी, वसंतोत्सव, वैशाखी हे ऋतूत्सव सर्वत्र साजरे होतात. महाशिवरात्र (हेरथ), चैत्री पाडवा व पौष अमावस्या (खिचमावस) हे सण पाळण्यात येतात. मुसलमानांचा सैयद अब्दुल कादर जिलानी हा राष्ट्रीय संत आहे. १९७१ मध्ये पाकने आणि चीनने व्यापलेला प्रदेश वगळून उरलेल्या क्षेत्रात वस्तीची सरासरी घनता दर चौ. किमीस ४५·५ होती. १९७१ च्या शिरगणतीत दर हजार पुरुषांमागे ८७८ स्त्रिया हे प्रमाण होते. लोकसंख्येपैकी खेड्यांत ८३% व नगरांत १७% असून १ लाखांवर वस्तीची शहरे श्रीनगर व जम्मू, ५ ते ५०,००० वस्तीची नगरे २१ व ५,००० हून कमी वस्तीची नगरे २१ होती. खेड्यांची संख्या ६,५०३ होती. राज्यात अनुसूचित जातीचे लोक सु. ३·८१ लाख होते. १९७२ मध्ये साक्षरतेचे प्रमाण पुरुषांत २६·७५%, स्त्रियांत ९·२८% व एकूण प्रजेचे १८·५८% होते. सु. १३·७३ लाख कामकऱ्यापैकी शेतीवर ९·३२ लाख, गृहउद्योगात ०·५५ लाख, कारखान्यांत व इतर सेवांत मिळून १.६ लाख, व्यापार व वाहतुकीस १०५·७ लाख, वनोद्योग-मच्छीमारी -खाणी मिळून ०·५२ लाख व इतर नोकरीधंद्यांत ०·६९ लाख होते. काश्मीरी मुसलमान काटक, मेहनती व हरहुन्नरी असून उद्येगांत गुंतलेले राहतात. पण काश्मीरी हिंदूंची प्रवृत्ती कारकुनी, शिक्षकी, अंमलदारी अशा प्रकारच्या धंद्यांकडे अधिक आढळते. मुस्लिमांचा पेषाख गोल टोपी, खमीस-जाकीट व ढिला चुणीदार पायजमा असा असतो. विशेष प्रसंगी ते शेरवानी किंवा लांब डगला घालून समारंभात शालही पांघरतात. हिंदू पंडित खांद्यावर उपरणे घेऊन कान झाकून रेखीव फेटा बांधतात. मुसलमान स्त्रियाही सलवार व कमीस पेहरून डोक्याला कसबा (रंगीत रुमाल) बांधतात. त्यांच्या पोषाखांवर कशिदा व नक्षी भरपूर असते. नानारंगी खड्यांचे व चांदीचे अलंकार घालण्याची त्यांना हौस असते. फक्त शहरांत त्या बुरखा घेतात. हिंदू स्त्रिया डोक्याला तरंगा (चौकोनी पांढरा रुमाल) बांधून वेणीसारखा मलमलीचा शेपटा पाठीवर सोडतात. आता शहरांतून स्त्री-पुरुषांचे पोषाख इतर भारतीयांसाखरे आधुनिक होत चालले आहेत. आहारात भात, भाजी, डाळ-रोटी, प्रसंगी मांस-मासळी हे पदार्थ हिंदु-मुस्लिमांत सामायिक आहेत. मोसमात मिळणारी फळेही खाण्यात येतात. चहा आणि तंबाखूचे सेवन सर्वत्र चालते. घरे बहुधा लाकडी दुमजली असतात. तळमजल्याला गुरेढोरे आणि वरच्या मजल्यावर माणसे राहतात. पक्की विटांची घरे फक्त शहरांतून अगदी थोडीच दिसतात. कडक थंडीमुळे उबदार कपड्यांशिवाय अगदी अंगालगत कांग्री नावाची शेगडी घेण्याची इकडे पद्धत आहे, किंबहुना कांग्री हे काश्मीरचे वैशिष्ट्य आहे.
