जनांकिकी : (लोकसंख्याशास्त्र, डेमोग्राफी). जनसमूह, त्यामधील व्यक्तींची संख्या, जनसमूहाचे निरनिराळे स्तर, वैशिष्ट्ये, भौगोलिक विभागणी, लोकसंख्येची होणारी वाढ इ. दृष्टीकोनांतून केलेला लोकसंख्येचा शास्त्रशुद्ध अभ्यास हा जनांकिकी या शब्दाचा प्रचलित अर्थ आहे. लोकसंख्येच्या अभ्यासाला दिवसानुदिवस वाढते महत्त्व येत असल्याने आधुनिक काळात जनांकिकी हा वेगळ्याच अभ्यासाचा विषय झालेला आहे.
इतिहास व विकास : लोकसंख्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यासास सतराव्या शतकात लंडनमधील जॉन ग्रँट या शास्त्रज्ञांपासून सुरुवात झाली, असे म्हणण्यास हरकत नाही. त्यांनी आपले सिद्धांत नॅचरल अँड पोलिटिकल ऑब्झर्व्हेशन्स …. मेड अपॉन द बिल्स ऑफ मॉर्टॅलिटी इन लंडन (१६६२) या पुस्तिकेमध्ये प्रसिद्ध केले. या पुस्तिकेत त्यांनी उपलब्ध माहितीच्या आधारावर आयुर्मान सारणी (दिलेल्या कोणत्याही वयाला मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्या देणारी विमाविषयक सारणी) कशी तयार करता येईल, याचा आराखडा दिला. एकाच वेळी जन्मलेल्या बालकांचा समुदाय घेतला, तर विवक्षित वयापर्यंत त्यापैकी किती जिवंत असतील व त्या वयापर्यंत जिवंत असणाऱ्यांची त्या वयानंतर सरासरी आयुर्मर्यादा किती वर्षे असेल हे या सारणीवरून कसे काढता येईल, हे त्यांनी दाखविले. १६९३ मध्ये एडमंड हॅली या ज्योतिषशास्त्रज्ञांनी जर्मनीतील वयगटसापेक्ष मृत्युसंख्येच्या प्रत्यक्ष माहितीवर आधारित अशी पहिली प्रत्यक्ष अनुभवाधिष्ठित आयुर्मान सारणी तयार केली. मॅल्थस यांनी १७९८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या लोकसंख्या तत्त्वांवरील निबंधात आर्थिक दृष्टिकोनातून जनांकिकीचा अभ्यास केला होता.
यानंतरचा बराच काळ जनांकिकीच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय मंदगतीचा गेला. संशोधनास जरूर ती जन्म-मृत्यू व लोकसंख्येबद्दलची माहितीच त्या काळात जरूर त्या स्थितीत उपलब्ध नव्हती, हे त्यामागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे या काळात जनांकिकीविज्ञांचे लक्ष प्रथम संशोधनास जरूर ती जनांकिकीय आकडेवारी विश्वसनीय स्वरूपात व जास्तीत जास्त प्रमाणात (उदा., संपूर्ण देशासाठी) कशी गोळा करता येईल, इकडे केंद्रित होते. याबाबतीत एकोणिसाव्या शतकातील इंग्लंडमधील रजिस्ट्रार जनरल विल्यम फार यांचे नाव उल्लेखनीय आहे. त्यांनी जन्म, मृत्यू यासंबंधीच्या नोंदी आणि जनगणनेतील माहिती गोळा करण्याच्या पद्धती यांमध्ये सुधारणा करून सुसूत्रता आणली त्यानी इंग्लंडच्या लोकसंख्येच्या निरीक्षणांवर आधारलेली आयुर्मान सारणी १८६४ मध्ये प्रसिद्ध केली. १९३९ मध्ये आल्फेड जे. लोट्का यांनी जन्म, मृत्यू आणि लोकसंख्येची वयवार विभागणी यांमधील संबंध दाखविणारे सिद्धांत प्रस्थापित केले.
वरील माहितीवरून असे दिसून येते की, जनांकिकी हा विषय काही अगदी नवीनच नाही. ऐतिहासिक काळातही लोकसंख्येच्या मोजणी बाबत बरेच प्रयोग झालेले आढळतात. लोकसंख्येच्या आकडेवारीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण व त्याचा उपयोग यांचा विकास मात्र आधुनिक काळातच होऊ लागला, असे दिसते. जनांकिकीचा अर्थशास्त्र, समाजशास्त्र, सांख्यिकी, मानसशास्त्र, आनुवंशिकी, मानवविषयक भूगोलशास्त्र इ. विषयांशी अतिशय निकट संबंध आहे. म्हणूनच अगदी अलीकडेपर्यंत जनांकिकी हे इतर शास्त्रांपासून पूर्णतया वेगळे मानले जात नव्हते.
जनांकिकीय आधारसामग्रीची साधने : एखाद्या जनसमूहाचा अभ्यास हा मुख्यत्वेकरून पुढील पिढीमध्ये लोकसंख्येची पुनःस्थापना कसकशी होईल याविषयीचा अभ्यास असतो. व्यक्ती ही जरी मर्त्य असली, तरी जनसमूह हा सतत अस्तित्त्वात असतो. म्हणजेच जनसमूहाचे घटकत्त्व नेहमी बदलते असते. प्रतिवर्षी काही बालके जन्माला येतात, तर काही माणसे मरतात. याशिवाय स्थलांतरानेही जनसमूहाच्या घटकांमध्ये निव्वळ वाढ अगर घट होऊ शकते. म्हणूनच लोकसंख्येमधील वाढ, घट अगर आहे ती लोकसंख्या टिकून राहणे हे जननक्षमता, मृत्यू व स्थलांतर या तीन गोष्टींवर प्रामुख्याने अवलंबून असते, हा एक सोपा परंतु महत्त्वाचा असा जनांकिकीय निष्कर्ष आहे.
जनांकिकीय आकडेवारी ही विविध मार्गांनी गोळा केलेली असते. जनगणनेच्या वेळी लोकसंख्या आणि तिच्यातील व्यक्तीची सामान्य माहिती गोळा केली जाते. प्रत्येक गावामध्ये अगर शहरामध्ये जन्म आणि मृत्यू किती झाले, यासंबंधीची माहिती त्या त्या गावच्या नोंदवह्यांमध्ये मिळते. याशिवाय काही ठिकाणी विवाह, घटस्फोट, महत्त्वाचे आजार, व्यक्तींचे स्थलांतर, परदेशातून या देशात येणाऱ्या अथवा या देशातून परदेशी जाणाऱ्या व्यक्ती यांसंबंधी माहिती देणाऱ्या नोंदवह्या ठेवतात. यांशिवाय काही विशिष्ट जनसमूहांचा अभ्यास करण्यासाठी प्रतिदर्श (नमुना) पाहण्या आयोजित करून निवडक माहिती गोळा केली जाते.
जननक्षमता : जननक्षमतेसंबंधीचे जनांकिकीय अभ्यास म्हणजे मानवी प्रजोत्पादनाविषयीचे अभ्यास असतात. मुख्यत्वेकरून जननक्षमतेवर ज्या सामाजिक व आर्थिक घटकांचा परिणाम होतो. त्यांचा अभ्यास येथे केलेला असतो. जननक्षमता (फर्टिलिटी) व प्रसवशक्ती (फेकण्डिटी ) या दोन संज्ञा निरनिराळ्या अर्थाने वापरतात. जननक्षमता ही संज्ञा प्रत्यक्ष अगर वास्तव परिस्थितीत होणारे प्रजोत्पादन या अर्थी वापरतात व प्रजोत्पादन करण्याची स्त्रीची अंगभूत शक्ती या अर्थाने प्रसवशक्ती ही संज्ञा वापरतात.