भाषा व शिक्षण : काश्मीर खोऱ्यात, बुर्झिल व झोजी खिंडींपर्यंतच्या प्रदेशात, त्याचप्रमाणे बनिहाल, रामबन व भद्रवाह या भागांत मिळून सु. २५,००० चौ. किमी. क्षेत्रातील अंदाजे २० लाख लोक काश्मीरी भाषा बोलतात. तिच्याखेरीज राज्यात डोग्री, लडाखी, पंजाबी, बाल्टी, दर्डी, उर्दू, बोधी व पहाडी भाषा बोलणारेही आहेत. जम्मूतील किश्तवारची किश्तवाडी ही काश्मीरचीच एक उपभाषा आहे. ‘कःशुर’ नामक मूळ देशभाषेचा उल्लेख तेराव्या शतकात प्रथम झालेला आढळतो. चौदाव्या शतकापर्यंत काश्मीरी भाषा शारदा लिपीत व नंतर फार्सीत लिहिली गेली. अलीकडे ती देवनागरी लिपीत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. पंधराव्या शतकातील महानयप्रकाश हा सर्वांत प्राचीन काश्मीरी ग्रंथ मानला जातो. या भाषेच्या आदिकालातील रचना बव्हंशी धार्मिक व आध्यात्मिक होत्या. शितिकंठ, लल-द्यद वा लल्लेश्वरी, भट्टावतार, सूफी कवी शेख नूर-उद्-दीन नूरानी यांचे साहित्य त्या काळातले. प्रबंधकालात लौकिक, ऐतिहासिक व पौराणिक विषयांवर लेखन झाले. गीतिकालातील भावकाव्यावर फार्सी छाप स्पष्ट होती हे हब्बा खातून, मिर्झा अकमल-उद्-दीन, साहिब कोल यांच्या कृती दर्शवितात. प्रेमाख्यानकालात पौराणिक इराणी कथांच्या आधाराने रमझान बट्ट, परमानंद, श्रीकृष्ण राझदान यांनी काव्ये केली. आधुनिक काळात वह्हाब परे, मक्बूल शाह, रसूल मीर, महजूर इ. लेखक काश्मीरी साहित्यात भर घालीत आहेत.
राज्यात १९७१ च्या जनगणनेप्रमाणे २६·७५% पुरुष व ९·२८% स्त्रिया असे साक्षरतेचे प्रमाण होते. राज्यात प्राथमिकपासून उच्च पदवीपर्यंत मोफत शिक्षण आहे. १९७२ मध्ये ६ ते ११ वयाच्या मुलांपैकी ६४% मुले शाळांत होती. ५,३६३ प्राथमिक शाळांतून ६,९४५ शिक्षक व २,५३,००० विद्यार्थी १,४०६ मिडलस्कूल्समधून ६,४८३ शिक्षक व १,६६,००० विद्यार्थी ५७७ माध्यमिक शाळांतून ८,३८१ शिक्षक व २,११,००० विद्यार्थी १९ महाविद्यालयांतून १,०५३ शिक्षक व २५,००० विद्यार्थी ११ व्यावसायिक शिक्षणसंस्थांतून ३७० शिक्षक व ३,००० विद्यार्थी आणि २ विद्यापीठांतून १४६ शिक्षक व १,७८० विद्यार्थी होते. विद्यापीठांत ३१ विभाग व ४० संल्ग्न महाविद्यालये असून त्यांशिवाय १ कृषी, १ अभियांत्रिकी, २ अध्ययन, २ तांत्रिक व २ कला, १ वाणिज्य, २ वैद्यकीय आणि १ आयुर्वेदीय महाविद्यालये होती. जाग्रोटा येथे सैनिकी शाळा आहे. हुशार मुलांसाठी मानसबल येथे निवासी स्कूल निघत आहे.
आरोग्य : १९७३ मध्ये राज्यात ३२ रुग्णालये व ४,६०० वर खाटा, २४३ प्राथमिक वैद्यकीय केंद्रे व सु. ६०० चिकित्सालये व औषधालये होती. कुटुंब नियोजन केंद्रे ७५, डॉक्टर १,०४०,४०० वर परिचारिका, १०० वर दाया, साहाय्यक दाया व परिचारिका २७८, हकीम व वैद्य ४३१ होते व दरडोई आरोग्यावर खर्च वार्षिक रु. १४·७५ होता.