जननक्षमता तीन गोष्टींवर अवलंबून असते : (१) स्त्रीचे लग्नाच्या वेळचे वय, (२) स्त्रीने जननक्षम अवस्थेतील विवाहित स्थितीत घालविलेला काळ आणि (३) लागोपाठच्या दोन मुलांमधील सरासरी अंतर अगर ‘पाळणा’. स्त्रीच्या आयुष्यातील सु. पंधराव्या वर्षापासून ते वयाच्या ४५ अगर ५० व्या वर्षापर्यंत म्हणजे सु. ३० ते ३५ वर्षाच्या काळात स्त्री जननक्षम असते म्हणजे ती अपत्यांना जन्म देऊ शकते. जीवनविज्ञानदृष्ट्या जरी स्त्रीला या काळात (जर ती हा सर्व काळ विवाहित असेल तर) चौदा-पंधरा अगर अधिकही मुले होण्याची शक्यता असली, तरी आधुनिक जगात दहापेक्षा अधिक मुले असणाऱ्या स्त्रिया विरळाच आढळतात. उत्तर अमेरिकेतील हुटेराइट्स या जमातीतील स्त्रियांची जननक्षमतेची पातळी फारच वरची आहे, असे मानले जाते. त्या जमातीतही स्त्रियांना सरासरी नऊ मुले असल्याचे आढळते. कोकोस बेटामधील मलायी स्त्रीला होणाऱ्या मुलांची सरासरी ८·४ आहे. कॅनडातील क्वेबेक राज्यात दर स्त्रीला सरासरी ९·९ मुले व ब्राझीलमध्ये सरासरी ८·८ मुले हे प्रमाण आढळते. चिनी अगर मुस्लिम स्त्रियांना सरासरी ७ ते ८ मुले असतात. वरील आकड्यांशी तुलना करता भारतीय स्त्रीच्या मुलांची सरासरी ६ ते ७ आहे. म्हणजे कमीच आहे.
कोणत्याही जनसमूहामधील स्त्रियांच्या जननक्षमतेचे मान अजमाविण्यासाठी जनांकिकीविज्ञांनी काही परिमाणे शोधून काढली आहेत. स्त्रिया एका ठराविक कालावधीत अगर एका वर्षात किती बालकांना जन्म देतात, या प्रकारच्या माहितीवर जननक्षमतेची काही परिमाणे आधारलेली आहेत. दुसरी काही परिमाणे एकाच वर्षी जन्मलेल्या अगर एकाच वर्षी विवाह झालेल्या ठराविक स्त्रीसमूहाला जननक्षमतेच्या काळात किती मुले झाली, यावर आधारलेली असतात.
स्थूल जन्म प्रमाण :हे सर्वसामान्य वापरात असणाऱ्या जननक्षमतेच्या परिमाणांपैकी एक आहे. एखाद्या लोकसंख्येमध्ये एका वर्षाच्या कालावधीत जितके जन्म झाले असतील, त्या संख्येचे त्या कालावधीत जिवंत असलेल्या सरासरी लोकसंख्येशी प्रमाण यालाच स्थूल जन्म प्रमाण म्हणतात. सामान्यतः हे प्रमाण दर हजारी–हजार लोकसंख्येमध्ये–जन्माचे प्रमाण या स्वरूपात निर्दिष्ट करतात.
जननक्षमतेचे सर्वसामान्य प्रमाण :याची व्याख्या एका वर्षाच्या कालावधीत झालेल्या जन्मांच्या संस्थेचे त्या कालावधीत असणाऱ्या जननक्षम वय गटातील स्त्रियांच्या सरासरी संख्येशी असणारे प्रमाण अशी करतात, मग त्या स्त्रिया विवाहित असोत वा नसोत. हे प्रमाणही जन्मलेल्या मुलांचे दर हजार स्त्रियांशी प्रमाण या स्वरूपात दिले जाते. या प्रकारचे प्रमाण जर एखाद्या वयगटात असणाऱ्या स्त्रियांना अनुसरून काढले, तर त्याला वयगट सापेक्ष जननक्षमतेचे प्रमाण म्हणतात. सर्व स्त्रियांऐवजी जर फक्त विवाहित स्त्रियांसाठी हे प्रमाण काढले, तर त्याला विवाहितस्थितीसापेक्ष जन्माचे सर्वसामान्य प्रमाण असे म्हणतात. याप्रमाणे वय, वैवाहिक स्थिती, विवाहित स्थितीत स्त्रीने घालविलेला काळ यांनुसार जननक्षमतेची विशिष्ट प्रमाणे काढतात. ही सर्व परिमाणे दर हजारी (दर हजार स्त्रियांमागे) प्रमाण या स्वरूपात सांगितलेली असतात.
एकूण जननक्षमतेचे प्रमाण :स्त्रीच्या वयवार जननक्षमतेच्या प्रमाणाची बेरीज केल्यास हे एकूण प्रमाण मिळते. म्हणजेच स्त्रीजननक्षमतेच्या संपूर्ण काळात किती बालकांना जन्म देऊ शकेल, हे या प्रमाणावरून मिळते. मात्र या प्रमाणामध्ये स्त्रिया जननक्षमतेच्या तीस ते पस्तीस वर्षाच्या संपूर्ण काळात जिवंत राहतील व जननक्षमतेच्या वयवार प्रमाणाचे विशिष्ट सूचीप्रमाणे बालकांना जन्म देतील, असे गृहीत धरावे लागते. सामान्यतः हे प्रमाण मात्र दर हजारी न देता एका स्त्रीचे एकूण जननक्षमतेचे परिमाण या स्वरूपात दिले जाते.
प्रजोत्पादनाचे ढोबळ प्रमाण :हा लोकसंख्येच्या पुनः स्थापनेचा एक निर्देशांक आहे. एखाद्या स्त्रीला संपूर्ण जननक्षमतेच्या काळत किती मुली होतील, हे हा निर्देशांक दर्शवितो. अर्थात हे काढताना स्त्री जननक्षमतेचा संपूर्ण काळ जिवंत राहील व जननक्षमतेच्या वयवार प्रमाणांच्या विशिष्ट सूचीप्रमाणे बालकांना (अगर मुलींना) जन्म देईल, हे गृहीत धरलेले असते. सामान्यतः एकूण जननक्षमतेच्या प्रमाणाला नवजात बालकांमधील मुलींच्या प्रमाणाने गुणल्यास हा निर्देशांक मिळतो.
प्रजोत्पादनाचे निव्वळ प्रमाण :हे काढताना वयवार मृत्यूच्या प्रमाणांचाही उपयोग केलेला असतो. एक हजार नवजात मुलींचा समूह घेतल्यास विशिष्ट वयापावेतो त्यांपैकी किती जिवंत राहतील व जननक्षमतेच्या वयवार प्रमाणांच्या विशिष्ट सूचीनुसार किती मुलींना जन्म देतील, यांवरून हे प्रमाण काढलेले असते. वेगळ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास एक हजार स्त्रिया पुढच्या पिढीमध्ये त्या त्या वयाच्या त्यांच्या मुलींच्या रूपाने किती प्रमाणात पुनः स्थापित झालेल्या असतील, हे यावरून समजते. प्रजोत्पादनाचे ढोबळ प्रमाण व निव्वळ प्रमाण ही दोन्ही प्रमाणे दर स्त्रीमागे दिलेली असतात. प्रजोत्पादनाचे निव्वळ प्रमाण एकापेक्षा जास्त असेल तेव्हा आजच्यापेक्षा पुढील पिढीत तुलनात्मक दृष्ट्या जास्त स्त्रिया असतील म्हणजेच स्त्रियांची संख्या त्या प्रमाणात वाढेल, असा निष्कर्ष निघतो.
मृत्यू : मृत्यूमुळे लोकसंख्येवर होणारा परिणाम हा मृत्युविषयक अभ्यासात हाताळला जातो. एखाद्या लोकसंख्येमध्ये एका वर्षाच्या कालावधीत झालेल्या मृत्यूचे त्या कालावधीत जिवंत असणाऱ्या सरासरी लोकसंख्येशी प्रमाण म्हणजेच ‘स्थूल मृत्युप्रमाण ’ होय (सरासरी लोकसंख्या म्हणजे वर्षमध्याचे दिवशीची लोकसंख्या असे मानले जाते). सामान्यतः हा निर्देशांक मृत्यूंचे दर हजारी (एक हजार लोकसंख्येतील) प्रमाण या स्वरूपात दिलेला असतो.