कला : रेशमी व लोकरी शालींवर अप्रतिम भरतकाम, कशिदा, अक्रोडाच्या लाकडावरील कोरीवकाम, कागदलगद्याच्या सुंदर वस्तू, धातूच्या भांड्यांवरील नक्षी, लाखेरी लाकूडकारागिरी, वेताच्या करंड्या, नामांकित गालिचे, नमदे व चामड्याचे सफाईदार काम या कलांबद्दल काश्मीरची प्रसिद्धी भारताप्रमाणेच परदेशांतही आहे.
क्रिडा : पोलो हा तट्टांवर बसून खेळण्याचा मैदानी खेळ गिलगिट विभागातच प्रथम निघाला अशी परंपरागत समजूत आहे. तेथील लोक या खेळात प्रवीण असतात. श्रीनगरला होड्यांच्या शर्यती हा नव्यानेच सुरू केलेला खेळ लोकप्रिय झाला आहे.
पर्यटन : पर्यटनव्यवस्था व्यवसायाकडे शासनाने विशेष लक्ष पुरविले आहे. गुलमर्ग, चष्मशाही, कुकरनाग, अच्छीबल, दल सरोवर, पहलगाम इ. पर्यटन केंद्रे विकसित करण्यात आली आहेत. पर्यटकांसाठी विविध प्रकारचे निवास आणि क्रीडा यांची सोय केलेली आहे. पठाणकोट-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ८५ खास राज्यपरिवहन बसगाड्या धावतात. प्रेक्षणीय स्थळांच्या सहलींसाठी आरामगाड्या व मोटारींची सोय केलेली आहे. ठिकठिकाणी निवास व खाद्यपेयांची व्यवस्था आहे. हिवाळी बर्फ खेळांचे केंद्र म्हणून गुलमर्गचा खास विकास करण्यात येत आहे. विमानाने, मोटारीने किंवा बसने प्रथम श्रीनगरला जाऊन तेथून सर्व ठिकाणी जाता येते. राज्याचे पर्यटन खाते प्रवाशांच्या सुखसोयी पाहण्यात तत्पर आहे.
प्रेक्षणीय स्थळे : निसर्गसौंदर्याचे वैभव काश्मीरमध्ये जगातील फारच थोड्या प्रदेशांस लाभले आहे. भारताचे नंदनवन ठरलेल्या या राज्यात श्रीनगरजवळची शालीमार, चष्मशाही, निशात, नसीम अशी रमणीय उद्याने गुलमर्ग, खिलनमर्ग, सोनमर्ग हे नयनमनोहर भूप्रदेश पहलगाम, अमरनाथ, लिद्दार दरी, हरमुख, नंगापर्वत अशी निसर्गदृश्ये वुलर, दल, मानसबल, गंगाबल, शेषनाग, कौंसरनाग, नीलनागसारखी सरोवरे अच्छीबल, कुकरनाग, व्हेरनाग, अनंतनागादी झरे पीर पंजाल, बनिहाल, झोजी, बुर्झिल अशा खिंडी मार्तंडमंदिर, वैष्णवदेवी, जम्मू-त्रिकुटा, तुलामुला, क्षीरभवानी, शंकराचार्य टेकडी, शारदा, दुर्गादेवी इ. प्राचीन मंदिरे श्रीनगरची शाह हमदान, हजरतबाल व पत्थर या मशिदी ही प्रेक्षणीय स्थळांत विशेष उल्लेखनीय आहेत.
ओक, शा. नि.
संदर्भ :
1. Bamsai, P. N. K. A History of Kashmiri, Delhi, 1962.
2. Bose, S. C.Geography of the Himalaya, New Delhi, 1972.
3. Government of India, Publications Division, India: A physical Geography, New Delhi, 1968.
4. Raina, A. N. Geography of Jammu and kashmir, New Delhi, 1971.
5. Spate, O. H. K. Learmonth, A. T. A. Farmer, B. H. India, Pakistan and Ceylon– The Regions, New Delhi, 1972,
6. Sufi, G. M. D. Kashmir, 2. Vols., New Delhi, 1974.
“