ज्याप्रमाणे जन्मांच्या बाबतीत वयगटसापेक्ष जननक्षमतेचे प्रमाण काढतात त्याप्रमाणेच मृत्यूंचेही वयगटसापेक्ष प्रमाण काढतात. जिवंत जन्माला आलेल्या एक हजार बालकांपैकी वयाचे एक वर्ष पूर्ण होण्याचे आत जी बालके मरतात, त्यांच्या संख्येचे मूळ जन्मलेल्या हजार बालकांशी प्रमाण, याला बालमृत्यूचे प्रमाण म्हणतात. हे प्रमाणही सामान्यतः दर हजारी बालमृत्यूचे प्रमाण अशा स्वरूपात दिले जाते.
आयुष्यात निरनिराळ्या वयांना मृत्यूची जी शक्यता असते, ती लक्षात घेऊन आयुर्मान सारणी तयार करतात. आयुर्मान सारणी ही एखाद्या जनसमुदायाचा जीवितेतिहास दर्शविते. एकाच वेळी जन्मलेल्या १,००,००० नवजात बालकांचा समुदाय गृहीत धरल्यास त्यांपैकी वयाच्या प्रत्येक वर्षी त्या समुदायामधील किती व्यक्ती मरण्याची अगर किती व्यक्ती जिवंत राहण्याची संभाव्यता आहे, दर वयाला मूळ १,००,००० पैकी किती व्यक्ती जिवंत राहतील याचे गणित आयुर्मान सारणीमध्ये केलेले असते. वयाच्या शून्य वर्षापासून (बालकाच्या जन्मापासून) त्या समुदायातील शेवटची व्यक्ती मृत्यू पावेपर्यंत प्रत्येक वयाला पुढील एका वर्षाच्या आत मृत्यूची संभाव्यता किती, जिवंत राहण्याची संभाव्यता किती, जीविताची शिल्लक राहिलेली सरासरी वर्षे किती यांबद्दल माहिती आयुर्मान सारणीद्वारे मिळते. आयुर्मान सारणी हे मानवी जीवनाच्या संपूर्ण कालखंडाच्या निरनिराळ्या उपकालखंडातील मृत्यूची संभवनीयता दर्शविणारे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
लोकसंख्येमधील नैसर्गिक वाढ : जन्म व मृत्यू यांचा लोकसंख्येवर होणारा परस्परविरुद्ध परिणाम लक्षात घेऊन लोकसंख्येमध्ये नैसर्गिक वाढ किती प्रमाणात होईल, ते अजमावता येते. जनांकिकीत बंदिस्त जनसमूह आणि मुक्त जनसमूह असा भेद केला जातो. ज्या जनसमूहाच्या बाबतीत त्यामधील घटकांच्या स्थलांतराचा (आतील घटक जनसमूहाच्या कक्षेबाहेर जाणे अगर बाहेरील घटक आत येणे यासंबंधीचा) प्रश्नच उद्भवत नाही, अशा जनसमूहाला बंदिस्त जनसमूह म्हणतात. अशा जनसमूहात होणारी वाढ (अगर घट) ही जन्मसंख्या आणि मृत्युसंख्या यांतील फरकावरच अवलंबून असते, ज्या जनसमूहाच्या बाबतीत वरील प्रकारचे स्थलांतर शक्य असते, त्या जनसमूहाला मुक्त जनसमूह असे म्हणतात. बंदिस्त जनसमूहाच्या बाबतीत एखाद्या विशिष्ट कालावधीत झालेली जन्मसंख्या व मृत्युसंख्या यांमधील फरकास जनसमूहामधील त्या कालावधीतील नैसर्गिक वाढ म्हणतात. एका वर्षाच्या कालावधीत झालेल्या जन्म व मृत्यू यांच्या संख्यांमधील फरकाचे त्या वर्षातील सरासरी लोकसंख्येशी प्रमाण काढल्यास त्याला ‘नैसर्गिक वाढीचे स्थूल प्रमाण’ म्हणतात.
जेव्हा एखाद्या जनसमूहामध्ये वयगटसापेक्ष जननक्षमतेचे प्रमाण व मृत्यूसंख्येचे प्रमाण वर्षानुवर्षे जसेच्या तसेच राहते तेव्हा असे सिद्ध करता येते की, त्या लोकसंख्येची वयगटवार विभागणीही स्थिर होत जाते व नैसर्गिक वाढीचे प्रमाणही स्थिर होत जाते. असे झाल्यास त्या लोकसंख्येला स्थिर लोकसंख्या म्हणतात आणि स्थिर झालेल्या नैसर्गिक वाढीच्या वार्षिक प्रमाणास ‘नैसर्गिक वृद्धिचे अंगभूत प्रमाण’ असे म्हटले जाते. स्थिर लोकसंख्येमध्ये नैसर्गिक वाढीचे वार्षिक प्रमाण जेव्हा शून्य होते तेव्हा त्या लोकसंख्येस अचल लोकसंख्या असे म्हणतात.
स्थलांतर : मुक्त जनसमूहातील घटकांची वाढ अगर घट ही त्या जनसमूहामधील घटकाचे जन्म व मृत्यू यांनीच फक्त होत नसून घटकांच्या स्थलांतरामुळेही होते. स्थलांतर म्हणजे एका भौगोलिक प्रदेशामधून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशामध्ये तेथे वास्तव्य करण्याच्या हेतूने जाणे. एका सार्वभौम प्रदेशातून–राष्ट्रातून–दुसऱ्या सार्वभौम प्रदेशात–राष्ट्रात–जाणे याला आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणतात आणि देशातल्या देशात स्थलांतर केले असल्यास त्याला अंतर्गत स्थलांतर म्हणतात.
लोकसंख्येच्या भौगोलिक कक्षेतून बाहेर गेलेल्या व बाहेरून आत आलेल्या अशा दोन्ही स्थलांतरितांची बेरीज केली असता त्याला ‘समग्र स्थलांतर अगर स्थलांतराचे ढोबळ परिमाण’ म्हणतात. या दोन प्रकारच्या स्थलांतरितांची वजाबाकी केल्यास त्या फरकास ‘निव्वळ स्थलांतर’ म्हणतात.
विवाह : जगातील निरनिराळ्या देशांत तेथील प्रचलित सामाजिक चालीरीती व रूढींनुसार स्त्रीपुरुषांचे विवाह होतात. विवाहाच्या वेळचे वय, विवाह संख्या, पती व पत्नी यांची आर्थिक व सामाजिक दर्जाविषयक वैशिष्ट्ये, त्यांनी वैवाहिक जीवनात घालविलेला काळ, मृत्यू अगर घटस्फोटादी कारणांमुळे वैवाहिक जीवन खंडित होण्याची शक्यता वगैरे गोष्टींचा विवाहविषयक अभ्यासात समावेश होतो.
एखाद्या वयगटात असणाऱ्या विवाहयोग्य स्त्रियांपैकी एका ठराविक वर्षाच्या कालावधीत त्यांमधील ज्यांचे विवाह झाले असतील, त्या संख्येला त्या वयगटातील मूळच्या विवाहयोग्य स्त्रियांच्या संख्येने भागले म्हणजे ‘वयगटसापेक्ष विवाहप्रमाण’ मिळते. हे प्रमाणही दर हजारी (एक हजार विवाहयोग्य स्त्रियांमध्ये) विवाहांचे प्रमाण अशा स्वरूपात दर्शविले जाते. पुरुषांचे वयगटसापेक्ष विवाहप्रमाणही याच रीतीने काढतात. ज्याप्रमाणे वयगटसापेक्ष मृत्यूच्या प्रमाणावरून आयुर्मान सारणी तयार करतात त्याप्रमाणेच वयगटसापेक्ष विवाह प्रमाणांचा उपयोग करून विवाह सारणी तयार करता येते. विवाहविषयक ढोबळ सारणीमध्ये लग्नाच्या किमान वयापर्यंत हयात असलेल्या स्त्रियांचा (अगर पुरुषांचा) समूह गृहीत समूह मानतात. समूहातील व्यक्तींची संख्या मृत्यूमुळे कमी न झाल्यास प्रत्येक वयाला वयगटसापेक्ष विवाहप्रमाणांच्या सूचीप्रमाणे त्यांपैकी किती व्यक्तींचे विवाह होतील याचे संभवनीय आकडे या सारणीत दिलेले असतात. विवाहविषयक निव्वळ सारणीमध्ये मात्र वयगटसापेक्ष मृत्यूचे प्रमाण व विवाहाचे प्रमाण या दोन्ही गोष्टी लक्षात घेतलेल्या असतात म्हणजेच प्रत्येक वयाला मूळ समूहापैकी किती व्यक्ती हयात असतील व त्यांतील किती व्यक्तींचे विवाह होतील, यांचे संभवनीय आकडे विवाहविषयक निव्वळ सारणीमध्ये मिळतात. येथे मृत्यू अगर विवाह या दोन कारणांनी व्यक्ती मूळ समूहातून निरनिराळ्या वयाला बाद होऊ शकते.
लोकसंख्येवर परिणाम करणारे इतर काही घटक : निरनिराळ्या सामाजिक व आर्थिक गोष्टींचाही लोकसंख्येमधील जननक्षमता, मृत्यू व स्थलांतर यांच्या प्रमाणावर परिणाम होतो. थोडक्यात म्हणजे जनसमूहामधील साक्षरतेचे प्रमाण, दरडोई उत्पन्न, ग्रामीण व शहरी भागांची वैशिष्ट्ये, सार्वजनिक आरोग्याची पातळी, उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सोयी, दळणवळणाच्या साधनांमधील प्रगती वगैरे गोष्टीचाही जननक्षमता, मृत्यू आणि स्थलांतर यांच्या प्रमाणावर परिणाम होतो.
लोकसंख्येचे प्रक्षेपण व लोकसंख्येचे अपेक्षित अंदाज : जननक्षमतेचे, मृत्यूचे व स्थलांतराचे प्रमाण भविष्यकाळात कसकसे बदलत जाईल याबद्दल काही गोष्टी गृहीत धरून त्यांच्या आधारे लोकसंख्येमध्ये भविष्यकाळात किती आणि कशा प्रकारे वाढ होत जाईल, याचा अंदाज लोकसंख्येच्या प्रक्षेपणामध्ये काढलेला असतो. भविष्यकाळातील मनुष्यबळ, अर्थार्जनासाठी श्रम करणाऱ्या व्यक्तींची संख्या, प्रजोत्पादनाचे प्रमाण यांचे अपेक्षित आकडे काढण्यासाठी लोकसंख्येच्या प्रक्षेपणांची जरूरी असते. सामान्यतः जननक्षमता, मृत्यू व स्थलांतर यांबद्दल गृहीत धरलेल्या गोष्टींचा लोकसंख्येच्या भविष्यकाळातील आकारमानावर होणारा परिणाम प्रक्षेणाद्वारे कळू शकतो.
लोकसंख्येबद्दलचे अंदाज मुख्यतः तीन प्रकारचे असतात : (अ) दोन जनगणनांच्या मधील एखाद्या वर्षाबद्दलचे अंदाज, (आ) जनगणनेनंतरच्या वर्षाबद्दलचे अंदाज, (गेल्या जनगणनेपासून चालू वर्षापर्यंतच्या काळामधील अंदाज ) व (इ) भविष्यकाळातील एखाद्या वर्षाबद्दलचे अंदाज. हे लोकसंख्येचे अंदाज विविध पद्धतींनी काढता येतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.
(१) गणितीय पद्धत :लोकसंख्या ही केवळ कालावधीवर अवलंबून असते असे मानले, तर दोन वा अधिक जनगणनांतील लोकसंख्यांचा उपयोग करून लोकसंख्या ही कालाच्या फलनाने (गणितीय संबंधाने) दर्शविता येणे शक्य असते. याकरिता सांख्यिकीतील नेहमीच्या समाश्रयण पद्धती वापरता येतात.
(२) घटक पद्धत : हीमध्ये जननक्षमतेचे प्रमाण, मृत्यूचे प्रमाण व स्थलांतराचे प्रमाण या लोकसंख्यावाढीच्या मुख्य घटकाची भविष्यकाळातील गती वेगवेगळी प्रक्षेपित करतात व त्यावरून लोकसंख्येविषयी अंदाज काढले जातात.
(३) आर्थिक पद्धत :बदलत्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता लोकसंख्येच्या वाढीचा अंदाज, स्वतंत्रपणे करता येणार नाही, हे या पद्धतीत विचारात घेतलेले असते. जननक्षमता, मृत्यू व स्थलांतर यांचे प्रमाण आर्थिक परिस्थितीवरही अवलंबून आहे, हे सर्वमान्य आहे. म्हणून लोकसंख्येचे प्रक्षेपण करताना योग्य त्या आर्थिक घटकांचा स्वतंत्रकारक म्हणून समावेश करणे तर्कशुद्ध ठरेल.
लोकसंख्येच्या प्रक्षेपित अंदाजांची यथार्थता ही मुख्यतः जननक्षमता, मृत्यू व स्थलांतर यांच्या प्रमाणासंबंधी ज्या गोष्टी गृहीत धरलेल्या असतात त्या वास्तवतेला धरून आहेत किंवा नाहीत, यांवर अवलंबून असते. याशिवाय प्रक्षेपणासाठी निवडलेली मूळ लोकसंख्या व प्रक्षेपणाची पद्धती यांवरही प्रक्षेपित लोकसंख्येची यथार्थता अवलंबून असते.
जनांकिकीचे महत्त्व : देशामधील उपलब्ध मनुष्यबळ, नोकरीव्यवसाय, शिक्षण, घरबांधणी, शेती व अन्नविषयक गरजा, सार्वजनिक आरोग्य, कुटुंबनियोजन इ. महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी धोरण आणि कार्यक्रम ठरविण्यासाठी जी माहिती आवश्यक असते, ती जनांकिकीय अभ्यासामुळेच उपलब्ध होते. राष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक योजनांमध्ये असलेले जनांकिकीचे हे महत्त्व दिवसानुदिवस सर्वमान्य होऊ लागले आहे. त्यामुळे जनांकिकीय विश्लेषणासाठी सध्या वापरात असलेल्या पद्धतींमध्ये अनुरूप सुधारणा करणे व नवीन पद्धती शोधून काढणे यांवर अधिकाधिक भर दिला जात आहे. कुटुंबनियोजनाविषयीचा प्रसार व त्यातील अडचणी, वाढत्या लोकसंख्येला आवर घालण्याची आवश्यकता व त्यासंबंधीची शक्यता इ. गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी जन्मसंख्या व मृत्युसंख्या यांचे प्रमाण, निरनिराळ्या आर्थिक व सामाजिक थरांतील, तसेच ग्रामीण व शहरी विभागातील स्त्रियांची जननक्षमता यांबद्दलच्या विश्वसनीय व अचूक जनांकिकीय आधारसामग्रीची आवश्यकता आहे. तसेच कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाचे मूल्यमापन करणे व त्यासंबंधीचे पुढील धोरण आखणे यांसाठी प्रशिक्षित जनांकिकीविज्ञांची आवश्यकता आहे.
संदर्भ : 1. Agarwala, S. N. Population, New Delhi, 1957.
2. Barclay, G. W. Techniques of Population Analysis, New York, 1958.
3. Cox, P. R. Demography, Cambridge, 1959.
4. United Nations, Department of Economic and Social Affairs, Multilingual Demographic Dictionary, New York, 1958.
5. United Nations, Department of Social Affairs, Population Division, The Determinants and Consequences of Population Trend, New York, 1953.
आगरवाला, एस्. एन्. (इं) भाटे, वैजयंती (म.)
“